Saturday, August 8, 2026

श्रीशिवाच्या मंदिरी, चित्त शांतीते वरी!

श्रीशिवाच्या मंदिरी, चित्त शांतीते वरी!ध्रु. 

शांत येथे वाटते, प्रेम कंठी दाटते 
देह हो जणु बासरी!१

मूर्ति नाही जरि इथे, दृश्य इथले भारते 
निमिषभर बस रे तरी!२

शोध आपण घ्यायचा, ध्यास आपण घ्यायचा
नांदतो शिव अंतरी!३ 

मिटुनि डोळे पाहणे, नाद‌विरहित ऐकणे 
नदी मिसळली सागरी!४

साध्य साधन एक ते साधका हे उमगते 
ना विसावा क्षणभरी!५

आदिनाथा हे गुरो, आदिसिद्धा सद्‌गुरो 
अंगुली धर तू करी!६

कोण मी हे जधि कळे, तिमिर सगळे लोपले 
ज्ञानरवि ये अंबरी!७

कामना कुठली नसो, भावना सरला असो
मन न रमते नश्वरी!८

रोग नाही अडसर, योग जुळतो सुंदर 
शक्ति ही किमया करी!९

सार ध्यानी आणले, श्रीमहेशे शिकवले 
बद्ध केले अक्षरी!१०

लेखणी ठेवू इथे, टेकवू माथा इथे
सफल शिवरात्री खरी!११

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
८/२/१९९६

Friday, August 7, 2026

तुझी भक्ति रामा आनंद देते!

तुझी भक्ति रामा आनंद देते!ध्रु.

बोरे वनीची
आस मनीची
रामास शबरी अशी मोहवीते!१

कृष्णा सुदामा 
बहिश्चर आत्मा
पोह्यांची मुष्टी मातृस्तन्य वाटे!२

नको कर्ममार्ग 
नको ज्ञानमार्ग? 
मातेस लेकरू कैसे भरवीते!३

नाम वेदतुल्य
नाम देवतुल्य
रूपाची ओळख नामातच होते!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २२० (७ ऑगस्ट) वर आधारित काव्य.

भगवंताचे स्वरूप ज्याला समजले त्याला सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी आनंदच दिसेल. भक्ति ही निश्चित श्रेष्ठ आहे. भक्ति म्हणजे परमात्मस्वरूपाचे परमप्रेम होय. कर्म, ज्ञान, योग ही साधने असून भक्ति हे साध्य आहे. नुसता कर्ममार्गी कर्मठ व जड बनतो. ज्ञानमार्गी माणसांना अभिमानाची बाधा लवकर होते. म्हणून खरा भक्त या सृष्टीला मिथ्या न मानता भगवंताची लीलाच समजतो. रूपाची ओळख खऱ्या नामानेच होते. जगत हे भगवंतापासून भिन्न नाही. जगतात आढळणारी सर्व रूपे भगवंताची आहेत. देशकालाच्या पलीकडे जे कायम राहते ते खरे सत्य. प्रत्यक्ष आकाराने आलेली अनेक रूपे नाहीशी झाली तरी त्यांचे नाव टिकून राहते. म्हणजे नाम हे देशकालाच्या मर्यादेच्या पलीकडे असते. म्हणून ते रूपापेक्षा जास्त सत्य होय व जे सत्य आहे ते श्रेष्ठ असलेच पाहिजे.

Wednesday, August 5, 2026

नामात रहावे, रामास भजावे!

नामात रहावे, नीतीस धरावे! 
नीतीत रहावे, रामास भजावे!ध्रु.

राम सदय माउली
धरत शिरी साउली 
श्रद्धेने रामनाम कंठि धरावे!१

शुद्ध मने भक्ति करी 
अंतरि मग वसत हरी 
हसत स्मरावे, स्मरत हसावे!२

शरण शरण रघुनाथा 
टेकविला पदि माथा 
हीण जळावे, मन उजळावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २१८ (५ ऑगस्ट) वर आधारित काव्य.

देव कसे आणि केव्हा साहाय्य करील याचा आपण कसा अदमास घेऊ शकू बरे? सदैव नामात राहण्याचा प्रयत्न करा.  नीतीला धरून राहा. त्यानेच तुम्हाला भगवंत भेटेल. परमार्थात नीतीला, शुद्ध आचरणाला फार महत्त्व आहे. जो शुद्ध मनाने परमेश्वराचे चिंतन, नामस्मरण करतो त्याला साहाय्य करण्यास परमेश्वर सदैव तत्पर असतो. आपण त्याला शरण जाऊन त्याच्या नामाचे प्रेम मागू या. तो दीनदयाळु भक्तवत्सल परमेश्वर आपल्यावर कृपेचा वर्षाव करील याची खात्री बाळगा.

Tuesday, August 4, 2026

रामाचे स्मरण देते नित्य समाधान!

रामाचे स्मरण देते नित्य समाधान!ध्रु.

मुखी रामनाम 
करू हाति काम
वासनेचा फास तुटण्या करू नामगान!१

रामी अनुराग 
प्रपंची विराग 
खरी पोथी कळली त्याच्या जीवनात राम!२ 

झडो देहबुद्धी
लागु दे समाधी
शरण गुरुसि सत्वर जाता करी येत ज्ञान!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २१७ (४ ऑगस्ट) वर आधारित काव्य.

भगवंताचे होणे हे माझे या जन्मातील मुख्य काम आहे असे समजावे. रात्रंदिवस मी भगवंताचा कसा होईन याचा सारखा विचार करावा. आपली वासना कोठे गुंतते हे पहावे. विचार आणि नाम यांनी वासनेला खात्रीने जिंकता येईल. मग आपले कर्तेपण आपोआप मरून जाईल. वासना सूक्ष्म व लवचिक आहे पण आपण तिला देहबुद्धीने अगदी घट्ट बनवून टाकतो, मग ती काढणे फार कठीण जाते. विषयांची वासना सर्व नाहीशी झाल्यावर जी उरते ती भगवंताची वासना होय. पोथी ऐकून प्रपंचाविषयी ज्याला वैराग्य आले त्यालाच पोथी खरी कळली असे म्हणावे. पोथीत सांगितलेले ऐकून जो ते आचरणात आणतो तोच खरा श्रोता होय.

Friday, July 31, 2026

भोग न चुकला जगी कुणाला? इलाज तेथे मुळि न चालला!

भोग न चुकला जगी कुणाला?
इलाज तेथे मुळि न चालला!ध्रु.

संत हि प्रारब्धास भोगती
साक्षित्वे देहात राहती
टाळिती ना ते प्रारब्धाला!१

देहबुद्धि त्या कणभर नाही 
भोगाचे सुखदुःखच नाही
नामी त्यांनी "राम" पाहिला!२

गुर्वाज्ञा हा धर्म वाटु दे
आत्मचिंतनी चित्त रमू दे 
देहीं भोगू मुक्ति सोहळा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २१३ (३१ जुलै) वर आधारित काव्य.

Thursday, July 30, 2026

राम कर्ता जाणुनी हे संत जगती वागती भोग मोदे भोगती!

राम कर्ता जाणुनी हे संत जगती वागती!
भोग मोदे भोगती!ध्रु.

मीपणा केव्हाच सुटला 
मोकळा आनंद लुटला 
नामि प्रेमा ठेवुनीया षड्रिपूंना जिंकती!१ 

चित्त स्थिर झाले कधीचे 
जाहले ते श्रीपतीचे 
नाम वदनी, स्नेह-सदनी ते सुखाने राहती!२ 

गुंतती ते ना कुठेही 
राहती जरि विश्वगेही 
ते विदेही मुक्तिसौख्या याच देही मिळविती!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

राम कर्ता हे जाणून चित्ती। जगात संत ऐसें वर्तती॥ 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २१२ (३० जुलै) वर आधारित काव्य.

Wednesday, July 29, 2026

निदान रोगाचे करुनि, माधव समजावुन सांगे!

निदान रोगाचे करुनि, माधव समजावुन सांगे!ध्रु.

मी अर्जुन, मी अतुल्य योद्धा
मी देहच, ही बेडी बद्धा 
भूल पडे ही धनंजयाला, म्हणुनी दुबळ्यासम वागे!१

शरीर नश्वर, आत्मा शाश्वत
जुनीच वसने, देही बदलत 
शोक व्यर्थ हा मेलेल्याचा, मोहन बोले अनुरागे!२

तप्त धरेवर मेघ बरसती
सुशांत शीतल सहजच करती
गुरुशिष्यांना कसे बांधती, नकळत हे रेशिमधागे!३

गुरुशिष्यांची ऐसी जोडी
संवादाला अतीव गोडी
जिज्ञासेने, विनम्रतेने, शंकांचा मेळा पांगे!४ 

करणीने हो नर नारायण
भजनाने हो भक्तिपरायण
कृष्ण, कृष्ण हा अनाहत ध्वनि, पार्थाला करतो जागे!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले