Tuesday, December 31, 2019

योगेश्वर श्रीकृष्णाची आरती ..

आरति गाऊ चला सुजनहो
योगेश्वर श्रीकृष्णाची!ध्रु.

सुखदुःखांकित असते जीवन
शांत मनाने ते स्वीकारून
कला शिकू या हसतमुखाने
समूहजीवन जगण्याची!१

भगवद्गीता हरिची मुरली
अभ्यासाने मनात मुरली
नको फलाशा कर्म घडावे
खूणगाठ ही यज्ञाची!२

धर्माहुन ना वरिष्ठ काही
वस्तु व्यक्ति वा गौणच राही
सदाचरण धर्माचा पाया
शिकवण ही यदुवीराची!३

इथे जन्मलो तनमन झिजवू
कार्य संपता निघून जाऊ
आसक्तीला कुठला अवसर?
नव्हेच वार्ता मोहाची!४

कामक्रोध हे कौरव कपटी
दास तयांचे सदैव कष्टी
दैवी संपद् जोडत जावी
हीच आस श्रीरामाची!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.७.१९९५

अवजड गिरि पेलून धरू..

गोवर्धन गिरिधारी नेता, गोपगडी सहकार्य करू
नेटाने या काठ्या लावुन अवजड गिरि पेलून धरू!ध्रु.

पर्वत अडवी मेघांना मग मेघ कसे धारा होती
सुजला सुफला सस्यश्यामला होते कृष्णासम धरती
गाई हिरवा चारा चरती, ऋण या गिरिचे सतत स्मरू

पाहिला न जो इंद्र कधी तो जो देवांचा स्वामी असे
त्याहुनि हा गिरिराज जवळचा नेत्रांना प्रत्यक्ष दिसे
प्रदक्षिणा या गिरीस घालू, सृष्टीकार्य ध्यानात धरू

यज्ञाचा तो अर्थ कळाला मोहाचा या होम करू
जय गोवर्धन तृणसंवर्धन गिरिराजाचा घोष करू
व्यक्ती व्यक्तींचा जनसागर संघकार्य हे सुरु करू

संकटात लागते कसोटी कृष्ण कसा ठाके ठाम
स्थैर्य धैर्य ते शिकवी सकलां नंदाचा मुलगा श्याम
मेघश्यामा पाहुन मेघहि सौम्यरूप लागले धरू

चमत्कार ना ही हरिलीला श्रद्धेने हे कार्य घडे
मति हो कुंठित तेथे भक्ती उपयोगाला सहज पडे
शक्तियुक्तिचा सुंदर संगम साक्षी सगळे गोप ठरू

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
५.८.१९९५

Thursday, December 26, 2019

समाधान वस्तूपलीकडे आहे

मला हे हवे रे, मला ते हवे रे
मने घोकले हे सदा सर्वदा रे
असे हावरी हाव जाणूनि घे रे
चुकेना जिवाला असंख्यात फेरे!१

समाधान ते काय वस्तूत आहे?
दिसे भासते सर्व जाणार आहे -
अरे साधका 'सार' शोधून पाहे
तुझा राम आतून हे सांगताहे!२

नको धावणे, शीणणे, कष्टि होणे
नको ते जिवाला सदा डाग देणे
सदा धावते त्या मना आत नेणे
मना शांतवाया सुखे नाम घेणे!३

जसा देह येई, तसा देह जाई
न येणे न जाणे शिवाला कधीही
समाधान ते का कधी सांगता ये
जरा स्वस्थ होऊन भोगून पाहे!४

असे जो विरागी विवेकी विचारी
जरी तो प्रपंची तरी ब्रह्मचारी
महादेव कैसा मना तू विचारी
अरे नाम घे होइ मोक्षाधिकारी!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२०.४.१९९०

Wednesday, December 25, 2019

येशु ख्रिस्त..

या येशूचे हेच सांगणे -
'परस्परांवर प्रेम करा!'
भगवंताच्या आज्ञेने मी
सर्व  बोलतो हृदयी धरा!

मी तुम्हा विश्रांती देतो या अवघे माझ्यापाशी
माझ्यापासुन शिका सर्वजण जाणा जाणा अविनाशी
मला अनुसरा दूर कराया
अज्ञानाच्या अंधारा!

झाले गेले विसरून जावे ते गतमार्गे जाऊ दे
भगवंतावर हवा भरवसा मी माझेपण लोपू दे
जीवन मृत्यू मी तर दोन्ही
जो विश्वासे शिष्य खरा

'प्रेम' तेवढा शब्द असू दे जाता येता ध्यानात
नेम न याचा येइन केव्हा देव जागवा हृदयात
भगवंताचा मार्ग स्वये मी
निर्धारे चालाच जरा

पश्चात्तापे पाप संपते सुधारणा सत्वर होते
त्यागे जागे दयाभावना क्षमा मना शांती देते
प्रसन्नतेने सहन करावे
आतुन वाहे धैर्यझरा!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, December 22, 2019

आनंदाचा कंद अंतरी..

आनंदाचा कंद अंतरी स्वरूप त्याचे नाव असे
सगुण नि निर्गुण आत्मरूप ते वदनावरती स्मित विलसे
नव्हे देह मी मन बुद्धि न मी तो मी तो मी जाणवले
अभ्यासाला लाग बालका गुरुमातेने जागवले
पहावयाचे आपण अपणा याला म्हणती अध्यात्म
शोध अंतरी नित्य घ्यायचा घोळवीत वदनी नाम
का मानावे क्षुद्र आपणा झाले गेले विसरावे
जनार्दनाच्या सेवेसाठी चंदनसम तन झिजवावे
बारावा अध्याय कळाया भावार्थाची धर गीता
अंतरि भवती हरि भरलेला प्रपंच परमार्थच होता
उमेद काही अशी बाळगी रडणे कण्हणे सोडुन दे
उत्साहाने चाल बोल तू पुढचे पाउल पुढे पडे
स्वरूपात जो नित्य राहतो स्वधर्म त्याने आचरिला
हात देतसे पडलेल्याला नारायण तेथे दिसला
ध्यानकेंद्र प्रत्येकच व्यक्ती गुरुकृपांकित अनुभवितो
स्वामी असती पुढे नि मागे अढळ भाव तो बाळगतो
कसे व्हायचे काय व्हायचे स्वामी बघुनी घेतील
अनुसंधाना सुटू न द्यावे राखायाचे तुज शील
गुरुनिष्ठेचे कवच चढविता प्रहार घे छातीवर तू
कृष्ण स्मरुनी क्षणोक्षणी बघ झुंज झुंजता विजयी तू
जे कळते ते विवरत जाता शिक्षण अपुले होत असे
आचरणाने तत्त्व उजळते कृतार्थता मग वाटतसे
विरंगुळा हा असाच असतो अनुभव घे देता देता
जमेल तितके बोलुन घे रे श्रीहरि असतो बोलविता

रचयिता - श्रीराम बाळकृष्ण आठवले.
१६.७.१९९५
आनंदाचा कंद अंतरी (audio)

Saturday, December 21, 2019

आरती श्रीमहाराजांची!

आरती श्रीमहाराजांची! नामाची!
नामावरल्या प्रेमाची!ध्रु.

श्रीराम जय राम जय जय राम
येता जाता घ्यावे नाम, मन सुखधाम
गुरुकिल्ली आनंदाची!१

प्रपंच परमार्थाची शाळा
शिकण्यासाठी जन्म आपला
हौस नवनवे शिकण्याची!२

दोष न बघता, गुणच बघावे
गुणच बघावे सांगत जावे
ही पूजा श्रीरामाची!३

प्रवचन वाचन तसे आचरण
रघुरायाचे प्रसन्न दर्शन
शिकवण श्रीमहाराजांची!४

गोंदवले ये घरी आणता
नाम स्मरता पावन होता
कृतार्थता लाभायाची!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१५.७.२०००

नमस्कार साष्टांग भास्करा..

नमस्कार साष्टांग भास्करा -
आरोग्याचे दे वरदान!
गाऊ आम्ही तेजोगान!ध्रु.

कर दोन्ही हे सहजच जुळता
कळे तनाची एकवाक्यता
पाय ठाकती ठाम धरेवर
ॐकाराचे स्फुरते गान!१

शरीर बिजलीसम लवलवते
आनंदाची लाट उसळते
सकल अवयवा गती लाभता
प्रगतीचा चढतो सोपान!२

श्वसनावर लाभते नियंत्रण
आरोग्याला हेच निमंत्रण
सदा सर्वदा योग रवीशी
नमस्कार दे लाभ महान!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१९.५.१९९०

आस ही झाली पुरी!

सूड घेणे! सूड घेणे! आस ही झाली पुरी!
श्रीअनंते अंत केला जाचकाचा सत्वरी!ध्रु.

दास्य जेथे तेथ वीरा पंथ केवळ हा असे
शस्त्रचारी कर्मवीरा मृत्युभय लवही नसे
तो हुतात्मा प्राणदाने आळवीतो श्रीहरी!१

धरणिकंपहि ना जरी हा, आंग्लभूमी हादरे
शासकांचे चित्त शंकित होतसे परि बावरे
हा बटू जरी आज कीर्ती पोचलीसे अंबरी!२

'शारदा' जे नाट्य होते त्याहुनीही वेधक
नाट्य घडले मंदिरी त्या साक्ष होते प्रेक्षक
कीचकासी भीम वधितो चित्र बिंबे अंतरी!३

शत्रु शासक जरि गुणी हो त्या गुणा ना चाटणे
जहर जरि ते सेविले बुद्धि अपुली मारणे
वध्यता त्या जाचकाची वीर ना क्षण विस्मरी!४

फूल कोमल जे असे वज्र आता जाहले
लोहिताने विक्रमाचे पान अवघे रंगले
रक्तस्नाता मातृभूमी हासली चित्ती परी!५

चंद्र जो भासे जनांना तळपला भानूपरी
मार्ग उजळे आत्मतेजे संपवी तो शर्वरी
अर्घ्य म्हणुनी भास्कराते वाहिल्या अश्रूसरी!६

कोणि ना भुलवू शके देश सारा जागला
दास्य देणे दूर फेकुन चंग त्याने बांधला
वानगी ही निश्चयाची जाण देण्यासी पुरी!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Tuesday, December 17, 2019

गोसावी सजला! मोरया गोसावी सजला

अंगि शोभली भगवी कफनी
कंठी रुद्राक्षांची माळा
कमंडलू घेताक्षणि हाती
गोसावी सजला! मोरया गोसावी सजला! ध्रु.

दीक्षादाता श्रीगजानन
कानी केले मंत्रोच्चारण
प्रेमभराने पद्महस्त तो अंगावर फिरला!१

ग्रामी फिरती, मंदिरि जाती
तेज आगळे वदनावरती
जीवदान अन् दीक्षादानहि एकचि समयाला!२

मयुरेश्वर  प्रकटे त्याकाली
मातापितरे कृतार्थ झाली
प्रेमाश्रूंनी चिंब भिजविले निजसर्वस्वाला!३

गंडांतर हे कैसे टळले?
प्रभुलीला कोणास आकळे?
भट्ट न पदवी, गोसावी पद रुचे मोरयाला!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
पूरिया, त्रिताल

Saturday, December 14, 2019

स्वभाव पाहु या....

तटस्थ होउन आपण अपुला स्वभाव पाहू या!
राम नि रावण काय व्हायचे आधी ठरवू या!ध्रु.

विकारवश तो रावण झाला संयम मग सुटला
विचार करता राम जीवनी संयम शिकलेला
तोल मनाचा राखायाला भक्तीने शिकु या!१

देहामध्ये रावण दडला अंतरात नाम
नाम स्मरता सरे वासना प्रकटे श्रीराम
निर्धाराने आपण अपुला स्वभाव बदलू या!२

अहंकार जणु मद्य प्राशुनी रावण उन्मत्त
विनम्रता ती रामापाशी मोहित करी चित्त
हवे हवेसे सकला आपण सत्वर होऊ या!३

दशाननाला स्वार्थाने त्या नष्टभ्रष्ट केले
त्यागाने श्रीरामाला त्या उंच उंच नेले
सर्वात्मकता श्रीरामाची आपण मिळवू या!४

सत्तेसाठी रावण जगला जीवन ते कसले?
सेवा करुनी रामराय तर मनोमनी आले
भक्तिदीप हा करी घेउनी वाटचाल करु या!५

कामुकता त्या दशाननाची मुख झाले काळे
वैराग्याने श्रीरामाचे जीवन ते उजळे
नामासक्ती विषयि विरक्ती आपण मिळवू या!६

तमोगुणाने दूषित रावण अंत कसा त्याचा
सत्त्वाचा श्रीरामच पुतळा भाव कसा त्याचा
सत्य शिवाचे सुंदरतेचे पूजन हो करु या!७

बहिर्मुखाला भविष्य कसले त्याचा हो नाश
अंतर्मुख श्रीरामच आत्मा जाणा अविनाश
देहातुन त्या देवदिशेला पुढती जाऊ या!८

जीवनभर अन्यायच केला रावण ना राजा
न्यायासाठी राघव लढला जनतेचा राजा
विकार हटवुन विचारास त्या अवसर देऊ या!९

राम नि रावण दोघे मानव अंतर परि मोठे
कृती देव की दानव ऐसे मनुजा दाखवते
विवेकास त्या संगे घेऊन उन्नत होऊ या!१०

राम राम म्हणताना वाल्या अतरंगि वळला
करुणासागर शब्दप्रभु श्रीवाल्मिकी बनला
सुधारण्याची संधी आपण आधी साधू या!११

नारद करती सावध सकलां सावध ते तरले
बेसावध ते प्रलयामाजी भले भले बुडले
आशिवातुन या जिवास आपण शिवा भेटवू या!१२

'मेरा मेरा' विसरायाचे 'तेरा' हे गाऊ
झाले गेले विसरायाचे सावधान राहू
उत्साहाने श्रद्धेने हो रामा आळवु या!१३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१२.०१.१९९०

Thursday, December 12, 2019

रघुपति राघव राजाराम, पतितपावन सीताराम..

रघुपति राघव राजाराम, पतितपावन सीताराम!

आपण सारे गजर करू,
भवसागर हा सहज तरू
उत्साहाला पुरवी राम, पतितपावन सीताराम!१

मधुर बोलणे बोलावे
मधुर हासणे विलसावे
धागा अखंड विणतो राम, पतितपावन सीताराम!२

मर्यादा आतुन कळते
मी माझे हे मावळते
समंजसपणा दे श्रीराम, पतितपावन सीताराम!३

हात द्यायचा बुडत्याला
हसवायाचे रडत्याला
प्रेमाची शरयू श्रीराम, पतितपावन सीताराम!४

ज्ञान नेमके आत असे
आचरणातुन दिसत असे
ज्या त्या हृदयी आत्माराम, पतितपावन सीताराम!५

कधी ऊन, सावली कधी
कधी कष्ट, आराम कधी
सुखदुःखांचा काला राम, पतितपावन सीताराम!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१७.३.२०००

रघुपति राघव राजाराम.. ( ऑडिओ )

Wednesday, December 11, 2019

गुरुमहाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु..

गुरुमहाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु!ध्रु.

नाम स्मरता मन गहिवरते दत्तराज दिसले
तीन मुखे, कर सहा कसे ते सुंदरसे हसले
धुंद केवडा सुगंध उधळे अनुभूती आदरू!१

गुरुचरिताची चटक लावती घडते पारायण
श्रवणी पठणी श्रीगुरु लीला सद्गुरु गुणगायन
दुःख पळाले दूर दूर करु नामस्मरण सुरू!२

उगाच का हो कष्टी व्हावे, कोंडुनिया घ्यावे
समाजात जर मिसळुन गेला मन हलके व्हावे
सेवा साधन उजळवि तनमन श्रीगुरु करुणाकरू!३

जटा जूट शिरि काखे झोळी पायि खडावा हो
भस्मविभूषित काया अवघी गंगा उसळे हो
गाय तयांच्या पाठीमागे दीनबंधु श्रीगुरु!४

आधी हातालागी चटके मग मिळते भाकरी
तळमळ वाढे अतिशय अंती दिसे चक्रधारी
श्रीरामाच्या लेखणीतुनी गीत लागले झरू!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
४.११.१९९७
गुरुमहाराज गुरु जय जय
👆🏻 ऑडिओ

Tuesday, December 10, 2019

सागरा विनवितो जलराजा घरि घेउनि जा..



सागरा विनवितो जलराजा,
घरि घेउनि जा, घरि घेउनि जा!ध्रु.

उसळत लाटांवरती लाटा
परी बुजविती सगळ्या वाटा
तूच आणिले वचन देउनी
वचना स्मरुनी घेउनि जा!१

ओढ लागली मायभूमिची
तगमग सांगू कशी मनीची
ओघळलेले अश्रु मिसळतिल
मिसळुनि वदती घेउनि जा!२

पंजरात शुक हरिणहि पाशी
फसगत झाली माझी तैशी
विरह न पळभर मला साहवे
दुवा घ्यावया घेउनि जा!३

आंग्लभूमि ना मना मोहवी
मायभूमि मज जवळ बोलवी
सरितेच्या विरहाची तुजसी
शपथ घालतो घेउनि जा!४

विकल अवस्था मुकीच वाचा
भार निरर्थक मम विद्येचा
कैसा भुललो मती गुंगली
एकच धोषा घेउनि जा!५

आळवणी जर तू न ऐकशी
सांगिन तत्क्षणि अगस्ति मुनिशी
आचमनी एकाच प्राशतिल
मनी उमजुनी घेउनि जा!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

सागरा तुजसि विनवितो, ने परतुनि भारतभूला

मदनलाल धिंग्राच्या क्रांतीकृत्यानंतर सावरकरांना इंग्लंडमध्ये फार त्रास सहन करावा लागला आणि त्यातच भारतभूच्या विरहाचं दुःख. अशाच एका विषण्ण मनस्थितीत सावरकर ब्रायटनच्या सागरतीरावर उभे होते.  छे एक महाकवी उभा होता.  महाकवीच्या महान अंतःकरणातील भावनांचं आंदोलन महासागराशिवाय कोणाला समजणार? सागराच्या किनाऱ्यावर लाटा उचंबळत होत्या.. आदळत होत्या.. आणि इकडे मनाच्या काठावर देशप्रेमाच्या, स्वातंत्र्य भक्तीच्या लाटा उचंबळत होत्या. 

सावरकरांनी सागराला साद घातली - सागरा तुजसि विनवितो
--------------------------------------

सागरा तुजसि विनवितो,
ने परतुनि भारतभूला!ध्रु.

लाटा किती खळखळ करती
तीरावर येउनि फुटती
बनुनी फेन परतुनि जाती
सागरा प्राण तळमळला!१

मज शब्द एक वदवेना
मातृभूविरह सहवेना
अश्रुसरी या मुळि न थांबती
शोकाग्नि चित्ति भडकविला!२

का निर्दय होउन हसशी?
उद्दामपणे खिजवीशी
तू ऐकले न जर, याच क्षणी-
मी कथिन अगस्ति मुनीला!३

आठव श्रीरामशराते
आठव ऋषि आचमनाते
मत्प्रिय बंधो, करुणासिंधो
चल घेउनि माहेराला!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Friday, December 6, 2019

नाते पतिपत्नींचे

नर नारी या पलिकडचे
ते नाते पतिपत्नींचे!ध्रु.

दोन देह परि एकच आत्मा
देहांच्या लंघुनिया सीमा
मने मनाला जोडत जुळवत
फुलता फुलवायाचे!१

ते सोशिकपण डोळस ममता
गुणग्रहण चित्ताची समता
दोष न बघता सावरताना
दर्शन शिवशक्तींचे!२

उपभोगाची नुरे लालसा
राम अंतरी असा भरवसा
या संसारा भजन समजुनी
गाता रंगायाचे!३

वेलीवरती फुले उमलती
आपण हसती जनां सुखवती
सद्गुण सौरभ दूर दरवळो
स्वप्न सत्य करायाचे!४

विश्वासावर समर्पणावर
आस्वादावर, त्या त्यागावर
संतोषाचे निशाण सुंदर
फडकत ठेवायाचे!५

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
(राग मांड)
३०.९.१९९४

Thursday, December 5, 2019

श्री अरविंद

जीवनात यावा वेदान्त-
हे स्वप्न धरी मी हृदयात!

तो अनंत अनुभव देतसे
मन पवना बांधुन देत असे
आनंद न मावे गगनात!

जे तये दिले त्याचेच असे
ते तयास द्यावे वाटतसे
दर्शना तळमळे दिनरात!

हे विचार बाहेरुन येती
फेकता तया अंतरि शांती
ये निजानंद नितध्यानात!

मन माझे झाले विश्वमन
हे विश्वच झाले मज सदन
मकरंद भरे अरविंदात!

आदेश आतुनी तो देतो
तो चालवी तैसा मी चलतो
मी कुणी न उरलो जगतात!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Wednesday, December 4, 2019

विवेक हाच खरा मित्र.



विवेक: सर्वजीवानां
मित्रं कारुणिकं सदा।
मोहात् रक्षति सर्वत्र
रक्षाम् कर्तुम् प्रधावति।।

अर्थ : (खरोखर) विवेक हा (सद्गुणच) सगळ्या प्राण्यांचा परमदयाळू मित्र आहे. तो सर्व ठिकाणी (जीवाचे) मोहापासून रक्षण करतो व त्याचे रक्षण करण्यासाठी (वेळीच) धाव घेतो.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Saturday, November 30, 2019

हताश होणे शोभत नाही भगवंताच्या भक्ताला..



हताश होणे शोभत नाही भगवंताच्या भक्ताला
घरी न बसता चालत राहे जनार्दना भेटायाला!ध्रु.

चिंतन करता, चालत असता
दुःखामधले सुख कळते
वियोगातही आप्तांच्या त्या
हरियोगाचे फळ मिळते
जे घडते ते अंति हिताचे खूण पटे ज्याची त्याला!१

स्वरूपात जो निवास करतो
तोच असे हो आनंद
जे न बघे जग तेच दिसे त्या
स्थलकालाचे ना बंध
सद्गुरुशी संवाद साधण्या हा सरसावे ध्यानाला!२

खचू न द्यावे मना कधीही
कळ सोसावी मुद्दाम
निष्ठा लागे कसास अपुली
स्वामी पाठीशी ठाम
घाव टाकिचे सोसे तेव्हा मूर्ती ये आकाराला!३

हानिलाभ ही समान दोन्ही
खेद हर्ष मानणे नको
जन्ममृत्यु स्वाभाविक दोन्ही
हसणे रडणे नको नको
विकारवश ना तोच विवेकी हवाहवासा विश्वाला!४

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
२०.०१.२००२

हताश होणे शोभत नाही..
👆🏻 ऑडिओ

Monday, November 25, 2019

अभंग ज्ञानेश्वरी....

अभंग ज्ञानेश्वरी वाचणे अनुभव हा आगळा
अलंकापुरी पावस यांचा संगम हा साधला!ध्रु.

सहज बसावे हाती घेउन हा दैवी ग्रंथ
ओळीमागुन ओळी वाचत जावे हो संथ
अश्रू झरती भाव अनावर कंठ कसा दाटला!१

निकट आपुल्या 'स्वामी' बसले प्रेमळ सहवास
प्रत्यक्षाला कसे म्हणावे हा तर आभास
अभ्यासाची लागे गोडी नम्र साधकाला!२

अंतर्यामी घेत राहावे शोध स्वरूपाचा
या यत्नातच आहे दडला स्रोत आनंदाचा
घराघरातुन अखंड चालो पारायण सोहळा!३

मज हृदयी सद्गुरु माउली ज्ञानाई बोले
पटते याची साक्ष भाविका तोही मग डोले
श्रीकृष्णाची मुरली वाटे ग्रंथराज सकला!४

तपाचरण हे अभ्यासावी अभंग ज्ञानेश्वरी
पुन्हा पुन्हा वाचता चरण हे उचंबळत लहरी
या प्रेमाच्या गावा जावे ध्यास लागलेला!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१७.६.१९८९

Sunday, November 24, 2019

भावार्थाची उजळ दीपिका!

भावार्थाची उजळ दीपिका अगा ज्ञानदेवा
ओवी ओवी शिकव राजसा सर्वात्मक देवा!ध्रु.

भगवन् विष्णो हे ज्ञानेशा कर अमुचे जुळले
गीतार्थाच्या श्रवणालागी श्रोते आतुरले
प्रभातकाली किरण एक तरी अंतरात यावा!१

मातृत्वाचा मंगल महिमा सद्गुरुची स्तवने
ऋग्वेदाच्या ऋचा कवीशा गा गा उच्च स्वने
माधुर्या माधुर्य आणण्या प्रसाद तू द्यावा!२

थोर विरागी तत्त्वज्ञानी योगी योग्यांचा
शैशव गमशी मानवतेचे मौनावे वाचा
वदनी सुस्मित हे मौनांकित ऐक ऐक धावा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१०.५.१९८४

माउली माहेरा चालली..

अनामिक ओढ उरी दाटली
माउली माहेरा चालली!धृ.

गीताजीवन जगता आले
कारुण्यी दडवुनी पाउले
प्रसन्न शांती मनसा भोगत
पुढे पुढे चालली!१

पैलतीराला नेत्र लागले
श्रीविठ्ठल सामोरे आले
अनंतास आसक्ती लावत
हलकेसे हासली!२

जगात असुनी जगावेगळी
वैराग्याची धुनी पेटली
निवृत्तीही ढळू लागला
मुक्ता बावरली!३

शब्दाला जणु अर्थ सोडतो
लावण्याचा प्रकाश जातो
ऐन दुपारी लोपे दिनकर
सृष्टी अंधारली!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२६.२.१९८३

Wednesday, November 20, 2019

मोडुनीया लेखण्या...

मोडुनीया लेखण्या हाती घ्या हो संगिनी!ध्रु.

ओळखा युगधर्म हा
शस्त्रमहिमा थोर हा
सैनिकी सामर्थ्य येते राष्ट्रजीवनरक्षणी!१

दूर ठेवा शारदा
ती निवारा आपदा
शरण जा दुर्गेस आता शस्त्रविद्याशिक्षणी!२

शस्त्र रक्षी राष्ट्र ते
शस्त्र उजळी शौर्य ते
लेखण्या मोडाच आता संगरी जा धावुनी!३

शस्त्रबळ आता हवे
क्षात्रबळ अंगी हवे
पौरुषाते प्राप्त करण्या उंचवा त्या संगिनी!४

युद्धविद्या आजला
श्रेष्ठतम आहे कला
सैनिकी शाळा हव्या हेच सांगे भाषणी!५

पाशवी सामर्थ्य ते
संस्कृतीसी जाळते
शस्त्रविद्या मेळवा संस्कृतीच्या रक्षणी!६

चापधारी राम तो
चक्रधारी कृष्ण तो
देव सारे शस्त्रधारी मर्म घ्या हे जाणुनी!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

विनायक शिकवी बंदिजना

लेखनवाचन गोडी लावी, रुचि आणी जीवना
विनायक शिकवी बंदिजना!ध्रु.

स्वये वाचणे कथा सांगणे
वाचनगोडी जना लाविणे
कार्यलालसा प्रखर तयाची, उत्सुक अध्यापना!१

ग्रंथ वाचतो, संग्रह करतो
ग्रंथालय चिमुकले काढतो
जिज्ञासा वाढवी जनमनी कर्तृत्वी नच उणा!२

भाबडेपणा हळुहळु जाई
अध्यापनि नच करतो घाई
गुरुमाउली प्रसन्न झाली वाटे सकलांना!३

धर्मांतर राष्ट्रांतर जाणे
उदासीनता घातक माने
शुद्धि संघटन दीप सहाय्यक देती नवचेतना!४

धर्म न वसतो अन्नामाजी
धर्म न वसतो रूढींमाजी
हिंदुत्वाते सुबोध करण्या शिकवितसे प्रार्थना!५

प्रचारकार्या गती लाभली
मोदफुलेही हळू उमलली
सूर सापडे सहज गायका रंग भरे गायना!६

शिक्षा इकडे भोगत असता
मानस कोठे गुंतु न देता
कर्मवीर हा रंगे कर्मी विसरुनिया बंधना!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Tuesday, November 19, 2019

अंदमानच्या भिंती....

अंदमानच्या भिंती मिरविति काव्याच्या पंक्ती!ध्रु.

येथिल बंदी नामी संधी
महाकवी तो अचूक साधी
दिव्या प्रतिभा जागृत होता शब्द धाव घेती!१

गाता गाता गीत स्फुरावे
भिंतीवरती 'अक्षर' व्हावे
प्रथम भिंतिवर स्मृतीत नंतर ऐसी ही रीती!२

हातकडीमधि जरि टांगला
कवी समाधीमधी रंगला
सुखदुःखांच्या अतीत होई महाकवि स्थिरमती!३

भिंतच कागद खिळा लेखणी
इच्छाशक्ती प्रबल कविमनी
आत्मा विहरे अनंतांतरी स्वरलहरी उसळती!४

कविता लिहिणे स्वये वाचणे
सुधारणे कंठस्थहि करणे
जगाआगळी अशी चिकाटी पाहुनि थक्कित मती!५

शिक्षेचे तधि होत विस्मरण
पुलकित होई तनुचा कणकण
श्रेष्ठ तपस्या अशी पाहता हरखे सरस्वती!६

रानफुले प्रतिभेची डुलता
चित्त प्रमोदे डोलडोलता
भूतकाल ही स्फूर्ती आणिक धृपद राष्ट्रभक्ती!७

हिंदू जनता हिंदू जीवन
हिंदु संस्कृती हिंदू दर्शन
हिंदुत्वाचे उत्कट चित्रण कवि कुठले करिती?

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, November 10, 2019

वंदे मातरम्

भारतमाता अमुची आई
कोटि वंदने तिला!
देह हा तिच्या पदी वाहिला!ध्रु.

सत्याचा तर सूर्य तळपतो
अमृतधारा चंद्र वर्षतो
हासते कशी सस्यश्यामला!१

जातिभेद, मतभेद विसरणे
शीलधनाला सदैव जपणे
श्रमांनी ही सुजला-सुफला!२

जीवन हो प्रेमाने सुंदर
निर्धारे हो सोपे खडतर
भिजवू घर्मजलाने हिला!३

सद्भावच हा देव आतला
उपासनेचा सदा भुकेला
साधु या आत्मविकासाला!४

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
२३.६.१९८४

स्वप्न..

हे स्वराज्य रामराज्य होउ दे, होउ दे
सत्य न्याय नीति यांस स्थान मान लाभु दे!ध्रु.

कोण मी मला कळो
कुवासना टळो पळो
रुक्ष जीवनात आज प्रेमराम येउ दे!१

सत्य राम भेटता
कंठ पूर्ण दाटता
रामनाम गायनात अश्रुपूर वाहु दे!२

द्रव्यलोभ तो नसो
तत्त्व ते मनी वसो
धावत्या मना त्वरे आत आत जाउ दे!३

पाप येत क्षाळता
सेतु येइ बांधता
बिंदु बिंदु एकरूप सिंधुरूप होउ दे!४

वधून स्वार्थरावणा
जगात सत्यस्थापना
रामकार्य, देशकार्य, संघकार्य होउ दे!५

विशुद्ध चित्त लाभता
जनांत राम देखता
भेदभाव मावळून सुप्रभात होउ दे!६

रामदास व्हायचे
रामगीत गायचे
चिंतनात, जीवनात रामराय येउ दे!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
४.४.१९८४

श्रीरामस्तवन

सत्यवक्ता शक्तिदाता
स्नेही भ्राता गुरू: सखा।
शब्दकोशे न शब्दोsस्ति
श्रीराम: शरणं मम।।

अर्थ :
खरे बोलणारा, शक्ती देणारा, प्रेमळ बंधू, गुरू, सखा छे! छे! आता शब्दकोशात (श्रीरामाच्या) वर्णनाला शब्दच नाहीत. असा श्रीराम माझे आश्रयस्थान आहे.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

आजची निकड..

जयाजयौ समौ मत्वा
यथा क्रीडा समाप्यते।
तथा निर्वाचनं मत्वा
स्थापयेत् ऐकतां पुनः।।

अर्थ :
हार जीत समान समजून ज्याप्रमाणे क्रीडास्पर्धा संपवितात त्याचप्रमाणे निवडणूक एक खेळ मानून पुन्हा एकता प्रस्थापित केली जावी.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(३०/१२/१९८४ रोजी तरुण भारत मध्ये छापून आलेलं हे सुभाषित)

Wednesday, October 30, 2019

कालियामर्दन - आसुरी वृत्तीचे मर्दन

कालियावरी थयथय नाचे नंदाचा नंदन
आसुरी वृत्तीचे मर्दन!

या मनरूपी यमुनाडोही
अहंकार तर उसळत राही
गढूळलेले जळ भावाचे, कोण करी रक्षण?

बालकृष्ण हासरा असू दे
सद्भावाचा वसा घेउ दे
विकारविलसित खुशाल चालो, हरवावे मी पण!

दंड थोपटुन उभे ठाकणे
का घाबरणे, कच का खाणे?
आत्मबलाच्या हुंकारावर लुब्ध होय तनमन!

विळखा सोडवि हरी एकटा
कसे म्हणावे तया धाकटा
हास्य देखणे वदनावरचे खिळले जनलोचन!

असे नवल हे नवनवलाचे
माधव मुकुंद वच ये वाचे
तांडव सर्पा लास्य सज्जना, मधुर मधुर नर्तन!

अशक्य जगती काही नाही
निर्धारे यश करात येई
मनामनातुन निपटु कालिया तोडू भवबंधन!

थके कालिया कृष्ण न थकला
नृत्यानंदी रंग रंगला
बालमुकुंदाची ही लीला गाती भाविकजन!

पशुपक्ष्यांना अभय लाभले
गोकुळ गोकुळ खरेच झाले
जीवनात या मुकुंद यावा यासाठी गायन!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Monday, October 28, 2019

गोवर्धन शिरि छत्र धरू!

या वृध्दांनो या युवकांनो
चिंता कसली नका करू
देवेंद्राचे वज्र कोसळो
गोवर्धन शिरि छत्र धरू!

गोवर्धन हा पाठीराखा
द्या अपुल्या काठ्यांचा टेका
संघशक्तिचा मंत्र अलौकिक
जपता सारे विघ्न हरू!

कोसळोत शतशत जलधारा
आपण शोधू नवा निवारा
विनाशात या उत्कर्षाचे
बीजारोपण सर्व करू!

गोपांनो गोधनासवे या
गोपींनो लेकरासवे या
गोवर्धन तर जीवनदाता
कृतज्ञतेने त्यास भजू!

प्रभुकृपेचा झरला पाझर
जलधारांची शोभे झालर
सहाय्य तुमचे सकल जनांचे
काठ्यांवर भूधर तोलू!

इंद्र लाजला मनी वरमला
गर्व तयाचा पुरा वितळला
आपण अपुले उद्धारक
यत्नांचा महिमा नित्य स्मरू!

असंभाव्य संभाव्य होतसे
गिरिधर कुंजविहारी हासे
मने उमलता गोपजनांची
हर्षभृंग लागे विहरू!

त्रिभुवन उजळे तुझ्यामुळे
रे नंदकुमारा
उपेंद्र तू बलशाली वंदू
तुला गिरिधरा
गुढ्या तोरणे उभारुनी
नवसामर्थ्याचा जय घुमवू
गोवर्धन शिरि छत्र धरू!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Friday, October 25, 2019

धन्वंतरी तू परतुन ये..

धन्वंतरी तू परतुन ये
भयभीता निर्भय कर ये!ध्रु.

कशास भ्यावे मरणाला
जो भ्याला शतदा मेला
झगडण्यास शक्ती दे ये!१

रडवेपण संपताक्षणी
स्मित फुलले वदनोवदनी
पालट हितकर घडवत ये!२

दोष शोषते जळू जशी
औषध दे आणून खुशी
आनंद वितरत ये रे ये!३

शरीर उसने भूषण हे
लाडाने ओझे झाले
पगडा त्याचा उतरत ये!४

घोर निराशा दूर करी
अमृतधारा बरस तरी
आयुर्विद्या शिकवत ये!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, October 20, 2019

नित्यपाठमहिमा.

कृपाच आहे स्वामीजींची
सोबत दिधली नित्याची
स्वरूपाची आनंदाची
नित्यपाठ।।१।।

श्रीज्ञानेश्वरी नित्यपाठ
खचू न देई आयुष्यात
अमृताचा झरा आत
चालू राहे।।२।।

ध्येयवाद येथे आहे
आशावाद येथे आहे
संवादाचा थाट आहे
नित्यपाठी।।३।।

कळू लागे ज्ञानेश्वरी
बोलू लागे ज्ञानेश्वरी
किमया ही खरोखरी
स्वामीजींची।।४।।

ओवी ओवी आळवावी
अर्थासंगे गावी ध्यावी
शांती माहेराला यावी
भेटायाला।।५।।

घडायाला भक्ती देई
सोसायाला त्राण देई
झुंझायाला शक्ती देई
नित्यपाठ।।६।।

नित्यपाठ नित्य गाई
त्याला उणे काही नाही
सद्गुरू त्याच्या पाठी राही
सर्वथैव।।७।।

हेच दर्शन ज्ञानेशाचे
ज्ञानेशाचे स्वरूपाचे
सान्निध्य श्रीस्वामीजींचे
नित्यपाठ।।८।।

गेले गेले भवभय
आता झालो निरामय
घेता नित्याचा आश्रय
नित्यपाठी।।९।।

शब्द आले श्रद्धेतून
त्यांची झाली गोड धून
माय घाली पांघरूण
ऐसे वाटे।।१०।।

ऐसी एकादशी नित्य
व्हावी घरोघरी सत्य
पाळून घेई पूर्ण पथ्य
नित्यपाठ।।११।।

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
नित्यपाठ महिमा
👆🏻 ऑडिओ

जयघोष..

स्वामी स्वरूपानंद जय जय
स्वामी स्वरूपानंद!ध्रु.

आम्हां बसविता अभ्यासाला
मना जोडता तुम्ही श्वासाला
सोsहं लागे छंद!१

आश्वासन देता भक्तासी
स्वरूपास तू सहज पावशी
अद्वय हा मकरंद!२

भावार्थासह वाचा गीता
नित्यपाठ सवयीचा होता
तुटे देहसंबंध!३

जे न बघावे ते अस्तवते
जे न वदावे विलया जाते
लाभे परमानंद!४

वैराग्याचे साह्य लाभते
अभ्यासाची सवय लागते
मन गाई बेबंद!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
जयघोष
👆🏻 ऑडिओ

Friday, October 18, 2019

जन्मला जगीं जो अंती विश्वि विरायाचा..

काय शोक करिसी वेड्या व्यर्थ नश्वराचा
जन्मला जगीं जो अंती विश्वि विरायाचा! ध्रु.

दृश्य जरी नाहीं आता तुझ्यात मी आलो
खुळ्या तुला कळले नाही? म्हणुनि कष्टि झालो
प्रवाह हा जीवनदीचा कधि न अडायाचा!१

पूस आसवे ही आता, सुपुत्र तूं माझा
एकवटुनि शक्ती सारी सिद्ध होइ काजा
स्थान रिक्त ठेवि न माझे - बोल मान माझा!२

तत्त्व आचराया लागे धैर्य मात्र मोठे
शून्य दिशा म्हणशी का रे? देव नसे कोठे?
ध्येयध्रुवी ठेवुनि दृष्टी मार्ग चालण्याचा!३

निराकार निर्गुण म्हणती जगीं ईश्वराला
तोच मान आता बाळा मला रे मिळाला
झटक मोह सत्वर घेवो रामनाम वाचा!४

बंधने गळाली सारी पूर्ण मुक्त झालो
"देह नव्हे तो मी, तो मी" पितृतत्त्व उरलो
उचल भार हासत हासत अता प्रपंचाचा!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१२.३.१९७५

Tuesday, October 15, 2019

संतसूर्य अस्ताला गेला..

सण दसरा बनुनि काळ शिर्डीला आला
भरदिवसा संतसूर्य अस्ताला गेला!ध्रु. 

जन रडती धाई धाई
हाकारती साई साई
पाषाणहि विरहाने अधिक श्याम झाला!१

'मी' 'माझे' ज्या न रुचे
वारस त्या कोण सुचे
प्रश्नाचे उत्तर नच.. प्रलयकाळ आला!२

अज्ञ जना शिकवोनी
दुःखि जना रिझवोनी
तनुत्याग करुनि संत ब्रह्मपदा गेला!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

आज वाचन प्रेरणा दिनानिमित्त हे सुभाषित-

श्रवणं पठनं कार्यम्
मननं तदनन्तरम्।
निरीक्ष्य लेखनं कुर्यात्
नित्यम् त्वम् कुरू लेखनम्।।

अर्थ : नित्य नेमाने श्रवण आणि वाचन करावे. त्यानंतर त्यातून चिंतनाचे कार्य सुरू होईल. मग उघड्या डोळ्यांनी जगाकडे पाहून  स्वतः लिहायला लागावे. तू नेहमीच काही लिहीत जा.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, October 13, 2019

पावसची ओढ मना फार लागली..

पावसची माहेराची ओढ

नरनारी जिथे हरिरूप जाहली
पावसची ओढ मना फार लागली!ध्रु.

स्वामींच्या जन्मघरी जरा बसावे
बालरूप स्वामींचे मने पहावे
माला स्मृतिचित्रांची दिसू लागली!१

सबब नका सांगू कसलीच रे कुणी
श्वासाविण जगते का भूतली कुणी
चल आता लवकर निघ याच पावली!२

ॐ राम कृष्ण हरि जपत राहावे
स्वामींच्या चरणांशी बसून राहावे
गीतेची शिकवण ती मुरवी वाटली!३

जे कळले तेच विवर माझिया मना
पावसची ही यात्रा हेच जाण ना
नित्यपाठ स्वामींची मूर्ति भासली!४

श्वासा मन जोडुनिया उंच जायचे
तैसे मग हळुच अता खाली यायचे
यात्रा ही स्वामीकृपे सुरू राहिली!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

पावसची ओढ मना फार लागली
👆🏻 ऑडिओ

Tuesday, October 8, 2019

रावण वध मीमांसा

सोन्याची ती लंका जळली, प्रजाहि सारी कष्टी झाली
असला कसला राजा रावण झाला तो नष्ट
पुण्यप्रतापासंगे असता धर्मविजय स्पष्ट!ध्रु.

शक्ति वापरा स्वामीसाठी
शक्ति वापरा धर्मासाठी
नका वापरू स्वार्थासाठी
नरदेही हो कशास होता आचरणे खाष्ट?

सत्तेचा हव्यास कशाला?
जनसेवेचा का कंटाळा?
जो तो द्रव्या का भुललेला?
परनारीची अभिलाषा तर करीतसे नष्ट!२

पतिव्रतेचे ना ऐकियले
विषयविलासी मन बरबटले
व्हायचेच ते अंती झाले
विनाशकाली सुबुद्धीच हो होत असे नष्ट!३

शिवभक्ती ती वरवर होती
त्या ज्ञानाची कसली महती?
मातिमोल तर केली नीती
रावणवध हा सांगुन जातो धर्मकार्य श्रेष्ठ!४

रावण आजहि अत्याचारी
रावण आजहि भ्रष्टाचारी
या दैत्यांना कोण संहरी?
मनामनातुन राघव जागो ही मनिची आर्त!५

दुर्गुणलंका जाळायाची
शूर्पणखा ना रक्षायाची
गोष्ट ऐकणे कल्याणाची
मदोन्मत्त तो रावण होई आचरणी भ्रष्ट!६

शौर्याला द्या जोड नीतिची
दानाला द्या जोड मतीची
कर्माला द्या जोड भक्तिची
प्रसन्न होईल रामचंद्र ही जाणुन उद्दिष्ट!७

श्रीरामाचे साह्य घेउ या
अहंकार रावणा वधू या
चला वंदु या मारुतिराया
रामकथेचा ध्यानी घ्यावा इतुका मथितार्थ!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(श्रोतेमुखी रामायण मधून)

रावण वध मीमांसा
👆🏻 ऑडिओ

Sunday, October 6, 2019

आरती मारुतीची..

आरति मारुतिराया तुजला भावभरे गाऊ
अंगी भिनता रामनाम तुज इथे तिथे पाहू!ध्रु.

चालण्यातली चपळाई तू भाषणि चातुर्य
कल्पकतेची झेप उंच तू, रणांगणी शौर्य
बलोपासना गुणोपासना ध्येय पुढे ठेवू!१

द्रोणागिरी उचलला आणला नंतर पोचवला
संजीवक सौमित्रा सारा तव विक्रम झाला
भक्तीमधली उत्कटता तव कृतीतुनी गिरवू!२

रडायचे ना अडायचे ना गाणे गाऱ्हाणे
उत्साहाने काटे तुडवत पुढे पुढे जाणे
शक्तीला युक्तीची जोडच नित्य देत राहू!३

चारित्र्याला जपावयाचे जीवन ही साधना
संशयास ना स्थान रतीभर हीच मनी धारणा
मांगल्याचा दीप तेवता असाच नित ठेवू!४

सज्जनगड गोंदवले केंद्रे स्फूर्तीची असती
नाम श्वसनी, श्वसन मारुती सज्जन हे वदती
कवि श्रीरामा दे अनुभूती आनंदी राहू!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
आरती मारुतीची..
👆🏻 ऑडिओ

रेणुका आई मजला बोलावून घेई..

रेणुका आई मजला बोलावून घेई
बोलावुन घेई चेतना तना मना देई!ध्रु.

चालता हुरूप वाढविते
भक्ती भयास घालविते
अशी ही अभय देत राही!१

उणे ना कधी पडायाचे
पाप ना कधी घडायाचे
निष्ठा जोपासत राही!२

नेहमी मंगल चिंतावे
नेहमी शुभ ते बोलावे
हिताचे तेच घडत राही!३

ओळखी अशा वाढतात
राम तो आहे जगण्यात
सरे ना कधीच पुण्याई!४

गणपति नांदे ऐक्यात
मारुति प्रकटे यत्नात
राम ते उमजे लवलाही!५

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
१५.०१.२००२
(अण्णा फिरायला जात सकाळी. तिथे रेणुकामातेचे मंदिर होते. तिथे गणपती आणि मारुती पण असावेत बहुतेक.  त्यावर त्यांना स्फुरलेलं हे काव्य)

देवकीनंदन हा वेगळा....

प्रकाश यावा जीवनात या अंधारी जन्मला
मुक्त कराया बद्धजनांना, तुरुंगात जन्मला
देवकीनंदन हा वेगळा!ध्रु.

निराशेतुनी उमले आशा
गूढ गहन देवांची भाषा
एक अनामिक उत्साहाने देवपिता हासला!१

धर्मग्लानी जेव्हा येते
काय करावे जरा न कळते
कर्तव्यास्तव अपुले जीवन परमात्मा वदला!२

अदय साखळ्या सदय जाहल्या
भिंती दगडी त्या मोहरल्या
बंदीच्या त्या निवासातही सोsहं घमघमला!३

मृत्यूवरती पाउल रोवुन
गगनधराही घेऊ जिंकुन
आदि अंत ना जयास काही तो तर अवतरला!४

आत्मश्रद्धा ती बलवत्तर
ती बघता पाझरले फत्तर
स्वातंत्र्याचा मंत्र प्रभावी नियतीला स्फुरला!५

कृष्ण कृष्ण जय मेघ गर्जले
अवताराचे सूचन कळले
लकेरल्या त्या आतुन सनया सुखद जन्मसोहळा!६

बालक इवले चुंबचुंबले
देवकिने हृदयाशी धरले
अमृतधारा बालक उदरी क्षण थक्कित झाला!७

निर्भय नि:स्पृह मनुष्य व्हावा
समूहजीवन स्वभाव व्हावा
श्रावणातला दिवस आठवा अजरामर जाहला!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२६.०६.१९८७

Thursday, October 3, 2019

रेणुकेचे गाणे..

गाऊ रेणुकेचे गाणे आता मोकळ्या मनाने
तिच्या पायाशी बसणे तिचे लडिवाळ होणे

माझी रेणुका ही आई तिचे स्मरण पुण्याई
हिची काय नवलाई चिंता दिगंतरा जाई

नरनारी ही लेकरे जीव भेटीला आतुरे
डोळे बोलके हासरे मोद जीवनात झरे

गणपती शेजारचा घेतो पत्कर भक्ताचा
नाश साऱ्या संकटांचा करी लोभ भजनाचा

पुढे ठाकला मारुती रामदास हा मारुती
सानथोरा देत स्फूर्ती गाया राघवाची कीर्ती

आई रेणुका रानात पाहे निळ्या आकाशात
काय कृपेची ही मात दावी प्रकाशाची वाट

सोडा संकोच मनाचा करा विस्तार मनाचा
थेंब मोठ्या सागराचा नाही कधी सुकायाचा

आसू पुसावे हसावे एक वेळ येथे यावे
गाणे रेणुकेचे गावे मन रानजाई व्हावे

गिरी मनाला उभारी साऱ्या काळज्या निवारी
देव भक्तांचा कैवारी राम जाहला आभारी

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२०.९.१९९५
(अण्णा फिरायला जात सकाळी. तिथे रेणुकामातेचे मंदिर होते. तिथे गणपती आणि मारुती पण असावेत बहुतेक.  त्यावर त्यांना स्फुरलेलं हे काव्य)

Wednesday, October 2, 2019

चला मिळूनी सारे गाऊ जय गांधीजी! जय बापूजी..

चला मिळूनी सारे गाऊ
जय गांधीजी! जय बापूजी!

नाव जयांचे मोहनदास
ते स्मरताती श्रीरामास
सद्भावाचा वास अंतरी सांगत बापूजी!१

हसरी मुद्रा बापूंची
चालहि झपझप बापूंची
करा स्वच्छता तनामनाची सांगत बापूजी!२

गरजा करताक्षणी कमी
आनंदाची मिळे हमी
ते हलकेपण सुखद नि शीतल सांगत बापूजी!३

चुका आपल्या जाणाव्या
जगास सगळ्या सांगाव्या
ते उघडपण करते निर्मळ सांगत बापूजी!४

अजून मी मोहाचा दास
मला व्हायचे मोहनदास
सत्कर्माच्या चांदण्यामधे विहरत बापूजी!५

प्रार्थनाच जीवन झाले
मरणाने बापू जगले
श्रीरामाला कल्पनेतुनी दिसले बापूजी!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२२.०५.२००१

Tuesday, October 1, 2019

पत्रलेखन

पत्रलेखन : वक्ते श्रीराम बाळकृष्ण आठवले
👆🏻 पत्रलेखन या विषयावर अण्णांचं रेडिओवर झालेलं भाषण (ऑडिओ).

Sunday, September 29, 2019

लक्ष्मी तिजविण कोण असे?

"पैसा" केवळ आहे साधन
कांचन कमला कसे असे?
घरी वावरे, सर्व आवरे
लक्ष्मी तिजविण कोण असे?

असो गरीबी शांतच राही
हाव हावरी शिवतच नाही
कोंड्याचा ती करते मांडा
ध्यानी यावे सांग कसे?

अमंगलाला दूर सारते
"शुभं करोति" भावे म्हणते
ज्ञानाचा नित दिवा लावते
प्रकाश अंतरि येत असे!

ती तव आई, पत्नी, तनुजा
भगिनी अथवा समज पंकजा
लेप कशाचा लागु न देते
कळते तरि का उमज नसे?

भगवंताची करे आरती
स्तवने भजने खुले भारती
प्रसन्न हसते मधुर बोलते
लक्ष्मी तिजविण कोण असे?

दैवी गुण ही संपदाच रे
दुर्गुण सगळे विपत्तीच रे
सुभगा, सुखदा, सुहासिनी रे
चिंतन पूजन खरे असे!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७.१०.१९८९
लक्ष्मी तिजविण कोण असे?
👆🏻 ऑडिओ

Saturday, September 28, 2019

देणे ईश्वराचे....

गाणे लतादीदींचे देणे ईश्वराचे
लेणे अलंकाराचे नवलाव!१

स्वर ओला गार सुमनांचा भार
स्पर्श हळुवार शिडकाव!२

सरावात लय साधुनि समय
हा तो मनोजय शिरकाव!३

तन्मयता दान स्वर्गाचा सोपान
अध्यात्माचा मान देवराव!४

ज्ञानेशाची ओवी सवयीची व्हावी
जाता येता गावी आर्त भाव!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, September 22, 2019

उद्या काय ते ठाऊक ना..

दिवस कालचा काल संपला उद्या काय ते ठाऊक ना!
अरे परंतु दिवस आजचा परिश्रम करी साध मना!

तुझे काम ते भगवंताने तुला दिलेली संधि असे
मनापासुनी काम करी रे - प्रेमळपण ते आण कसे
कर्मफळाची नकोच चिंता लाग लाग रे हरिभजना..

नकोच चिडणे, नको कष्टणे आदळआपट नसे बरी
कसे सोसशी, कसे वागशी तुझी कसोटी इथे खरी
तुझे कार्य हे तुझी आठवण पटते का तू सांग मना..

मने मनाला स्वये आवरी अशक्य येथे काय असे?
गेला क्षण तो पुन्हा न येतो स्वस्थ बसे तो पूर्ण फसे
दुसऱ्यावर का रुसशी फुगशी तूच सुधारी तुझ्या मना..

नव्हे नोकरी सत्कार्याची प्रत्येकाला संधी मिळे
आशावादी उद्यमी तसा भगवंताची स्फूर्ति मिळे
शुद्ध करी मन रामनाम घे प्राशन कर या रसायना..

देवापुढती दुःख वदावे उगाळू नये सदाच ते
दुःखाने वाढते दुःख ते उगाच मन मग तळमळते
तू हसला तर विश्व मित्र तव कसे तुलाहि उमजेना..

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
उद्या काय ते ठाऊक ना..
👆🏻 ऑडिओ

Saturday, September 21, 2019

देशगौरव हे सुभाषा, बाळगे मी एक आशा

देशगौरव हे सुभाषा, बाळगे मी एक आशा!ध्रु.

नवयुगाचा वीर तू
उंचवी रे क्रांतिकेतू
शिवनृपा आदर्श मानुनि चालवी तो वारसा!१

वीर सैनिक मेळवी
शस्त्रसंगर चालवी
युद्धचि स्वातंत्र्य देते तोच तो घेई वसा!२

येथ पळ राहू नको
जालि या गुंतू नको
शत्रु हाती दे तुरी तू जा दुरी तू राजसा!३

लोकनिंदा सोशिन
सैन्य तुजसि पुरविन
जाणशी अंतस्थ हेतू जाणशी मज  मी कसा!४

व्यक्तिगत कीर्ती नको
श्रेयवाटा मज नको
जाशि तेथे हो यशस्वी स्वीकरी तू नवदिशा!५

शत्रु अडचण संधि ती
लाभताहे संप्रती
देई रे ऐसा तडाखा युद्धि तू श्रीरामसा!६

हरप्रयत्ने तू अता
मायभूची मुक्तता
साधता होशील तिचिया कंठि कोस्तुभमणि जसा!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(सुभाषचंद्र आणि सावरकर भेटी वर आधारित काव्य)

स्पर्शे विटाळतो तो देव नव्हे..दारे जो लावितो तो धर्म नव्हे!

स्पर्शे विटाळतो तो देव नव्हे
दारे जो लावितो तो धर्म नव्हे!ध्रु.

मन ज्याचे संकुचित तोच हो पतित
धर्मबांधवा झिडकारी तोच हो पतित
खरा देव सर्वजणांना उरी लावताहे!१

स्वाभिमान होता जागा लाचारी नुरते
स्वावलंब साधन थोर सहज हाती येते
ज्ञानदान सर्वजणांसी पापनाश आहे!२

आजवरी पापे घडली पुण्य साधु या
आजवरी एकी भंगे पुन्हा घडवु या
रामचंद्र ऐशा यत्ना साथ देत आहे!३

उराउरी भेटू सारे ऐक्यगीत गाऊ
हिंदुराष्ट्र वैभवशिखरी निश्चयेच नेऊ
योगिराज माधव दिव्या शक्ति देत आहे!४

स्पर्शबंदि रोटीबंदी आड येत भिंती
बांधवासि कारण नसता दूर ठेवताती
कळे परी कार्य न करि जो राष्ट्रभक्त नोहे!५

कलंक हे धर्मावरचे अश्रुजले क्षाळू
नवे नियम हिंदुत्वाचे यथाशक्ति पाळू
धर्माचे स्थान खरे तर अंतरात आहे!६

जन्मजात जातिभेद सर्व ही विरावे
विवेके विचारे मानस सर्वदा भरावे
स्नेहदीप ऐसे करता हृदी तेवताहे!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर १९७३ मधे लिहिलेल्या कवितांपैकी पतित पावन मंदिर प्रसंगावर आधारित ही कविता)

Thursday, September 19, 2019

सावरकर सकलांना सतत सांगती..

सावरकर सकलांना सतत सांगती
स्वातंत्र्यच करुनि लक्ष्य करणे क्रांती!ध्रु.

इतिहासा अभ्यासा चूक सुधारा
घातक बेसावधपण ध्यानि हे धरा
एक देश एक देव एकच नीती!१

शत्रूचा शत्रु तोच मित्र आपला
कार्यभाग घ्या साधुन आधी आपला
राजा शिवछत्रपती वितरत स्फूर्ती!२

राम कृष्ण वंदनीय खचित हिंदु तो
भारतभू माय ज्यास खचित हिंदु तो
ती न पूर्ण मुक्त म्हणुन जिवा घोर अशांती!३

धगधगते यज्ञकुंड तेच जीवन
तृप्ती फसवी न जिथे तेच जीवन
ती तडफड, ती धडपड साधे प्रगती!४

सच्चा जो भारतीय एकनिष्ठ तो
धर्मभेद प्रांतभेद गौण लेखतो
बुद्धीच्या निकषावर तत्त्वे ठरती!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२२.७.२००२
("विनायक विजय" ही संजय उपाध्ये यांची पोथी वाचताना स्फुरलेली कविता)
👆🏻 ऑडिओ

Tuesday, September 17, 2019

करें सशक्‍त यह समाज अग्रणी बनें..

रक्षणार्थ हो खडें सीना तान के
करें सशक्‍त यह समाज अग्रणी बनें। ध्रु.

अन्‍नवस्‍त्र अल्‍प है आसरा न कुछ भी है
प्रबुद्ध देश है कहॉं,  भारतीय सुप्‍त है 
सिद्धि के लिए यहॉं, जननी भगीरथ जने।१

भक्तिहीन आदि से, शक्तिशून्‍य हैं सभी
आते, रहते, फूटते हैं बुदबुदे सभी
जागते हुए जनेश के जनक बनें।२ 

सद्गुणी पराक्रमी हुई अनेक पीढियॉं
मुसीबतें कई निगल खडी रही पुरुषस्त्रियॉं
विजयगीत ध्‍यान दे हर कोई यहॉं सुने।३ 

व्‍यक्ति व्‍यक्ति भिन्‍न है, मार्ग भी न एक है
स्‍नेहशील एकता फिर भी यह समीप है
एक सूत्र में पिरो हार यह बने।४ 

शांति से समृद्धता खिल उठे यहॉं
सुवर्णभूमि हिंदुभू कह पडे जहॉं
बढे चलो, बढे चलो गीत गुनगुनें।५ 

- श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
१६.१२.२००३ (अनुवादित)
करें सशक्त यह समाज अग्रणी बने..
👆🏻 ऑडिओ

Thursday, September 12, 2019

विसर्जन..

मातीचीच तर मूर्ती माझी!
मग ती विसर्जित नको करायला?
अरे, यथाविधि काढून घेतले आहे ना चैतन्य या मूर्तीतून?
आता माझे स्थान आहे तुमच्या हृदयात
टरफलाला महत्त्व नका देऊ, बाबांनो!
सार घ्या, असार सोडा!
माती कुठे विरघळून जाईल?
हा आत्ताचा कृत्रिम आकार कुठे संपेल?
जळात, पाण्यात, मग तिथेच पोचवा ना!
अरे, हसत खेळत आणलेत,
तसेच हसत नाचत, गात गात पोचवा!
सर्जन ते विसर्जन!
सगळ्या कृती हे मानवांनो या या तुमच्या हातून घडल्या
रडायचे नाही, अडायचे नाही, डरायचे नाही
उणीदुणी न काढता आनंदाने नांदा
गणराज्य कसे असते ते दाखवून द्या सगळ्या जगाला!
आरंभी वंदे मातरम् केलेत!
आता गा मुक्तकंठाने
जनगणमन अधिनायक जय हे
आजच्या विसर्जनात उद्याचे सृजन असते
सृजनातच पुढे वर्धन, वर्धापन शेवटी विलय
पण चक्र सदोदित चालू ठेवा!

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गणपतीच्या गोष्टीमधून)

विसर्जन..
👆🏻 ऑडिओ

Sunday, September 8, 2019

मुळात आहे प्रपंच लटिका खेळच भातुकलीचा..

मुळात आहे प्रपंच लटिका खेळच भातुकलीचा
हसती कोणी, रडतहि कोणी भोगच सुखदुःखाचा!ध्रु.

माया फसवी, जिवा गुंतवी फरफट पुरती होते
समाधान का कधी कुणाचे हव्यासाने होते?
प्रपंच श्रीरामाचा म्हणता ठाव नुरे चिंतांचा!१

'मी माझे' हे अवघड ओझे ताठा ने गोत्यात
अवचित सुटला तोलच तर मग कोण देतसे हात?
पराधीन या जगात जो तो अंकित सर्वेशाचा!२

नर नारी हा भेद वरिवरी एकच आत्माराम
वरल्या सोंगा भुलायचे ना, स्मरायचे प्रभुनाम
मुक्त आतुनी बांधिल साधु सगळ्या आप्तजनांचा!४

बेचैनी ती छळिते संतत, भय संशय वस्तीला
प्रपंचात जो गुरफटला तो आचवला शांतीला
तनामनाच्या पलीकडे चल सांगावा संतांचा!५

'सगळ्यांचे सुख ते माझे सुख' संतांचा हा बोध
अनंत ठेवी तसे राहता सर्वसुखाचा शोध
एकपणा बघ अनेकातला सुबोध परमार्थाचा!६

प्रपंच नाही कुणास चुकला अटळ असा तो भोग
नामस्मरणे साधत जावा भगवंताशी योग
प्रपंच करता मार्ग सापडे मनुजा परमार्थाचा!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४/२५.२.१९९३
मुळात आहे प्रपंच लटिका खेळच भातुकलीचा
👆🏻 ऑडिओ

आवर्तन चालू ठेव....

ही गणेशभक्तीची ठेव
आवर्तन चालू ठेव!ध्रु.

एकेक पाठ जधि होई
श्रीगणेश अंतरि येई
सद्भाव जागता ठेव!१

जे मंगल करि मंगल ते
नैराश्यतिमिर घालवते
अनुभव हा देतो देव!२

तू अजिंक्य होशी वक्ता
तू स्वयेच पातकहर्ता
वज्राक्षर कोरुनि ठेव!३

जे संघटनेला जमते
व्यक्तीला अवघड गमते
जनसमूह असतो देव!४

मन सुमन करुनि अर्पावे
सुस्वर तू भावे गावे
उपनिषदा जाणुनि ठेव!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले.
(अथर्वशीर्षावरील काव्यातील ही भैरवी)

मंगलमूर्ती मोरया गाऊ, ध्याऊ मोरया..

रक्तम् लंबोदरम् शूर्पकर्णकम्
रक्तवाससम् रक्तगंधानुलिप्तांगम्
रक्तपुष्पैसुपुजितं भक्तानुकंपिनं देवम् जगत्कारणमच्युतं....
--------------------------------

मंगलमूर्ती मोरया
गाऊ, ध्याऊ मोरया!ध्रु.

एक रदाचा
चार करांचा
रक्ताम्बर खुलवीत जया!१

लंबोदर जो
शूर्पकर्ण तो
करुणाकर तो पूजू या!२

सिंदुरवर्णी
रक्तसुमांनी
मंडित, पूजित आळवु या!३

सुशांत आहे
सुस्थिर आहे
पुरुषोत्तम हा ध्याऊ या!४

हे जाणावे
नमन करावे
लोटांगण पदि घेऊ या!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(अथर्वशीर्षावर आधारित कविता)

Wednesday, September 4, 2019

अशी कशी सूनबाई? अशा कशा सासूबाई?

अशी कशी सूनबाई? अशा कशा सासूबाई?ध्रु.

नका संशयाने पाहू नका दुराव्याने पाहू
चला आनंदाने राहू, प्रेम देऊ प्रेम घेऊ
दोष पाहता पाहता, कावीळच जणु होई!१

आहे प्रपंच कुणाचा? अता मुलाचा सुनेचा
पण वारसा कुणाचा? आहे आईवडिलांचा
मुला लाभलेली माया का हो सुनेलाच नाही?२

थोडा सद्भाव जागवा, थोडा विश्वास दाखवा
मध्ये थोडे दिस तरी सून माहेरा पाठवा
ओढ घराचीच तिला घरी घेऊनीच येई!३

अपेक्षेत दडे दुःख निरपेक्षता हे सुख
कौतुकाची मना भूक संशयाने धाकधुक
थोडे सोसावे झिजावे नको शब्द वावगाही!४

सून जैसी लेक आहे, सासू आई तैसी आहे
जो जो जैसा नाते पाहे त्यास तेच नाते आहे
वृत्ती बदलण्या नका लावू उशीर हो बाई!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

अशी कशी सूनबाई? अशा कशा सासूबाई?
👆🏻 ऑडिओ

कुटुंबाची सभा कधी भरेल का?

कुटुंबसभा

खरंच ही कल्पनाच किती सुरेख आहे!
आस्थेने विचारपूस करावी, अडचणी मांडाव्या, पेच सोडवायचा प्रयत्न करावा, विशेषतः मनातली अढी काढून टाकावी.
आर्थिक प्रश्नही बघता बघता सुटतील. संसार सुखाचा होईल.
ज्ञानेश्वरीतील ओवीचा अर्थ उमगेल.  अवघाची संसार सुखाचा होण्यासाठी तरी विचारावेसे वाटते
कुटुंबाची सभा कधी भरेल का?

कुटुंबाची सभा कधी भरेल का? ध्रु.

सानथोरांनी जमावे
एकमेकांचे ऐकावे
देवघेव विचारांची जमेल का?

कुणा दुखते खुपते
कुणा आशंका जाचते
मनातली सल कधी निघेल का?

जिथे समंजसपणा
तिथे पंढरीचा राणा
नवे नवे काम काही सुचेल का?

खर्च कसा भागवावा?
पैसा कसा वाचवावा?
अर्थपूर्ण दृष्टिलाभ घडेल का?

ऐसा संसार सुखाचा
इथे फराळ भक्तीचा
पालट अंतरि जमेल का?

जर ओळख पटली
कोडी सगळी सुटली
ओवी ज्ञानेशाची कधी कळेल का?

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१.१०.१९९४

कुटुंबाची सभा कधी भरेल का?
👆🏻 ऑडिओ

Tuesday, September 3, 2019

मंगलमूर्तीची आरती


मंगलमूर्ती तुझी आरती भाविकजन गाती
ओंकाराच्या उच्चारेही तना मना शांती!ध्रु.

मृण्मय जरि तव देह वाटला झळके चैतन्य
प्रसन्नता तर थुई थुई नाचे भक्त तुझे धन्य
तू बाप्पा रे तुला मोरया अवघे म्हणताती!१

तिथी चतुर्थी विनायकी वा संकष्टी असते
त्या दिवशी तर तुझ्या दर्शना मानस आतुरते
अथर्वशीर्षाचे आवर्तन करते शुद्ध मती!२

मस्तक मोठे, लंबोदर ते, डोळे इवलाले
सूक्ष्म निरीक्षण, क्षमाशील मन पटले रे पटले
निरांजनाच्या सगळ्या ज्योती औक्षण करताती!३

एक विसावा, एकविसावा संख्या आवडते
आज्ञापालन विनायकाला रुचते बहु रुचते
मन जर अंकित पाश नि परशू अरिदमना पुरती!४

हासत येणे हासत जाणे मोह न तुज कसला
तव चरिताचा तव चित्राचा ठसा न कधी पुसला
श्रीरामाचे भरती डोळे लिहिता या पंक्ती!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

मंगलमूर्ती तुझी आरती भाविकजन गाती
👆🏻 ऑडिओ

Thursday, August 29, 2019

खेळा, भरपूर खेळा.....

खेळा, भरपूर खेळा!ध्रु.

वेगे धावा, उड्याहि मारा
परिसर जागो सारा
जनात आनंदे मिसळा!१

कधी विजय तर कधी पराभव
दोन्हीचा चाखावा अनुभव
मीपण पूर्ण पिटाळा!२

आनंदाने जगता येते
मैदानावर ध्यानी येते
आरोग्या सांभाळा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

ग. श्री. खैरं नमाम्यहम्....

सदाचार प्रसारार्थं
गीतारत्नं  परीक्षितम्
द्रव्यदानं महत् दत्तम्
ग. श्री. खैरं नमाम्यहम्।।

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले


Sunday, August 25, 2019

गीतेचा हा प्रभाव ऐसा..


उत्साहाने जीवन जगता हसायचे हसवायाचे
गीतेचा हा प्रभाव ऐसा पाउल पुढती पडायचे!ध्रु.

जे ओघाने काम येतसे आज्ञा हरिची समजावी
कृष्णच कर्ता फल कृष्णार्पण गीतामुरली ऐकावी
चुकलो त्याची खंत न करता चुका सुधारत शिकायचे!१

जीवन आहे कुरुक्षेत्र हे करावयाचा संग्राम
स्मरून कृष्णा झुंज झुंजुनी गाठू मुक्तीचे धाम
अभ्यासाने चंचल मन हे श्रीरामी रमवायाचे!२

सद्गुण पांडव दुर्गुण कौरव परि यश:श्री सत्याची
कर्तव्याचे पालन धर्मच ध्वजा फडफडो धर्माची
धनंजयाचा कृष्ण सारथी तो अपुला आपण त्याचे!३

विसंवाद जरि भवती भरला सुसंवाद साधायाचा
काटे काढुन पुष्पे वितरत मार्ग सुखदसा करायचा
कर्मच आहे सुंदर साधन गीताजीवन जगण्याचे!४

नव्हे देह मी, मी विश्वात्मक मर्यादा नच आत्म्याला
सोsहं घोषे मनगाभारा गुरुकृपेने घुमघुमला
लेप न कसला मनास लागो नभापासुनी शिकायचे!५

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
०४.०१.१९९२

गीतेचा हा प्रभाव ऐसा
👆🏻 ऑडिओ 

Saturday, August 24, 2019

ज्ञानदेव गाता ओवी...

निवेदन:
नेवासे गाव,
चारी भावंडं येथील परिसरात रमली.

ज्ञाना, भगवद्गीता ग्रंथ इतका काळ संस्कृत भाषेच्या अवगुंठनात दडलेला.  सामान्य जनता अध्यात्माला भुकेलेली आहे. तिची क्षुधा शमव.

हे आवाहन हृदयापर्यंत पोचलं - ओव्यामागून ओव्या स्फुरु लागल्या, झरू लागल्या. 

सच्चिदानंद बाबा मोठ्या आनंदाने लेखकु झाला.
ज्ञानदेव ओव्या गात होते .. आणि भवताली?.....

*****

ज्ञानदेव गाता ओवी गंध सुवर्णाला यावा
सडा स्वरांचा शिंपावा अर्थ कस्तुरीचा व्हावा

ज्ञानदेव गाता ओवी नीज मुक्ते लागी यावी
माउलीची स्निग्ध माया तिच्या अंतरा लाभावी

ज्ञानदेव गाता ओवी निवृत्तीते व्हावा मोद
सोपानास सोपे व्हावे अर्थगर्भ चारी वेद

ज्ञानदेव गाता ओवी माय मराठी डोलावी
घास घेत सोनुल्याचा तया सवे सान व्हावी

ज्ञानदेव गाता ओवी कृष्ण मेघ खाली यावा
भावभक्तिचा ओलावा तया हवा हवा व्हावा

ज्ञानदेव गाता ओवी मोहुनिया मुकुंदाने
धरूनिया अधरी पावा घुमवावी राने वने

ज्ञानदेव गाता ओवी धरा अमृता नहावी
गात्र गात्र व्हावे रसना भावमाधुरी चाखावी

ज्ञानदेव गाता ओवी लाभे प्रसाद प्रसादा
शांत रसाच्या धारेत तृप्त शांत होते वसुधा


श्रीसंत ज्ञानेश्वर (कथाकाव्य)
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Friday, August 23, 2019

गीतमुकुन्द - गाठणे सन्मित्राचे धाम

शिरी टोपली, मुखी श्रीहरी
वदनी मंगल नाम
गाठणे सन्मित्राचे धाम!ध्रु.

प्रहरी निद्रित दिसता सगळे
साहस चित्ती गोड हासले
अमोल ठेवा जपुन न्यायचा
हेच अलौकिक काम!१

दुथडी भरुनी वाहे यमुना
थांग तिचा कोणास कळेना
लव न थांबता पुढे चालणे
ठाउक ना विश्राम!२

यमुने का गे अशी खवळसी
दृढ निर्धारा भीति दाविसी
हृदयी दाटले साहस गाते
मुनिवर घोषित साम!३

इकडे पाणी तिकडे पाणी
रुद्ध ना परी माझी वाणी
अंतरातला भाव सांगतो
संरक्षक श्रीराम!४

टोपलीतले बालक इवले
मुखी आंगठा चोखत पडले
पादस्पर्शे यमुना शमली
खुद्कन् हसला श्याम!५

सर्वेश्वर तर पाठीराखा
पार लावतो श्रद्धा नौका
दिसले गोकुळ कंठ दाटला
पूरित मंगलकाम!६
गाठले सन्मित्राचे धाम

गीतमुकुन्द
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

कृष्णजन्माष्टमी

वद्य अष्टमी भयाण तिमिरी
कोसळती जलसरी
त्रिभुवनसुंदर बालक चिमणे
देवकिच्या उदरी!ध्रु.

प्रकाश येता तिमिर लोपला
खेद निमाला हर्ष कोंदला
अंतराळि उसळती अचानक
सुरेल स्वरलहरी!१

लोभसवाणे बाळ चिमुकले
सरळ नासिका काळे डोळे
नीलवर्ण जणु नीलकमल की
फुलले कासारी!२

माय देवकी होता उन्मन
सावध होता उचंबळे मन
भावभरे गदगदुनि गातसे
आज जन्मला हरी!३

लगबग उठुनि अंकि घेतले
अश्रुसरींनी न्हाउ घातले
स्पर्श सुखावह घडता लहरे
अंगांगी शिरशिरी!४

जन्मांतरिची मम पुण्याई
चिंता कसली उरली नाही
सुकुमारा आलास आज तू
बोले भिजल्या स्वरी!५

चुंबचुंबिते ती बाळाला
प्राणपणे रक्षिण्यास त्याला
गाय जणू की वाघिण झाली
दृढ जी निर्धारी!६

खुशाल येवो कंस दुरात्मा
आज पाठिशी मम परमात्मा
भावविवश देवकी आवळुन-
हृदयी तान्ह्या धरी!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Friday, August 16, 2019

रामकृष्ण चालले....

नश्वर देहा टाकुनि मागे
रामकृष्ण चालले! रामकृष्ण चालले!ध्रु.

व्यक्ताव्यक्ती ईश्वर भरला
स्थलकालाच्या अतीत उरला-
मर्त्य शरीरे हे अनुभवले.....१

कामिनिकांचन मोह त्यागिला
अहंभाव तो पूर्ण नाशिला
वाण सतीचे करी घेतले.....२

चारित्र्याचे कमळ फुलावे
आत्मौपम्ये विश्व पहावे
आचरणाने असे बोधिले.....३

धर्माची जगि एकवाक्यता
ऐसा अनुभव आला चित्ता
धर्माचे एकत्व वर्णिले.....४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Tuesday, August 13, 2019

श्रीरामचंद्रांची भूपाळी..

रघुकुलतिलका श्रीरघुनाथा गातो भूपाळी
पुढती मागे, राहुनिया नित दासा सांभाळी!ध्रु.
असे वाटते नील नभाने वर्ण तुझा घेतला
दिनकर गगनी तुझ्याच तेजे आहे झगमगला
रघुपति राघव नाम आळवित वाजतसे टाळी!१
पवनसुत उभा हात जोडुनी तत्पर सेवेला
अजपाजप जो असे चालला कोणी मोजियला
आत्मारामा प्रकट अंतरी प्रार्थित या काली!२
तू  देवासी सोडविणारा ऐसी तव कीर्ती
तुझाच महिमा शब्दोशब्दी रामदास गाती
हे घननीळा, परमकृपाळा प्रेमे कुरवाळी!३
कलियुगात तू रूप घेतले रामा नामाचे
नाम साजिरे तुझ्या कृपेने रसनेवर नाचे
अरूप जरि सुस्वरूप दर्शन मजला दिपवाळी!४
सोsहं सोsहं घोष घुमतसे मनगर्भागारी
गुरुकृपांकित सूक्ष्म रूप तव पापतापहारी
ओढ आतुनी जादूगारा सांग कशी लाविली?५
आता मजला पुरता विरवी तुझिया नामात
ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटि ही लोपवि निमिषात
भावभक्तिची शरयू रामा अंतरि झुळझुळली!६
रघुकुलतिलका अध्यात्माच्या अंगणि नेऊन
अंगुलि धरुनि चालव संगे आई होऊन
श्रीरामाशी आस न दुसरी साद आर्त घाली!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२.२.१९७७

भूपाळी ऑडिओ

Sunday, August 11, 2019

मना तू चाल भक्तिपंथे..

चाल भक्तिपंथे! मना तू चाल भक्तिपंथे!ध्रु.

श्रवण करी, मनन करी
मनन करुनि कीर्तना करी
आनंदचि भेटे!१

निंद्य त्याज्य ते दे दे टाकुन
एक एक गुणसुमना वेचुन
हरिला वाहू दे!२

भावभरे तू कर पारायण
आचरणे हो नर नारायण
घे प्रत्यय येथे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

मना तू चाल भक्तिपंथे..
👆🏻 ऑडिओ

Thursday, August 8, 2019

रामनाम जपावें....

रामनाम जपावें, रामनाम जपावें, रामनाम जपावें रे
रामरूपि लपावे, रामरूपि लपावे, रामरूपि लपावे रे!

तो त्रयोदशाक्षरी मंत्र
भक्तांच्या मस्तकी छत्र
भवभय सरावें, भवभय सरावें, भवभय सरावें रे!१

जन्म नि मृत्यु हे भास
"मी अजर अमर" विश्वास
गुरुपदि रमावें, गुरुपदि रमावें, गुरुपदि रमावें रे!२

ज्ञानेच व्हायचे गुप्त
ही आस असू दे सुप्त
रामरंगि रंगावें, रामरंगि रंगावें, रामरंगि रंगावें रे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

रामनाम जपावे..
👆🏻 ऑडिओ

Sunday, August 4, 2019

मनातला सुविचार येवो कृतीत...

श्रीसत्यनारायण पूजा मनात
मनातला सुविचार येवो कृतीत!ध्रु.
सत्य हाच नारायण मन बोलले
नारायण नारायण स्मरण चाले
विचार नि आचारही सुसंगतीत!१
सत्य जीवाचे कल्याण मनाची शांती
वासुदेव कृपेनेच समाधि स्थिती
नको खटाटोप काही सोपी ही रीत!२
दिसे भासते ते जाते गाठ बांधावी
आजवर बाळगली अढी सोडावी
उकलती कोडी सारी निमिषार्धात!३
नर होय नारायण गुण जोडावे
निर्धाराने जाती दोष त्वरे त्यजावे
नामस्मरणे पालट होई वृत्तीत!४
शांत झोप तेव्हा लागे जेव्हा सत्कार्य
परिश्रमे सुधा गमे नित्याचे खाद्य
बीज रुजते पुण्याचे शिशुपणात!५
सत्यनारायण व्रत मने करावे
आत्मनिरीक्षणा सिद्ध नित्य असावे
मार्गदीप सर्वांसाठी ध्रुव प्रल्हाद!५
लोकमान्य महात्मा नि स्वातंत्र्यवीर
सेनापति नेताजीही सारे सुधीर
आपणही चोखाळावा मार्ग प्रशस्त!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७.०८.२००१

Thursday, August 1, 2019

टिळकांचे हे दर्शन....

टिळकांचे हे दर्शन
मौनातुन संभाषण!ध्रु.

गीतेचे भाष्यकार
राष्ट्राचे शिल्पकार
बिजलीचे जणु नर्तन!१

नेत्रांनी वेध घेत
ऐक्याचा मंत्र देत
व्यक्तीचे हो विकसन!२

समरसता सकल कळे
दीक्षा ही आज मिळे
तादात्म्यच संजीवन!३

व्हा शिक्षक संपादक
संस्थेचे संचालक
प्रात्यक्षिक अध्यापन!४

लाभाविण प्रीत कशी
आज मला मिळत अशी
मिटले हे सजल नयन!५

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, July 28, 2019

देहातच रामायण ऐकावे, गावे!

रे मना कधीही एकांती बैसावे
देहातच रामायण ऐकावे गावे!ध्रु.
तो आत्मा अंतरि वसला आहे राम
घे सतत मुखाने श्रीरामाचे नाम
वाल्मीकी आपण सुखे सुखे समजावे!१
तव हातपाय हे रघुनाथाचे भाऊ
भक्ती जी चित्ती तीत जानकी पाहू
नित त्या उभयांचे चरणकमल वंदावे!२
रावण तो कपटच कामक्रोध गणावा
परि बिभीषण खरा पापभिरू समजावा
तो विवेक, अंती विजयी होई स्वभावे!३
करी चिंतन त्याला कोडी उलगडतात
तो करी न कसल्या दुर्घटनांची खंत
नर पराधीन हे मनी धरून चलावे!४
मोहाने अवचित मात मनावर केली
ती सती अहल्या शिळाच होउन पडली
धरी रामचरण तो पावन हो समजावे!५
हे शरीर नश्वर साधन परमार्थाचे
ते ज्याचे त्याच्या हाती निरवायाचे
भूमीत सितेने जळि रघुनाथे जावे!६
जे ग्रामराज्य ते रामराज्य होताहे
ग वगळा सुज्ञा सहजच समजत आहे
मी माझे जावे तू नि तुझे उमलावे!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

देहातच रामायण ऐकावे गावे..
👆🏻 ऑडिओ

Tuesday, July 16, 2019

रामदास कुलगुरु आम्ही विद्यार्थी त्यांचे....

रामदास कुलगुरु आम्ही विद्यार्थी त्यांचे!
विद्यार्थी त्यांचे!ध्रु.
निर्भय होऊ समर्थ होऊ
संघटनेचे सैनिक होऊ
उत्कटतेने पाठ गिरवुया लोकसंग्रहाचे!१
साक्षेपे गुण जोडत जाऊ
आत्मारामा अंतरि पाहू
आमंत्रण घेऊ सदैवच आम्ही साहसाचे!२
परोपकारी देह झिजावा
यत्नदेव यत्ने पूजावा
दिवसा रात्री घोकत राहू नाम राघवाचे!३
क्षात्रत्वाचे अंतरि स्पंदन
ब्राह्मतेजही टाकी भारुन
पुण्यालाही देऊ पाठबळ परम प्रतापाचे!४
परोपरीचे जन मिळवावे
एकविचारे त्या भारावे
शिवशक्तीचे मंगलमीलन स्वप्न साधकांचे!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२६.०४.१९७६

रामदास कुलगुरु आम्ही विद्यार्थी त्यांचे..
👆🏻 ऑडिओ

बिन भिंतींची शाळा अमुची आजी आजोबा गुरु

बिन भिंतींची शाळा अमुची
आजी आजोबा गुरु
तेही वंदिती ज्या देवाला
तो सगळ्यांचा गुरु !१

वर्गशुल्क तर येथे नाही
आई वडिलां प्रवेश राही
शिक्षक येथे आपण शिकती
गंमत थोडी करु !२

नवीन गाणी नवे उखाणे
नमस्कार अन नवी आसने
नवी भाषणे नवी दर्शने
आनंदे जग भरू!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

बिन भिंतींची शाळा आमची..
ऑडिओ👆🏻

Monday, July 15, 2019

गुरुपदपूजन सोहळा मी मनाने पाहिला!

गुरुपदपूजन सोहळा
मी मनाने पाहिला!ध्रु.

समर्थ येती नयनांपुढती
परिसर सगळा परिमळला!१

तेवत समई, वाजत सनई
कलश जलाचा शोभला!२

चरण क्षाळिले, हलके पुसले
करी ठेविले कमलदला!३

स्पर्श अलौकिक, अनुभव मौलिक
कण कण तनुचा मोहरला!४

श्वासासंगे भजनहि रंगे
लंघुनि गेलो दिक्काला!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
११.०७.१९७९

Thursday, July 4, 2019

नरेन्द्रा, तू प्रतीक ध्येयाचे....

अमृतपुत्रा अगा नरेन्द्रा
प्रणाम कोटि जनांचे
तू प्रतीक ध्येयाचे! ध्रु.

तुझिया स्मरणे पौरुष जागे
वैराग्याचे कुंड धगधगे
दर्शन श्रद्धेयाचे!१

निर्भय बनणे तुझेच पूजन
वैदिक जीवन तव संशोधन
गायन कर्तृत्वाचे!२

अज्ञानाचे भस्म होउ दे
समर्थ भारत जगा दिसू दे
मंथन तत्वार्थाचे!३

गुरुदेवांनी दिली प्रेरणा
हे दिग्विजयी तुला वंदना
उद्बोधन धर्माचे!४

निजसामर्थी निष्ठा ठेवू
पुढती पुढती चालत राहू
आश्वासन छात्रांचे!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Friday, June 28, 2019

विठ्ठल! विठ्ठल! विठ्ठल! विठ्ठल


विठ्ठल! विठ्ठल! विठ्ठल! विठ्ठल! ध्रु.
टाळ घुळघुळे, मृदंग घुमतो
देहावरती कोण राहतो
इंद्रायणीचे झुळझुळते जळ!१
भाळी बुक्का लागे नकळत
माळ तुळशिची भक्ता राखत
फुलाहूनही वाचा कोमल!२
प्रपंच आपला होतच असतो
परमार्थाचे कोण पाहतो?
ओवी अभंग सेवावे जळ!३
हरिपाठी लाभे विश्रांती
दया क्षमा वसतीला येती
मेरूसम मन होई निश्चल!४
पाषाणाची बरवी मूर्ती
ती वज्राची बनवी छाती
वारकरी हो मनेच निर्मळ!५
पंढरीनाथा कैसे आला
गंध चंदनी कुठून भरला
गंगायमुना नयनीचे जळ!६
पंढरीराणा घरी पाहुणा
पुंडलीकवरदा यदुराणा
उभे पाठिशी बाळकृष्णबळ!७
तोच आपले नाम आठवी
तोच लिहाया आपण बसवी
पांडुरंग हरि निर्बळास बळ!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, June 23, 2019

घडव ही मूर्ति पांडुरंगा..



घडव ही मूर्ति पांडुरंगा!ध्रु.

दे भजनी रति
सत्कर्मी मति
मला पांडुरंगा!१

निंदा रुचु दे
स्तुती पचू दे
पुरवी सत्संगा!२

हसत साहावे
सहत हसावे
शिकवी श्रीरंगा!३

घाव पडू दे
हात फिरू दे
अगा पांडुरंगा!४

तुला हवासा
घडवी तैसा
मला पांडुरंगा!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२.१०.१९८२

Saturday, June 22, 2019

सूड घेतला! सूड घेतला!


रँड नव्हे कंसच जणु आज मारला
सूड घेतला!ध्रु.

प्लेगाने जन पिडिले,
आंग्लांनी नाडियले
जुलुम्यांनी जनतेचा अंत पाहिला!१

सत्ता जयघोष करी
जाचते गुलामगिरी
हिंदू नच षंढ कुणी प्रत्यय दिधला!२

शिशुपाला रयत स्मरे
आज घडा पूर्ण भरे
कृष्णाने रिपुवर्मी घाव घातला!३

सत्तेचा दीपोत्सव
रँडासी परि रौरव
नरकाचा मार्ग त्यास खुला जाहला!४

अबलांचा कैवारी
दामोदर तापहरी
या धैर्या साहसास ना कुठे तुला!५

अन्याया ठेचले
भीमशौर्य दाविले
अभिमाने ऊर भरत तरुण चेतला!६

मृत्यूभय नच शिवले
मरणासी चुंबियले
अमरत्वे नरवीरा हार घातला!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१२.५.१९७३

Monday, June 17, 2019

थांबवू कसा तुम्हाला?



थांबवू कसा तुम्हाला
चालला महायात्रेला
खळबळ या मानसडोही
पाहिजेच शमवायाला!

आपल्याच छायेखाली
खेळला, वाढला, रमला
हा छत्रपती परि आता
छत्रास पारखा झाला!

पौत्रास मानुनी पुत्र
जाहला तयाची माता
नच मी परि आम्ही अवघे
जाहलो पोरके आता!

आठवे तात अंतरता
निश्चये पद पुढे पडता
तत्क्षणी घालुनी खेव
थांबविले तेव्हा जाता!

सुख सरले, दुःख न उरले
भावना गोठल्या आता
कर्तव्यकर्म मज पुरते
उरलोच स्वराज्यापुरता!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, June 16, 2019

आमची यात्रा मुंबईची, उद्यमनगरीची....

पूर्वी शाळेची ट्रीप जायची मुंबईला (बहुतेक जाताना विमान प्रवास असायचा), त्यावर आधारित हे काव्य..

आमची यात्रा मुंबईची
उद्यमनगरीची!ध्रु.

विशाल सागर नाच करी
तयास वारा साथ करी
ऐसी नवलाची!१

चौपाटीवर निसर्ग शोभा
मनामनातुन आनंद आभा
याद दिवाळीची!२

दख्खनराणी कशी धावते
डोंगरातुनी वाट काढते
घाई गर्दीची!३

नभात घेई झेप विमान
आम्हा ठेंगणे हो अस्मान
बालकसेनेची!४

उरका अपुली कामे झटपट
नकोच आळस नकोच वटवट
या संदेशाची!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१७.२.१९८५ 

फादर्स डे निमित्त ग्रंथसंवाद मध्ये आलेला हा लेख..

श्रीराम बाळकृष्ण आठवले, हे माझे वडील. आम्ही त्यांना अण्णा म्हणत असू. त्यांचा जन्म ५ मे १९३३ ला झाला. आठवले कुटुंब हे मूळचे मिरजेचे. माझे आजोबा पुण्यात स्थायिक झाले. ते शिल्पकार होते. त्यांचा कलेचा वारसा अण्णांमधे उतरला तो लेखनाच्या रुपात. 

अण्णा भावेस्कुलमधे शिक्षक होते.  आजही त्यांचे विद्यार्थी त्यांची आठवण काढतात. ‘ऑफ’ तासाला ते कुठल्या वर्गावर गेले की मुलांकडून कविता म्हणून घायचे. काही विद्यार्थ्यांना अजूनही त्या कविता पाठ आहेत.  त्यांचे शिकवायचे विषय संस्कृत, मराठी आणि हिंदी हे  होते. मुळात भाषेवर प्रभुत्व होतं, उच्चार स्पष्ट होते, वक्तृत्व उत्तम होतं... त्यामुळे मुले वर्गात रमून जात असत. त्यांनी संस्कृतमधे लिखाणही केलं विशेषतः सुभाषिते लिहिली. नी. शं. नवरे तरुण भारत मधे सुभाषित लिहायचे त्यांच्यानंतर दोन वर्षे अण्णा तरुण भारतसाठी सुभाषिते  लिहायचे. 

काहीही लिखाण केले की त्याच्यावर दिनांक आणि वेळ टाकायची अण्णांना सवय होती. त्यावरून पहिली कविता त्यांनी २४ जानेवारी १९५५ला लिहिली असे कळते. आणि शेवटपर्यंत म्हणजे अगदी २०१२ पर्यंत ते साहित्यसेवा करत होते.  त्यांनी भूपाळी, अभंग, आरती, पोवाडा, फटका असे विविध काव्यप्रकार चोखाळले. पोथी लिहिली, भक्तीस्तोत्र ही रचली. प्रसंगांवर आधारितही त्यांचं बरंच लिखाण होतं. विवाह, उपनयन या विषयांवर ही त्यांचं काव्य होतं. उपनयन संस्कार गीतावली हे त्यांचं काव्य १९७१ मधे चित्रशाळा प्रेस मधून प्रकाशित झाले. एवढंच काय मरणावर ही त्यांनी काव्य केलं. त्यांनी पद्य आणि गद्य असं दोन्ही लेखन केलं. हिंदीमधेही त्यांनी काव्य केलं. मला आठवतंय ग्राहक मंचासाठी त्यांनी हिंदी कविता केल्या होत्या.

१९६२ मधे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या शिवगीता या काव्याचे कार्यक्रम गजाननराव वाटवे करत असत. वाटव्यांनी त्याला संगीत दिलं होतं. त्यातली ४ गाणी एच एम व्ही नं रेकॉर्ड केली होती. यातली दोन गाणी वाटव्यांनी तर दोन जानकी अय्यर यांनी गायली होती. अण्णांचे एक वैशिष्ट्य होतं की ते कविता स्फुरल्यावर बरेच वेळा बाजूला कुठल्या रागात म्हणायची ते ही लिहित असत. अशाप्रकारे त्यांचे गायनाविषयीचे ज्ञानही नकळतपणे डोकावत राही.

सुरवातीला विविध विषयांवर आणि विविध व्यक्तींच्या चरित्रांवर आधारित काव्य केल्यानंतर, त्यांनी मुख्यत्वे अध्यात्मिक आणि विशेषतः गीतेवर काव्य आणि लिखाण केले. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, महात्मा फुले, सेनापती बापट, महर्षी कर्वे, रामकृष्ण परमहंस, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, रामदास स्वामी, साई बाबा, गजानन महाराज शेगाव, स्वामी स्वरूपानंद आदि विभूतींवर त्यांचे विपुल लेखन आहे. ‘काव्यमय सावरकर दर्शन’ हा त्यांच्या कवितांचा कार्यक्रम  अण्णा, त्यांचे विद्यार्थी आणि नंतर सहकारी झालेले श्री. श्री वा कुलकर्णी सर (जे निवेदन आणि कविता वाचन करायचे) आणि रंजना गोखले या गायिका असे करायचे. कुलकर्णी सर आणि अण्णा महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्यावरच्या कवितांचा ही कार्यक्रम करायचे. त्या दोन्ही कार्यक्रमांना प्रतिसादही चांगला मिळायचा. राजभाषा सभेने तेव्हा एक महात्मा गांधींवरच्या कवितांचा कार्यक्रम केला होता आणि त्या कार्यक्रमाला गदिमा प्रेक्षकांमधे होते. त्यात अण्णांच्या एका कवितेमध्ये "शस्त्राघाता, शस्त्र न उत्तर" अशी ओळ आहे.  ही कविता कुलकर्णी सर वाचत होते आणि या ओळीला खूप दाद मिळाली. गदिमांच्या एका गाण्यात ‘शस्त्राघाता शस्त्रच  उत्तर’ अशी ओळ आहे. पण तरीही कार्यक्रम संपल्यावर गदिमांनी सुद्धा दाद दिली असं कुलकर्णी सर सांगतात. 

भगवद्गीता हा त्यांच्या आवडीचा विषय. पुण्यातल्या गीता धर्म मंडळात त्यांचं नेहमी जाणं असायचं. मंडळांच्या गीता दर्शन या मासिकात ते नेहमी लिहायचे. "कथा ही भगवद्गीतेची" हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक गीता धर्म मंडळाने प्रकाशित केलं. संतकृपा प्रकाशनाने त्यांचं "सद्गुरू श्री नारायण महाराज, बेट केडगाव" हे चरित्र संतचरित्र मालेत प्रकाशित केलं.  

पुढे अण्णा देवधर (गिझरवाले) यांच्याशी परिचय झाला. त्यानंतर श्रीकृष्ण प्रकाशन या माध्यमातून त्यांची अनेक छोटी छोटी काव्यपुष्पे प्रसिद्ध झाली. त्याचे कार्यक्रम "ओंकार संगीत साधना" हा ग्रुप करत असे. त्यात निवेदन अण्णा करायचे. "गीता कळते गाता गाता" आणि "श्रोतेमुखी रामायण" हे त्यातील विशेष कार्यक्रम. त्याच काळात त्यांनी अण्णा देवधरांबरोबर सदाशिव पेठेतील नरसिंह मंदिरात संस्कार वर्ग चालू केला. त्यांनी तेव्हा लहान मुलांसाठी गाणी व प्रार्थना लिहिल्या. "बिनभिंतींची शाळा आमची आजी आजोबा गुरु", "हे प्रभो शिकवी नित्य मला श्रद्धा दे विमला" व "माझे बाबा विठ्ठल आई रखुमाई" या त्यातील काही. 

गीता धर्म मंडळाच्या गीता संथा वर्गांमध्ये त्यांचं "घरोघरी करोकरी गीता जाऊ दे" आणि "कृष्ण कृष्ण म्हण येता जाता" नेहमी म्हटलं जातं. पावसला काकड आरतीच्या वेळी त्यांनी लिहिलेली "प्रभात झाली स्वरूपनाथा या हो मम अंतरी" ही भूपाळी रोज म्हटली जाते. या तिन्ही रचनांमधून त्यांच्या विचारांचे दर्शन घडते. या रचना वर्षानुवर्षे टिकून राहतील आणि मार्गदर्शन करत राहतील अशी मला खात्री वाटते. 

गजाननराव वाटवे, मुकुंदराव गोखले, दादा फाटक या संगीत क्षेत्रांतल्या व्यक्तींचा त्यांना सहवास लाभला. या सर्वांचा अण्णांवर विशेष लोभ होता. आम्हीही नशीबवानच, कारण हे लोक आमच्या घरी नेहमी यायचे. शांताराम आठवले यांच्याकडेही त्यांच्याबरोबर गेल्याचं स्मरतंय. अध्यात्म क्षेत्रातल्या स्वामी माधवनाथ, स्वामी अमलानंद, स्वामी विद्यानंद, गणोरे आजोबा,  आबाजी पणशीकर यांच्याही ते संपर्कात आले. लेखक आणि साहित्यिक श्री न. म. जोशी त्यांचे मित्र आणि काही काळ सहकारी होते तर लेखिका मृणालिनी जोशी त्यांच्या गुरुभगिनी. 

अण्णांची भाषा सहज, सोपी आणि सर्वांना कळेल अशी होती. शब्दभांडार ही विपुल होते त्यांचे. शब्दांचे अवडंबर त्यांच्या लिखाणात कधीच नसायचे. याउलट अनेकदा त्यांच्या लिखाणात शब्दांच्या गमती मात्र बघायला मिळतात. उदा. एका भूपाळी मधे "सुमने सु-मने अर्पण व्हावी कृपा करा सत्वरी", एका गाण्यात "मना उलटता होते नाम श्रीराम जयराम जय राम". तसंच एका कवितेत ते म्हणतात "मोहना, मोह ना राहो कोण मी मजला कळो, देहबुद्धी त्वरे जावो  सोऽहं तो मी कळो वळो". 

त्यांना स्वत: वाचून दाखवण्याची विशेष आवड होती. विशेषकरून वयस्कर माणसांना ते वाचून दाखवत असत. ते वाचत असताना ऐकत राहावंसं वाटायचं. जीवनात त्यांना बरेच आघात सहन करावे लागले. माझ्या थोरल्या भावाचे आकस्मिक निधन हा तसं पाहिलं तर त्यांना बसलेला खूप मोठा धक्का होता. पण त्यातून ईश्वर कृपेने ते बऱ्यापैकी सावरु शकले, ते त्यांच्या या साहित्यसेवेमुळेच. त्यावेळी त्यांनी लिहिलेल्या ओळी आहेत "रडून काय कधी मना गेला जीव येत असतो, झटक मोह देहाचा तू कोणीच येथे राहात नसतो".

या सगळ्या साहित्य प्रवासात माझी आई प्रतिभा सावलीसारखी त्यांच्याबरोबर असायची. कधी लेखनिक म्हणून तर कधी श्रोता म्हणून आणि बरेचदा सहगायिका म्हणून.  तिचं नावही म्हणूनच प्रतिभा, खरंच ती त्यांची प्रतिभा होती. संसाराचा भार सगळा तिनं सांभाळल्याने अण्णांचा साहित्यप्रवास अखंड चालू राहू शकला. आजही त्यांच्या कविता, स्तोत्र आई गुणगुणत असते.

त्यांचा स्वभाव संकोची असल्यामुळे असेल कदाचित पण त्या काळात त्यांच्या साहित्याला तसा कमी वाव मिळाला असावा. अर्थात त्यावेळी खूपच दिग्गज लोक होते साहित्य क्षेत्रात. आजच्या सारखं सोशल नेटवर्किंग असतं तर हे लिखाण जास्त लोकांपर्यंत गेलं असतं. मी हा ब्लॉगही चालू केला आहे. यावर मी त्यांचं बरचसं साहित्य आणि ऑडिओ सुद्धा अपलोड केलेले आहे.  त्यामुळे त्यांचा आवाज आणि साहित्य  आता कायम स्वरूपात आंतरजालावर राहील. 

अण्णांच्या साहित्याबद्दल अजूनही बरंच लिहिण्यासारखं आहे, पण जागेच्या मर्यादेमुळे इथे थांबतो.

Wednesday, June 12, 2019

श्रीराम एक हे नाम।..




श्रीराम एक हे नाम। स्तोत्र मंत्र न काय हे?
मानवा पाव आराम। शक्तिवर्धक पेय हे।।
तुझा राम तुझ्या देही। कार्यकर्मच पूजन
विलासी जरा न राही। उद्योगी प्रभुदर्शन।।
चालू क्षण त्वरे साध। व्यर्थ बडबड ती नको
गुणांचा घेत जा शोध। निंदेची खोड ती नको।।
केल्याने होत आहे रे। समर्थे कथिले तुला
यत्न श्रीराम आहे हे। जाणुनी वागणे मुला।।
दौर्बल्य पायबेडी ही। दे तोडुनी भिरकावुनी
युक्तिने मुक्ति लाभे ही। घेई संधीच साधुनी।।
संघजीवन हे तंत्र। एकटा दुबळा खरा
'तू, मी, तो' सगळे राम। पेलणे महती धुरा।।
देह दुःख सुखे सोस। वेदना वर ईश्वरी
जानकीनाथ कैवारी। प्राणांती विस्मरू नको।।
खेडोपाडी, झोपड्यात। हिंड जा मोकळ्या मने
दीनांस  लावुनी जीव। राघवा प्रिय हो सदा।।
नको धन, नको कीर्ती। सत्तेची लालसा नको
अंतरे राम ज्या योगे। ऐसा मोह नको नको।।
प्रपंची परमार्थी वा। सावधानच राहणे
दासबोधी जसा बोध। तैसे नित्यच वागणे।।
दृष्टीत आगळे प्रेम। सृष्टी प्रेमळ हो तरी
भाषणी गोडवा येता। राम बाहेर अंतरी।।

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Wednesday, June 5, 2019

गोंदवलेकर महाराजांच्या बोधवचनांवर आधारित काव्य (रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले)

आपला 'देव' देवघरातच ठेवू नका.  त्याला व्यवहारात आणा

'देव' न ठेवा देवघरी। तया आणा व्यवहारी।
हरि अंतरी-बाहेरी। भाव हवा।।१।।
भाव हवा मी श्रीराम। व्हावे आपण निष्काम।
नाम जपावे अविराम। हे भजन।।२।।
हे भजन गुण मिळवीन। मजला मीच सुधारीन।
आत्मरूप जग पाहीन। नामबळे।।३।।
नामबळे भय जाइ दुरी। नामबळे तम जाइ दुरी।
नाम बळे सुख व्यवहारी। परमार्थी।।४।।
परमार्थी 'मी' चा विसर। परमार्थी सम नारीनर।
भेद न उरतो रतीभर। स्वर्गच हा।।५।।


भगवंत अवतरला आहे, हे अखंड स्मरणात ठेवा

भगवंत आहे अवतरला। नामामध्ये तो भरला।
श्वासोच्छ्वासी जर धरला। सखाच तो।।१।।
सखाच तो माझा राम। स्वामी तो माझा राम।
स्मरण करवुनी घे राम। तो कर्ता।।२।।
'तो कर्ता' हे जाणवता। विरून जाती मग चिंता।
शांती सदनास येता। दिपवाळी।।३।।
दिपवाळी नामस्मरण। गुरुकृपेची ही खूण।
इथे तिथे तो समजून। वागावे।।४।।
वागावे जगतात असे। क्षणात दुःखी हासतसे।
आश्वासन स्पर्शात वसे। ही भक्ती।।५।।


भगवंताचे स्मरण करावे म्हणजे प्रपंच सोपा जातो

करावे रामाचे स्मरण। प्रपंच नाही मग कठीण।
संतबोध हा जाणून। जगायचे।।१।।
जगायचे रामासाठी। मरायचे रामासाठी।
होडी घ्या तरण्यासाठी। नामाची।।२।।
नामाची रुचि वाढावी। विषयाची रुचि सोडावी।
प्रपंचबेडी तोडावी। आत्मबले।।३।।
आत्मबले "तो मी" ज्ञान। सरला तुमचा अभिमान।
रात्रंदिन अनुसंधान। परमार्थ।।४।।
परमार्थाला लागावे। प्रपंचास राहू द्यावे।
कधी न कोठे गुंतावे। स्वराज्य हे।।५।।


संत व्हायचे म्हणजे सुखाने नेहमी हसायचे

उठता बसता नाम घ्यावे। मने विश्रांतीला जावे।
जो भेटे त्या प्रेम द्यावे। आनंदाने।।१।।
आनंदाने संभाषण। संभाषणे समाधान।
समाधाने सोsहं ज्ञान। भाविकाला।।२।।
भाविकाला सदा तोष। भक्तीचा हा परिपोष।
'मी रामाचा' आत घोष। मुखी हास्य।।३।।
मुखी हास्य ज्याच्या असे। संतपण तेथे असे।
रघुनाथ तेथ विलसे। नित्याचाच।।४।।
नित्याचा हा परिपाठ। मोद भरे काठोकाठ।
मोक्षलाभ हातोहात। भाग्यवंत।।५।।


भगवंताचा जन्म झाला की आनंदीआनंद भरून राहिला पाहिजे

जगायचे आनंदार्थ। दुःख करावे किमर्थ? 
ओळखून दैत्य स्वार्थ। दक्ष राहा।।१।।
दक्ष राहा प्रपंचात। आसक्ती ही दुःख देत।
भक्त होत निरासक्त। नामघोषे।।२।।
नामघोषे राम जन्मे। नामघोषे कृष्ण जन्मे।
हा संतोष पूर्वपुण्ये। साध्य आहे।।३।।
साध्य आहे आत्मज्ञान। नामी पूर्ण समाधान।
नाम स्नान, नाम ध्यान। पर्वकाल।।४।।
पर्वकाल अंतरात। रामजन्म अंतरात।
ऐसी आनंदाची मात। रामराज्यी।।५।।


आकुंचित वृत्तीच्या माणसाला समाधान मिळणे शक्य नाही.

प्रभूने हे विश्व दिले। पाहिजे हे ध्यानी आले।
"मी, माझे" जर मावळले। समाधान।।१।।
समाधान नसे वित्ती। समाधान असे चित्ती।
विलसे ते मुद्रेवरती। भाविकाच्या।।२।।
भाविकाची कशी भाषा। राम एक त्याची आशा।
दुःख गुंडाळते गाशा। जाई दूर।।३।।
जाई दूर सुखस्वार्थ। प्रवेशतो परमार्थ।
मीच कृष्ण, मीच पार्थ। आत्मानंदी।।४।।
आत्मानंदी जे जे मिळे। अज्ञान्याला कोठे कळे।
देहबुद्धी त्याला छळे। राक्षसी ती।।५।।


गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे

गीता आहे ग्रंथमाता। साऱ्या विश्वी तिज मान्यता
गीता कळे गाता गाता। साधकाला।।१।।
साधकाला गुरु कृष्ण। कडेवर घे उचलून
आत्मस्वरूप दाखवून। करी शांत।।२।।
करी शांत योगेश्वर। करी ज्ञानी योगेश्वर
करी भक्त योगेश्वर। सश्रद्धाला।।३।।
सश्रद्धाला होते ज्ञान। कर्तव्याचे पूर्ण भान
स्वानंदाचे मधुर गान। गीता गाई।।४।।
गीता गाई वेदसार। गीता नेई भवपार
गीता घाली कंठी हार मौक्तिकांचा।।५।।


मारुती गावात नसेल तर घरी तरी ठेवावा.

मारुतीची उपासना। मनोभावे करताना।
निर्भय वाटे मना। भेटे राम।।१।।
भेटे राम ध्यानी मनी। रंगे भक्त नामगानी
एकवचनी, एकपत्नी। कृपा करी।।२।।
कृपा करी रघुनाथ। पूर्ण करी मनोरथ।
राम येथ, राम तेथ। ऐसे वाटे।।३।।
ऐसे वाटे घडो सेवा। आवडो ती रामदेवा।
आत्म्याला हा गोड मेवा। देई मोद।।४।।
देई मोद रामदूत। धन्य अंजनीचा सुत।
व्रते तीव्र सौम्य होत। प्रसादाने।।५।।


मला मनुष्य वाईट असा दिसतच नाही नाहीतर तो मनुष्य होऊन जन्माला आलाच नसता.

कोणी दिसो नारी-नर। त्या त्या रूपे रघुवीर
पाहता ये नयनी नीर। आनंदाचे।।१।।
आनंदाचे जे ठिकाण। तेथे कोण थोर सान।
अवघी भूते मला समान। वंदनीय।।२।।
वंदनीय सारे जन। दिसे उध्दाराची खूण।
नामी टाकावे दंग करून। हाचि ध्यास।।३।।
हाचि ध्यास माझ्या मना। पोटी दाटे अपार करुणा
शब्दही मग बोलवेना। भाग्य माझे।।४।।
भाग्य माझे ऐसी दृष्टी। टाकाऊ ना कुणी व्यक्ती
देउळे ही सारी हलती। राघवाची।।५।।


घरामध्ये सर्वांनी कसे हसून-खेळून मजेत असावे.

घरी असावी प्रसन्नता। स्वच्छता, नीतिमत्ता
रमा रमे येथ येता। ते सदन।।१।।
ते सदन जेथे प्रेम। सायंप्रार्थना हा नेम।
सकलांचा योगक्षेम। योग्य चाले।।२।।
योग्य चाले कारभार। जो तो आहे खबरदार
कुणी न करी शब्दप्रहार। कोणावरी।।३।।
कोणावरी न कार्यभार। सर्व लोक भागीदार।
आल्या अतिथ्या मुक्तद्वार। गोकुळ हे।।४।।
गोकुळ हे आहे घर। कुणी न करी किरकिर
शांति नाचे धरून फेर। मंदिर ते।।५।।


आपण आपले मागले घडलेले सर्व भगवंताला अर्पण करावे; मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते.

जे झाले ते रामार्पण। करू नये चिंता आपण।
सर्व त्यावर सोपवून। स्वस्थ व्हावे।।१।।
स्वस्थ व्हावे नाम घ्यावे। मी तुझा हे बाणवावे।
सर्वाभूती तो जाणावे। उपासना।।२।।
उपासना ज्ञानयुक्त। उपासना करी मुक्त।
आनंद हा अंतर्गत। ज्याचा त्याला।।३।।
ज्याचा त्याला लाभ होई। समाधान आत येई। 
शांती तनी मनी येई। सुख सर्वां।।४।।
सुख सर्वां रामराज्य। वासनेचे सरे राज्य।
आनंदाचे हे साम्राज्य। रामकृपा।।५।।


अपेक्षा न करणे हे परमार्थाचे बीज आहे.

नको धन, नको मान। काही न इच्छावे आपण।
फलाशा सर्व सोडून। वागायाचे।।१।।
वागायाचे असे काही। सर्वां हवा हवा होई।
चित्त राही रामापायी। ऐसा भक्त।।२।।
ऐसा भक्त प्रपंचात। कमलपत्र उदकात।
अलिप्त तो पूर्ण शांत। आत्मतृप्त।।३।।
आत्मतृप्त रमे नामी। कधीही न म्हणे मी, मी।
जग वाखाणे नेहमी। रामदासा।।४।।
रामदासा नसे आशा। भक्तिपूर्ण अशी भाषा।
नाही क्षुधा, नाही तृषा। अंशमात्र।।५।।


आपण आपल्या आईशी बोलतो तसेच देवाशी बोलावे. देवाला आपले दुःख सांगत जावे.

बोलावे नित्य देवाशी। जसे बोलतो आईशी।
तो सांभाळे भाविकासी। हा भावार्थ।।१।।
हा भावार्थ धरा ध्यानी। मागे पडतो अभिमानी।
नम्र तो जाय तरुनी। नाम घेता।।२।।
नाम घेता राम येतो। तोच दुःख ऐकून घेतो।
पाठी प्रेमळ हात फिरतो। बरे वाटे।।३।।
बरे वाटे नामस्मरणे। पुरते होई जेथ उणे।
दीनदास ऐसे म्हणे। तारी भाव।।४।।
तारी भाव आहे राम। नाम जपा अविराम।
अंतःकरण शांतिधाम। साधनेने।।५।।


उपासनेचे खरे स्वरूप म्हणजे आपले दोष आपल्याला दिसणे होय.

नाम घ्यावे नम्र व्हावे। उपासना करीत जावे।
अवगुणा ध्यानी घ्यावे आपल्याच।।१।।
आपल्याच मनी क्रोध। क्रोधमूळ आहे काम।
कामशत्रू रामनाम। दिव्यौषधी।।२।।
दिव्यौषधी घेत जाता। तना मना निरोगता।
एक एक गुण जोडता। पाउल पुढे।।३।।
पाउल पुढे असे राहो। आत्माराम भेटत राहो।
सत्संगाचा घडे लाहो। उपासका।।४।।
उपासका काय कमी? सुधारण्याची तया हमी।
आतला आदेश नेहमी। पाळायाचा।।५।।


जगात जे आहे ते सर्व चांगलेच आहे; आपणच बरे नाही.

जगामध्ये सारे चांगले। पाहिजे ते ध्यानी आले
मन हवे विशाल अपुले। गुणग्रहणा।।१।।
गुणग्रहणा त्वरे लागा। भावपूर्ण बोला, वागा।
राम आत नित्य जागा। भेटा त्याला।।२।।
भेटा त्याला वारंवार। तोच एक दाता शूर।
वाहवील प्रेमपूर। आचारात।।३।।
आचारात हवी आस्था। रामापायी असो माथा।
चढे वैभव बघता बघता। श्रद्धेचे त्या।।४।।
श्रद्धेचे त्या एक आहे। काही पालट त्वरे आहे। 
बरे आहे, भले आहे। म्हणू ऐसे।।५।।


मनाने संत बनायला पाहिजे; नुसते बाहेरून संत बनणे पाप आहे.

मने व्हावे रामदास। भजन करा सावकाश।
एक एक गळे पाश। अज्ञानाचा।।१।।
अज्ञानाचा करा त्याग। ज्ञाने साधा कार्यभाग।
जीवन आहे थोर याग। ध्यानी घ्यावे।।२।।
ध्यानी घ्यावा मनोधर्म। सुधारणेचे हेच मर्म।
मना उलटता ते नाम। आपोआप।।३।।
आपोआप स्फुरो नाम। एक एक श्वास दाम।
श्वासमोले घ्यावा राम। संत व्हावे।।४।।
संत व्हावे विवेकाने। विवेकाने, अभ्यासाने।
अभ्यासाने नारायणे। केला यज्ञ।।५।।


समाधान आणि आनंद ही खरी लक्ष्मी होय.

खरी लक्ष्मी समाधान। आनंद तो अन्नदान।
सदाचार हे वरदान। भगवंताचे।।१।।
भगवंताचे नाव घ्यावे। कार्यकर्म करीत जावे
आळसाला न ठेवावे। थोडे स्थान।।२।।
थोडे स्थान विवेकाला। विवेकाला संयमाला।
संयमाला, विरक्तीला। देता शांती।।३।।
देता शांती, घेता प्रीती। कृतज्ञता ही श्रीमंती।
सदाचार हीच नीती। संतबोध।।४।।
संतबोध समाधान। संतबोध आत्मज्ञान।
संतबोध निर्मूलन। अज्ञानाचे।।५।।


उद्योगामध्ये राहाणे हीच खरी भगवत्सेवा होय.

निजकर्तव्या करीत जावे।नामानंदा सेवीत जावे।
रघुनाथाने अंतरि यावे। कृपा हीच।।१।।
कृपा हीच घडे उद्योग। नित्य रामाशी घडे योग।
क्षणभरही ना वियोग। भगवत्सेवा।।२।।
भगवत्सेवा कर्मपूजा। नामस्मरण भावपूजा।
सोsहं ध्यान ज्ञानपूजा। भगवंताची।।३।।
भगवंताची मूर्ती संत। परमार्थाची शिकवण देत। 
भक्तिमार्गी पुढती नेत। हळूहळू।।४।।
हळूहळू सुधारावे। निंद्य त्याज्य ते टाकावे।
वंद्य ते ते भावे करावे। उद्योग हा।।५।।


संत हे गेल्यानंतर सुद्धा हवेसे वाटतात.

संत जरी देहे गेले। बोधरूपे मागे उरले
हवेहवेसे सर्वां झाले। आत्मतृप्त।।१।।
आत्मतृप्त सदा संत। विषयी ना जरा गुंतत।
अनुसंधानी नित्य रत। रघुनाथाच्या।।२।।
रघुनाथाच्या नामस्मरणे। अवघे जीवन त्यांचे सोने। 
मार्गी त्यांच्या नेटे जाणे। श्रद्धा हीच।।३।।
श्रद्धायुक्त कृती श्राद्ध। श्रद्धा नाही ते थोतांड।
नामधार धरा अखंड। शिवावरी।।४।।
शिवावरी निष्ठा असो। संतप्रेम चित्ती असो
उपासना खंडित नसो। पुण्यतिथी ही।।५।।


तू जे देशील ते मला आवडेल असे आपण भगवंताला सांगावे.

"राघवा, जे देशी मला। ते ते आवडेल मला"।
ऐसे बोला राघवाला। सर्वकाळी।।१।।
सर्वकाळी 'राम माझा'। ऐसे बोलो सदा वाचा।
राम माझा, मी रामाचा। राहो भाव।।२।।
राहो भाव, रामापायी। त्याची इच्छा प्रमाण राही।
"मी, माझेपण' जधी जाई। देव भेटे।।३।।
देव भेटे श्रद्धावंता। श्रद्धावंता ज्ञानवंता।
ज्ञानवंता, भक्तिवंता। साक्षात्कार।।४।।
साक्षात्कार ज्ञानेश्वरा। नामदेवा, तुकारामा
एकनाथा, रामदासा। आत्मशोधे।।५।।


माझ्या माणसाने माझे घेतले असे मला कधीच वाटले नाही.

जे दिले ते परत मिळावे। ऐसे न मना वाटावे
वृथा कशाला गुंतावे। आशापाशी।।१।।
आशापाशी तीव्र यातना। खंड पडे अनुसंधाना
विकल्प उठती मनी नाना। आशा सोडा।।२।।
आशा सोडा राम जोडा। सहज ओढा प्रपंच गाडा
सारथी करा वीर गाढा। मेघश्याम।।३।।
मेघश्याम लावण्यरूपी। राजाराम परमप्रतापी।
रामांकित तो महाकपी। हनुमान।।४।।
हनुमान राम सर्वस्व। त्यांचे माना वर्चस्व
विसरायाचे आता स्व। मी साऱ्यांचा।।५।।


एका भगवंताचे प्रेम लागले की भाषेमध्ये सर्व चांगले गुण येतात.

प्रेम लागावे श्रीरामाचे। इथे तिथे दर्शन त्याचे।
वाढे माधुर्य वाचेचे। भगवत्प्रेमे।।१।।
भगवत्प्रेमे जीव नटला। देहस्वार्था पुरता विटला
दुजाभाव पूर्ण आटला। भक्ती करता।।२।।
भक्ती करता मनःशांती। मनःशांती ही विश्रांती
तुळशीची ही रोपे डुलती। वृंदावनी।।३।।
वृंदावनी तुळस डुलो। भक्तीचे जळ तिला मिळो
पुन्हा न मानस कधी मळो। शुद्ध व्हावे।।४।।
शुद्ध व्हावे देहे आधी। नाम घ्यावे ही समाधी।
विरती आपोआप उपाधी। नित्यपाठे।।५।।


मरणाच्या मागे स्मरणाचा ससेमिरा लावावा

मरणाचे जरी वाटे भय। वृत्ती करता राममय।
साधक बनतो निर्भय। नामस्मरणे।।१।।
नामस्मरणे भेटे समर्थ। मरणा भ्यावे किमर्थ
जन्ममरण पाउले टाकत। चालायाचे।।२।।
चालायाचे घेता नाम। संगे सहज येत राम
तोच तोच रे आत्माराम। माझ्या मना।।३।।
माझ्या मना नित्य स्मर। अनित्याचा पडे विसर
रघुनाथ घाली पाखर। भक्तावरी।।४।।
भक्तावरी प्रेम करी। मरणभय जाई दुरी
ऐसा कनवाळू श्रीहरी। मागेपुढे।।५।।


ज्याच्या मागे उपासनेचा जोर आहे, तोच जगात खरे काम करतो.

उपासनेला चालवावे। मना समर्थ बनवावे
तनी, मनी तत्त्व मुरावे। साधनेने।।१।।
साधनेने साध्य सर्व। घालवावा दुष्ट गर्व।
तेणे सुरू पुण्यपर्व। जीवनात।।२।।
जीवनात राम आहे। उपासना राम आहे।
ज्याचे धैर्य ठाम आहे। रामदास।।३।।
रामदासामुखी हास्य। करी भगवंताचे दास्य
कार्य वाटे उमालास्य। शिव तोषे।।४।।
शिव तोषे भक्तिभावे। जीव शिवच स्वभावे
आपण अपणा ओळखावे। शिवरात्री।।५।।


परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा मार्ग आहे.

चंचल मना आवरावे। मना नामी रमवावे।
तया माघारी वळवावे। अंतरात।।१।।
अंतरात जाता येते। मने मना शिकता येते।
वृत्ती सुधारता येते। अभ्यासाने।।२।।
अभ्यासाने वैराग्याने। आत्मारामाला पाहणे।
निजात्मसत्ता आठवणे। परमार्थ।।३।।
परमार्थ हा समजुतीचा।समजुतीचा शांतपणाचा।
लीनतेचा, सदयतेचा। शिकवी पाठ।।४।।
शिकवी पाठ सच्छिष्याला। सद्गुरू सुकृते लाभलेला
प्रेमसूत्रे बांधलेला। भविकाने।।५।।


पैसा गेला म्हणून काही अब्रू जात नांही. आपली अब्रू आपल्या आचरणावर अवलंबून असते.

धन गेले सुखे जावो। शीलधन दृढ राहो।
आत्मारामा सदा पाहो। भक्तराज।।१।।
भक्तराज रंगे नामी। न गुंतला कामक्रोधी।
अनुसंधाना सदा साधी। साक्षेपी तो।।२।।
साक्षेपी तो सावधान। मी रामाचा तया भान
नसे लेश अभिमान। दीनदासा।।३।।
दीनदासाची श्रीमंती। श्रीमंती ती सद्भावाची
कारुण्याची कर्तव्याची। ध्यानी घ्यावे।।४।।
ध्यानी घ्यावे धन गौण। गौण लौकिक सन्मान।
सन्मान तो वमनासम। निरिच्छाला।।५।।


ज्याचा आनंद टिकेल त्याला नित्य  दिवाळी आहे.

आनंद हा स्वरूपाचा। ज्याचा त्याला लाभायाचा
पथ अनंत रामाचा। चालू लागा।।१।।
चालू लागा भक्तिमार्गे। राम पुढे राम मागे।
मन रामाज्ञेत वागे। भाविकाचे।।२।।
भाविकाचे भाग्य हेच। द्वंद्व कदा बाधेनाच।
सोsहं घोष घुमतोच। अतरंगी।।३।।
अतरंगी राम आहे। आनंदाचा कंद आहे।
नाम घेणे छंद आहे। दिवाळी ही।।४।।
दिवाळी ही नित्याचीच। शांतितृप्ती सदाचीच।
बोधवाणी संतांचीच। तारीतसे।।५।।


बापाचा पैसा हा मुलाने अनीतीने वागण्यासाठी नाही. जो मुलगा अनीतीने वागतो त्याला बापाने पैसा देऊ नये.

जे जे वडिली मेळविले। हवे आपण वाढविले।
तरीच काही सार्थक झाले। पुत्रपणाचे।।१।।
पुत्रपणाचे हे लक्षण। पित्याविषयी पुत्र कृतज्ञ।
पितृगुणाचे सदा स्मरण। पाउल पुढे।।२।।
पाउल पुढे टाकायाचे। संस्कारांना स्मरायाचे
मायपितरां वंदायाचे। भावपूजा।।३।।
भावपूजा देवा रुचते। नवीन काही आतुन सुचते
दिवसेंदिवस भाग्य उजळते। उद्योगाने।।४।।
उद्योगाने साक्षात्कार। पथ पुढचा उलगडणार
ध्येयमंदिर नाही दूर। यात्रिकाला।।५।।


मनाची विश्रांती म्हणजे खरी विश्रांती होय.

श्रीराम मना विश्राम। विश्रामाचा अर्थ नाम। 
मना जोडून देता नाम। खेळीमेळी।।१।।
खेळीमेळी प्रसन्नता। प्रसन्नता विश्वबंधुता।
मी न काही देहापुरता। सर्वांसाठी।।२।।
सर्वांसाठी माझी काया। सर्वांसाठी दौलत माया।
ना तरी सारा जन्म वाया। गेला गेला।।३।।
गेला गेला ऐसे न व्हावे। परोपकारी तन झिजवावे
मने विश्रामसुख घ्यावे। रामरंगी।।४।।
रामरंगी रंगून जाता। चंदनापरी झिजता झिजता।
आत्मसौख्य लुटता लुटता। सार्थकता।।५।।


तपश्चर्या म्हणजे चिकाटी होय. 

तपश्चर्या देहविस्मरण। तपश्चर्या दिव्य स्फुरण
तपश्चर्या सुंदर साधन। परमार्थाचे।।१।।
परमार्थाचे राज्य ऐसे। येथे काम चिकाटीचे।
अभ्यास नाम सातत्याचे। बिंबे आत।।२।।
बिंबे आत मी रामाचा। क्षणहि न विसर रामाचा।
आक्रमीन पथ राघवाचा। ध्यास हाच।।३।।
ध्यास हाच तप करीन। मोही न कसल्या गुंतेन
वाटचाल मी करीन। चिकाटीने।।४।।
चिकाटीने करता यत्न। मानव ठरे अमोल रत्न।
नर होई नारायण। अभ्यासाने।।५।।


परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते.

परमार्थ आहे सदाचार। कल्याणाचा सुविचार।
मनावरचा संस्कार। सुमंगल।।१।।
सुमंगल आहे नाम। नाम हेच रामधाम।
भक्ता करीत निष्काम। निश्चयाने।।२।।
निश्चयाने कार्य होई। राघवाशी भेट होई।
समाधान होत राही। मानसाचे।।३।।
मानसाचे शुद्ध प्रेम। करवील नित्यनेम।
तेणे होई पूर्ण क्षेम। आपलेच।।४।।
आपलेच हितासाठी। बनायाचे परमार्थी।
वागण्यात हवी नीती। सौख्यदायी।।५।।


ज्ञान हे परीक्षेकरिता नसावे; ज्ञानासाठी ज्ञान मिळवावे, त्यातच खरा आनंद आहे.

नसावे ज्ञान परीक्षेसाठी। ज्ञान हवे ज्ञानासाठी।
तेणेच लाभे विश्रांती। साधकाला।।१।।
साधकाला लागो ध्यास। तरीच होईल अभ्यास।
देही होता तो उदास। होई भला।।२।।
होई भला जिज्ञासेने। बैसे ध्याना निश्चयाने।
त्याच्या भाग्या काय उणे? तोचि ज्ञानी।।३।।
ज्ञानी नाही शब्दज्ञानी। आहे पूर्ण आत्मज्ञानी।
आत्मतृप्त निरभिमानी। ऐसा भक्त।।४।।
ऐसा भक्त होता यावे। उपासना करीत जावे।
फलाशेत ना गुंतावे। कदा कोणी।।५।।


भगवंताच्या स्मरणामध्ये देहबुद्धीचे विस्मरण आहे.

नाम घ्यावे येता जाता। नरजन्माची सार्थकता।
देही विदेही येते होता। सोsहंभावे।।१।।
सोsहंभावे समाधान। ज्ञानामध्ये आत्मज्ञान
देहबुद्धि हे अज्ञान। घालवावे।।२।।
घालवावे देहभान। तनू पूर्ण झिजवून।
तरी न्यून होई पूर्ण। संतकृपा।।३।।
संतकृपा तेव्हा झाली। देहबुद्धी गेली गेली।
आत्मबुद्धि झाली झाली। विवेकाने।।४।।
विवेकाने, वैराग्याने। आचरावे साधकाने।
धान्य व्हावे नामस्मरणे। तत्त्वसार।।५।।


भगवंताला दृष्टीआड न होऊ देणे याचे नाव अनुसंधान होय.

अनुसंधान त्याचे स्मरण। अनुसंधान त्याचे चिंतन।
अनुसंधान त्याचे दर्शन। येथे तेथे।।१।।
येथे तेथे असे राम। अंतरात आत्माराम
करिता काम घेता नाम। परमानंद।।२।।
परमानंद अनुभवणे। 'मी-माझेपण' पूर्ण जाणे।
ऐसे त्याशी समरसणे। शिव-शक्ती।।३।।
शिवशक्तीचा चाले खेळ। परमार्थाचा सुंदर मेळ। 
गंध चंदनी पसरेल। मलयानिले।।४।।
मलयानिले शीतलता। अंग अंग परिमळता।
आनंद ये का तो मोजता। पामराला।।५।।


सद्गुरु म्हणजे मूर्तिमंत नाम होय.

मूर्तिमंत नाम जेथे। सद्गुरुंचा वास तेथे।
स्वार्थहीन चित्त होते। नाम घेता।।१।।
नाम घेता क्षणोक्षणी। राम होय स्वये ऋणी।
नामे वश होय वाणी। गुरुकृपा।।२।।
गुरुकृपा लाभ थोर। आनंदाला नाही पार।
दुःख थोडे सुख फार। रामानंदी।।३।।
रामानंदी रंगे मन। तरी मनाचे अमन।
साधकाचे पूर्वपुण्य। नरजन्म।।४।।
नरजन्म महत्त्वाचा। बोध साऱ्या सज्जनांचा 
नारायण बनण्याचा। लागो ध्यास।।५।।


ज्याने मला पाठविले तो बोलाविल तेव्हा परत जायचे.

ज्याने मला पाठविले। त्याचे स्मरण हवे केले
नामरूपे त्या साठविले। अतरंगी।।१।।
अतरंगी तो भरलेला। अवती भवती तो जाणवला
म्हणून जीव जडला। त्याचे चरणी।।२।।
त्याचे चरणी वृत्ती लीन। ऐसा गा मी पराधीन
साद त्याची मी ऐकेन। हवे जाया।।३।।
हवे जाया तातडीने। ऐहिकात ना गुंतणे
आनंदे प्रस्थान ठेवणे।  त्याची इच्छा।।४।।
त्याची इच्छा आलो येथे। त्याची इच्छा निघालो तेथे
यात काय माझे जाते? मी रामाचा।।५।।


आपल्याला जे कळले ते आपल्या आचरणात आणणे हे खरे ऐकणे होय. 

सावधान श्रवण करून। तत्त्वसार मनि ठसवून
जर केले आचरण। ते श्रवण।।१।।
ते श्रवण खरे श्रवण। भक्तिपूर्ण अंतःकरण।
भरून वाहताती नयन। आसवांनी।।२।।
आसवांनी स्नान घाला। अंतरातल्या रामाला
नामस्मरणे तो तोषला। सर्व काळ।।३।।
सर्व काळ जी जिज्ञासा। तीच शारदीय भाषा।
तोडतसे मायापाशा। साधुबोधे।।४।।
साधुबोधे होते ज्ञान। हारपते देहभान।
जमू लागे सोsहं ध्यान। नित्यश्रवणे।।५।।


परमार्थ आपल्याशीच करायचा खेळ आहे. तो आपल्याशीच करायचा अभ्यास आहे. 

परमार्थी हवे सावधपण। पाहावे आपणा आपण।
कळो येती निज अवगुण। भिऊ नये।।१।।
भिऊ नये करावा नेम। रघुनाथ करील क्षेम।
मग अभ्यासी निपजे प्रेम। आपोआप।।२।।
आपोआप स्फुरे नाम। तेही ऐकवता राम।
आता निष्प्रभ क्रोध-काम। प्रगती ही।।३।।
प्रगती ही वागण्यात। समाधान वाटे आत।
मन होय शांत शांत। भक्तियोग।।४।।
भक्तियोग कळे वळे। गंध घरी दरवळे।
आत आत मनहि वळे। अभ्यासाने।।५।।


आपण स्वतःच्या मुलाला जसे प्रेमाने घेतो तसा परमार्थ करावा आणि आपण दुसऱ्याच्या मुलाला जसे घेतो तसा प्रपंच करावा.

कर्तव्यपालन प्रपंचात। मन रंगावे परमार्थात।
उठता बसता नाम घेत। वेळ जावा।।१।।
वेळ जावा नामस्मरणी। एक एक श्वास मणी।
तरीच लागे जन्म कारणी। भाविकाचा।।२।।
भाविकाचा पाठिराखा। रघुनाथ एक सखा। 
ये विषयी न जरा शंका। राहो द्यावी।।३।।
राहो द्यावी चिर जागृती। कोण मी? याची स्मृती।
राम देई संतत स्फूर्ती। दाता थोर।।४।।
दाता थोर दुसरा नाही। अंतर्बाह्य तोच राही।
चित्त ठेवुनि त्याचे पायी। धन्य व्हावे।।५।।


देहाच्या भोगांना मी कधी कंटाळलो नाही. 

संतबोध 'मी न देह'। देह आहे रामगेह।
राम मी जर निःसंदेह। का कष्टावे?।।१।।
का कष्टावे? येता रोग। सारावा तो भोगून भोग।
रघुनाथाचा साधे योग। नाम घेता।।२।।
नाम घेता बरे वाटे। चित्त शांत शांत होते।
चंदनाचे शैत्य येते। कृपा हीच।।३।।
कृपा हीच धैर्य राहे। मागे-पुढे राम आहे।
धीर तोच पुरवताहे। क्षणोक्षणी।।४।।
क्षणोक्षणी अभ्यासाने। अभ्यासाने विवेकाने।
भोग भोगणे अलिप्तपणे। जमू लागे।।५।।


समाधान ही सुधारणेची खूण आहे.

रामनाम ज्याचे मुखी। तोच एक खरा सुखी।
मिळो रोटी ओली सुकी। घेई नाम।।१।।
घेई नाम आवडीने। त्याच्या भाग्या काय उणे?
नसो काही सोने नाणे। समाधान।।२।।
समाधान सुधारणा। सुख मना, सुख जना।
भक्त नाही दीननवाणा। राघवाचा।।३।।
राघवाची कृपा हीच। जळे आशा अंतरीच।
एक भाषा प्रेमाचीच। हास्य गाली।।४।।
हास्य गाली ही दिवाळी। ज्योत नेत्री तेजाळली।
गेली वासना हो गेली। संतसंगे।।५।।


माझ्या देवाला हे आवडेल का? अशा भावनेने जगात वागणे हाच सगुणोपासनेचा हेतू आहे.

जे जे देवा आवडावे। ते ते आपण करावे।
एवढेच सांभाळावे। येथे पथ्य।।१।।
येथे पथ्य रामी भाव। नित्य पाही राम राव।
मार्गदीप भक्तिभाव। वागण्याला।।२।।
वागण्याला ऐसे लागू। प्रेम रामापाशी मागू।
सुखदुःख त्याला सांगू। मुक्त मने।।३।।
मुक्त मने नाम घेता। चिंताभार त्याचे माथा।
अहंभाव दूर जाता। उपासना।।४।।
उपासना चालवतो। संकटात साह्य देतो।
भक्त कौतुक करतो। रघुनाथ।।५।।


प्रत्येकाला त्याची गरज भागेल येवढे भगवंत देतच असतो, म्हणून जे आहे त्यात समाधान मानावे.

आहे ते ते त्याने दिले। काय हवे हे जाणले।
प्रमाणही ठरविले। देणाऱ्याने।।१।।
देणाऱ्याने भक्ति द्यावी। रामपदी निष्ठा द्यावी।
चूक आपली कळावी। दिले नाम।।२।।
दिले नाम घ्यावे तेच। भूक त्याने भागतेच।
बाळसेही धरतेच। भक्तबाळ।।३।।
भक्तबाळ राम आई। आई बाळापाठी राही।
उचलुन कडे घेई। कौतुकाने।।४।।
कौतुकाने रामे घ्यावे। समाधान मना द्यावे।
काय लागते मागावे। दयाघना?।।५।।


भगवंत असण्याची जी स्थिती तिचे नाव भक्ती होय. 

'राम आहे' ऐसा भाव। मुखी राघवाचे नाव।
दुःखविमोचना धाव। तीच भक्ती।।१।।
तीच भक्ती रामी प्रीती। सदाचार हीच नीती।
संयमाची सारी कृती। प्रसन्नता।।२।।
प्रसन्नता सदा मुखी। ऐसा रामदास सुखी।
देह राघवा पालखी। वाटलेला।।३।।
वाटलेला हा आधार। हेहि रामाचे आभार।
भक्तिभावे नमस्कार। भावपूजा।।४।।
भावपूजा साधीसुधी। व्यवहारी शुद्ध बुद्धी।
होत दासी ऋद्धि सिद्धी। रामराज्यी।।५।।


धर्म म्हणजे व्यवस्थितपणा होय. धर्म वस्तुजातास नीट धरून ठेवतो. 

धर्म धरून ठेवणे। धर्म व्यवस्था लावणे।
धर्म भगवंत होणे। साधनेने।।१।।
साधनेने ये वैराग्य। साधकाचे उजळे भाग्य।
शांतिसुखाचे साम्राज्य। समाजात।।२।।
समाजात संघटना। कार्यक्रमात योजना।
साधणे अनुसंधाना। धर्मखूण।।३।।
धर्मखूण आहे प्रेम। निश्चयाने नित्यनेम।
घरीदारी समाधान। सर्वकाळ।।४।।
सर्वकाळ नाम घेणे। तने मने त्याचे होणे। 
कर्म यज्ञरूप होणे। धर्ममर्म।।५।।


जेथे आपणच दिवस गोड करून  घ्यायचा आहे तेथे रोजच दसरा का न करावा? 

दुःख नाव अज्ञानाचे। आनंद रूप ज्ञानाचे।
संतबोल समजुतीचे। आचरावे।।१।।
आचरावे आत्मज्ञान। भगवंताचे आत स्थान।
साधनेने समाधान। लाभताहे।।२।।
लाभताहे जर सुख। थोडे व्हावे अंतर्मुख।
रामनामी पूर्ण सुख। विश्वासावे।।३।।
विश्वासावे रामावर।  मने मना घाला आवर।
नाम जपा श्वासावर। हा दसरा।।४।।
हा दसरा विजयाचा। विसर पूर्ण विषयाचा।
दिवस गोड करायाचा। नित्यच सण।।५।।


खरा पश्चाताप हा भयंकर दाहक आहे. तो मागचे सगळे जाळून टाकतो. 

'त्याला' विसरलो चूक झाली। मना चुटपुट लागलेली।
अश्रू ओघळले मग गाली। गंगास्नान।।१।।
गंगास्नान शुद्ध करते। तनामना स्वच्छ करते।
मागचे न काही उरते। पुनर्जन्म।।२।।
पुनर्जन्म प्रत्येक दिवशी। अंतःकरण आहे काशी।
अभाग्या का न ध्यानी घेशी। सावधान।।३।।
सावधान जो सगळ्याआधी।  त्याला न छळे उपाधी।
कैची आधी-कैची व्याधी। रामदासा।।४।।
रामदासाचा अनुताप। नुरू देई मनस्ताप।
नावालाही नुरे पाप। नाम घेता।।५।।


आपण साखर खाल्ली तर आपल्याला गोड लागते, त्याचप्रमाणे आपण गोड शब्द बोललो की आपल्याला गोड शब्द ऐकू येतात.

नित्य गोड बोलत जावे। प्रेमे सकलां सौख्य द्यावे।
सौम्य, शांत आपण व्हावे। विवेकाने।।१।।
विवेकाने नामस्मरणे। अद्वयानुभवा घेणे।
'माझे मीपण' पूर्ण जाणे। असो लक्ष।।२।।
असो लक्ष 'रामा'वरी। अंतर्बाह्य वास करी।
स्वये सुखी सुखी करी। सगळ्यांना।।३।।
सगळ्यांना जो आवडतो। रघुनाथा ही हवा होतो।
देव भक्ता मस्तकी धरतो। कौतुकाने।।४।।
कौतुकाने घास घाला। कौतुकाने प्रेमे बोला।
परानंदी मोदे डोला। आशीर्वाद।।५।।



आपले कर्तव्य शेवटपर्यंत करणे हा परमार्थ होय.

कर्तव्यपालन करावे। मोही न कसल्या गुंतावे।
नामस्मरणी रत व्हावे। पुन्हा पुन्हा।।१।।
पुन्हा पुन्हा करता करता। गोडी लागते तत्त्वतः।
यश लाभे अभ्यास घडता। हाचि नेम।।२।।
हाचि नेम निसर्गाचा। जाणून सदा पाळायाचा।
नामे होय शुद्ध वाचा। कर्मे काया।।३।।
कर्मे काया होय निरोगी। ध्याने होई मानव योगी।
विषयत्यागे पूर्ण विरागी। होई नर।।४।।
होई नर नारायण। हरिभक्ति परायण।
करी कर्तव्यपालन। परमार्थ हा।।५।।


जसे आपले आपलेपण आपल्या नावात आहे तसे देवाचे देवपण त्याच्या नामात आहे. 

नाम घ्यावे आवडते। त्यात देवत्व राहते।
नाम औषध तारते। आजाऱ्याला।।१।।
आजाऱ्याला दुःख होते। देहबुद्धी त्रास देते।
रामाहून दूर नेते। रडू येते।।२।।
रडू येते वियोगाने। हासू येते संयोगाने।
रामयोग हो नामाने। लीला त्याची।।३।।
लीला त्याची नाम देतो। नाम घेता धीर देतो।
भक्तालागी सांभाळितो। रघुनाथ।।४।।
रघुनाथ आहे नामी। देह गुंतो कार्यकर्मी।
नाम घालवी 'माझे, मी'। करी राम।।५।।

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले