भगवंताने दिले कितितरी, ते तर अपुल्या गावी नाही!
"हवे मला हे, हवे मला ते," हाव हावरी संपत नाही!ध्रु.
परमार्थाचा भरला हाट
भक्ति चाललीसे दिनरात
आम्ही करंटे असे की आम्हा भजनाची तर गोडी नाही!१
भगवंताची वत्सलता
थोडीहि न ध्यानी घेता
कृतघ्नतेने तया निंदितो या कृत्याची लाजच नाही!२
शोध लागती, सोयि वाढती
नीतिबंधने ढिलीच होती
माणुसकीचा हिरा हरविला खुळ्या माणसा पत्ता नाही!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ८१ (२१ मार्च) वर आधारित काव्य
माणसाला कितीही दिले तरी त्याची हाव कायमच राहते. इतका परमार्थाचा हाट भरला आहे. भजन, पूजन चालू आहे परंतु आपल्याला त्याचे प्रेम नाही. त्याची आवडच वाटत नाही. आपल्याला त्याची खरी भूकच लागलेली नाही. आपण दरवर्षी वारी करतो आणि करतच राहणार परंतु परमेश्वराचे प्रेम मात्र काही लागत नाही. खरोखर भगवंताने आपल्याला आपल्या कल्पनेपेक्षा किती तरी जास्त दिले. परंतु अजून आपली हाव काही थांबली नाही. या सर्वांना पुरून, या सर्वांचे भस्म करून आपली हाव कायमच आहे, हे असं किती दिवस चालणार मानवी जीवन सुखी झाले तर ती सुधारणा म्हणायची. उलट आजची स्थिती पहावी तर सुधारणा जितक्या जास्त, तितका माणूस जास्त असमाधानी झाला आहे. आपण नुसते नीतिधर्माने चालतो, आपली वागणूक वाईट नाही हे खरे, पण याचे कारण आपल्याला वाईट वागण्याची भीती वाटते. वाईट वागल्यास लोक नावे ठेवतील अशी भीती. अशी ही वरवरची सुधारणा, असा दिखाऊ चांगुलपणा काय कामाचा? परमेश्वराचे प्रेम लागल्याशिवाय व इतर गोष्टींची हाव कमी झाल्याशिवाय काही फायदा नाही. तीर्थक्षेत्रे, पूजा, भजन वगैरे केल्याने अंतरंग सुधारेलच असे नाही; आणि अंतरंग सुधारले नाही तर बाकीच्यांचा उपयोग नाही. तीर्थक्षेत्रे ही परमार्थाची नुसती आठवण ठेवतील.