Monday, April 30, 2018

शोकाला श्लोकत्व लाभले ! अध्याय १ - अर्जुनविषाद योग


मनास होतो विषाद जेव्हा भगवद्गीता करात घे
वासुदेव तर तुझ्याच हृदयी योग तयाचा साधुनि घे!१

कृष्ण कृष्ण म्हण अनुरागाने तुझी आर्तता वाढू दे
मोह हराया तुझ्या मनाचा पार्थसख्याला धावू दे!२

असे कोण मी? करू काय मी? प्रश्न जयाला हा पडला
जिज्ञासा जागता मनाची ज्ञानमार्ग त्या सापडला!३

मरण आपले आप्तजनांचे कल्पनेतही सहवेना
मी माझे हे अवजड ओझे दूर फेकता येईना!४

प्रगतीच्या तर आड येतसे कर्तृत्वाचा अभिमान
मी कर्ता, फळ हवेच मजला असे मागते अज्ञान!५

मी लढतो ते राज्यासाठी वाट खरोखर चुकलो मी
वंद्य जगी ते वध्य कसे मज पुरता झालो लज्जित मी!६

ज्या शस्त्रांनी अधर्म होई रणात शस्त्रे ती त्यजिली
धनंजयाला शोकभयाने रणात भोवळ आलेली!७

विषाद आला शरण प्रसादा योग हरीशी जुळुनी ये
शोकाला श्लोकत्व लाभले चमत्कार हा पाहुनि घे!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

सदैव गीता वाचत जा..

अरे मना तू होउनि अर्जुन सदैव गीता वाचत जा
तुझ्या आतला माधव सांगे सदैव तैसे वागत जा !१ 

कर्तव्याचा निर्णय करते म्हणून गीता वाचावी
आशागीतच आहे गीता म्हणून गीता ऐकावी !२

देह येतसे देह जातसे नश्वर त्याचा मोह नको
दिसे न परि जो असे सुनिश्चित तो आत्मा विस्मरू नको!३ 

ओघे आले कर्म करूनी आवडता हो कृष्णाचा
अभ्यासा उत्साहे लागुनि घे घे अनुभव सोsहंचा!४ 

विकारातुनी विचाराकडे प्रवास ऐसा होऊ दे
अंधारातुनि प्रकाशाकडे प्रवास पथिका होऊ दे!५ 

कृष्ण कृष्ण म्हण येता जाता गीता आचरणी येते
सदा सर्वदा योग हरीचा गीताई साधुनि देते!६

तुझे प्रश्न अन् तुझी उत्तरे खेळ कसा हा गमतीचा 
गीताभ्यासे साधे प्रगती पाठ गिरव संन्नीतीचा!७ 

आठच कडवी या कवितेची गोडीने तू गाशील 
तूच तुझा उद्धार मानवा भवार्णवी या करशील!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Saturday, April 28, 2018

मंदिर हे नरसिंहाचे केंद्रच संस्कारांचे!


मंदिर हे नरसिंहाचे
केंद्रच संस्कारांचे! ध्रु.

सकलजनांनी येथे यावे
'दर्शन' घेउन कृतार्थ व्हावे
नाम वदावे वाचे!१

'श्रीनारायण' मंत्र लाभता
तनी वज्रता मनी अभयता
साधक जन भाग्याचे!२

परमात्मा सर्वत्रच आहे
अंतरि आहे, भवती आहे
स्थान असे भजनाचे!३

येथे यावे, घ्यावा अनुभव
प्रल्हादाचे श्रद्धावैभव
आपण मिळवायाचे!४

श्रोता वक्ता समरसताना
इथे तजेला क्षणसुमनांना
निधान हे सौख्याचे!५

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

नरहरे, घालतो साद! तू आम्हां कर प्रल्हाद!

नरहरे, घालतो साद!
तू आम्हां कर प्रल्हाद!ध्रु.

तव मूर्ती नयनी भरली
नकळताच अंतरि ठसली
तव दर्शन दे आल्हाद!१

"नारायण" म्हणता म्हणता
देहत्व लयाला जाता
ये मोक्ष सहज हातात!२

ही ओळख बहु जन्मांची
आश्वासक वाटे साची
पाउले येथ वळतात!३

नयनी ये अश्रूपूर
तू नकोस लोटू दूर
तव दर्शन हाच प्रसाद!४

मन नामस्मरणी रमते
नकळतच मस्तक लवते
ओठात शब्द अडतात!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

उठा उठा नरहरी!

उठा उठा नरहरी! ध्रु.

प्रभात झाली, या शुभकाली
दिठी दर्शना आतुरलेली
कृपा करा सत्वरी!१

उपासना नित, करवुनि घ्या हो
चित्त सदोदित प्रसन्न राहो
या हो या अंतरी!२

तुम्हां स्मरता सरल्या चिंता
आनंदाश्रू नयनी झरता
उठली तनि शिरशिरी!३

प्रल्हादाची श्रद्धा द्यावी
निर्भयता आचरणी यावी
घुमवा तनुबासरी!४

अधर्म जगती बळावलेला
रिपूवरी त्या घालू घाला
आवाहन हे करी!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, April 19, 2018

कृतार्थ जीवन अण्णांचे..

कृतार्थ जीवन अण्णांचे!ध्रु.

रूढीच्या बंधनी जखडली
ऐसी अबला स्वतंत्र केली
फल निर्धाराचे!१

असा तपस्वी, असा मनस्वी
तेजस्वी हा अंति यशस्वी
सार प्रयत्नांचे!२

नावे धोंडो कुसुम सुकोमल
ऋषिस्मरण हे मंगल मंगल
अर्घ्य जीवनाचे!३

पुसता अश्रू हासू उमले
स्त्री साठी नवविश्व लाभले
साक्षी सगळ्यांचे!४

इथे न थांबू जाऊ पुढती
पथिका वाटा उलगडताती
निधान स्फूर्तीचे!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

ना प्रभू दे अंतर

चालणे चालूच ठेवा
चढ असो वा उतरण
साधणे संवाद जमवा
गोड गाली हासुन !१

नाम घ्यावे गुणगुणावे
तुष्ट व्हावे ऐकुन
वेळ लागे सार्थकी हा
दिवस सारा शुभ दिन !२

देव सारे भेटताती
चालणारे बोलते
कुशल सारे सांगताती
मोकळे बहु वाटते !३

जे दिसे ते देव समजा
सृष्टि माता आपली
टेकड्यांची चढण छोटी
कौतुकाने हासली !४

चांगले जर कथन केले
लाभते प्रोत्साहन
संत उत्सुक सांगण्याला
अल्पमोली बहुगुण !५

मागणे काहीच नाही
सांगणे ना फारसे
हा असा श्रीराम भेटे
भाग्य का थोडे असे ?६

सातही वारी म्हणावे
होतसे पाठांतर
पालटे मन साथ दे तन
ना प्रभू दे अंतर !७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Tuesday, April 17, 2018

झटक मोह देहाचा तू....

रडून काय कधी मना गेला जीव येत असतो
झटक मोह देहाचा तू कोणीच येथे राहात नसतो । ध्रु.

बाहेर धावशी तळमळशी तू क्षणक्षण वाया गेला
आत वळशी नाम घेशी राम येतो भेटायला
न बोलता संवाद साधतो जाणता पुरुष शांत बसतो। १

गेला त्याचे काम तुला जीव ओतून करायचे आहे
कृष्ण कर्ता आतून तुला शक्तिस्रोत पुरवत आहे
श्वासासंगे जुळवुन घ्यावे सोsहं स्वर कानी येतो।२

वाचण्यापुरती नसते गीता घोट घोट सेवन कर
विचाराने विवेकाने माझ्या मना तूच सावर
वडीलपणा पुत्रधर्मही देहासंगे जळत नसतो।३

भलबुरे आतून कळते सारासार ध्यानी धर
मनोहर तूच मना सत्कर्माचा मार्ग धर
कर्तव्याचा दीप पथिका रस्ता रस्ता उजळत जातो। ४

आज ना उद्या येथुन आपला मुक्काम नक्की हलणार आहे
कसा जगला माणूस गीता काळपुरुष पहाणार आहे
समिधा होऊन यज्ञी पडतो तोच मरून अमर बनतो। ५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३ जानेवारी १९९७

Monday, April 16, 2018

जाग आणली मला

हात जोडले, वंदन घडले
जाग आणली मला
दयाळा, प्रणाम देवा तुला! ध्रु.

हालचाल देहाची घडता, जडता बघ लोपली
नामस्मरणी मने रंगता स्फुरली भूपाळी
तूच शिकविले मला। दयाळा  १

शीतल जल ते, हस्तपादमुख शीतल करणार
पवन सुगंधी अवचित येउन स्पर्शून जाणार
विशाल गगनी, पहा आतही चेतविलेसी मला। दयाळा २

आयु वाढवुनि मिळे तर तना आता झिजवावे
देहदुःख विसरून जनांना प्रेमे सुखवावे
लिहुनि कवने गाउनि दाखव
दीक्षा दिधली मला। दयाळा ३

उंबरठ्याचा घाटच अवघड जा ओलांडून
नकोस घेऊ आपआपणा ऐसे कोंडून
उत्साहाचा, चैतन्याचा निर्झर केले मला। दयाळा ४

गीता, ज्ञानेश्वरी, भागवत, तुकयांचा गाथा
समजुन उमजुन सुलभ सुगम कर तू गीते गाता
कृतज्ञ कविने श्रीहरीचरणी
देह लोटुनी दिला। दयाळा ५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, April 8, 2018

पराधीन नाही जगती पुत्र मानवाचा...

पराधीन नाही जगती पुत्र मानवाचा! ध्रु.

झुंज द्यावयाची आहे प्राणपणे येथे
खचायचे नाही कधीहि भान मना येथे
मार्ग जरी काटेरी हा मला चालण्याचा!१

उगाच का कष्टी व्हावे जरी होय हार
एकवटून शक्ती सारी करावा प्रहार
हार जीत यांनी नक्की घोष विक्रमाचा!२

स्वयंनियंत्रण मज रुचते नसे पराधीन
मी न कधी होतो हळवा आणि उदासीन
ध्येय खुणावे मज रस्ता आत्मविकासाचा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

२००४ मधे सकाळ मधे सुप्रभात या सदरामधील खालीलप्रमाणे विचार वाचल्यावर सुचलेली ही कविता.
पराभूत मनोवृत्तीच्या तत्त्वज्ञानाला आळवत बसण्यापेक्षा मूलभूत आणि स्वयंभूतेचे स्वतंत्रतेचे विचार मनात रुजवले पाहिजेत. कोणत्याही घटनेवर आपण नियंत्रण करू शकत नसल्याने पराधीन ठरत नाही. आपण नियंत्रण करतो ते घटनांवर नाही, तर घटनांना आपण जो वैचारिक, नैतिक व भावनिक प्रतिसाद देतो त्यावर. ते विचार व भावना सर्वस्वी स्वयंनियंत्रित व स्वतंत्र असतात. स्वतः मधल्या या नियंत्रक क्षमतेची जाणीव झाली की मन बलशाली आणि निश्चयी होते.