श्री स्वामी स्वरूपानंद भक्तिस्तोत्र
ॐ नमो जी गजानना
माझी पुरवा कामना
करावयासी सद्गुरु स्तवना
प्रज्ञाबल मज पुरवावे ।। १ ।।
श्रीशारदे हंसवाहिनी
मीपण अवघें सांडोनी
अंग लोटले तव चरणी
लळे आगळे तू पुरवी ।। २ ।।
नमन गुरुवरा आदिनाथा
तुझा महिमा वर्णू जातां
आदरे लवितो मम माथा
मौनचि झालें तुज स्तविणे ।। ३ ।।
सोऽहं सोऽहं स्मरतां स्मरतां
वाटे कैवल्य आले हाता
बैसल्या ठायी डोळे मिटतां
चित्सुखसागर उचंबळे ।। ४ ।।
संतसमागम साधावा
अहंपणा ना बाधावा
बोध होऊं दे हाचि जिवा
नित्यानंदचि तो शिव मी ।। ५ ।।
स्वामी अंतरि यावे हो
गंधित जीवन व्हावे हो
मनमंदिर उजळावे हो
असंख्य दीपज्योतींनी ।। ६ ।।
जय स्वरूप जय आनंद
कृष्ण विष्णु हरि गोविंद
नाम उमलवी अरविंद
गुरुवर्या मम चित्ताचे ।। ७ ।।
ॐ नमो जी गुरुराया
चरणी वाहियली काया
चित्त लागले नाचाया
दर्शनाचिया स्मरणाने ।। ८ ।।
शैत्य स्पर्शनी चंद्राचे
दयार्द्र बघणे सद्गुरुचे
मार्दव हृदयी मातेचे
असे कुठेही दिसेचि ना ।। ९ ।।
सजीव प्रतिमा आवडली
नामाधारे हृदि ठसली
सोऽहं स्मरता मृदु हसली
उसळत लहरींवर लहरी ।। १० ।।
रामकृष्ण हरी ! रामकृष्ण हरी !
येता कानी ही वैखरी
सहज उलगडे ज्ञानेश्वरी
कृतज्ञ अश्रू झरताती ।। ११ ।।
परमार्थाची जी नांदी
पावस झाले आळंदी
तिने रमविता सोऽहं बोधी
ज्ञानाई स्वामी विलसे ।। १२।।
मृदु सबाह्य नवनीत
तैसे स्वामी तुमचे चित्त
केली निर्हेतुक प्रीत
आचरिलात परमार्थ ।। १३ ।।
अगा सद्गुरो कैवल्यधामा
उच्चारिता तुझिया नामा
मानसी मोहरत मधुरिमा
सात्त्विक कोमल भावांचा ।। १४ ।।
भगवंतचि हे प्राप्तव्य
तयास भजणे कर्तव्य
आत्मा आहे मन्तव्य
ऐसी बुद्धि द्यावी हो ।। १५।।
‘खरा मी कोण’ शोधावे
आपण आपणां बोधावे
तत्त्वचिंतनी रंगावे
सौख्य याहूनि कोणते ।। १६ ।।
सोऽहं भावी जो रमला
तो प्रभुलागी आवडला
आत्मारामचि तो झाला
अद्वयानंद अनुभविता ।। १७ ।।
मन हे धावत बाहेरी
विषया भुलते वरी वरी
स्वरूप कृष्णा घ्या बासरी
आत तयासी वळवा हो ।। १८ ।।
सोऽहं साधना रुचो मना
मिळो प्रेरणा उन्नयना
आणिक कसलीहि कामना
नसो नसो या दासाची ।। १९ ।।
स्वामी आंतरिक सहवास
उद्धरी सकल जीवांस
सोऽहं चा दृढ अभ्यास
करवुनि घ्यावा गुरुदेवा ।। २० ।।
आपुला देव आपुल्यापाशी
हेचि बिंबावे निजमानसी
आणि काही न लगे मजसी
हेतु एवढा पुरवावा ।। २१ ।।
सोऽहं भावचि तनुधारी
भक्तजनांचा कैवारी
चालती बोलती ज्ञानेश्वरी
पावसेत बसली होती ।। २२ ।।
प्रेमळ मूर्ती अजुनि दिसे
आसनस्थ ती हासतसे
कसल्या अबोध उल्हासे
स्मरणे डोळे डबडबले ।। २३ ।।
कनकचंपकाचा वर्ण
टपोर पाणीदार नयन
पूर्णचंद्रासम सुहास्य वदन
स्मरतां गहिवर येत असे ।। २४ ।।
आपले पाहणे प्रेममय
आपले बोलणे दयामय
आपला स्पर्श स्नेहमय
सगळे काही सुख देई ।। २५ ।।
श्वासोच्छ्वासी यावे हो
सहवासासी द्यावे हो
निर्मल मानस व्हावे हो
आसनस्थ तेथे व्हावे ।। २६ ।।
सोऽहं सुंदर केरसुणी
दिलीत आम्हा लागूनी
धूळ मनीची झटकूनी
निर्मळ होऊ गुरुराया ।। २७ ।।
स्वामी करिता आपले स्मरण
होतसे तात्काळ देह विस्मरण
विकल्पास नुरते स्थान
उरतो केवळ आनंद ।। २८ ।।
स्वामी आपले कृतार्थ जीवन
उपासिता सद्गुरु चरण
तेचि घडविल मार्गदर्शन
भक्तिपथावर मी जाता ।। २९ ।।
सद्गुरु असता पाठीशी
खंत कासया तू करिशी ?
रात्रंदिन जप नामासी
आतुनि कोणी हे वदले ।। ३० ।।
नाम जोडिले श्वासाशी
अंतरि हसला हृषिकेशी
अमित जोडल्या सुखराशी
गुरुकृपेचा प्रत्यय हा ।। ३१ ।।
‘स्वामी, स्वामी’ मुखे म्हणा
सुवर्णनगरीचा राणा
धावत ये गीताकथना
सावध सावध वर्तावे ।। ३२ ।।
अरूप जरि मज स्वरूप तू
निर्गुण जरि मज सगुणचि तू
ये विषयी न मनी किंतू
अनुभविले साक्षात्कारा ।। ३३ ।।
‘मी’ म्हणजे हा देह नव्हे
‘मी’ म्हणजे ‘मन, बुद्धि’ नव्हे
‘मी, मी’ ऐसे वदताहे
ते तर सगळे ‘तोचि’ असे ।। ३४ ।।
‘सद्गुरु, सद्गुरु’ मी म्हणता
मानस अवघे परिमळता
शासोच्छवासी सुरेलता
अष्टभाव सात्त्विक स्फुरले ।। ३५ ।।
झरझर झरती अश्रुसरी
स्पंदन सोहं स्फुरे उरी
अनुभव जरि हा निमिषभरी
सार्थक झाले जन्माचे ।। ३६ ।।
दत्त- अंश तव रूपात
वावरला या जगतात
आनंदाची बरसात
स्वरूपमेघा त्वा केली ।। ३७ ।।
सद्वस्तु त्वा दाखविली
खूण अंतरी बाणविली
सोऽहं दिधली गुरुकिल्ली
वानू काय तुझा महिमा ? ।। ३८ ।।
काम क्रोध गेला कचरा
भक्तीचा झुळझुळे झरा
शीतल गंधित ये वारा
गेले मानस कैलासी ।। ३९ ।।
तुजसम कैवारी न कुणी
गुरुवर्या या तिन्ही भुवनी
सुवर्णवर्णांची स्मरणी
नाम घेत मी फिरवितसे ।। ४० ।।
‘प्रियंवदां’ च्या वंशात
प्रसन्न फुलला पारिजात
गंध दरवळे जगतात
तुझिया पावन चरिताचा ।। ४१ ।।
‘रामचंद्र’ हे तव नाम
नामांतहि वसला साम
कर्तव्याचे ते धाम
सार्थनाम तू झालासी ।। ४२ ।।
शैशवि शिवमंदिर रुचले
एकांतासी स्थान भले
चरणांनी नकळत नेले
सोऽहं ध्यानी रमावया ।। ४३ ।।
सुधामाधुरी वचनात
मार्दव अतिशय चित्तात
भाव आगळा भजनात
प्रसादचिन्हे ही सगळी ।। ४४ ।।
उदार सद्गुरु गणनाथ
अंजन घाली नयनांत
स्नेहल त्यांच्या छायेत
लाभे अवीट आनंद ।। ४५ ।।
ऐसे आला उमलून
कुणी छेडिली मधु धून?
श्रावणि सुखवित जे ऊन
सुखद सुखद तैसे गमला ।। ४६ ।।
ज्ञानमाउली हृदि वसली
प्रतिभावेली टवटवली
सुमनांवर सुमने ढाळी
कवित्व परिमल दरवळला ।। ४७ ।।
गुरुने केले नि:संग
प्रसन्न झाला श्रीरंग
रोम रोम फुलले अंग
निजांतरी गुज जाणवले ।। ४८ ।।
शांतिसुखाचा वर्षाव
गुरुकृपेचा नवलाव
दु:खालागी नच वाव
परमार्थाच्या क्षेत्री या ।। ४९ ।।
अपूर्व अनुभव मरणाचा
पाश तोडितो देहाचा
कळले ‘मी तर देवाचा’
जीवनौघ सारा बदले ।। ५० ।।
जगदंबेच्या प्रियकुमरा
ज्ञानराज हे योगिवरा
शतशत नमने स्वीकारा
चरणी मस्तक ठेवियले ।। ५१ ।।
गौरवर्ण ती पदकमले
नयन तयांवरती खिळले
प्रेमाश्रू मज नावरले
ब्रह्म पाहिले तेच तिथे ।। ५२ ।।
काय उणे श्रीगुरुचरणी?
तुष्ट जाहलो असे मनी
देहभान गेले सरूनी
उद्धरलो मी उद्धरलो ।। ५३ ।।
अंतरोत ना हे चरण
पदोपदी त्यांचे स्मरण
हेच हेच सद्गुरुभजन
जन्मचि हा सेवेसाठी ।। ५४ ।।
मुसावलेल्या सौंदर्या
कविवर्या सद्गुरुवर्या
मूर्तिमंत हे कैवल्या
सांग कसे संबोधावे ।। ५५ ।।
वरदहस्त जो वर झाला
अभयद शांतिद तो ठरला
स्मृतिचित्रांची मग माला
मनास माझ्या मोहविते ।। ५६ ।।
चित्त रंगले हरिपायी
मी-तूपण उरले नाही
हरि नांदे सर्वां ठायी
मन मौनावे स्वानंदे ।। ५७ ।।
समाधान नित हृदयात
सोऽहं ये आचारात
आपण जगला हरिपाठ
हरिरूपासी ध्याताना ।। ५८ ।।
विश्व पावसी पाहियले
सोऽहं सहजचि अस्तवले
अभिन्नत्व हरिशी झाले
हरि अवघा मग परिपूर्ण ।। ५९ ।।
ज्ञानज्योती पाजळली
भ्रांति भवाची सारियली
विदेहस्थिती आपणिली
देही दाखविला देव ।। ६० ।।
संत-सद्गुरुंची वाणी
पाठीवर कर फिरवूनी
अज्ञासी बनवी ज्ञानी
कौतुकास या पार नसे ।। ६१ ।।
सत्कर्मी मज रति वाढो
पुन:पुन्हा सत्संग घडो
सोऽहं चा मज छंद जडो
हेचि मागणे गुरुराया ।। ६२ ।।
ध्याना आपण बैसविता
अंगुलि धरूनि चालविता
भजनी आवड वाढविता
लळे आगळे पुरवीता ।। ६३ ।।
स्वरूपनाथ माझे आई
मजला ठाव दे ग पायी
अधिक मागणे काही नाही
हीच विनवणी दासाची ।। ६४ ।।
विरक्त देही ते संत
हेत विठ्ठली ते संत
नाम नित मुखी ते संत
श्रीस्वामीजी संत तसे ।। ६५ ।।
पुनर्जन्म श्रीस्वामींचा
महिमा सोऽहं भावाचा
अंत देहसंबंधाचा
तीर्थराज झाले स्वामी ।। ६६ ।।
शुचिर्भूतता श्रीस्वामी
अलिप्तपण ते श्रीस्वामी
शांतीचे गृह श्रीस्वामी
मोगराच की हा फुलला ।। ६७ ।।
जन्ममरणवार्ता सरली
स्वामी झाले शशिमौली
पावनगंगा झुळझुळली
स्वामींच्या साहित्याची ।। ६८ ।।
स्वरूपकीर्तन मज रुचते
स्वरूपदर्शन घडण्याते
सोडि न स्वरूप-नामाते
नामापाठी तू येसी ।। ६९ ।।
भक्तिभाव हा दृढ व्हावा
हीच प्रार्थना गुरुदेवा
परब्रह्म तू विमलत्वा
स्तोत्रांचा पुरवी स्रोत ।। ७० ।।
तुजला भावे आळविता
उमलुनि आली ही कविता
रंगुनि जावे मी गाता
वेडा झालो या छंदे ।। ७१ ।।
झटे वासरू धेनूला
माय चाटते वत्साला
गुरु-शिष्यांच्या स्नेहाला
महामूर येवो पूर ।। ७२ ।।
आत्मारामा तोषावे
भजनी तुझिया रंगावे
अद्वयत्व ना खंडावे
देवभक्त द्वैता बघता ।। ७३ ।।
इथे गायचे कुणी कुणा ?
अनुभविताना एकपणा
गुरुकृपेने मी न उणा
संतोषाच्या साम्राज्यी ।। ७४ ।।
सोऽहं भावे नटव मला
प्रेमजलाने क्षाळि मला
आत्मा अतीव आतुरला
गुरुमाउली घे अंकी ।। ७५ ।।
अद्वैती व्यापार कुठे ?
विना श्रवण सोऽहं श्रवितें
असे कोण परि दुसरे ते ?
तो मी ! तो मी ! ज्ञान उरे ।। ७६ ।।
तन्मयता तव कणभर दे
तत्त्वचिंतनी आवड दे
मुक्त गगनि मज विहरू दे
पुरवी बळ या पंखाना ।। ७७ ।।
देह भले मातीस मिळो
कधी न माझे चित्त मळो
अहंभाव संपूर्ण गळो
तूचि वाहणे मम चिंता ।। ७८ ।।
मी-माझे हे मावळु दे
तू तुझे हे उगवू दे
तुझिया शब्दी गुंफू दे
भावसुमांची मज माला ।। ७९ ।।
अनन्य करि मज गुरुमाय
नित्य दिसावे तव पाय
चंदनसम झिजु दे काय
कोड जिवाचे तू पुरवी ।। ८० ।।
धवल वसन तू गुरुराया
सहजासनि स्थिर तव काया
प्रसन्न मन तव नित सदया
मूर्ति स्थिरावी हृदयात ।। ८१ ।।
आनंदाचे निधान तू
ध्येय-ध्याता-ध्यानहि तू
हेहि वदविता केवळ तू
जळला कापुर, गंध उरे ।। ८२ ।।
गीतेने तुज स्तन्य दिले
ज्ञान दिले, अमरत्व दिले
स्थितप्रज्ञ तुजसी केले
गीतातत्त्वचि समूर्त तू ।। ८३ ।।
भावार्थासह जी गीता
आवडिने गाता गाता
मुखदुर्बळ बनतो वक्ता
वेडे गाणे मग स्फुरते ।। ८४ ।।
नित्यपाठ तव वाङमूर्ति
मनास निरवित शांती ती
तव उपकारा नसे मिती
तुजसम दाता तूचि खरा ।। ८५ ।।
ज्ञानेशाच्या अवतारा
मधुर मधुर अमृतधारा
पिलालागि झाला चारा
संजीवन दिधले दिधले ।। ८६ ।।
रामकृष्ण सम तू दिसशी
परमहंस तू मज गमसी
साधक बसता ध्यानासी
दोन्ही एकचि जाणवले ।। ८७ ।।
तुझ्या खडावा हृदयि धरू
तुझ्या गुणांचे गान करू
तुला अहर्निश स्मरू स्मरू
योगिराज परमानंदा ।। ८८ ।।
गुरुकृपा हो जयावरी
कृतार्थ झाला क्षितीवरी
सद्गुरु तत्त्वासी विवरी
सावधान ते परिसावे ।। ८९ ।।
तुझ्या कराने मी लिहितो
तुझ्या मनाने अनुभवितो
तुझ्या स्वरांनी आळवितो
भक्तिगीत सद्गुरुराया ।। ९० ।।
अमृतमय जीवन झाले
जधि गुरुंनी अंकित केले
आनंदाने मन धाले
भक्तिरंग चढता राहो ।। ९१ ।।
‘पातुं वसति’ पावस ते
यतिवर झाले ज्या वदते
माहेरचि ते सकलातें
पुण्यक्षेत्री वारी घडे ।। ९२ ।।
श्रींची खोली गाभारा
थारा नुरवी संसारा
सोऽहं भावचि खराखुरा
आसनस्थ झाला, दिसतो ।। ९३ ।।
अनाथपण ते संपविले
गुरुनाथांनी आपणिले
साधन स्वयेचि दाखविले
वेड लाविले त्या नादे ।। ९४।।
परमहंस भाग्ये दिसला
ज्ञानदेव तर अवतरला
कृतज्ञ साधक गहिवरला
लोळण घे पदि पुन:पुन्हा ।। ९५ ।।
देहातीत श्रीस्वामी
अनाम तरि वसती नामी
येती भक्तांच्या धामी
भावभरे त्या आळविता ।। ९६ ।।
चित्ताची नित प्रसन्नता
भगवंती पुरती निष्ठा
दे संरक्षण निजभक्ता
अनुभव हा श्रीस्वामींचा ।। ९७ ।।
गादीवर लविता माथा
स्पर्शभास सुखवी चित्ता
शब्दहि घुटमळती आता
परेत वैखरी विरलीसे ।। ९८ ।।
आत्मा नसतो शास्त्रात
आत्मा नाही मंदिरात
आत्मा आहे श्वासातीत
गुरुकृपेने हे कळले ।। ९९ ।।
सोऽहं चिंतन जधि चाले
हृदयस्थे दर्शन दिधले
पदोपदी भक्ती उमले
स्तोत्र होउनी ये रूपा ।। १०० ।।
‘नित्य काय’ हे जाणावे
अनित्य मोहा टाळावे
अनन्यभावा राखावे
शिकवण आचरणी यावी ।। १०१ ।।
सोऽहं तत्त्वा मुरवावे
अमानित्व अंगी यावे
जनी-विजनि तुज चिंतावे
‘तथास्तु’ वद सद्गुरुराया ।। १०२ ।।
भक्त भाबडा श्रीराम
आळवितो मंगलनाम
तयास कर तू निष्काम
गुरुवर्या हे प्रार्थितसे ।। १०३ ।।
स्तोत्र तुझे हे नित गावे
विदेहत्व देही यावे
‘मी-तू पण’ विलया जावे
कृपा करी रे, कृपा करी ।। १०४ ।।
देहबुद्धि ही लोपावी
आत्मबुद्धि उदया यावी
उत्कटता भक्तीत हवी
एवढाचि वर मजसी दे ।। १०५ ।।
नाथ सांप्रदायी आम्ही
रत व्हावे सोहं ध्यानी
जिवास ठावहि नुरवोनी
अनुयायीपण राखावे ।। १०६ ।।
दुजेपणासी वाव नसे
सद्गुरुमूर्ति हृदी विलसे
अज्ञानाचे तम निरसे
केवळ एका किरणाने ।। १०७ ।।
‘गुरुचि देव’ या भावासी
भावे धरूनी हृदयासी
वंदुनि सद्गुरुचरणांसी
स्तोत्रगान हे संपवितो ।। १०८ ।।
।। हरि: ॐ तत् सत् ।।
कवि : श्रीराम बाळकृष्ण आठवले