Wednesday, December 23, 2020

जन्मणे न तुझिया हाती

जन्मणे न तुझिया हाती, घात व्यर्थ करशी
वेड्या खंत का जिवासी? ध्रु.

सोड ही अहंता वेड्या विवेकास जाग
विकारी न होई जीवा विचारेच वाग
परीक्षा न देता घोर यशा वांच्छितोसी!१

मरायचे आहे तर का करशि आत्मघात
मारुनी रिपुला मरुनी अमर हो जगात
आत्मघात भ्याडपणाचा का न मानतोसी?२

दुर्बलता सोड मनाची जाण तू अनंत
नको खेद मानू कसला नको करू खंत
एक एक पार्था हृदयी वसे हृषीकेशी!३

अफाट या विश्वामाजी अणुहुनी सान
पसाऱ्यात या विश्वाच्या कुठे तुझे स्थान
जरी मरशि विश्व न अडते ध्यानि का न घेसी!४

विवेके मनाचा अपुल्या तोल सावरावा
रामकृष्ण जाता येता मनी आठवावा
गीत मधुर भगवंताचे कधी ऐकशी?५

फलाची न धरता इच्छा आचरी स्वधर्मा
देहमंदिरी वसणाऱ्या पहा प्रभू रामा
तुझी तुला ओळख पटता मिळे सौख्यराशी!६

खरी कसोटी तव येथे सुरू ठेव सेवा
कर्मफले अर्पुनि मनुजा तुष्ट करी देवा
आचरूनि गीता दिव्या बोध दे जगासी!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

१९.०५.१९७३

No comments:

Post a Comment