Wednesday, July 26, 2023

संग नको विषयांचा!

मनुष्याचा जन्म हा आत्मज्ञानप्राप्तीसाठीच आहे. आत्मज्ञानासारखे पवित्र व आनंददायी दुसरे काही नाही. जागृती याविषयी हवी-  आपण कोण आहो? कोठून आलो? आपल्याला कोठे जायचे आहे? आत्म्याचे असे काही वेगळेच सुख आहे. परंतु परमशांति ज्ञानानेच प्राप्त होते. विषयाचा संग त्यासाठी सुटावा -  सद्गुरुकृपेने कळेल - मी तोच आहे! 

*********

संग नको विषयांचा!ध्रु.

ते सुख नश्वर 
जाळत अंतर 
पेला जणु जहराचा!१ 

कोण असे मी?
तोच तोच मी - 
चल, म्हण "मी देवाचा!" २

संग सोडता 
ज्ञान भेटता
ध्यास जडे भजनाचा!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१०.०६.१९७८

(तरी आत्मसुखाचिया गोडिया 
विटे जो का सकळ विषयां 
जयाच्या ठायी इंद्रियां  
मानु नाही

या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन ३६ वर आधारित काव्य)

No comments:

Post a Comment