Saturday, July 15, 2023

चिंतित ' आत्माराम ', घाल मनास लगाम

चिंतित ' आत्माराम ', घाल मनास लगाम!ध्रु.

सुस्थिर होईल तेव्हा मानस
गाई निकटी जैसे पाडस
सुखेनैव जरी घडली कर्मे तोषे आत्माराम!१

नरदेह न हा केवळ कर्मा
पार्था घे रे जाणुनि वर्मा
तरीच सार्थक नरदेहाचे वश जर आत्माराम!२

कर्मव्याप्ती सीमित व्हावी
निर्मळ शांती हृदी मुरावी
सोऽहं भावी रमावयाचे तूच स्वतः भगवान्!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१५.०१.१९७४

(तू मानसा नियमु करी
निश्चळु होय अंतरी
मग कर्मेंद्रिये व्यापारी
वर्ततु सुखे

या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आधारित काव्य. स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन २३ वर आधारित काव्य).

No comments:

Post a Comment