Saturday, June 30, 2018

साईनाथा मजसी प्रसाद द्या..

साईनाथा मजसी प्रसाद द्या
कुरवाळा मज शांती द्या!ध्रु.

कणाकणातून भरला आपण
विरवा हलके माझे मीपण
एकपणा मज अनुभवु द्या!१

बसल्या ठायी नयन मिटावे
मिटल्या नयनी आपण यावे
भावभेट नित ध्यानी द्या!२

वामहस्त दक्षिण चरणावर
श्वेतवसन मुनि बसे शिळेवर
सोsहंचा मज छंद द्या!३

कामक्रोध हा झाडा कचरा
बरसा हृदयी अमृतधारा
प्रेमळवृत्ती अपुली द्या!४

श्रद्धा द्यावी सबुरी द्यावी
साधन करण्या सन्मति द्यावी
अशीर्वच उत्तेजन द्या!५

चैतन्याचा ध्यास लागु दे
चैतन्याचे गीत गाउ दे
कीर्तनरंगी नाचू द्या!६

देहातुनि न्या देवापाशी
मला जाणवो मी अविनाशी
'तत् त्वम् असि' हा प्रत्यय द्या!७

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

कितिकितिदा घोकायाचे शिरडीला मज जायाचे..

कितिकितिदा घोकायाचे
शिरडीला मज जायाचे! ध्रु.

साईमाय माझी
वाट पाहे कधीची
कडकडून भेटायाचे!१

आनंदाने गावे
गावे गावे जीवेभावें
भजन साईरायाचे!२

हाती खंजिरी प्रेमाची
पायी घुंगुरे सोsहंची
भक्तिरंगी रंगायाचे!३

गोदामाईचा तो घाट
भक्तिप्रेमाची ती पेठ
भरभरुनि प्रेम घ्यायाचे!४

माझी ज्ञानाई साई
माझी तुकाई साई
विश्वात्मक मज व्हायाचे!५

वाटे कल्पतरु साई
माझे दत्तगुरु साई
सोsहं ध्यानात रंगायाचे !६

काय वानू नवलाई
कनवाळू साईमाई
फळ रसाळ मज व्हायाचे!७

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
२९.०७.१९७६
कितिकितीदा घोकायाचे
👆🏻 ऑडिओ

Sunday, June 24, 2018

श्री साई बावन्नी

शिळेवरी साई बसले मनी रूप हे ठसलेले
फिकीर विश्वाची ज्यांना शिरडी आवडली त्यांना
रोखुनि डोळे ते बघती मनातले झणि ओळखती
साई साई मी म्हणता रसना प्रेमे ओलवता
दोन्ही डोळे हे भरता मनोमलिनता मावळता 
श्रद्धेचा उगवे चंद्र लोप पावते ते तिमिर
सबुरी म्हणजे सोशिकता धैर्याची शोभे माता
उदी ठसवते नश्वरता संजीवक सगळ्या भक्ता
ती लावावी भाळाला का भ्यावे कळीकाळाला
ज्याच्या खांद्यावर झोळी अशुभाची करतो होळी
कांदाभाकर आवडते गाणे देवाचे रुचते
सबका मलिक एकही है उपदेशाचे सूत्रच हे
मानवतेचे बालक हा शांतीचा आश्वासक हा
धर्माचा अभ्यासक हा मांगल्याचा पूजक हा
जरी लेखणी ना धरली उपनिषदे त्या स्फुरलेली
कोणासाठी शंकर हा दत्तगुरु कोणासी हा
आकारी नच मावतसे मनामनातून शिरलासे
ज्ञानेश्वर हा आळंदीचा तुकाराम हा देहूचा
पैठणचा जणु नाथ असे या रूपे सद्भाव वसे
दासगणू नि उपासनी आवडती त्यांना दोन्ही
संतकवी स्त्रीचा त्राता व्यवहारीही नि:स्पृहता
शिरडी तैसी साकोरी तीर्थक्षेत्रे भूमिवरी
देहाची सोडा ममता मी असताना का चिंता
जो कोणी पायरी चढे भाग्य तयाच्या पुढे खडे
चुकले कोठे कळले ना भगवंताला ये करुणा
साई साई असे म्हणा कुणी अधिक ना कुणी उणा
रोग निपजतो देहात उपचारही तो देहात
देव नांदतो भावात धर्म वसे माणुसकीत
समता जगती वर्तावी अहंभावना खंडावी
मोदाची गुढी उभवावी शिरडीची यात्रा व्हावी
स्मराल तेथे मी आहे स्मराल तेव्हा मी आहे
स्मराल तैसा मी आहे कणकण क्षणक्षण मी आहे
पायघोळ कफनीच बरी फडके माथी मुकुट जरी
साई दीनास्तव दीन साई लीनाहुन लीन 
साई वृद्धाचे आसू साई बाळाचे हासू
साई जैसा मशिदीत मंदिरात गुरुद्वारात 
चुकले हळहळ वाटू दे माय आसरा देऊ दे
सुधारणा ती घडवू दे भक्तीपथावर आणू दे
नरनारी सगळेच हरि साईनाथ तू असे करी
उजाड भूमी भिजवावी हिरवा शालू ती ल्यावी
नको रुक्षता वचनात हवी सुजनता वृत्तीत
आवेगे जवळी घ्यावे बालकास या चुंबावे
जातिभेद ते विसरावे साई साई मी गावे
उणे भरूनी काढावे अंतर्मुख बनता यावे
स्थल काला ओलांडावे विश्वात्मक मज बनवावे
गीतेचा जडू दे छंद राम कृष्ण हरि गोविंद
साई सत्चरिता ध्यावे जे न दिसे ते उमजावे
माझा मी घेता शोध  कुठे काम कोठे क्रोध
मशीदीतली दिपवाळी बारा मास घरी व्हावी
माझ्या नकळत हे व्हावे मनमंदिरि साई यावे
उघड दार मन खुले करी साईनाथा त्वरा करी
साई बावन्नी इथे पुरी साईचरणा राम धरी

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, June 21, 2018

चला करू या व्यायाम...

चला करू या व्यायाम!ध्रु.

सतेज होऊ
सुदृढ होऊ
चला शिकु प्राणायाम!१

प्रातःकाळी
रवि उदयाचलि
रूप तयाचे अभिराम!२

मन:संयमन
भगवद्चिंतन
हाच जिवाला विश्राम!३

आठहि अंगे
वंदन रंगे
उच्चारू या रविनाम!४

मंत्र आगळा
आम्हा लाभला
होऊ आपण बलराम!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Wednesday, June 20, 2018

सखि प्रवास सुखमय उत्तररंगाकडे....

अशि वाट संपता खडतर वळणे-कडे
सखि प्रवास सुखमय उत्तररंगाकडे!ध्रु.

हातात घालुनि हात फिरत असताना
गुंतलो मने कल्पना मुळी नसताना
आकर्षण मधुमय भान हरपवी गडे
सखि प्रवास सुखमय उत्तररंगाकडे!१

कालची संकटे, भीती, कठिण प्रसंग
जे गडद भासले पार निवळले रंग
उतरलो कसोट्या शिकलो अवघड धडे
सखि प्रवास सुखमय उत्तररंगाकडे!२

सुरकुत्या तनावर अंधुक अंधुक दिसे
परि उठले असती चरणांचे पथि ठसे
कधि नव्हते इतके परस्परांविण अडे
सखि प्रवास सुखमय उत्तररंगाकडे!३

देऊन न सरते घेउन उरते सदा
कुणी म्हणोत माया वरदायिनी हिज वदा
जरि थकते पाउल पथावर पडे पुढे
सखि प्रवास सुखमय उत्तररंगाकडे!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, June 17, 2018

आशीर्वाद

मुला तुला शाळेत घातले तुझेच तुजला शिकायचे
बलशाली हो, हो उद्योगी विश्वाला सुख द्यायाचे! ध्रु.

अक्षर सुंदर मोत्यावाणी नयनांचा तो आनंद
हिशेब वेळेचा द्रव्याचा, कलागुणांचा घे छंद
एकलव्य तू गुरुनिष्ठेने पुढे पुढे तुज जायाचे!१

इतिहासाने स्फूर्ति लाभते, हस्तकला दे उद्योग
चित्रकला सौन्दर्य दाखवी संस्कारे हरिशी योग
विशाल दृष्टी, विशाल सृष्टी बाल्यी हे जाणायाचे!२

भूगोलाने दिली प्रेरणा सारे जग मी पाहीन
भाषा फुलवी भावभावना दुःख दुज्याचे जाणेन
संगीताने तुला शिकवले समाजजीवन जगण्याचे!३

पाठांतर हे ज्ञान जिभेवर थोरांचा सहवास खरा
स्फूर्तिकेंद्र तू हो सगळ्यांचे असा खळाळो मोदझरा
मेरूसम तू राही निश्चल वज्रासम तुज होण्याचे!४

कृतज्ञता ही सद्गुरु भक्ती विनम्रता ही श्रीमंती
दैवीगुण तू जोडत जाता वश होती ऋद्धी सिद्धी
तुजवर केंद्रित सगळ्या दृष्टी आशीर्वच तुज थोरांचे!५

सहली शिबिरे विरंगुळा हा कंटाळ्याला पिटाळले
प्रयोगशाळा प्रात्यक्षिक ते अचूकपण अंगी आले
अनुभवातुनी ज्ञान लाभते ज्ञान देउनी फुलायचे!६

दूरदर्शना घरी सोड तू खेडोपाडी भटकत जा
कशी मोकळी हवा कसा तो निसर्ग त्याची चाख मजा
काटकपण जर अंगी आले मानच देणे देवाचे!७

अंकुरणारे बीज जसा तू, तूच उद्याचा वटवृक्ष
तूच जिवाचा आश्रयदाता समाज ठेवुन हे लक्ष
वसा घेतला उतू नको तू असे वागणे पथ्याचे!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Tuesday, June 5, 2018

कलियुगात अवतरले रामराज्य भूमीवरी - शिवराज्याभिषेकावर आधारित गाणे



रायगडी शिंग नभी उच्च स्वरे घोष करी
कलियुगांत अवतरले रामराज्य भूमीवरी ! ध्रु.

तीर्थरूप माउलीला
वंदण्यास शिव झुकला
थरथरता कर फिरला
रोमरोम तनी फुलला
हर्षभरे नयनांतुनि ओसंडत अश्रूसरी!१

गंगा-सिंधु-यमुना
गोदा-कृष्णा-पवना
भरभरुनी कलशांना
घालण्यास शुभस्‍नाना
तटिनी भगिनी मिळुनी जमुनी पोचल्यात येथवरी!२

शोभतसे छत्र शीरी
धारदार खड्ग करी
भवति उभे सहकारी
देई सभा ललकारी
विष्णुचा अंश तूच, तू अमुचा कैवारी!३

वेदमूर्ति गात गान
कर्ण नवा देत दान
वडिलांचा होत मान
तृप्‍त सकल थोर-सान
शुभदिनी या शक नवीन प्रचलित हो राज्यभरी!४

कवि : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Monday, June 4, 2018

अवघाची संसार सुखाचा होण्यास.

अंग मोडूनि काम करावे आळस नाही कामाचा !१
घरदार आपले स्वच्छ ठेवावे, ठाव नसावा केराचा!२
घर हे मंदिर समजावे, प्रत्यय यावा शांतीचा!३
हास्य मुखावर विलसावे, प्रपंच सगळा रामाचा!४
नको अहंता, नको दुरावा आदर्शच सहकार्याचा!५
पति नारायण पत्नी लक्ष्मी भाव असा हा जपायचा!६
तुच्छ न दुसऱ्याला समजावे मान राखणे दुसऱ्याचा!७
मनी मानसी अढी नसावी डाव मोजक्या घटिकांचा!८
झाले गेले ते विसरावे मार्ग चांगला भक्तीचा!९
स्वावलंबने श्रीहरि तोषे यज्ञ खरा सत्कर्माचा!१०
देता घेता वाढतसे सुख हात असावा कर्णाचा!११
समेट करणे पुढती होउन काय भरवसा देहाचा!१२
चैन न वाटो गरज कदापि निर्व्यसनी तो सगळ्यांचा!१३
मुले खेळती ते घर गोकुळ खेळ असे भगवंताचा!१४
मना रोग ना शिवो कधीही छंद जडो हरिनामाचा!१५
सद्गुण रुजती अनुकरणाने जो सावध तो भाग्याचा!१६
तथास्तु वदतो वास्तु पुरुष तो सत्संकल्पच वदायचा!१७
शुभं करोति नित्य म्हणावे सांगावा गृहलक्ष्मीचा!१८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले