Thursday, February 15, 2024

नर-नारायण अर्जुन-माधव अद्वैताचा अद्भुत अनुभव !

खरोखर अनेकदा प्रश्न पडतो अर्जुन खरेच अज्ञानी होता का? की त्याने अज्ञानाचे सोंग घेतले होते ?
भगवंताच्या स्‍नेहसुखाचा लाभ कोणाला नकोसा वाटेल?
अर्जुनाची भूमिका देहाभिमानी माणसाची तर भगवंत बोलत आहेत देहातीत अवस्थेतून.
खरोखर ही नर-नारायणाची जोडी पाहून मनात येते-

++++++++++

नर-नारायण अर्जुन-माधव
अद्वैताचा अद्भुत अनुभव ! ध्रु. 

त्या आठविता डोळे झरती
वंदन करण्या कर हे जुळती
दिव्य जोडी ही भारतवैभव!१
 
सांख्ययोग हा माधव गमतो
कर्मयोगिसम अर्जुन नटतो
शिवशक्ती जणु युगुलच अभिनव!२

कृष्‍णसखा वेल्‍हाळ लाभता
अर्जुन अपुले लाड पुरविता
श्रोते स्‍मरती लोभस शैशव!३
 
देहि अर्जुन विदेही माधव
लटक्‍या द्वैती दाविति पाटव
दुग्‍धशर्करा सुयोगसंभव!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment