Friday, September 30, 2011
अध्याय ११ : विश्वरुपदर्शनयोग
Thursday, September 29, 2011
अध्याय १० : विभूति योग
Wednesday, September 28, 2011
अध्याय ९ : राजविद्याराजगुह्ययोग
अध्याय ९ : राजविद्याराजगुह्ययोग
आसक्ती फलाची नसे ज्या मानवा
तो तर असतो सदा मुक्त ।।१।।
माझे जे जे भक्त भक्तीने भेटती
त्यांना आलिंगाया चार हात ।।२।।
भावाचा भुकेला नित्य भगवंत
देह जरी दोन एकरूप ।।३।।
आदि मध्य अंत सर्व मीच पार्था
तुझ्याशी वियोग कधी नाही ।।४।।
योगक्षेम तुझा चालवीन सदा
निर्धारे चालव अभ्यासाला ।।५।।
सागरी मिसळे सरिता सदाची
तुझे लया गेले पाप पुण्य ।।६।।
माझे तुझे मन जाणे एकपण
राजविद्यानावे राजगुह्य ।।७।।
Tuesday, September 27, 2011
अध्याय ८ : अक्षरब्रह्मयोग
अध्याय ८ : अक्षरब्रह्मयोग
अंतकाळ साधे तया साधकाला
स्मरूनी मजला युद्ध करी ।।१।।
वेदना होऊ दे आठव हरीला
मी तो देह नाही भाव ठेव ।।२।।
ज्ञान आणि भक्ती दोन्ही सामावले
खुबी स्मरणात असो द्यावी ।।३।।
ज्याचे त्याला देणे सोपे हे गणित
नाम ओठी यावे एकाक्षरी ।।४।।
ॐकार स्वरूप सद्गुरु समर्थ
पाठीशी सदैव आहे उभा ।।५।।
वासना सरावी हीच उपासना
सुखाने विलीन ब्रह्मी व्हावे ।।६।।
Monday, September 26, 2011
अध्याय ७ : ज्ञानविज्ञान योग
अध्याय ७ : ज्ञानविज्ञान योग
ज्ञानविज्ञानही सांगतो तुजला
ध्यान देऊनीया ऐकशील ।।१।।
प्रकृतीची फोड विज्ञानविषय
ज्ञान हे निखळ आत्मज्ञान ।।२।।
माझ्याविना काही दुजे असे नाही
तुझा आणि माझा एकपणा ।।३।।
सृष्टी आविष्कार माझाचि तो आहे
सर्वात मी आणि मीच सर्व ।।४।।
सर्व काळी स्मर मजला अर्जुना
ॐकार ही खूण नादचित्र ।।५।।
स्वरुपानंदांनी कृपा केली थोर
गीतेत आकंठ बुडवले ।।६।।
Sunday, September 25, 2011
अध्याय ६ : आत्मसंयम योग
अध्याय ६ : आत्मसंयम योग
आपला उद्धार आपण करीन
बाळगा हिंमत आरंभाला ।।१।।
आत्मविश्वासाने चाले व्यवहार
वाढवा योग्यता आपलीच ।।२।।
मनास वळवा नामाला बसवा
आतला आनंद दावा त्याला ।।३।।
एकाग्रता साधे त्याला काय बाधे
श्वसनाचे नाते मनापाशी ।।४।।
आपण आपले दोष न्याहाळावे
नित्याचा विकास अनुभवा ।।५।।
आठव हरीचा हेच महापुण्य
विसर हरीचा महापाप ।।६।।
जनातही ध्यान साधे ज्या मानवा
प्रसन्न सुशांत कळो येत ।।७।।
Saturday, September 24, 2011
अध्याय ५ : कर्मसंन्यास योग
अध्याय ५ : कर्मसंन्यास योग
कर्मयोग योग्य अर्जुन तुजला
भिक्षेच्या आहारी जाऊ नको ।।१।।
तुझा जो स्वभाव लढाया लावेल
चापबाण धर युद्ध करी ।।२।।
सोडता अहंता गोड होई कर्म
कर्मच सु-मन करीतसे ।।३।।
कर्मात रंगता लाभे मन:शांती
फळाची आसक्ती सुटतसे ।।४।।
कर्म हाच योग हरीशी मिळाया
ज्ञान कर्मातून मिळतसे ।।५।।
ध्यान साधावया सांगे भगवंत
सारी सरे खंत मनातली ।।६।।
Friday, September 23, 2011
अध्याय ४ : कर्मब्रह्मार्पण योग
अध्याय ४ : कर्मब्रह्मार्पण योग
आपणच जेंव्हा अर्जुन बनतो
अंतरात कृष्ण प्रवेशतो ।।१।।
अधर्माची चीड धर्माची ती चाड
अन्याय मुळीच सहवेना ।।२।।
संतांचे रक्षण दुष्टांचे मर्दन
धर्मसंस्थापन कृष्ण करी ।।३।।
हरि एक कर्ता फलाचा तो भोक्ता
ज्याचे त्याला देता धन्य वाटे ।।४।।
कोणी आर्येमध्ये कोणी ते ओवीत
गीतेचा भावार्थ सांगू पाहे ।।५।।
हरि धरी हात लिहवून घेत
गीता अभंगात रामा वाटे ।।६।।
Thursday, September 22, 2011
अध्याय ३ : कर्मयोग
अध्याय ३ : कर्मयोग
करावे कर्तव्य आज्ञा देवाजीची
पाळावी भावाने प्रेमानेही ।।१।।
कर्मे करताना व्हावे समरस
भान हरपते समाधि ती ।।२।।
तनाचा आळस मनाचा तो सोस
झटकता झणी यज्ञ घडे ।।३।।
कर्मानेच योग घडतो हरीशी
भक्ताचे कल्याण करी गुरु ।।४।।
कर्मातून ज्ञान मी तो देह नाही
अंतरंगी पहा दिव्यज्योत ।।५।।
नंदादीप हाच तेवता राहू दे
विश्वहितकर विश्वंभर ।।६।।
Wednesday, September 21, 2011
अध्याय २ : सांख्ययोग
अध्याय २ : सांख्ययोग
देह नाशिवंत आत्मा तो शाश्वत
ज्ञानी जाणतात सारासार ।।१।।
करावा विवेक ज्याने त्याने येथे
कोण राही येथे कायमचे ।।२।।
देह हे साधन साध्य भगवंत
खरा भक्त भजे आत्मारामा ।।३।।
विवेक बनवी मनाला सुशांत
तोल तो मनाचा सांभाळतो ।।४।।
अलिप्त राहून करावीत कर्मे
कोशल्य कर्मात हाच योग ।।५।।
सहज समाधि सापडते धन
अभ्यासाला नित्य चालू ठेव ।।६।।
Tuesday, September 20, 2011
अभंगात गीता
माझ्या वडीलांना म्हणजे श्री श्रीराम बाळकृष्ण आठवले यांना नुकतीच गीता अभंगात सुचली. आजपासून रोज एक अध्याय या ब्लॉगवर देत आहे
अभंगात गीता रचावीशी वाटे
द्यावे वरदान गजानना ।।१।।
अनुसंधानाने असाध्य ते साधे
सांगे स्वानुभवे तुकाराम ।।२।।
माझे मनपण जावे विलयाला
ठेवितो श्रीराम पदी माथा ।।३।।
सद्गुरु धावला स्वामिराया माझा
पुरवितो स्फुर्ती कानी आले ।।४।।
अध्याय १ : अर्जुनविषादयोग
लढावे की जावे काहीच कळेना
पार्थ पछाडला अज्ञानाने ।।१।।
युद्धाचे कर्तव्य टाळायाला पाही
कारणे ही नाना पुढे करी ।।२।।
मी न लढणार मारोत मला ते
ऐसे वेड्यापरी बरळला ।।३।।
उभे राहवेना धनु पेलवेना
गळाले तयाचे अवसान ।।४।।
अर्जुनाची ऐशी दशा अहंतेने
मायेचा पडदा डोळ्यावर ।।५।।
सूत्रधार कृष्ण याचा खरा अर्थ
मोहपीडिताला कळेचिना ।।६।।