Friday, May 31, 2024

रामनाम, रामनाम, रामनाम गाऊ! मीहि राम, तू हि राम, त्यात राम पाहू !

रामनाम, रामनाम, रामनाम गाऊ!
मीहि राम, तू हि राम, त्यात राम पाहू!ध्रु.

ज्ञान नाहि भले नसो
राम अंतरात वसो
सद्भावे अनुभवुया देह हाच देहू!१

कर्तेपण जर सुटले
मन गंगाजल झाले
रामरंगि रंगुनिया रामरूप होऊ!२

विषयांचा कांचनमृग
भुलवुनिया करि तगमग
जाणुनि हे, रामचरण घट्ट धरुनि राहू!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
सोहनी, दादरा

(गोंदवलेकर महाराज प्रवचन २८४, १० ऑक्टोबर वर आधारित काव्य)

Tuesday, May 28, 2024

माझे मुखी राहो नाम करी एवढे श्रीराम!

माझे मुखी राहो नाम
करी एवढे श्रीराम!ध्रु.

नाम तुझे मज सुधा
शमवीते सारी क्षुधा
वाटे व्हावे मी निष्काम!१

उणे त्याची खंत नसो
ज्यास्त त्याचा गर्व नसो
मन व्हावे प्रेमधाम!२

जनां खायाला घालावे
डोळे भरुनी पहावे
दिसो जनी आत्माराम!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज प्रवचन क्र. २११, २९ जुलै वर आधारित काव्य.

पुष्कळ मंडळी यावीत, आलेल्याला खायला घालावे, आणि
भगवंताचे नाम घ्यावे, या तीन गोष्टी मला फार आवडतात. त्या जो करील त्याच्या हयातीत त्याला कधीही कमी पडणार नाही. जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो, त्याच्या प्रपंचात मी आहे. माझ्या माणसाने प्रपंचात हेळसांड केलेली मला आवडायची नाही. उलट, इतरांच्यापेक्षा त्याने जास्त दक्षता दाखवली पाहिजे. कमी आहे त्याची काळजी न करता, जास्त असेल तर त्याविषयी ममत्व न ठेवता, जो येईल तसा खर्च करतो, तो मनुष्य ते सर्व मला देतो.

Sunday, May 26, 2024

कुटंबातील पाच


भगवंत आपला पिता नि माता 
(चला तया) वंदू!  भावभरे वंदू!ध्रु.

सद्‌बुद्धीचा श्रीहरि दाता 
कृष्णच कर्ता कृष्ण करविता 
सौख्याने नांदू!१

नरनारी हा भेद वरिवरी 
परस्परांचे ते सहकारी 
आत्मोन्नति साधू!२

गृहस्थ जणु हा श्रीनारायण 
गृहिणी लक्ष्मी भक्तिपरायण 
जोडीला वंदू!३

बंधू भगिनी पवित्र नाते
शिकवी प्रेमे वागायाते 
देव असा शोधू!४

चुकता चुकता शिकता येते 
नित्यचिंतने प्रगती घडते 
सुधारणा साधू!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, May 23, 2024

सोऽहं ध्यानी 'माधवनाथ' नेमाने ते भेटत आत!

सोऽहं ध्यानी 'माधवनाथ' 
नेमाने ते भेटत आत!ध्रु. 

जाता येता नाम स्मरता 
गीता ज्ञानेश्वरी ऐकता 
लाभाविण प्रीती करतात!१ 

मनात कुठला विचार नाही 
क्षणभर जर हे घडून जाई 
साधक ठाके हरिद्वारात!२

स्वरूप अपुले आनंदाचे 
नित्य जवळ ते असावयाचे 
श्रीहरि भवती तैसा आत!३ 

कोठे चुकते मला कळावे 
अवगुण माझे मीच त्यजावे 
सुधारणा हो हातोहात!४

देहाहुन मी पूर्ण निराळा 
अभ्यासे हा अनुभव दिधला 
श्रीस्वामी अनुसंधानात!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
२९/८/१९९५

श्रीगजानन महाराजांची २१ सूत्रे



गण गण गणात बोते !ध्रु.

न पाहिलेल्या शेगांवाला मन जाउन येते ! १ 

' सिद्धयोगि ' या गजाननाचे दर्शन घरि होते!२ 

अन्न न वाया जाऊ द्यावे, पूर्णपणे पटते!३ 

जसा मी तसा बाकी सगळे कळते अन् वळते!४ 

जितकी भक्ती तितकी प्राप्ती, चिंतन हे स्फुरते!५ 

देवळात जो, तोच अंतरी हे ध्यानी येते!६  

चून भाकरी साधे जेवण देवा आवडते!७ 

मरण यायचे लांबे परि नच कोणाला टळते!८ 

रोग मनाचे, ते देहाचे निदान हे सुचते!९ 

श्रीगजानन, जय गजानन कोणी गुणगुणते!१०  

दुसऱ्याचा कर विचार आधी, पोथी हे शिकवते!११ 

नर नारी हा भेद वरिवरी पोथीतुन कळते!१२ 

हासत आलो, जाऊ हासत पारायण ठसविते!१३ 

नका भडकवू कधी वासना संयमि हित असते!१४ 

अन्न, वस्त्र अन् हवा निवारा रयत हेच मागते!१५ 

यावे-जावे, खावे-प्यावे प्रेम घरां बांधते!१६ 

अन्न भुकेला, जळ तृषिताला अमृत हे ठरते!१७ 

शब्द जोडतो - शब्द तोडतो पोथीतुन कळते!१८ 

जसे बोलणे - तसे वागणे जाणति हे जाणते!१९ 

तिथी सप्तमी तिथी पंचमी ओढ मना लागते!२० 

हीच उजळणी, दिवेलागणी श्रीरामा पटते!२१


रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

२१.०९.१९९६

Friday, May 17, 2024

जे मन आत्मसुखा भोगे कसे ते विषयसुखी रंगे? .

जे मन आत्मसुखा भोगे
कसे ते विषयसुखी रंगे?
नच ते विषयसुखी रंगे!ध्रु.

मृगजळ आले वाहुनि गेले
प्रचंड पर्वत जरा न हाले
समदृष्टीचा संत विरागी रमला देवासंगे!१

मेघच्छाया येत न कामा
मना मोहवी जरि अभिरामा
विषय देत जे सुखाभास ते इंद्रियसंयोगे!२

शाश्वत सुख नच विषय देतसे
जहर का कधी सुधा होतसे ?
सर्पफणा का देते छाया, घातक ठरे प्रसंगे!३

विरक्ति काठी टेकू देते
झंझावाती तोल राखते
निश्चयबंधू सहाय्य देता योगाभ्यसनी दंगे!४

अहंकार मन बुद्धि न उरती
ब्रह्मसुखांतरि विरुनी जाती
जिवाशिवांचा मिलनसोहळा ऐसा अद्‌भुत रंगे!५

देहधारी हि तरी विदेही
ब्रह्मपदाला पावत तोही
वृत्ति मनांकित, नित्यानंदी, ब्रह्मानंदा भोगे!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

Thursday, May 16, 2024

अर्जुना झुंज तू!

भगवान अर्जुनाला म्हणाले- श्रेष्ठच जर आपल्या कार्यापासून कर्मापासून च्युत झाला तर अज्ञानी कनिष्ठांनी काय करावे?
अर्जुना हे युद्ध सोडून जाऊन आपल्या सैन्याला पळपुटा धर्म शिकवायचा का?

आपल्या वागण्याने जर लोकहितकारी आचारधर्माची रीत दाखविली नाही तर सामान्य लोकांच्या समोर आदर्श कोणता? - नियतीच हे युद्ध तुला खेळायला लावते आहे. चित्तवृत्ती आत्मस्वरूपी ठेव, पुन्हा रथारूढ हो. विजयी धनुष्य घे आणि लढण्याचा निश्चय  आणि धर्माची प्रतिष्‍ठा वाढव.
 
भगवंताच्या वक्तृत्वाचा ओघ स्फुरणदायी होता. शब्दाशब्दातून रणावेश प्रकट होत होता-

+++++++

होई निःशंक तू, हो निरासक्त तू
अर्जुना झुंज तू ! अर्जुना झुंज तू!ध्रु.

कर्म करशील जे
अर्पि चरणी स्वये
चित्तशुद्ध्यर्थ रे अर्जुना झुंज तू!१

ऊठ रे झडकरी
सज्ज हो सत्वरी
वीरवृत्ति स्फुरे थोर राजन्य तू!२

पृथ्वि भारावली
दुष्टता मातली
पार्थ निर्मत्सरा शर्थिने झुंज तू!३

जे निरासक्त ते
कर्म निर्दोष ते
विसर ममता अता सोडि कार्पण्य तू!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
३०.१२.१९७२

Sunday, May 12, 2024

भाउजी, इथेच बांधा कुटी!

श्रीराम जय राम जय जय राम!

मनि भरली ही पंचवटी, इथेच बांधा कुटी, 
भाउजी, इथेच बांधा कुटी!ध्रु.

शीतल गंधित इथला वारा 
पर्णकुटीचा सुखद निवारा 
गोदेचा हा सुरम्य परिसर ठसला नेत्रपुटी!१ 

इथे बहरली हिरवी सृष्टी 
श्रीरामांची खिळली दृष्टी 
तळ्यात डुलती असंख्य कमळे सुखावलीसे दिठी!२ 

अशी देखणी कुटी उभारा 
प्रासादाचा उतरो तोरा 
साधेपणही करताहे घर रसिकाच्या चित्ती!३ 

गोदेचे मी पाणी आणिन 
फुलझाडे मी असंख्य लाविन
फुललेल्या सुमनांची माळा घालिन पतिकंठी!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०६.०८.१९७३ 
दरबारी कानडा

Saturday, May 11, 2024

श्रीमंत तोचि ज्यास समाधान!

आपले आपण घेणे समाधान!
श्रीमंत तोचि ज्यास समाधान!ध्रु.

हवे पण जावे
पुरे पण यावे
जेथ नोहे चिंता तेथ समाधान!१

रामासंगे सुख
रामाविण दुःख
नामस्मरणाने लाभे समाधान!२

चित्त स्थिर व्हावे
भक्तीत रंगावे
रामावरि निष्ठा हेच समाधान!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज प्रवचन २२२, ९ ऑगस्ट वर आधारित काव्य

ज्याचे ‘ हवेपण ’ जास्त असते तो गरीब जाणावा, आणि ज्याचे हवेपण कमी असते तो श्रीमंत जाणावा. ज्याला नेहमी समाधान वाटते तोच खरा श्रीमंत. 
खरोखर, समाधानासारखे औषधच नाही. ते मिळत नाही म्हणून इतर औषधे घ्यावी लागतात. काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान, शांती आणि आनंद मिळतो.

Wednesday, May 8, 2024

मना संगती घ्यावे नाम मधुर मधुर गावे

मना संगती घ्यावे नाम मधुर मधुर गावे 
त्या दोघांची ओळख घडता तन हलके व्हावे!ध्रु.

राम रमवितो, कृष्ण ओढतो, हरि हा हारवितो 
ओंकाराच्या पाठबळाने भक्त अभय होतो 
चिंतन जेथे तिथे न चिंता, धरून चालावे!१

तन नत होते देवदर्शने, अमोल संस्कार 
सदैव बसणे प्रभुचरणांशी नमन सांगणार 
अनुसंधानी अगा अनंता भक्ता ठेवावे!२ 

कंठी धरतो भक्ता सुचवी तुळशीचा हार 
कर पाठीवर प्रेमळ प्रभुचा असाच फिरणार 
गंगायमुनांनी भक्ताला न्हाऊ घालावे!३
 
आळंदी देहू नि पंढरी घरीच असतात
माय रुक्मिणी तात विठोबा निश्चित असतात 
असे घराला उपासनेने मंदिर पण यावे!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

शांकर धनु आज कसे भंग पावले?

श्रीराम जय राम जय जय राम !

कडाड कड् , कडाड कड् ध्वनी उमट‌ले 
शांकर धनु आज कसे भंग पावले?ध्रु.

राम नव्हे पौरुष हे पुढती ठाकले 
त्या अजेय शिवचापा सहज स्पर्शिले
प्रत्यंचा ज्या क्षणि ते लावु लागले!१

कडकडाट भयद असा पृथ्वि डळमळे 
सूर्यरथाचे वारू स्वैर उधळले 
श्रीरामे कठिण पणा सहज जिंकले!२

आशीर्वच मुनि देती, उधळली फुले 
दुंदुभिच्या तालावर पडति पाउले
आज धरा धन्य अशा नरवरामुळे!३

पंचारति ओवाळिति गीत गाउनी-
नाचतात नर्तकि ही धुंद होउनी-
संशय, अज्ञान, गर्व लुप्त जाहले!४

वरमाला सीतेने कंठि घातली-
कनकगौर बाला ती लाज लाजली
नयनांतुनि भावमधुर दृश्य तरळले!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२१.०७.१९७३
खेमटा, तालगीत, लयबद्ध वाचन

Sunday, May 5, 2024

विनविते तुम्हां रघुनाथा - वनासी संगे न्या सीता!

श्रीराम जय राम जय जय राम !

विनविते तुम्हां रघुनाथा -
वनासी संगे न्या सीता!ध्रु.

थट्टा कसली भलत्या वेळी 
नाथा आपण असे मांडली?
सुखदुःखांतरि सोबत माझी -
कशास नाकारिता!१ 

धर्म न्याय्य जे तेच सांगते 
आज्ञा मज ही असे मानते 
सन्निध असता स्वामी आपण -
भय न शिवे चित्ता!२

संगे असता नाथा आपण 
पशू न बघतिल मजसी ढुंकुन 
भय दाखविता, मला टाळता 
कारण मुळि नसता!३ 

कंदमुळे आनंदे सेविन 
पत्निधर्म मी अचूक पाळिन 
विभिन्न देही एकच आत्मा 
ध्यानि न का घेता?४

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
२५.०७.१९७३
जोगी, आधा

त्या क्षणी रघुनाथा वरिले!

श्रीराम जय राम जय जय राम!

दुर्गामंदिरी, मी शुभयोगे, चरणकमल पाहिले 
त्या क्षणी रघुनाथा वरिले! ध्रु. 

नरश्रेष्ठ हा पणास जिंकिल 
संशय सगळे सहजचि फिटतिल
मनोदेवता विश्वासाने मजपाशी बोले! १

दुर्गापूजन मी करताना 
मनी उमलली नवी भावना 
मी जिव ते शिव नाते ऐसे आनंदे जुळवले!२

मानसपूजन श्रीरामांचे
गुणसंकीर्तन श्रीरामांचे
दुर्गापूजन नावापुरते हातुनि घडलेले!३

लज्जा भिववी, लज्जा खुलवी
लज्जा झुलवी, लज्जा नाचवि
दिवास्वप्न मी त्या विजयाचे औत्सुक्ये पाहिले!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
बिहाग आधा
मम आत्मा

अनित्य विषयी उदास व्हा नित्य ईश्वरा स्मरा स्मरा!

नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो हे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका
+++++++

अनित्य विषयी उदास व्हा
नित्य ईश्वरा स्मरा स्मरा! ध्रु.

भोगवासना खंडि साधना
अन्य कामना नको मना
मुखि रामाचे नाम धरा!१

बरवी शांती ती विश्रांती
संतोषच संतांची रीती
शांतिब्रह्मची मना करा!२

सच्ची तळमळ, गुरु भेटावा
विरक्ति उज्ज्वल ' काम ' जळावा
रामनामधर हरा स्मरा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज प्रवचन २०८, २६ जुलै वर आधारित काव्य. 

अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावे आणि नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे. नंतर, या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी. हे दुसरे साधन होय. आपले मन बाह्य विषयांकडे धाव घेते; तिथून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लावावे.

Wednesday, May 1, 2024

कथा ही भगवद्‌गीतेची!

ॐ 
कथा ही भगवद्‌गीतेची!

कथा ही भगवद्‌गीतेची 
सर्वांगाचे कान करूनी ऐकुन घेण्याची
मोह‌निरसनाची!ध्रु.

रणांगणावर सांगितलेली, शरण जाउनी ध्यानि घेतली 
घनांधकारी पुरी हरवली कर्तव्याची वाट गवसली 
आता कृती करायाची! १ 

आपण असतो निमित्त केवळ, कर्तृत्वाचा दावा पोकळ 
मी कर्ता बडबड ही बाष्कळ, मलाच फळ समजूत वेडगळ
विद्या अलिप्त असण्याची!२ 

देह येतसे तसा‌ जातसे त्याची चिंता कोण करतसे, 
स्वरूपात ज्ञानी राहतसे, हजार जखमा तो साहतसे 
झुंज ना सोडून देण्याची!३

कर्तव्याचे पालन करता तोष होतसे सदा अच्युता 
काय फलाची उगाच चिंता कृष्णच कर्ता कृष्ण करविता 
समाधि सहज साधण्याची!४

खचू न द्यावे मना कधीही नाम हरीचे अमृत होई 
ते पवनाला जोडून देई, तो मी अनुभव निश्चित घेई 
जगती असून नसण्याची!५

चालू क्षण साधावा आपण नाम स्मरु उजळाया जीवन 
तने झिजावे जैसे चंदन सद्‌गुरूंना आत्मत्त्वे वंदन 
साम्यता जगण्या यज्ञाची!६

योगेश्वर योगीश्वर होता ज्ञानाचा तो सागर होता 
मेघासम तो उदार होता वेणूचा ह‌ळवा स्वर होता 
मनाने तया भेटण्याची!७

विकारवश ना कधी व्हायचे विवेकास ना सोडायाचे 
आपण अपणा पहावयाचे पाठ गिरवणे सोसायाचे
पुस्तिका ही आचाराची!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
२५,२६ आणि २७ नोव्हेंबर २००१