Saturday, July 15, 2023

वाट्याला जी आली कर्मे सहज आचरावी!

भगवत्प्राप्ती होण्यासाठी वाटचाल व्हावी 
वाट्याला जी आली कर्मे सहज आचरावी!ध्रु.

हळूहळू विसरावे ' मी पण '
सद्भावांचे करिता पोषण 
जाते घडि ही धर्माचरणि सार्थकि लावावी!१

हेतुरहित कर्मांची सुमने 
ईशचरणि अर्पिणे भक्तिने 
बसल्या स्थानी सोऽहं भावे पूजा बांधावी!२

विवेक औचित्यांची जोडी 
ओढे आयुष्याची गाडी 
अंत:करणी शुचिता कर्मे आपण आणावी!३

फुटेल तेव्हा ज्ञानपहाट 
खुलेल मग मोक्षाची वाट 
भगवत्प्राप्ती पक्व फळासम साधकास व्हावी!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१६.०१.१९७४

(म्हणोनि जे जे उचित 
आणि अवसरेकरूनि प्राप्त 
ते कर्म हेतूरहित आचरे तू 

देखे अनुक्रमाधारे 
स्वधर्मु जो आचरे 
तो मोक्षु तेणे व्यापारे 
निश्चित पावे 

या ज्ञानेश्वरीतील ओव्यांवर आधारित हे काव्य. स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन २४ वर आधारित काव्य)

No comments:

Post a Comment