Thursday, January 23, 2020

विज्ञानाचा तृतीय नेत्र!

पुरे पुरे ही भोळी श्रद्धा, भोळी पोथीनिष्ठा
विज्ञानाच्या तृतीय नेत्रा उघडी माझ्या मित्रा!ध्रु.

ऐहिक तत्त्वांच्या पायावर
समाजरचना व्हावी सत्वर
विज्ञानाची निष्ठा दे बल विकसविण्या ते राष्ट्रा!१

पोथीनिष्ठता नेते मागे
कालौघाते ध्यानि न घे
नको अडकवू ग्रंथी बुद्धी सावध रे सन्मित्रा!२

विज्ञानाशी जे जे निगडित
ते ते स्वीकारार्हच निश्चित
व्रतवैकल्ये निरर्थकपणे कशास करिशी मित्रा!३

राष्ट्रहिताची लाव कसोटी
विज्ञानाशी पहा संगती
जोड माणसे तोडु नको रे या अवलंबी सूत्रा!४

शस्त्रास्त्रांच्या बळा वाढवी
विज्ञानाची वाट धरावी
शस्त्रसज्जता अद्यावतता आवश्यक की राष्ट्रा!५

शब्दाते प्रामाण्य नसावे
रूढीते प्राधान्य नसावे
आत्मप्रत्यय होइल जागा विरेल दाट तमिस्रा!६

वाढव वाढव विचारशक्ती
पहा वापरुनि शोधकबुद्धी
शिल्पकार तू तव भाग्याचा घे ध्यानी घे मित्रा!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(विज्ञाननिष्ठ सावरकरांवर आधारित काव्य)

विधिलिखिताच्या कठोर पानी...

मकरसंक्रांत पार पडली आणि ८/९ दिवसातच भयंकर घात झाला (२३ जानेवारी १६६४). महाराजांना त्याची चाहूल नव्हती.  रायगडावर आईसाहेबांच्या मनालाही काही पूर्वकल्पना नव्हती. पण विधिलिखिताच्या कठोर पानावर कल्पांत लिहिलेला स्पष्टच आढळून आला!
-------------------------------------
काय जाहले, कसे जाहले असे अकस्मात?
विधिलिखिताच्या कठोर पानी लिहिला कल्पांत!

जंगलात राजे शिरले
सावजा पाहण्या घुसले
चौखूर अश्व मग उधळे
वेलीस भाग्य अडखळले
कोसळता धरणीवरती दो क्षणात हो देहांत
विधिलिखिताच्या कठोर पानी लिहिला कल्पांत!

तो लोळ विजेचा आला
हृदयासी जाळुनी गेला
नजरेचा कणखर भाला
रोखता काळ थरथरला
'जाणार मी सती' बोल उमटता एकच आकांत!
विधिलिखिताच्या कठोर पानी लिहिला कल्पांत!

ये आक्रंदत शिव पुढती
कर दोन्ही घालुन कंठी
"तू नको जाउ गे सती"
परि थिजे जननिची दिठी
फुलाहुनी मृदु माय लाजवी वज्रा निमिषात!
विधिलिखिताच्या कठोर पानी लिहिला कल्पांत!

येत ना आसवे नयनी
हा वियोग क्षणभर मानी
नश्वर तनु घेउनि अग्नी
नेईल पतीच्या सदनी
ती सती जशी की संगमरवरी मूर्त दिसे साक्षात!
विधिलिखिताच्या कठोर पानी लिहिला कल्पांत!

जर सोडुनि मजला जाशी
मी शपथ घालतो तुजशी
धर क्षणभर मज हृदयाशी
अश्रूत न्हाउ दे मजशी
निर्वाणीची हाक ऐकता उसळत वत्सल लाट!
विधिलिखिताच्या कठोर पानी टळला कल्पांत!
विधिलिखिताच्या कठोर पानी टळला कल्पांत!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(२३ जानेवारी १६६४ रोजी शहाजीराजांचे निधन झाले त्या प्रसंगावरचे हे काव्य)

Friday, January 17, 2020

गुरुदेवा, गुरुदेवा, हा आश्रम अर्पित चरणी!

महाराजांचे सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती! महाराजांचे सर्व प्रेमी शिष्यवर एक झाले. नवी वास्तु उभारली गेली एरंडवणेच्या शांत परिसरात! वास्तूला नाव दिले 'श्री वासुदेव निवास' तो आश्रम गुरूंना अर्पण करताना मनात येत होतं ...
----------------------------------------
गुरुदेवा, गुरुदेवा, हा आश्रम अर्पित चरणी!ध्रु.

असंख्य भाविक जमले येथे
वास्तु रम्य ही अधिक शोभते
प्रसन्न वृत्ती, प्रसन्न मुद्रा, प्रसन्नता या भुवनी!१

सद्गुरु नाम निवासा दिधले
गुरुस्मृतीने लोचन भिजले
कृतज्ञता ही होउनि पुष्पे क्षणात आली फुलुनी!२

इथे रहाया ये मंगलता
कणाकणातुनि दिसे सजिवता
आत्मोद्धरणा मार्ग दाखविल या वास्तूची धरणी!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गुरुदेवा, गुरुदेवा, घ्यावी करुनी निजसेवा!

गुरुदेवा, गुरुदेवा, घ्यावी करुनी निजसेवा!ध्रु.

श्रद्धा चरणी अविचल राहो
इष्टदेवता दृष्टी पाहो
निरंजनाते दाखविण्याची कृपा करावी देवा!१

इच्छा अमुची पूर्ण करावी
देवकार्यी ही तनू झिजवावी
योग-भक्ति हा सुरेख संगम साधुनि द्या गुरुदेवा!२

'वामन' नामाचा मधु महिमा
मनोनभाच्या लंघित सीमा
अज्ञानाचा बळी दडपुनी प्रत्यय दिधला देवा!३

योगभास्करा त्रिवार वंदन
स्वीकारावे विनम्र पूजन
शब्द सुमांतरि सद्भावांचा परिमल सहज रिघावा!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१२.१२.१९७२
बिहाग त्रिताल

वामना पाहिली या जगती, तव नेत्री करुणा!

वामना पाहिली या जगती, तव नेत्री करुणा!ध्रु.

मूर्तिमंत कोमलता येथे
वृत्ति प्रमुदित इथेच दिसते
भाविक कर हे नकळत जुळले स्वीकारी वंदना!१

सदा येतसे मुखि नारायण
भावविश्व ये सहज फुलारुन
योगैश्वर्ये मंडित होउनि सुधा पाजसी तृषितांना!२

योग जीवनी पूर्ण बिंबला
ज्ञानसुवर्णा सुगंध आला
तुझे हासरे दर्शन स्मरते शोक मोह मुळी उरती ना!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
जोगी केरवा

योगी पावन मनाचा!

योगी कोण्या एका गावाचे, प्रदेशाचे उरत नाहीत. ते साऱ्या विश्वाचे होतात! त्यांचे मन म्हणजे शुद्ध गंगाजल! वामन देखील असेच साऱ्या विश्वाचे झाले आहेत! "स्थिरचर व्यापुनि दशांगुळे उरला! असेच म्हणावेसे वाटते..

योगी पावन मनाचा!
हा "वामन" सर्व जगाचा!ध्रु.

सुख वसते अंतर्यामी
जा मनुजा रंगुनि नामी
ठसे चित्ती बोध गुरूंचा!१

जे घडते हातुनि कर्म
ते निरासक्त हे मर्म
पथ सोपा चालायाचा!२

नित्य आत्मानंदी दंग
खुलतात जीवनी रंग
आदर्श स्थितप्रज्ञांचा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

शिवरंजनी (दुर्गा)   केरवा

तुमचे गाऊ किती गुण, योगिराज!

तुमचे गाऊ किती गुण, योगिराज!ध्रु.

संतसमागम सहज साधता
राग भक्तिचा नित आळविता
पवित्र जीवन सद्गुरु अपुले -
गाऊ देत स्वरराज!१

शुद्धाहारी, परोपकारी
विकारारि भाविककैवारी-
अभय द्यावया कर उंचावे
तेच उरे त्या काज!२

चिरंजीवपण तुम्हा लाभले
वदनी विलसे तेज आगळे
अभ्यासासह विनयशीलता-
हास्याचाही साज!३

दत्तोपासक तुम्ही योगिजन
मनोमनी करता गुरुसेवन
योगपंथि चालता निश्चये-
नाम मिळे पंथराज!४

ज्ञाना आपण अन्न मानिले
गुरुसाहित्या पुढे आणिले
घास भरविले इवले इवले-
कृतज्ञता शिर लववित आज!५

देहभोग जे - हसत भोगता
तटस्थ वृत्ती मुळि न सोडता
ओंकाराचे तेज मुखावर
झळकत जणु रविराज!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
मालकंस त्रिताल
भैरवी

Sunday, January 12, 2020

पाश्चात्या: सकला जिता:

वक्तृत्वेन स्वभावेन
पाश्चात्या: सकला जिता:।
विवेकानन्द वीरेण
मातृभूमि: सुपूजिता।।

अर्थ :  स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या धर्मपरिषदेत आपल्या वक्तृत्वाने विश्वविजय प्राप्त केला. लाघवी स्वभावाने पाश्चात्यांना जिंकून घेतले आणि हिंदुधर्माची विजयपताका आकाशात झळकवून मातृभूमीची-भारतभूमीची उत्तम पूजाच केली.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

(११ सप्टेंबर १८८३ या दिवशी स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील धर्मसभेत विश्वविख्यात अविस्मरणीय भाषण झाले)

सांगा, ऐका, मनात मुरवा कथा विवेकानंदांच्या..

सांगा, ऐका, मनात मुरवा
कथा विवेकानंदांच्या!ध्रु.

पारतंत्र्य हा शाप असे तर स्वातंत्र्य हे वरदान
भारतीय मी माझा भारत आवश्यक हा अभिमान
प्रेरक, उद्बोधक, प्रोत्साहक घटना त्यांच्या बाल्याच्या!१

नरेंद्र ऐसे नाव शोभले उमदा होता राजा तो
नारायण या जन्मी होइन आकांक्षा मनि बाळगतो
तू शिव माता जाणिव देते गोड खुणा संस्काराच्या!२

केंद्रित होते मन हे जेव्हा भान जगाचे उरत नसे
पूर्ण विरागी ज्ञानी योगी नरेंद्र चिमणा भासतसे
वाचन चिंतन स्मरणा पूरक या गोष्टी तर सवयीच्या!३

देव कसा हो? असे कुठे हो? कुणी पाहिले असे तया?
मजला सांगे, मला भेटवे पडेन मी त्याच्या पाया
ही जिज्ञासा बलवत्तरशी बालकथा या नवलाच्या!४

बीज रुजू दे, ते अंकरु दे पाणी घालू प्रेमाचे
मज गाऊ दे, मज गुंफू दे पुष्पहार ते सुमनांचे
दिवसा रात्री खाद्य चिंतना पंक्ती भगवद्गीतेच्या!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
४.२.१९९५

Friday, January 10, 2020

विनवणी

ही हात जोडुनी एक विनवणी तुजला
आरोग्य हवे रे तनामनाचे मजला!ध्रु.

खळमळ हे सारे  नित्य निघुनिया जावे
जे पथ्य नि पोषक ते आहारी यावे
मन देही गुंते अडचण ही गोपाला!१

पाउले चालण्या दूर दूर जाऊ दे
हात हे राबण्या कर्तव्यास भिडू दे
धर्म हाच राजा कळेल कैसे मजला!२

नामाची गोडी ऐसी लावी काही
मनपण हे अलगद मना सोडुनी जाई
तो भाव पाहिजे अंतःकरणी रुजला!३

हा देहच छळतो विसर पडे पाठाचा
तो देव मागतो लक्ष कुंठते वाचा
आजार करी बेजार निवेदन तुजला!४

पोसणे शोषणे ऐसे का रे होते
अज्ञानसागरी कितिदा खावे गोते
धावा या कवनातून असा सुरु केला!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२६.०८.२००१

Thursday, January 9, 2020

प्रपंच - परमार्थाची पाठशाळा

प्रपंचात तुज गिरवायाचे परमार्थाचे धडे!ध्रु.

प्रपंच आहे विशाल शाळा
शिक्षक इथला कुणा न दिसला
पाउल इथले मोजत मापत टाकायाचे पुढे!१

आधी परीक्षा निकाल आधी
कुणा समाधी कुणास व्याधी
रस्त्यामधले दे दे फेकुन देहबुद्धिचे खडे!२

चित्ताची जर साधे समता
तनी वज्रता मनी शांतता
सेवा म्हणुनी कर्मे घडता गाठ प्रभूची पडे!३

भलेबुरे ते आतुन कळते
तुला विठाई नित सावरते
कौल मानता मनुजा त्या काय कुठे साकडे?४

मी माझे जर पूर्ण वगळले
गंगोदक जणु जीवन झाले
जिवाशिवांचे मंगलमीलन गुरुकृपेने घडे!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Monday, January 6, 2020

श्री गजानन विजय ग्रंथ

श्री गजानन विजय ग्रंथ
धरण्या भक्तीचाच पंथ
वाचू , ऐकू मनी संथ
गंगा वाहे!१

गंगा वाहे माणुसकीची
सन्नीतीची, आपुलकीची
लाट उसळे भावनांची
मना स्नान!२

मना स्नान संतकृपा
तने कर्म हरिकृपा
धने दान गुरुकृपा
सर्वस्वाचे!३

अंधत्वाला दृष्टिलाभ
अज्ञान्याला ज्ञानलाभ
निष्प्रेमाला प्रेमलाभ
पारायणे!४

पारायणे कळो येई
संत सन्मार्गाने नेई
न मागता तो जे जे देई
कल्याणाचे!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२८.२.१९८९

Sunday, January 5, 2020

'वीर विनायक सावरकर' - एक नाममंत्र

'वीर विनायक सावरकर' हा नाममंत्र गावा
अखंड भारत, अभिनव भारत आकारा यावा!ध्रु.

खंडित भूमी अखंड होते अमुचा विश्वास
चला करू या निर्धाराने पुन्हा प्रयत्नास
युवक नि युवती सिंहयुग्म तर कुमार हो छावा!१

अष्टभुजा देवीचे पूजन पुरवितसे शक्ती
योगाभ्यासे आवरते मन जाणतसे युक्ती
चातुर्ये बुद्धीच्या जाणू आधीच रिपुकावा!२

राष्ट्रभक्त तो हिंदु असतो भिनले हिंदुत्व
गीताईची गुटी प्राशुनी पचले सत्तत्त्व
राष्ट्रासाठी भातुकलीचा खेळहि उधळावा!३

अम्हां भयाचे  नाव न ठावे महारुद्र होऊ
युद्धासाठी, विजयासाठी स्फुरताती बाहू
सिंधुलोकमातेने स्नाने जन्म धन्य व्हावा!४

नामाचे सामर्थ्य जाणण्या पुनःपुन्हा बोलू
तीक्ष्ण बुद्धिच्या निकषावरती घासूनच घेऊ
मी न देह मी अवध्य आत्मा प्रबोध बाणावा!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२०.५.२००१

दासगणू महाराज

अंगठ्यातुनी गंगा यमुना झरताना दिसती
दासगणू ही पाहुनि लीला कितिदा गहिवरती!ध्रु.

"इथेच आहे तुझे प्रयाग
श्रद्धा ठेवुनि तैसा वाग"
या वचनाची साई शंकर झणि करती पूर्ती!१

स्नान मला गुरुचरणी घडले
कणाकणाने तन मोहरले
हात जोडुनी, नयन झाकुनी समाधिसुख घेती!२

साई झाले हृदयनिवासी
इथेच आता मथुरा काशी
पर्वकाल हा साई सद्गुरु साधुनि देताती!३

संतचरित्रे गात बसावे
साईकीर्तनि भान हरावे
नको नोकरी ती सरकारी दासगणू विटती!४

साईंनी मज स्नान घातले
मन हे अवघे निर्मळ केले
ख्यालीपण तर नकळत सुटले- सुटली आसक्ती!५

दर्शन लाभे झालो पावन
अंतर्बाह्य मी गेलो बदलुन
साईलीला अगाध ऐसी संतकवि वदती!६

महिमामृत हे सेवित जावे
आर्त जनांचे दुःख शमावे
हेतु न आता दुसरा कसला "पदसेवा" करिती!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
ऑक्टोबर १९७६

Friday, January 3, 2020

जो सावध तो शिकला..

प्रतिपळ सावध रहायचे, मज शिकायचे
मज शिकायचे!ध्रु.

वृक्ष वाकती फलभाराने मेघही झुकती जलभाराने
विनम्र तैसे बनायचे!१

टाकीचे ते घाव सोसणे, दगडातुन मूर्तीच प्रकटणे
प्रहार हासत साहायचे!२

क्षमा शिकावी भूमातेची, विशालता ती आकाशाची
दान करांनी करायचे!३

पाणी घाली फळे तयाला, दगड मारतो फळे तयाला
समदर्शी मज बनायचे!४

शिक्षणास या सीमा नाही, श्वास तोवरी शाळा राही
जीवनभर मज शिकायचे!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
मे २००१

Wednesday, January 1, 2020

गोपाळ गणेश आगरकर

स्वतंत्र विचार जिवंत निबंध
लोकांच्या क्षोभाची पर्वा नाही
रूढींचे बंधन स्त्रियांना जाचक
घणाघाती घाव लेखणीचे!

पत्र सुधारक पेटते अंगार
संपादना तोड नाही नाही
समाजधुरीण गोपाळ गणेश
चिरंजीव नाम झाले त्यांचे!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

आचार्य नरेंद्र देव

उपनाम जयाचे 'देव' तो 'नरेंद्र' ज्ञानी होता
अभ्यासक चिंतक थोर अंतरात दडला होता
'मी भारतीय' हा पाया सिद्धांता त्याच्या होता
सत्याग्रह मूल्या मान 'आचार्ये' दिधला होता

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

मित्रमेळा

प्लेगच्या संकटानंतर सावरकर कुटुंब नाशिकला आलं.
भारतभूच्या स्वातंत्र्याच्या विचारांनी तात्यांना ग्रासलं होतं.

नाशिकला त्यांना आपल्या विचारांचे आबा दरेकर, म्हसकर, पागे हेही मिळाले.  सारा मित्रमेळा जनजागृतीसाठी, स्वातंत्र्यासाठी सिद्ध झाला.

मित्रमेळा?  अभिनव भारताची गंगोत्री होती ती. एका दिलाचे, एका ध्येयाचे मित्र एका सुरात म्हणू लागले..
-------------------------------------

सजला मित्रमेळा! जनजागृतीच्या कार्याला सजला मित्रमेळा!ध्रु.

स्वातंत्र्य हाच ध्यास, स्वातंत्र्य हीच आस
आशा फुलावयाला, सजला मित्रमेळा!१

शिवराय नित्य ध्याऊ, शिवराय नित्य गाऊ
चैतन्य द्यावयाला, सजला मित्रमेळा!२

व्रत घ्यायचे स्वदेशी, भक्ती असो स्वदेशी
स्वत्वास निर्मिण्याला - सजला मित्रमेळा!३

जातीयता सरावी, राष्ट्रीयता भरावी
जनतेस भारण्याला, सजला मित्रमेळा!४

सूचकता साधन अपुले, दास्यमुक्ती साध्यच ठरले
पुरुषार्थ प्रेरण्याला, सजला मित्रमेळा!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(काव्यमय सावरकर दर्शन)