नुरला आठव "मी, माझे" ज्या, संन्यासी झाला!
तोच हो संन्यासी झाला!ध्रु.
तोच हो संन्यासी झाला!ध्रु.
देह नव्हे मी पूर्ण बिंबले
निरहंकारी मानस झाले
सुशांत, स्थिर झाला!१
कर्तृत्वाचा भार न उचले
फलासक्त मन कधी न झाले
आत्मरंगिं रंगला!२
विवेक भानु हृदी उगवला
' मी परमात्मा ' कळले त्याला
नि:संगच ठरला!३
कर्तव्याचे भान प्रत्यही
अशा साधका होतच राही
जन म्हणती "हा भला"!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३०.०१.१९७४
(आणि मी माझे ऐसी आठवण
विसरले जयाचे अंतःकरण
पार्था तो संन्यासी जाण
निरंतर
या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधव नाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञान किरणे या पुस्तकातील प्रवचन ३८ वर आधारित काव्य)
No comments:
Post a Comment