Friday, December 28, 2012

काही छायाचित्रे.

पुण्यातील खुन्या मुरलीधर मंदिर येथे पंडित भीमसेन जोशी यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमातील फोटो 









शिवाजी मंदिर, पुणे येथे काव्यमय सावरकर दर्शन कार्यक्रमाचे वेळी रंजना गोखले, माझे वडील कै. श्रीराम आठवले आणि निवेदनाला श्री. श्री. वा. कुलकर्णी सर 

शिवाजी मंदिर, पुणे येथे शिवगीता या कार्यक्रमाचे वेळी कै. गजाननराव वाटवे आणि अण्णा म्हणजे माझे वडील कै. श्रीराम आठवले 


शिवाजी मंदिर, पुणे येथे शिवगीता या कार्यक्रमाचे वेळी कै. गजाननराव वाटवे आणि अण्णा म्हणजे माझे वडील कै. श्रीराम आठवले 

बांडेवाडी येथे ग्रामस्थांबरोबर, अण्णा म्हणजे माझे वडील कै. श्रीराम आठवले त्यांच्या शेजारी मी, आई, थत्ते सर, कै. घैसास आणि वि र कुलकर्णी सर 

बहुतेक लक्ष्मि क्रीडा मंदिरातील हा फोटो आहे.  आई, अण्णा आणि तबल्याला कुलकर्णी.


शिवाजीराव भोसले यांच्याबरोबर 

काव्यमय सावरकर दर्शन कार्यक्रमाचे वेळी.  रंजना गोखले, माझे वडील कै. श्रीराम आठवले आणि निवेदनाला श्री. श्री. वा. कुलकर्णी सर 


Tuesday, December 25, 2012

भगवान श्रीकृष्णावरील श्लोक



कुठल्याशा अधिक मासी अण्णांना सुचलेले हे श्रीकृष्णावरील ३३ श्लोक.

गणेशा तुला वंदितो भक्तिभावे
तुझे रुप चित्ती गुणेशा ठसावे
कुरुक्षेत्र जे ते मनाला दिसावे
मने माझिया पार्थ व्हावे स्वभावे ॥१॥

'खरा कोण मी’ ते कदा आकळेना
मनाने मनाला मला आवरेना
दिशाभूल झाली, दिशा सापडेना
करु काय मी हे कळेना वळेना ॥२॥

असा एक विश्वास गीता कळेल
अकर्मण्य नैराश्य वेगे पळेल
मनी हीण जे ते तपाने जळेल
मती माझी कृष्णोक्त मार्गी वळेल ॥३॥

अहंकार नाशा मला साह्य द्यावे
विवेके विचारे मला चालवावे
पसार्‍यातले सार धान्यात यावे
मना माझिया माधवा पालटावे ॥४॥

सदा सर्वदा योग कृष्णा घडावा
मला सूर माझा इथे सापडावा
नसे देह मी अर्थ चित्ती ठसावा
तुझा हात पाठी फिरावा फिरावा ॥५॥

अति स्वार्थ बुद्धी तिथे पाप आहे
अति क्रोध बुद्धी तिथे पाप आहे
समाजार्थ मी भाव हे पुण्य आहे
घडे त्याग जेथे तिथे पुण्य आहे ॥६॥

फलाशेत जेव्हा स्वये गुंततोसी
अरे मानवा, माधवा सोडतोसी
करी चित्त एकाग्र कर्मात नित्य
दुजा यज्ञ नाही नरा मान सत्य ॥७॥

जसा देह येई, तसा देह जाई
परी आत्मतत्त्वा नसे लोप काही
तुझ्या अंतरी नांदताहे अनंत
तया पाहता वृत्ति होई सुशांत ॥८॥

मनाने मनाला सुधारीत जावे
अती आदरे नित्य ध्याना बसावे
स्वये नाम घ्यावे हरीरूप ध्यावे
सदा साह्य दे साधकाला स्वभावे ॥९॥

घडो कर्म जे घालवी सर्व रोग
घडो कर्म जे साधते कृष्ण योग
जगज्जीवनी देव दृष्टी पडू दे
दिसामाजि सत्कर्म काही घडू दे ॥१०॥


स्थितप्रज्ञ आदर्श जो कार्यकर्ता
निराधार बंधूस तो साह्यदाता
तयाच्या परी ईशभक्ती घडू दे
विवेके, विचारे कृती पालटू दे ॥११॥

जनां मेळवी बोधवी ज्ञानदाता
जनां रीत लावी सुधारी अवस्था
करी कार्य, सन्मान ना इच्छितो तो
असामान्य विश्वी असा मान्य होतो ॥१२॥

मना माझिया वाच गीता सदैव
तदा कृष्ण बोले तुझ्याशी सदैव
नको खेद मानू, नको हासु फार
तदा तोल राखे मनाचा विचार ॥१३॥

करी कार्य जे जे सुखे प्राप्त झाले
असे मान ते त्याकडूनीच आले
फलाची धरी आस तो दीनवाणा
जनांचा म्हणे दास कैवल्यराणा ॥१४॥

मनी ज्या क्षणी लोभ निर्माण झाला
अशांती स्वये पातलीसे घराला
असे जन्मते पाप जेव्हा मनात
तदा भ्रष्ट साधे स्वत:चाच घात ॥१५॥

खरी संपदा ती श्रमे प्राप्त झाली
खरी संपदा न्याय्य मार्गेच आली
खरी संपदा दान देता सुखावे
खरी संपदा सद्गुणा वाढवावे ॥१६॥

करी स्वच्छता बा तनाची मनाची
धरी लाज काही जनाची मनाची
विलासामधे जो सदा डुंबलेला
असे मान तो भूमिला भार झाला ॥१७॥


सचोटी हवी वागण्या बोलण्यात
चिकाटी हवी माणसे जोडण्यात
शिताफी हवी शत्रूला जाणण्यात
खरा दक्ष तो धन्य तीन्ही जगात ॥१८॥

विवेकी खचेना जरी दु:ख आले
विवेकी उतेना जरी सौख्य आले
मना आवरे जो खरा देव आहे
मना नावरे तो खरा दैत्य आहे ॥१९॥

अनाथां जनांना जरा धीर द्यावा
तया संगती काळ थोडा क्रमावा
तया वाटुदे कृष्ण माझा विसावा
असा जीव मुद्दाम लावीत जावा ॥२०॥

दिल्याने घटेना असे ज्ञान आहे
दिल्याने घटेना असे प्रेम आहे
मना क्षोभवी जो असा भोग आहे
मना शांतवी जो असा त्याग आहे ॥२१॥

धरी रे मना ध्यास तू उद्यमाचा
धरी रे मना ध्यास तू उत्तमाचा
धरी रे मना ध्यास तू संयमाचा
धरी रे मना संग तू सज्जनांचा ॥२२॥

मना गुंतवावे कथा कीर्तनात
मना गुंतवावे कला दालनात
मना गुंतवावे अनोख्या जगात
विलासा विटे देत भक्तीत साथ ॥२३॥

नको आत्मनिंदा नको ती बढाई
नको ती टवाळी जरा शांत होई 
वदे तीव्र जो तो जगत् शत्रु होतो 
वदे गोड जो तो जगन्मित्र होतो ॥२४॥

तपस्या करावी चिकाटी धरावी
चिकाटी धरावी अंहता सरावी
अंहता सरावी जरा जाग यावी
जरा जाग यावी समस्या सुटावी ॥२५॥

कुणी मी न कर्ता कुणी मी न भोक्ता
कुणी मी न वक्ता कुणी मी न नेता
खरा कृष्ण कर्ता खरा कृष्ण दाता
खरा कृष्ण वक्ता बरा पार्थ श्रोता ॥२६॥

व्रती तो यशस्वी व्रती तो मनस्वी
व्रती तो मनस्वी व्रती तो तपस्वी
व्रती देत आधार दु:खी जनांना
व्रती लोकमाता जनां पोसताना ॥२७॥

मनाचे तनाशी जुळे जेथ जेव्हा
तदा योग साधे तदाकार तेव्हा
करी कर्म जे सामरस्ये तपस्या
न गुंता कुठेही कुठे ना समस्या ॥२८॥

कुठे शोधिशी देव देवालयात
वसे देव शेतात, विद्यालयात
पहा देव रुग्णात, रुग्णालयात
जिथे राबताती असंख्यात हात ॥२९॥

नको रुप पाहू नको रंग पाहू
नको जात पाहू नको पात पाहू
अमीरीत नाही फकीरीत आहे
नसे बद्ध काही सदा मुक्त आहे ॥३०॥

तुरुंगात ज्याचा असे जन्म झाला
तयाच्या मनी जागलेला जिव्हाळा
स्वये मुक्त होता जनां मुक्त केले
तये जन्मभूला किती ऊंच नेले ॥३१॥

वसे कृष्ण अध्यापनी न्यायदानी
वसे युद्धशास्त्री, वसे आत्मज्ञानी
वसे नाट्यरंगी वसे अंतरंगी
तुझे चित्त रंगो सदा संतसंगी ॥३२॥

तुझी माधवा गोड गीता कळू दे
तुझा हात पाठी फिरु दे, फिरु दे
तुझे तत्त्व चित्ती ठसू दे, ठसू दे
तुझे कार्य काही घडू दे, घडू दे ॥३३॥

॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥







Saturday, December 15, 2012

स्वामी स्वरुपानंद (पावस) जयंती.



आज स्वामी स्वरुपानंद जयंती.  त्यानिमित्त त्यांच्यावर कै श्री बा आठवले यानी रचलेले व तरुण भारत मध्ये १९८५ साली प्रकाशित झालेले हे सुभाषित.


स्वरुपानंदरुपाय
स्वामिने परमात्मने ।
अंत:स्थाय बहि:स्थाय
सोऽहं भावाय ते नमः॥

अर्थ :

हे स्वरुपानंद आपण परमात्म स्वरुप स्वामी आहात. अंतरंगात आणि अवतीभवतीही असणार्‍या मूर्तिमंत सोऽहंभावाला नमस्कार असो.

Wednesday, December 12, 2012

माझे वडील कै. श्रीराम बाळकृष्ण आठवले यांच्या "गाणी अण्णांची" या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिकेच्या प्रकाशनाची छायाचित्रे


ध्वनिमुद्रिकेचे प्रकाशन. श्री रविंद्र खरे, श्री संजय उपाध्ये, कल्याणीताई नामजोशी, आई (प्रतिभा आठवले), मी आणि श्री चारुदत्त आफळे.
श्री प्रसाद जोशी यांचा सत्कार 

श्री संजय उपाध्ये सीडी प्रकाशानानंतर संवाद साधतना 

कल्याणीताई नामजोशी संवाद साधताना