Sunday, October 14, 2018

राजहंस तू....

कसले अवघड सोपे सगळे
राजहंस तू बाकी बगळे!ध्रु.

आपआपला धरी भरवसा
कालावर उमटवी पदठसा
परब्रह्म जगि बाळ सानुले!१

शिशुपण बरवे लेप न कसला
बालभक्त अत्यंत सोवळा
भलतेसलते मना न शिवले!२

बाप्पा आतुन जे सांगतसे
नाम तयाचे तो वदवतसे
कधी कुठेही भजन रंगले!३

प्रश्नामागुन प्रश्न जन्मती
आपोआपच सगळे सुटती
त्यांचे ओझे का शिरि धरले!४

कर्तव्याची कास धरावी
फिकीर दुखण्याची न करावी
थोरपणाचे माप वेगळे!५

नित्य नवा दिस जगण्यासाठी
आनंद देण्याघेण्यासाठी
चिखलामध्ये कमळ उमलले!६

सोपवले सगळे देवावर
भक्त उमावर भक्त रमावर
प्रसन्नतेने भाग्य हासले!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७.०४.२००४

Friday, October 12, 2018

उदे गे अंबाबाई आई उदे गे अंबाबाई..



उदे गे अंबाबाई
आई उदे गे अंबाबाई!ध्रु.

तुझीच आम्ही सगळी बाळे
अजाण असलो तरी लडिवाळे
चुका सुधारुन देई!१

या देहाच्या करी घागरी
सोऽहं फुंकर घाल झडकरी
घोष घुमव गे आई!२

तूच शिवाई शिवनेरीची
आई भवानी तुळजापुरची
आवडते रणघाई!३

नर नारी हा भेद संपवी
अक्षर अक्षर गिरवुन घेई
भारतमाते आई!४

तू वाणी संगीत नि नर्तन
तू परिचर्या तू अध्यापन
कर संगोपन आई!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Wednesday, October 10, 2018

आरती रेणुका मातेची ..

जय देवी जय देवी रेणुका माते
आरती गाण्याला भाविक आतुरते!ध्रु.

सकाळी दुपारी संध्याकाळीही
तुझाच आधार पाठीशी राही
तुझेच स्मरण नित्य तारते!१

अवती भवती जनी विजनी
डोंगर दऱ्यात तसे गगनी
बघू जाता तुझे दर्शन घडते!२

चालता बोलता देऊळ आले
चिंता क्लेश दूर देशांना गेले
भक्तांच्या मनात आले भरते!३

आरोग्य देहाचे तसे मनाचे
भान राहाणे एकपणाचे
रामाचे भाबडे मन मागते!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Saturday, October 6, 2018

मद्यपी.

मद्याच्या प्याल्यामाजी सुखदुःखे बुडली अवघी
कुणी नाही जगती माझे, मी जगी कुणाचा नाही!

उकलता हृदयिचा कंद
प्राशुनिया होतो धुंद
थिजतात नयनिचे बुंद
मनवारु उधळता स्वैर, त्या दिशा थिट्या दाहीही!

श्रद्धेचे ढळता कुंकू
मन उदास लागे भटकू
करि आत्मार्पणि ते कांकू
औचित्य-चितेवर चढुनी मी मलाच जळता पाही!

संसृतिचा झंजावात
करि पुनःपुन्हा आघात
गरगरे नाव दर्यात
आशेचा तुटता तंतू, मी सदय मृत्युला बाही!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१५.१०.१९६०