जन्माचा हेतू कळला पाहिजे.
आयुष्याचे ध्येय ठरवले पाहिजे.
एकही क्षण वाया दवडायचा नाही. धनही सत्कारणी लावायचे, जे ज्याचे ते त्याला देत असायचे.
आपले येथे काहीच नाही हे मनात पक्के जाणून असायचे.
'कृष्णच कर्ता, कृष्ण करविता'
स्तंभात दडून बसलेला नरसिंह दैत्यांचा अन्याय फार काळ सहन नाहीच करू शकत-
प्रल्हादाचा भावार्थ जाणून तो प्रकट होतो.
दुष्टसंहार करतो हे सत्य आहे.
म्हणून श्रीसत्यनारायणा पुढे हा सत्संकल्प बोलून दाखवून अर्घ्य अर्पायचे.
सत्यार्थ जन्म आहे सत्यार्थ मृत्यु यावा
धनकनककामिनींचा थोडा न मोह व्हावा!ध्रु.
पशु जी क्षणात बनवी मदिरा कशास प्यावी?
कर्तव्यभान जाई-रामास दुःखि गोवी
त्या स्वर्णमयमृगाचा हव्यास का धरावा?१
हा देश देव माझा स्वातंत्र्य प्राण आहे
दैदिप्यमान व्हावा हा एक ध्यास आहे
ध्येया कशास विसरू का व्यर्थ श्वास जावा?२
नारायणेच केले वास्तव्य अंतरात
केले तमास दूर झाली मनी प्रभात
जनता जनार्दनाला मी नित्य अर्घ्य द्यावा!३
नरसिंह विक्रमी जो स्तंभात गुप्त आहे
अन्याय लेश तोही कैसा कशास साहे?
गगनास भेदणारा घनघोष तीव्र व्हावा!४
माझे न येथ काही सगळे दयाघनाचे
कर्तृत्व श्रीहरीचे फल निश्चये तयाचे
तो कर्मयोग रामा थोडा तरी कळावा!५
रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
(सुजनहो सत्यच नारायण मधून)