Thursday, November 30, 2017

श्रीगीतामृत नवनीत.

श्री गीतामृत नवनीत

भ्याला अर्जुन? मुळीच नाही भ्रमजाळी तो गुरफटला
धर्म कळेना कर्म घडेना शस्त्र टाकुनी हिरमुसला ! १

मरणालागी भिणे कशाला मृत्यु कुणाला टळलेला?
देहांतर स्वाभाविक मनुजा ज्ञानी ना कधी घाबरला ! २

आपण आपुले कर्म करावे मनापासूनी ही भक्ती
कर्मि कुशलता साधकास दे आत्मबलाची श्रीमंती ! ३

संयमनाने निजप्रयत्ने नैतिक उन्नति साधावी
अंकित जे मन दे हित साधुन घडी कारणी लावावी ! ४

निजकर्तव्या करता करता ज्ञानातहि भर घालावी
ज्ञाने लाभत शांति मनाला समता हळु हळु साधावी ! ५

ज्ञानी कर्म नि कर्मी ज्ञान जाणताच हे जाणतसे
तोल मनाचा भक्त हरीचा योगी रमुनि राखतसे ! ६

नामाचा रथ ध्यानाचा पथ पुढे पुढे तुज जाण्याचे
सारे सात्त्विक भाव उमलता दर्शन होईल कृष्णाचे ! ७

गीतामुरली कानी यावी अंतरातुनी गोपाला
सोsहं सुस्वर भूपाळीचे जागविती मनि देवाला ! ८

योगाभ्यासे आवरले मन विनीत जेथे होत असे
तेथे स्वमने अपणा बघता आत्मरूप ते विश्व दिसे ! ९

अतींद्रियचि सुख हे अनुभविता तत्त्वच्युत ना नर होतो
लाभ कायसा याहुन दुसरा? योगी नारायण बनतो ! १०

साधनेत जरि शरीर गेले चिंता येथे कोणाला?
उत्साहाचे अमृत प्यालो कृपा तुझी रे गोपाला ! ११

मरणभयाला नाशायाला गीता आहे अवतरली
भक्ति शिकवते ज्ञान मुरवते सत्कर्मा प्रेरक ठरली ! १२

कृष्णार्पण जो कर्मे करतो पापपुण्य त्या लागत ना
मन झाले गंगाजळ निर्मळ अपार श्रीहरिची करुणा ! १३

पान फूल वा पाणी दिधले आवडले बहु आवडले
भाविक भक्ता बघता बघता मानस माझे परिमळले ! १४

परमात्म्याचे चिंतन करता सहज साधते समरसता
ध्याता ध्याता श्रीभगवंता विरताती सगळ्या चिंता ! १५

चुकलो त्याची खंत कशाला सुधारण्याचा ध्यास धरी
शुभसंस्कारे येत शुद्धता गुण मिळविण्या यत्न करी ! १६ 

स्वरूपबोधावरती येउन निर्मम निर्भय मी व्हावे
शक्तिस्फूर्ति प्रताप यांचा प्रपात मज बनता यावे ! १७

अंत:स्थित बल ते ऊर्जस्वल अंतरास या जाणवता
पूर्णत्वाच्या आविष्कारे जीवनही होई कविता ! १८

अंतरिच्या शक्तीच्या शोधे देही दिसताहे देव
साधक जपतो सदैव हृदयी सद्भावाची ही ठेव ! १९

सेवेचा आनंद आगळा जनी जनार्दन पाहु या
माणुसकीचा मंत्र आळवित शिवास पूजत राहू या ! २०

देव असे सकलांच्या हृदयी पाया आहे गीतेचा
मंदिर कर्माने रचलेले कळस चढविला भक्तीचा ! २१ 

कृष्णाईची धरुनि अंगुली आनंदाने चालावे
अंगुलि सुटता “आई, आई” ऐसे म्हणुनी क्रंदावे ! २२

स्वभाव तैसे कर्म घडतसे सत्त्वगुण मनी वाढ़ू दे
उदात्त उन्नत होवो मानस जनी जनार्दन पाहू दे ! २३

सत्त्वगुणांची वृद्धी घडता सुख येई हासत दारी
विवेक दावी वाट सरळ ती आदेशा त्या अवधारी ! २४

संवादातुनि सुख झुळझुळते प्राशावे या कानांनी
स्फूर्ति लाभते जीवन फुलते अज्ञानी होतो ज्ञानी ! २५

श्लोक जरी एकेक वाचला जीवन अवघे बदलेल
मांगल्याचा गंध आगळा कृतीकृतीला येईल ! २६

ध्यानाचा त्या ध्यास धरावा अभ्यासाची या गोडी
हलके हलके अनुभविता मग सहजच उलगडती कोडी ! २७

गुण चिंतावे आनंदावे चैतन्याचा वास तिथे
वस्तु व्यक्ती यांच्या उगमी ईश्वरीय शक्ती वसते ! २८

आत्मसंयमन शुद्ध आचरण गुणवैभव हे जोडावे
मनने ध्याने उपासनेने विश्वात्मक भक्ते व्हावे ! २९

आत्मिक आनंदाच्या पुढती तुच्छ तुच्छ ते उपभोग
दु:खातहि जर ढळे न शांति मन:स्थिती ऐसी योग ! ३०

तत्त्वची अवतरले भूवरती कृष्णाच्या या रुपाने
कर्माचरणे जगा दाविले शिष्योत्तम श्रीपार्थाने ! ३१

गीतामृतनवनीत त्वा दिले कृपावंत सद्गुरुराया
कृतार्थ झालो मी गहिवरलो पुलकित झाली मम काया ! ३२

गायक श्रोते समरस झाले चैतन्याचा अनुभव हा
श्रीरामाचे मानस सांगे तत्त्वपालना सिद्ध राहा ! ३३

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment