अध्याय १८ : मोक्षसंन्यासयोग
गीता गाता कळे अर्थ बोधातला
सारा गुंता कसा सुटतसे ।।१।।
कर्तव्याचा त्याग नका कधी करू
फलासक्ति सोडा व्हाल मुक्त ।।२।।
कृष्ण जीवनाचा महामंत्र व्यास
सांगत कौशल्ये गीतेमाजी ।।३।।
दिशाहीन पार्थ आरंभाला खिन्न
शेवटी प्रसन्न कसा झाला ।।४।।
स्वभाव सुधारे श्रवण मनने
गुरुकृपांकित झाल्यावर ।।५।।
अरे मोहना रे मोह गेला माझा
सांगशी तसे मी करणार ।।६।।
चाप उचलता पातली वीरश्री
शंख फुंकताच सिद्ध युद्धा ।।७।।
वाचावी ही गीता जसे जमे गावी
नित्य नवा लाभे प्रेमानंद ।।८।।
पार्थ धनुर्धर कृष्ण सूत्रधार
धर्माचाच जय ठरलेला ।।९।।