Tuesday, July 18, 2023

सोऽहं सोऽहं स्मरण असो!

' मी हे केले ' भाव नसू दे
' मला फळ हवे ' लोभ नसू दे
अभिमाना चित्ती वाव नसो
सोऽहं सोऽहं स्मरण असो!१

देह नसशि तू, तू नच कर्ता
शिवो न लव चित्तास अहंता
"मी, माझे" येणे मुळी नसो
सोऽहं सोऽहं स्मरण असो!२

सत् चित् आनंदाचा धनि तू
देहाचा तर दास नसशि तू
मी केवळ साक्षी भाव असो
सोऽहं सोऽहं स्मरण असो!३

कर्मे करणे! कशास डरणे?
कर्मबंधनी नच सापडणे
कौशल्य राखणे भान असो
सोऽहं सोऽहं स्मरण असो!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१९.०१.१९७४

(आणि हे कर्म मी कर्ता
का आचरेन या अर्था
ऐसा अभिमानु झणे चित्ता
रिगो देसी
तुवा शरीरपरा नोहावे
कामना जात सांडावे
मग अवसरोचित भोगावे
भोग सकळ

वरील ज्ञानेश्वरीतील ओव्यांवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन २७ वर आधारित काव्य)

No comments:

Post a Comment