Thursday, September 12, 2013

गोष्टी गणपतीच्या - गोष्ट पहिली.





अरे बनविता माझी मूर्ती किती रंगता बाबांनो 
गणपती बाप्पा लय आवडता, कळते माया पोरांनो 
मंगलमूर्ती गाता कीर्ती शब्दच फेर जसे धरती 
माती पाणी तेज पोकळी परस्परांना सावरती 
पाण्याचा ओलावा सरला तरीहि भक्तीने भिजला 
मूर्ती आली आकाराला पहा कशी, दाटला गळा 
जडणघडण करताना असली काळिज जे लकलक करते 
श्रीगजानन जय गजानन मलाच ओळखता येते 
आनंदाचे नाव मोरया चिंता गेल्या विलयाला 
चिंतामणी आणू या आपण परिसर गंधे परिमळला 
अमूर्त आले आकाराला आगळाच हा आनंद 
ब्रह्मा जो सृष्टीचा कर्ता त्याचा धरला का छंद 
बाप्पा या ना सदना लवकर, उठा उचलतो हातात 
वेल जपतसे फुला तसे हो हळवेपण या चित्तात 
आनंदाचे आसू झरती श्रावणझड ही थांबेना 
लगीन लाजे असली घाई, मलाही हासू आवरेना 
मूर्ती हसली, मूर्तिकारही निरोप देता रडवेला 
ग्राहकराजा कृतज्ञ मोठा मूर्ती घेता गलबलला 
सांभाळावे एकामेका नकळत झाला संस्कार 
गणपती बाप्पा मूर्ती तुमची तुमच्यावाणी दिलदार 
अशा ओळी वीस, एकवीस दुर्वा घ्या 
आपलेच घर बाप्पा, घरात या आम्हा घ्या!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
#गोष्टी गणपतीच्या

No comments:

Post a Comment