तुला शोधणे पुढची वाट
खेळ चाललासे द्वंद्वाचा
अवघड आहे जीवनघाट
नकोस जाऊ तरी बावरुन
तुला शोधणे पुढची वाट । ध्रु
चढ जर आता उतरण पुढती
दुःख जर आता सौख्यच पुढती
सामर्थ्याने अंतर काट । १
भले बुरे ते दोन्ही कळते
आतुन कोणी तुला शिकवते
काळोखातुन फुटे पहाट । २
असो अमिरी असो फकीरी
सदा रहावे निरहंकारी
सद्भावाचा मिरवी थाट । ३
तू सगळ्यांशी वाग सारखा
गंगेच्या त्या जळासारखा
समाधान ये घेऊन ताट । ४
जैसे द्यावे तैसे घ्यावे
का कोणाचे मन दुखवावे
सावध राही व्यवहारात । ५
देहामधला देव पहावा
क्षणात संपे तरी दुरावा
यशोबीज ते विश्वासात ।६
दोन पावले एक चालणे
दोन डोळुले एक पाहणे
घे जीवा सगळ्यांची साथ । ७
द्वंद्व भासते तरी ते नसते
ऐक्य चिंतनी हळू उमलते
सार तेवढे घे ध्यानात । ८
कल्पना : ज. कृ. देवधर (गिझरवाले )
काव्यरुप - श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment