Saturday, August 24, 2024

मी भगवंताचा आहे हा घोष करीत तू राहे!

मी भगवंताचा आहे 
हा घोष करीत तू राहे!ध्रु. 

मग समाधान अविनाशी 
लोळती पदी सुखराशी 
हा अनुभव घेउनि पाहे!१ 

मग दास्य नको इतरांचे 
आम्ही रामाचे, रामाचे 
हा ठेका धरुनी राहे!२ 

परमार्थ साधण्यासाठी 
हा प्रपंच साधन हाती 
जाणीव बाळगुनि राहे!३ 

रचयिता  : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १६५ (१३ जून) वर आधारित काव्य.

मी भगवंताचा आहे या जाणिवेने जगणाऱ्याला म्हणजे भगवंताच्या अनुसंधानात जगणाऱ्याला जे समाधान मिळते ते मीपणाने जगणाऱ्याला मिळत नाही. फार दिवस नोकरी केली की माणसाच्या मनाला गुलामगिरीची सवय लागते. हे चांगले नाही. नोकरी करीत असतानाच अनुसंधानाचा अभ्यास करावा म्हणजे पुढे नोकरी सुटल्यावर जितका वेळ मिळेल तितका अनुसंधानात जाईल. जगात जे आहे ते सर्व चांगले आहे, आपणच तेवढे बरे नाही. दरवाजे खिडक्या हे जसे घराचे साधन आहे किंवा आपल्या गावी जाण्यासाठी आगगाडी हे जसे साधन आहे त्याचप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी किंवा परमात्माच्या प्राप्तीसाठी प्रपंच हे साधन आहे. परमार्थाची जाणीव जेवढी दुःखात होते तेवढी सुखात असताना होत नाही. आपल्यासारखे दुसऱ्याला ओळखणे व त्याच्याशी तसे वागणे हाच परमार्थ होय.

प्रतिक्षण सार्थकि लावावा!

भरवसा न घडिचा, प्रतिक्षण सार्थकि  लावावा!ध्रु.

मी भगवंताचा, दुरावा इथे न कामाचा! 
राम एक माझा, असे मी नित्यचि रामाचा 
अहंभाव सगळा दयाळा समूळ निपटावा!१ 

शरण तया जावे, दुःख निज रामा सांगावे 
गायनि त्या गावे चरण ते कधी न सोडावे 
प्रपंच जर नेटका, तरी तो भावतसे राघवा!२

इच्छा रामाची, तिजपुढे मात्रा कोणाची? 
सृष्टी देवाची, खरोखर जगन्नियंत्याची
मीपण सकल सरे, जागृती येताक्षणि जीवा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १६९ (१७ जून) वर आधारित काव्य.

वाईट लोकांस सुधारणे हेच खरे कार्य आहे आणि तेच समर्थांनी केले. समर्थांनी सर्व जगाचा स्वार्थ पाहिला. प्रपंच सावधानपणे पण दक्षतेने करावा असे त्यांचे म्हणणे असे. प्रपंचात जर समाधान झाले नाही तर तो नेटका नाही झाला. प्रपंचाचे बंधन सुटावे लागते, जबरदस्तीने सोडून कुठे सोडता येते. पेन्शन घेतल्यावर परमार्थ करू हे म्हणणे बरोबर नाही. या गडबडीतच प्रपंचाच्या झटापटीतच परमार्थ साधावा. आपण विषयांना जसे शरण गेलो तसे भगवंताला शरण जावे. नोकरीत नाही का तुम्ही वरिष्ठाला शरण जाता मग जे पोटाकरिता करता ते भगवंताकरता का नाही करीत? सर्वात सोपे भगवंताला शरण जाणे आहे. त्याला निराळ्या कोणत्याही वस्तूची जरुरी नाही लागत. माझ्या मनात येईल तेव्हा भगवंतास शरण जाता येईल. भगवंतास शरण जाणे म्हणजे, मी त्याचा झालो असे म्हणणेच होय. मी रामाचा झालो; जे जे होते ते रामइच्छेने होते असे जो म्हणतो त्याला निराळी सावधगिरी ठेवावी लागत नाही.

Thursday, August 22, 2024

मी झटताहे दुसऱ्यासाठी, नको नको (न धरी हा) अभिमान!

मी झटताहे दुसऱ्यासाठी, नको नको (न धरी हा) अभिमान!
सेवा घडते भगवंताची मानत भक्त सुजाण!ध्रु.

कुणी न दुसरा ध्यानी घ्यावे
सर्वांतरि रामास पहावे -
नामी रमता गळे "मीपणा" मन हो शांति ठिकाण!१

सेवेची नित संधी घ्यावी
भक्तिपर्वणी ती समजावी
बहुवेषे भगवंत विनटला इकडे द्यावे श्यान!२

तव सेवेचा लाभ दिलासी
कृपा करुनि आपणिले मजसी
अशीच सेवा घडवी पुढती हे राखावे भान!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १४८ (२७ मे) वर आधारित काव्य.

प्रत्येक मनुष्याला परोपकाराची बुद्धी असणे अत्यंत जरूर आहे. परोपकाराची बुद्धी व प्रयत्न असणे जरूर आहे परंतु परोपकार म्हणजे काय, व त्याचा दुष्परिणाम न होऊ देता तो कसा करता येईल हे पाहणे आवश्यक आहे. भगवंताची सेवा या भावनेने दुसऱ्याकरिता केलेली मेहनत याला परोपकार म्हणता येईल व त्यापासून नुकसान होण्याची भीती नाही. परंतु हे वाटते तितके सोपे नाही. कारण मनुष्याची सहज प्रवृत्ती अशी की, थोडेसे काही आपल्या हातून झाले की ते मी केले, मी असा चांगला आहे, अशातऱ्हेचा विचार येऊन अभिमानाला बळी पडावे व यासाठीच परोपकार न झालेला बरा असे म्हणावे लागते. सबब ज्या ज्या वेळी दुसऱ्याकरिता काही करण्याची संधी मिळेल त्या त्यावेळी तिचा फायदा घेऊन मनाला अशी शिकवण द्यावी की "देवा, तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास ही माझ्यावर कृपा झाली, व अशीच कृपा ठेवून आणखी सेवा करून घे." ही विचारसरणी जागृत राहिली तरच परोपकाराचे फंदात पडावे. मनाच्या या ठेवणीमुळेच जर आपल्या हातून दुसऱ्याचे कधीकाळी एखादे काम होण्याचा योग आला, तर मी दुसऱ्याचे काम केले ही जाणीव होऊन अहंकार झपाट्याने वाढू लागतो. म्हणून परोपकाराच्या बाबतीत अत्यंत सावध राहण्याची सूचना सर्व संतांनी दिली आहे. नामात राहिले म्हणजे अहंकार नाहीसा होऊन सावधनात सावधानता येते व चित्त शांत होते.

Tuesday, August 20, 2024

मागणे माझे सरू दे हीच आता याचना!

स्मरण राहो तव सदोदित केशवा, नारायणा! 
मागणे माझे सरू दे हीच आता याचना!!ध्रु.

तूच कर्ता तूच दाता 
तूच भोक्ता तू विधाता 
हे कळावे, हे ठसावे ही रुजू दे भावना!१ 

आपला म्हण, नुरवि मीपण 
क्षुद्र जीवन, तुज समर्पण 
सकल तूची सकल तूझे माझिया जगजीवना!२ 

तिमिर दाटे, रुतति काटे 
भीति वाटे, कंठ दाटे 
नामदीपक, तिमिरनाशक करि असू दे त्या क्षणा!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १४९ (२८ मे) वर आधारित हे काव्य.

संकटकाळी, हे संकट नसावे असे न वाटता परमेश्वराचे स्मरण असावे व त्याचे जवळ हे मागावे की देवा मला तुजजवळ काहीहि मागण्याची इच्छा देऊ नको. देहास मुद्दाम कष्ट देऊ नये, पण जेव्हा ते आपोआप येतात तेव्हा मात्र ते आनंदाने सोसावेत. प्रपंच मिथ्या मानावा व जो मिथ्या तो बरा असे वाटण्यात काय अर्थ? तुमचा परमार्थही तुमच्या स्वाधीन नाही, तो सद्गुरूच तुमच्याकरिता करत असतात. तेव्हा तुम्ही कशाचीही काळजी करू नये, जे होईल त्यात आनंद मानीत राहावे. प्रपंच देवाचा मानून अभिमानरहितपणे तो करणे हा परमार्थ. देवापाशी "मला तू आपला म्हण, मन तुझ्या चरणी अर्पण केले, मला तुजजवळ काहीहि मागण्याची इच्छा न होवो," असे मागावे. भगवंताची मनापासून प्रार्थना करावी, आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवतो. अंधारामध्ये वाट चालत असता एक क्षणभरच वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले असता पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते.

Monday, August 19, 2024

साह्य देई, साह्य देई आत्मबलसंवर्धना!

चरणि माथा ठेविला रे दशरथाच्या नंदना!
साह्य देई, साह्य देई आत्मबलसंवर्धना!ध्रु.

देहबुद्धी ओसरावी 
व्यंकटी माझी नुरावी 
संकटे जरि धाडिली तू झुंजण्या दे प्रेरणा!१ 

भोग भोगू दे सुखाने 
भक्ति घडु दे तनमनाने 
शरण आलो मी वरेण्या तूच देगा चेतना!२ 

सद्गुरूंचा बोध तू रे 
अद्वयाचे सौख्य तू रे
सर्वकाली तुज स्मरावे सफल कर ही साधना!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १४३ (२२ मे) वर आधारित काव्य.

आलेल्या परिस्थितीस तोंड देऊन समाधानाने राहण्याने आत्मिक बळ वाढते. आत्मिक बळ वाढणे म्हणजे देहबुद्धि कमी होणे. भोग समाधानाने भोगण्यात पुरुषार्थ आहे. दुखणे भोगायचेच आहे तर ते समाधानाने का नाही भोगू? दुखणे आले असता, त्याची उपेक्षा करावी म्हणजे आपोआप ते कमी होईल. 
माझी सेवा तुम्ही जी करता ती तुम्ही आपल्या देहबुद्धीची केली, तुम्हाला जे पसंत तसे तुम्ही केले. वास्तविक,  माझी सेवा म्हणजे मला जे आवडते ते करणे माझ्या आज्ञेत राहणे, नामस्मरण करणे, सर्वाभूती भगवद्भाव ठेवून कोणाचेही मन न दुखवणे, परमात्मा सर्व करतो अशी भावना ठेवणे.

Sunday, August 18, 2024

देह जाणार जाणून, चित्ती राखा समाधान!

देह जाणार जाणून, चित्ती राखा समाधान!
धरा विश्वास रामाचा, करा राघवाचे ध्यान!१

लोभ नकोच देहाचा, छंद लागू दे नामाचा 
देवावर भार ज्याचा, तोच पार पोचायाचा!२ 

सख्य रामाशी करावे, दुःख तयाला सांगावे 
रामराय जेणे पावे, नामसाधन करावे!३

जे जे झाले होउनि गेले, येणारे ते येवो भले 
रामाहाती देती वल्हे, तेचि तरले तरले!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ६० (२९ फेब्रुवारी) वर आधारित काव्य.

चित्तात ज्याचे राहिले समाधान! तोच भगवंताचा आवडता जाण!
माझे हित रामाचे हाती हा धरिता विश्वास! समाधान मिळत असे जीवास!! 
देहाच्या लोभात न सापडावे!!
कर्तव्याची ठेवावी जागृति! त्यात भगवंताची राखावी स्मृति!! 
देहाचे अस्तित्व भगवंतासाठी! याहून नाही दुजी उच्च प्राप्ति!!
आता रामा एकच करी! तुझा विसर न पडो अंतरी!! आता जसे असेल तसे होऊ द्यावे! रघुनाथभजनी असावे!! मागील झाले होऊन गेले! पुढील येणार येऊ द्यावे भले!! कारणास्तव येणे झाले! आता काम संपले! आता न धरावा हव्यास! हेच वाटे जीवास! जे जे करणे आणिले मनी! रामकृपे पावलो जगी! आता माझे काही दुसरे मागणे नाही!!

Thursday, August 15, 2024

विषय विसरावे, भगवंता हृदयि भरावे!

विषय विसरावे, भगवंता हृदयि भरावे!ध्रु.

अवीट असतो श्रीभगवंत 
नामि कोंडिती तयास संत 
नाम घोकावे, देवाचे व्हावे व्हावे!१ 

प्रपंच करु कर्तव्य म्हणून 
कमलपत्रसम अलिप्त राहुन 
संतसंगाने भवसिंधू तरुनी जावे!२

संते दिधला प्रभु आधारा 
भगवद्भक्ती देत निवारा 
असे बोलावे, जे झडकरि कृतीत यावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ११६ (२५ एप्रिल) वर आधारित काव्य. 

आपले हृदय विषयांनी इतके भरले आहे की तिथे भगवंताच्या प्रेमाला जागाच राहिली नाही. या हृदयाचा संबंध भगवंताशी जोडण्यासाठी आपल्या हृदयातील सामान (म्हणजे विषय) खाली करून त्याच्या जागी भगवंताचे प्रेम भरणे जरूर आहे. जी वस्तु आपल्याला कितीही मिळाली तरी तिचा वीट येणार नाही अशी वस्तु आपण मिळवावी.  अशी वस्तु एकच आहे ती म्हणजे भगवंत होय. भगवंताने आपले नाम संतांस दिले. त्यामुळे संत जे करतील त्यास मान्यता देणे भगवंतास जरूरच आहे. संत हा जसे बोलतो तसे वागतो. आपण बोलतो चांगले आणि वागतो मात्र त्याच्या उलट. आपण सुख हवे असे म्हणतो आणि प्रपंच करतो म्हणून नेहमी दुःखाने रडतो. यासाठी आपण अशी कृती करू या की आपल्याला नंतर तसे बोलता येईल. मोठमोठ्या संतांनी प्रपंच केला खरा, परंतु तो सुखासाठी केला नाही. आपल्या वृत्तीपासून न ढळता इतरांना तारण्याचे काम संतांनी केले. संतांनी आपल्याला परमात्म्याचा आधार दिला. जो संताजवळ राहतो तोही संतच बनतो. काही कष्ट न करता परमार्थ साधणे हेच सत्संगतीचे महत्त्व आहे. ज्याचे चित्त आणि वित्त भगवंताकडे असते तोच खरा संत होय. संत हे आपला संबंध भगवंताशी जोडतात.

Wednesday, August 14, 2024

भगवंताची नड वाटू दे, प्रपंचात या घडोघडी हीच प्रार्थना रामपदी!

भगवंताची नड वाटू दे, प्रपंचात या घडोघडी 
हीच प्रार्थना रामपदी!ध्रु.

राम माय मी तिचे लेकरू 
राम गाय मी सान वासरू 
ऐसी तळमळ अंत:करणी, वाट पाहतो येत कधी?१ 

श्वासासम मज राम हवासा 
त्या रामाचा खरा भरवसा 
दुसरे काही नलगे मजला अशी भावना होत कधी?२ 

ईशप्रीती येइल शोधत 
नामाची घेउनिया सोबत -
आस एकली, मनात जपली भाविक भक्ताने साधी!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ८३ (२३ मार्च) वर आधारित काव्य.

प्रपंचात भगवंताची नड आहे असे वाटले पाहिजे.
भगवंताची कृपा आपल्यावर असावी. नामाचे प्रेम आपल्याला यावे असे वाटते पण हा अनुभव आपल्याला का बरे येत नाही. भगवंत नसेल तर माझे चालणार नाही, माझ्या समाधानाला त्याची अत्यंत गरज आहे असे आपल्याला मनापासून वाटतच नाही. प्रपंचाची स्थिती कशीही असो मला भगवंत हवाच असे आम्हास तळमळीने मनापासून वाटत नाही. प्रपंचात आम्हाला सुख मिळेल ही आमची कल्पनाच नाहीशी व्हावयास पाहिजे. प्रपंच आम्हास शाश्वत समाधान देऊ शकत नाही हे एकदा निश्चयाने ठरले, म्हणजे मग भगवंताची गरज आम्हाला भासू लागेल व मग त्याच्या प्राप्तीसाठी आम्ही केलेल्या प्रयत्नाचे आड जग, परिस्थिती वगैरे काही येऊ शकणार नाही. भगवंत मला पाहिजेच हे विचाराने ठरवल्यानंतर, त्याचे प्रेम आम्हास यावे असे आपल्याला वाटू लागेल.

Sunday, August 11, 2024

भूपाळी हरिपाठाची

 हरिपाठा ये कंठी माझ्या, आस तुझी लागली! 
"हरि, हरि" म्हणतां हरिपाठा तव स्फुरली भूपाळी!ध्रु. 

"राम‌कृष्णहरि" जपे वैखरी मन निर्मळ बनले 
अरे मोहना मोहपाश मग तटा तटा तुटले 
हरिनामाचे पठण हीच रे गमली दिपवाळी!१ 

विषयि गुंतणे हा तर असतो स्वभाव गात्रांचा 
हरिपाठा तू मना उलटवी विनवित मी कधिचा 
समाधिसुख दे नामघोष नित, तू मज सांभाळी!२ 

हरिनामाविण दुजे न जगती तेच तेच रुचते 
सात्त्विक, सुंदर, अन्नब्रह्म ते पोषक बहु ठरते 
मौनावे तधि ज्ञानाईने माळ हृदी धरली!३ 

"पांडुरंग हरि, वासुदेव हरि" सहजच मी वदतां 
उच्चारणि या मोक्ष लाभला मोद न या परता 
काळ वेळ या नामा नाही तनु झाली मुरली!४ 

हरि पाहुणा मत्प्रिय व्हावा हरि गीती गावा 
सोऽहं चा स्वन मंजुळ काढी मम तनुचा पावा 
हरिविण वाया येरझार ही ज्ञानाई वदली!५ 

कळिकाळाला रीघच नाही हरि हरि म्हणतांना 
जन्म जाहला सफळ वाटतो मीपण सरताना 
अमृत लाजे अशी मधुरता हरिनामी भरली!६ 

आत्मसुखाची चटक लावसी, ऋण कैसे फिटणे
कर जोडुनियां "हरि, हरि" म्हणुनी नयनदले मिटणे 
श्रीरामासी बाळगुटी ही किति किति मानवली!७ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
कार्तिक शु. १२, . २२-११-१९७७.

दोष देवासी देऊ नका! चूक आपली झाकू नका!

दोष देवासी देऊ नका!
चूक आपली झाकू नका!ध्रु.

प्रपंच का मानिता सुखाचा? 
रामनाम नच घेई वाचा 
खटपटीत जाता जन्म फुका!१ 

साध्य कोणते कळले नाही 
साधन हाती धरले नाही 
वासना कधी सुख देईल का?२

ओळखले ना 'कोण असे मी' ? 
पाहिले न कधि अंतर्यामी 
नश्वर देहा लागता धका!३ 

तृप्त न होते कधी वासना 
रामाजवळी तिचा वास ना 
कळुनिया अंतरी वळत न का?४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ८७ (२७ मार्च) वर आधारित काव्य.

प्रापंचिकाच्या मनात शंका येते की सन्मार्गाने गेला तरी माणूस दुःखी का होतो? मी देवाला भिऊन वागलो, का? तर प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून. देवाची एवढी खटपट करून जर सुखी होता येत नाही तर काय उपयोग? प्रपंचात दक्षता ठेवणे जरूर आहे. ते जर आपण केले नाही तर देवाने काय करावे! भगवंताचा साधन म्हणून आपण उपयोग करतो व शेवटी साधनालाच दोष देतो. साध्य बाजूला राहते. भगवंत विषय देईल पण त्याबरोबर त्याचे दुःखही देईल. मी कोण? हे जोवर आपण ओळखत नाही तोवर वैभवाच्या शिखरावर जरी गेलो तरी आपल्याला समाधान मिळणार नाही. देहच सत्य नाही तर त्यावर उभारलेली इमारत कुठून सत्य असणार? वासना मारायला भगवंताचे अधिष्ठान हाच एक उपाय आहे. वासना ही कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून आपण जर भगवंताजवळ ' वास ' ठेवला तरच ती नष्ट होते.

Saturday, August 10, 2024

सुजन हो, सत्यच नारायण!

सत्याची व्याख्या कशी करणार? सत्य नारायण आहे, सत्य सनातन आहे, सत्य अजर आहे, अमर आहे! सत्य थोर नैतिक तत्त्व आहे. प्राणप्रणाने जपण्यासारखी वस्तू सत्यच आहे. श्रीसत्यनारायणाच्या पूजेच्या निमित्ताने सत्याचे व्रत घ्यायचे.
बिंदुने सिंधू बनून जायचे. तीर्थप्रसाद घ्यायचा. सत्य महिमा ऐकायचा. सत्याग्रही बनायचे. आळवून, आळवून गुणगुणायचे. 
++++++++

सत्यच नारायण 
सुजन हो, सत्यच नारायण!ध्रु. 

सत्य वदावे, सत्य श्रवावे 
सत्यवचन भजन!१ 

सत्य अबाधित, सत्य प्रकाशित 
सत्यदेव दर्शन!२

व्रत सत्याचे आज घ्यायचे 
या नच उद्यापन!३

प्रसाद घ्यावा, प्रसाद द्यावा 
करीत मधुभाषण!४

 
प्राणपणाने सत्या जपणे 
सार्थ तरी जनन!५ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
(सुजनहो, सत्यच नारायण मधून)

अभिमान दूर व्हावा - चरणी मिळो विसावा!

अभिमान दूर व्हावा -
चरणी मिळो विसावा!ध्रु. 

मन काही आवरेना 
क्षण स्वस्थ बैसवेना 
आधार तूच द्यावा!१ 

तव नाम आळवावे 
माझ्या मना कळावे 
पथ भक्तिचा दिसावा!२ 

कर्तेपणा न बाधो 
संयोग तुजशि साधो
सरु दे पुरा दुरावा!३ 

रचयिता :  श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३६१ (२६ डिसेंबर) वर आधारित काव्य.

जगात आजपर्यंत पुष्कळ लोकांनी दानधर्म स्वार्थत्याग केला पण त्यांच्यामध्ये कर्तेपणाची जाणीव राहिल्याने खऱ्या अर्थाने त्यांना निस्वार्थी बनता आले नाही. खरे म्हणजे आमचे मन आमचे ताब्यात आल्याशिवाय आम्हाला निस्वार्थी बनता येणार नाही. मन ताब्यात यायला सध्याच्या काळात नामस्मरणाशिवाय दुसरे साधनच नाही. ते मन स्वाधीन होण्यासाठी सर्वांनी मनापासून नाम घ्या. ह्या अभिमानासारखा आपला घात करणारा दुसरा शत्रू कोणी नसेल. तो अभिमान सोडायला आपण शिकले पाहिजे. तो अभिमान नाहीसा करण्यासाठी आपण कर्तेपणाची जाणीव सोडून नाम घेतले पाहिजे. नीतीच्या बंधनात राहणाऱ्या माणसाचे विकार आपोआप आवरले जातील. आपले मन भगवंताकडे विनम्र करा. तुम्ही भगवंताकडे जाऊ लागा, मन आपोआप तुमच्या मागे येईल कारण तो त्याचा धर्म आहे. भगवंताला विसरू नका. तुमचे मन तुम्हाला आपण होऊन सहाय्य करेल याची खात्री बाळगा.

Wednesday, August 7, 2024

मन लागो राघवचरणी!

राम राम वदू दे वाणी 
मन लागो राघवचरणी!ध्रु. 

रामाचा धरता नेम 
नामात उतरते प्रेम 
माधुरी येतसे वचनी!१ 

नामाचा अनुभव घ्यावा 
सोऽहं स्वन कानी यावा 
घ्या दर्शन मिटल्या नयनी!२ 

जे माझे ते ते त्याचे 
ऐश्वर्य सर्व रामाचे 
मग मनपवनांची मिळणी!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२३.०२.१९७९

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ५४ (२३ फेब्रुवारी) वर आधारित काव्य.

प्रत्येक शब्दात रामच आहे असे ज्यांना वाटते त्यांची तयारी काही निराळीच असते. प्रल्हादाने नामावर जसे प्रेम ठेवले तसे आपण ठेवावे. नाम घेऊन नामाचा अनुभव घ्यावा. विषयाचा घाला जेव्हा पडतो तेव्हा नामाची आठवण ठेवा. कोणालाही कोठेही खुपू नये. आपण हवेसे वाटावे. आपण निस्वार्थी झालो तरच हे साधेल. सत्कर्मानंतर आपली स्तुती ऐकायला साधकाने तेथे उभे सुद्धा राहू नये. माझे सर्व आहे ते त्याचेच आहे. त्याचे तो पाहून घेईल. तो जे करील ते सर्वांच्या हिताचेच करील. उद्याचा दिवस त्याच्या इच्छेनेच यायचा आहे. आपले मन मारा असे न सांगता आपले मन भगवंताकडे लावा असेच संत आपल्याला सांगतात. आपण भगवंतासाठीच नाम घ्यावे.

Sunday, August 4, 2024

विषयांचे सुख मायावी!

विषयांचे सुख मायावी! 
विषयांचे सुख मायावी!!ध्रु.

ते न खरे सुख, इंद्रियकौतुक 
वरि वरि मोहक अंतरि घातुक 
खरी जाण ही कशि यावी?१ 

मदिरेसम हे झिंग आणते 
दरवेशापरि ते नाचविते 
विटंबना मोठी दैवी!२ 

हीच न्यूनता प्रपंचातली 
रामभक्तिने भरुनि निघाली 
संतसाक्ष ध्यानी घ्यावी!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ८६ (२६ मार्च) वर आधारित काव्य.

प्रपंचातील विषयसुख हे खरे सुख नाही. न्यूनता नाही असं प्रपंचच नाही. विषयातील सुख परावलंबी विषयांवर अवलंबून असते. विषय हे नश्वर, आपल्यापासून कधीतरी जाणार. निदान आपल्याला तरी त्यांच्यापासून एक दिवस जावे लागणार. दुसरी गोष्ट म्हणजे विषयांचे सुख इंद्रियाधीन असते. इंद्रिये विकल झाली म्हणजे सुख कसे मिळणार? जे सुख होतेसे वाटते ते आपल्यातच असते आणि ते विषयांपासून मिळते अशी आपली फसवणूक मात्र होते. मी कोण? कशासाठी आलो? असा विचार करणे याला सारासार विचार म्हणतात.