Friday, December 28, 2012

काही छायाचित्रे.

पुण्यातील खुन्या मुरलीधर मंदिर येथे पंडित भीमसेन जोशी यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमातील फोटो 









शिवाजी मंदिर, पुणे येथे काव्यमय सावरकर दर्शन कार्यक्रमाचे वेळी रंजना गोखले, माझे वडील कै. श्रीराम आठवले आणि निवेदनाला श्री. श्री. वा. कुलकर्णी सर 

शिवाजी मंदिर, पुणे येथे शिवगीता या कार्यक्रमाचे वेळी कै. गजाननराव वाटवे आणि अण्णा म्हणजे माझे वडील कै. श्रीराम आठवले 


शिवाजी मंदिर, पुणे येथे शिवगीता या कार्यक्रमाचे वेळी कै. गजाननराव वाटवे आणि अण्णा म्हणजे माझे वडील कै. श्रीराम आठवले 

बांडेवाडी येथे ग्रामस्थांबरोबर, अण्णा म्हणजे माझे वडील कै. श्रीराम आठवले त्यांच्या शेजारी मी, आई, थत्ते सर, कै. घैसास आणि वि र कुलकर्णी सर 

बहुतेक लक्ष्मि क्रीडा मंदिरातील हा फोटो आहे.  आई, अण्णा आणि तबल्याला कुलकर्णी.


शिवाजीराव भोसले यांच्याबरोबर 

काव्यमय सावरकर दर्शन कार्यक्रमाचे वेळी.  रंजना गोखले, माझे वडील कै. श्रीराम आठवले आणि निवेदनाला श्री. श्री. वा. कुलकर्णी सर 


Tuesday, December 25, 2012

भगवान श्रीकृष्णावरील श्लोक



कुठल्याशा अधिक मासी अण्णांना सुचलेले हे श्रीकृष्णावरील ३३ श्लोक.

गणेशा तुला वंदितो भक्तिभावे
तुझे रुप चित्ती गुणेशा ठसावे
कुरुक्षेत्र जे ते मनाला दिसावे
मने माझिया पार्थ व्हावे स्वभावे ॥१॥

'खरा कोण मी’ ते कदा आकळेना
मनाने मनाला मला आवरेना
दिशाभूल झाली, दिशा सापडेना
करु काय मी हे कळेना वळेना ॥२॥

असा एक विश्वास गीता कळेल
अकर्मण्य नैराश्य वेगे पळेल
मनी हीण जे ते तपाने जळेल
मती माझी कृष्णोक्त मार्गी वळेल ॥३॥

अहंकार नाशा मला साह्य द्यावे
विवेके विचारे मला चालवावे
पसार्‍यातले सार धान्यात यावे
मना माझिया माधवा पालटावे ॥४॥

सदा सर्वदा योग कृष्णा घडावा
मला सूर माझा इथे सापडावा
नसे देह मी अर्थ चित्ती ठसावा
तुझा हात पाठी फिरावा फिरावा ॥५॥

अति स्वार्थ बुद्धी तिथे पाप आहे
अति क्रोध बुद्धी तिथे पाप आहे
समाजार्थ मी भाव हे पुण्य आहे
घडे त्याग जेथे तिथे पुण्य आहे ॥६॥

फलाशेत जेव्हा स्वये गुंततोसी
अरे मानवा, माधवा सोडतोसी
करी चित्त एकाग्र कर्मात नित्य
दुजा यज्ञ नाही नरा मान सत्य ॥७॥

जसा देह येई, तसा देह जाई
परी आत्मतत्त्वा नसे लोप काही
तुझ्या अंतरी नांदताहे अनंत
तया पाहता वृत्ति होई सुशांत ॥८॥

मनाने मनाला सुधारीत जावे
अती आदरे नित्य ध्याना बसावे
स्वये नाम घ्यावे हरीरूप ध्यावे
सदा साह्य दे साधकाला स्वभावे ॥९॥

घडो कर्म जे घालवी सर्व रोग
घडो कर्म जे साधते कृष्ण योग
जगज्जीवनी देव दृष्टी पडू दे
दिसामाजि सत्कर्म काही घडू दे ॥१०॥


स्थितप्रज्ञ आदर्श जो कार्यकर्ता
निराधार बंधूस तो साह्यदाता
तयाच्या परी ईशभक्ती घडू दे
विवेके, विचारे कृती पालटू दे ॥११॥

जनां मेळवी बोधवी ज्ञानदाता
जनां रीत लावी सुधारी अवस्था
करी कार्य, सन्मान ना इच्छितो तो
असामान्य विश्वी असा मान्य होतो ॥१२॥

मना माझिया वाच गीता सदैव
तदा कृष्ण बोले तुझ्याशी सदैव
नको खेद मानू, नको हासु फार
तदा तोल राखे मनाचा विचार ॥१३॥

करी कार्य जे जे सुखे प्राप्त झाले
असे मान ते त्याकडूनीच आले
फलाची धरी आस तो दीनवाणा
जनांचा म्हणे दास कैवल्यराणा ॥१४॥

मनी ज्या क्षणी लोभ निर्माण झाला
अशांती स्वये पातलीसे घराला
असे जन्मते पाप जेव्हा मनात
तदा भ्रष्ट साधे स्वत:चाच घात ॥१५॥

खरी संपदा ती श्रमे प्राप्त झाली
खरी संपदा न्याय्य मार्गेच आली
खरी संपदा दान देता सुखावे
खरी संपदा सद्गुणा वाढवावे ॥१६॥

करी स्वच्छता बा तनाची मनाची
धरी लाज काही जनाची मनाची
विलासामधे जो सदा डुंबलेला
असे मान तो भूमिला भार झाला ॥१७॥


सचोटी हवी वागण्या बोलण्यात
चिकाटी हवी माणसे जोडण्यात
शिताफी हवी शत्रूला जाणण्यात
खरा दक्ष तो धन्य तीन्ही जगात ॥१८॥

विवेकी खचेना जरी दु:ख आले
विवेकी उतेना जरी सौख्य आले
मना आवरे जो खरा देव आहे
मना नावरे तो खरा दैत्य आहे ॥१९॥

अनाथां जनांना जरा धीर द्यावा
तया संगती काळ थोडा क्रमावा
तया वाटुदे कृष्ण माझा विसावा
असा जीव मुद्दाम लावीत जावा ॥२०॥

दिल्याने घटेना असे ज्ञान आहे
दिल्याने घटेना असे प्रेम आहे
मना क्षोभवी जो असा भोग आहे
मना शांतवी जो असा त्याग आहे ॥२१॥

धरी रे मना ध्यास तू उद्यमाचा
धरी रे मना ध्यास तू उत्तमाचा
धरी रे मना ध्यास तू संयमाचा
धरी रे मना संग तू सज्जनांचा ॥२२॥

मना गुंतवावे कथा कीर्तनात
मना गुंतवावे कला दालनात
मना गुंतवावे अनोख्या जगात
विलासा विटे देत भक्तीत साथ ॥२३॥

नको आत्मनिंदा नको ती बढाई
नको ती टवाळी जरा शांत होई 
वदे तीव्र जो तो जगत् शत्रु होतो 
वदे गोड जो तो जगन्मित्र होतो ॥२४॥

तपस्या करावी चिकाटी धरावी
चिकाटी धरावी अंहता सरावी
अंहता सरावी जरा जाग यावी
जरा जाग यावी समस्या सुटावी ॥२५॥

कुणी मी न कर्ता कुणी मी न भोक्ता
कुणी मी न वक्ता कुणी मी न नेता
खरा कृष्ण कर्ता खरा कृष्ण दाता
खरा कृष्ण वक्ता बरा पार्थ श्रोता ॥२६॥

व्रती तो यशस्वी व्रती तो मनस्वी
व्रती तो मनस्वी व्रती तो तपस्वी
व्रती देत आधार दु:खी जनांना
व्रती लोकमाता जनां पोसताना ॥२७॥

मनाचे तनाशी जुळे जेथ जेव्हा
तदा योग साधे तदाकार तेव्हा
करी कर्म जे सामरस्ये तपस्या
न गुंता कुठेही कुठे ना समस्या ॥२८॥

कुठे शोधिशी देव देवालयात
वसे देव शेतात, विद्यालयात
पहा देव रुग्णात, रुग्णालयात
जिथे राबताती असंख्यात हात ॥२९॥

नको रुप पाहू नको रंग पाहू
नको जात पाहू नको पात पाहू
अमीरीत नाही फकीरीत आहे
नसे बद्ध काही सदा मुक्त आहे ॥३०॥

तुरुंगात ज्याचा असे जन्म झाला
तयाच्या मनी जागलेला जिव्हाळा
स्वये मुक्त होता जनां मुक्त केले
तये जन्मभूला किती ऊंच नेले ॥३१॥

वसे कृष्ण अध्यापनी न्यायदानी
वसे युद्धशास्त्री, वसे आत्मज्ञानी
वसे नाट्यरंगी वसे अंतरंगी
तुझे चित्त रंगो सदा संतसंगी ॥३२॥

तुझी माधवा गोड गीता कळू दे
तुझा हात पाठी फिरु दे, फिरु दे
तुझे तत्त्व चित्ती ठसू दे, ठसू दे
तुझे कार्य काही घडू दे, घडू दे ॥३३॥

॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥







Saturday, December 15, 2012

स्वामी स्वरुपानंद (पावस) जयंती.



आज स्वामी स्वरुपानंद जयंती.  त्यानिमित्त त्यांच्यावर कै श्री बा आठवले यानी रचलेले व तरुण भारत मध्ये १९८५ साली प्रकाशित झालेले हे सुभाषित.


स्वरुपानंदरुपाय
स्वामिने परमात्मने ।
अंत:स्थाय बहि:स्थाय
सोऽहं भावाय ते नमः॥

अर्थ :

हे स्वरुपानंद आपण परमात्म स्वरुप स्वामी आहात. अंतरंगात आणि अवतीभवतीही असणार्‍या मूर्तिमंत सोऽहंभावाला नमस्कार असो.

Wednesday, December 12, 2012

माझे वडील कै. श्रीराम बाळकृष्ण आठवले यांच्या "गाणी अण्णांची" या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिकेच्या प्रकाशनाची छायाचित्रे


ध्वनिमुद्रिकेचे प्रकाशन. श्री रविंद्र खरे, श्री संजय उपाध्ये, कल्याणीताई नामजोशी, आई (प्रतिभा आठवले), मी आणि श्री चारुदत्त आफळे.
श्री प्रसाद जोशी यांचा सत्कार 

श्री संजय उपाध्ये सीडी प्रकाशानानंतर संवाद साधतना 

कल्याणीताई नामजोशी संवाद साधताना 

Monday, November 12, 2012


दिनांक ११ नोव्हेंबर २०१२ रोजी भरत नाट्य मंदिर येथे गाणी अण्णांची या माझ्या वडिलांनी लिहिलेल्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिकेचे औपचारिक प्रकाशन श्री संजय उपाध्ये यांच्या हस्ते झाले.  प्रसिद्ध कीर्तनकार  श्री चारुदत्त आफळे आणि प्रसिद्ध तबला / ताल वादक  श्री. प्रसाद जोशी यांनी या ध्वनिमुद्रीकेसाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे फोटो लवकरच अपलोड करीन.    

Sunday, September 30, 2012

गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या ....

माझे वडील कै.  श्रीराम  बा. आठवले यांनी लिहिलेले आणि १९८४ मध्ये तरुण भारत मध्ये आलेले हे सुभाषित

वन्दामहे वयं सर्वे
गणेशं प्रार्थयामहे ।
गृहं गत्वा सुखेनैव
पुनरागमने कुरु ।।

अर्थ

आम्ही सगळे आज मंगलमुर्ती मोरयाला वंदन करून विनवितो की आपल्या घरी सुखाने जा पण पुढल्या वर्षी लवकरात लवकर परत मात्र या हं !

Sunday, September 23, 2012

गीता दर्शन सप्टेंबर २०१२ च्या अंकात वाहिलेली ही श्रद्धांजली

गीता दर्शन या मासिकामध्ये सप्टेंबर २०१२ च्या अंकात अण्णांना वाहिलेली ही श्रद्धांजली 


Thursday, August 30, 2012

नेत्रदान आणि त्वचादानाविषयी जागृती निर्माण व्हायला हवी

अण्णांनी मरणोत्तर नेत्रदान व त्वचादान केले.   सह्याद्री हॉस्पिटल ने आठवले कुटुंबियांना दिलेले हे पत्र.  नेत्रदान आणि त्वचादानाची सध्या आत्यंतिक गरज आहे.  भारतामध्ये अंधांची संख्या खूप आहे त्यांना अशा नेत्रदानामुळे नक्कीच नवीन दृष्टी लाभू शकते आणि भाजण्याच्या घटना ही भारतात खूप होतात त्वचादानामुळे या लोकांच्या वेदना थोड्यातरी कमी होतील.



Friday, August 24, 2012

"सोसाया सामर्थ्य हवे"


माझे वडील श्रीराम बाळकृष्ण आठवले यांचे काल गुरुवार, दिनांक २३ ऑगस्ट २०१२ रोजी सकाळी निधन झाले. 

Wednesday, August 15, 2012

स्वातंत्र्यदिन


अण्णांचे म्हणजे माझ्या वडीलांचे १९८५ साली तरुण भारत मध्ये प्रसिद्ध झालेले हे सुभाषित.  आजही ते प्रासंगिक आहे.  आताही परिस्थिती तशीच आहे.

स्वातंत्र्यदिन

स्वातंत्र्यं स्वार्थात् मुक्तिः
त्यागात् स्नेहोऽभिजायते।
सौहार्दं सर्वराज्येषु
स्वातंत्र्यं राष्ट्रभावना॥

अर्थ : स्वातंत्र्य म्हणजे क्षुद्र स्वार्थापासून सुटका. अशा त्यागातूनच परस्परात स्नेहभाव निर्माण होतो. सर्वच राज्यांमध्ये परस्परांविषयी सद्भावना असायला हवी.  आपण एक राष्ट्र आहो ही भावना म्हणजेच स्वातंत्र्य होय.

Monday, August 13, 2012

लोकाभिराम.



अण्णांना म्हणजे माझ्या वडीलांना पुस्तकांची भारी आवड.  आणि पुस्तक वाचता वाचता काही काव्य स्फुरले की त्याच पुस्तकातील रिकाम्या जागेत ते काव्य लिहून ठेवायची त्यांची सवय.  लोकाभिराम या पुस्तकात त्यानी लिहून ठेवलेले हे काव्य.  काव्य आहे ३१ जुलै १९९१ चे.  नुकतेच बघितले मी.  आणि म्हणून ब्लॉगवर टाकत आहे.  सहज गुणगुणण्यासारखे आहे. बघा ऐकून... ऐकता ऐकता बरोबर स्क्रिप्ट ही वाचता येते.



Friday, August 10, 2012

भ़गवद्गीतेची आरती


कालपर्य़ंत "कथा ही भगवद्गीतेची"  चे सर्व अध्याय रोज एक याप्रमाणे अपलोड केले.  विलक्षण योगायोग म्हणजे कालच गोकुळाष्टमी होती आणि कालच सर्व अध्याय अपलोड करून झाले हे सगळे न ठरवता झाले.

आज पारणे, दही हंडी....... आज भ़गवद्गीतेची आरती अपलोड करत आहे.

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

Thursday, August 9, 2012

अध्याय अठरावा - मोक्षसंन्यास योग - ध्वनिमुद्रित

गेले सतरा दिवस रोज एक अध्याय मी अपलोड करत होतो.  उद्देश हाच की गीतेची ओळख सोप्या शब्दात आणि गद्यात सर्वांना व्हावी.  कथा ही भगवद्गीतेची हे माझ्या वडीलांनी स्वतः लिहिले आणि म्हणूनच त्यांच्या आवाजात ते ऐकण्यात ही मजा आहे.  आज शेवटचा अध्याय ब्लॉग वर अपलोड करत आहे.


Thursday, July 26, 2012

Wednesday, July 25, 2012

अध्याय तिसरा - कर्मयोग - ध्वनिमुद्रित

परवापासून येथे रोज एक याप्रमाणे माझे वडील श्री. श्रीराम आठवले यांच्या शब्दात आणि आवाजात ध्वनिमुद्रित केलेली भगवद्गीतेची कथा देत आहे.  आज अध्याय तिसरा  -  कर्मयोग 




Tuesday, July 24, 2012

अध्याय दुसरा - सांख्य योग - ध्वनिमुद्रित

श्रीराम आठवले यांच्या शब्दात आणि आवाजात भगवद्गीतेची कथा.  अध्याय दुसरा - सांख्य योग. 

Monday, July 23, 2012

अध्याय पहिला - अर्जुनविषाद योग - ध्वनिमुद्रित


श्रीराम आठवले यांच्या शब्दात आणि आवाजात भगवद्गीतेची कथा. अध्याय पहिला अर्जुनविषाद योग  



Sunday, July 22, 2012

म्हणून भांडू नका.


भेदेन क्षीयते राष्ट्रम्
वर्धते संघकर्मणा ।
कलहः कार्यनाशाय
यशसे सांघिकं बलम् ॥

अर्थ : 
फाटाफुटीमुळे राष्ट्र क्षीण होते तर संघटना केल्याने राष्ट्रबळ वाढते.  मात्र कलह हा केव्हाही राष्ट्र नाशाला कारण होतो.  सांघिक सामर्थ्य राष्ट्रोत्कर्ष घडवून आणते.

Tuesday, July 17, 2012

द्वेष विलयास जाऊ दे.


द्वेषो विलयतां यातु
चित्ते स्नेहोदयो भवेत्
आदावहं भारतीयो
भावो जागर्तु सत्वरम् ॥

अर्थ : द्वेष विलयाला जाऊ दे आणि मनामध्ये बंधुभाव जा़गृत होऊ दे. सर्वात आधी ’मी भारतीय आहे’  असा पवित्र भाव मनामनात त्वरेने जागृत होऊ दे.

Sunday, July 1, 2012

लवकर उठा



शीघ्रं निद्रा जनैस्त्याज्या
सौख्यलाभाय सर्वदा ।
प्रसन्नमनसा कार्यम्
प्रथमं प्रभुचिन्तनम् ॥

अर्थ :  लोकांनी निद्रा टाकून सौख्यलाभासाठी नेहमीच लवकर उठावे  आणि आन्हिकं उरकून पहिल्यांदा प्रसन्न मनाने प्रभुचिन्तन करावे. 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले





Thursday, June 21, 2012

केशवः संघनिर्माता


केशवः संघनिर्माता
द्रष्टा ज्ञाता च चिंतकः ।
पूजितस्तोषितो तेन
संघरूपः सदाशिवः ॥

अर्थ : प. पू. आद्य सरसंघचालक डॉ. के. ब. हेडगेवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक होत. ते द्रष्टे होते, ज्ञानी होते, ज्ञानी आणि तत्त्वचिंतक होते.  त्यांनी आयुष्यभर संघरुपी सदाशीवाची पूजा केली आणि त्याला प्रसन्न करून घेतले.

Sunday, June 17, 2012

रविवार.


आज रविवार.  माझ्या वडीलांनी लिहिलेले आणि तरुण भारत मधे १९८४ साली प्रसिद्ध झालेले हे सुभाषित त्यामुळे आठवले.

रविवार

विश्रांतिदः स्फूर्तिदश्च
सर्वेषो हि मनोहरः ।
आश्वासकस्तु रसिकानां
रोचते रविवासरः ॥

अर्थ : थकल्या जिवांना विसावा देणारा तसेच प्रतिभाशाली कलावंतांना स्फूर्ती देणारा आणि रसिकांना ’आपण आलोच’ असे आश्वासन देणारा रविवार मला फार आवडतो.

Sunday, June 10, 2012

ये रे घना


आपण सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहात आहोत. माझ्या वडीलांनी लिहिलेले आणि तरुण भारत मधे १९८५ साली प्रसिद्ध झालेले हे सुभाषित त्यामुळे आठवले.

ये रे घना 

वर्षादेवि कदा वर्षे
तृषिता क्षुधिता धरा ।
शीतं घनं जलं वर्ष
आतुराः सकला जनाः ।

अर्थ : हे वर्षादेवि तू कधी जलवृष्टी करशील? ही पृथ्वी तहानलेली आहे, भुकेजली आहे. तू शीतल जलाचा जोरदार पाउस पाड कारण सगळेच फार आतुरलेले आहेत.

Thursday, May 24, 2012

काय हा उन्हाळा


सध्या खूपच उन्हाळा आहे.  माझ्या वडीलांनी लिहिलेले आणि तरुण भारत मधे १९८५ साली प्रसिद्ध झालेले हे सुभाषित त्यामुळे आठवले.

काय हा उन्हाळा

कुतो निद्रा कुतः स्वास्थ्यं
स्वेदधारा पुनःपुनः ।
विना तापं कथं वर्षा
निदाघाय नमो नमः ॥

अर्थ :

काय हा उन्हाळा..  धड झोप नाही तर स्वस्थता कुठली.  घामाच्या धारा वाहताहेत, पण असा ताप सहन केल्याशिवाय पाऊस कुठला पडायला?  हे उन्हाळ्या तुला पुनपुन्हा नमस्कार.

Friday, May 11, 2012

स्वातंत्र्यसमराचे स्मरण.


१० मे - स्वातंत्र्ययुध्दाचा प्रारंभ.  त्यानिमित्त तरुण भारत मधे १९८४ साली प्रसिद्ध झालेले हे सुभाषित

देशाभिमानः प्रतिकारभाव:
द्वे लक्षणे राष्ट्रभाग्योदयस्य ।
स्वातंत्र्यवीरान् शिरसा प्रणम्य
स्वातंत्र्ययुध्दं प्रथमं स्मरामः ॥

अर्थ :  देशाभिमान आणि अन्यायाचा प्रतिकार करण्याची तीव्र भावना ही राष्ट्राच्या भाग्योदयाची दोन लक्षणे आहेत. सर्व स्वातंत्र्यवीरांना प्रणाम करुन आज पहिल्या स्वातंत्र्यसमराचे स्मरण करु या.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

Thursday, April 26, 2012

अण्णांनी लिहिलेली पहिली कविता - बाष्पांजलि


अण्णांनी लिहिलेली पहिली कविता

त्यांनी लिहिलेली ही कवितेमागची भूमिका

दि. १४ जानेवारी १९५५ रोजी कै. सौ. आजींना तिलांजली देण्यासाठी ओंकारेश्वराला गेलो.  तेथे आजोबांची दुर्दैवी अवस्था पाहून मला भडभडून आले. त्यांच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी ही पहिली कविता लिहिली.

अश्रुमालिका नित्य अर्पितो, रडुनि ठायि ठायी
या जगतामधि मजला प्रेमे, कोण धरिल हृदयी
कितीक वर्षे होतो आपण, परस्परांशी हृदये भिडवून
परंतु येता तुफान वारा, कुठे तू नि मीहि
जीवन अजि हे उदास गमते, मार्गी दिसती असंख्य काटे
पथ हा दुर्गम कसा आक्रमु, भय मोठे वाटे
पुढे लाडके जाउ नको तू, मलाहि वाटे यावे तिकडे
परंतु तुझ्या नि माझ्यामध्ये, धुके दाट साचे
मम देहाची जीर्ण लक्तरे, जातिल गळुनि दोन दिसांनी
आणिक तुजला भेटायाला, येईन मीहि त्वरे

- २४ जानेवारी १९५५

Sunday, April 22, 2012

गीता कृपा द्वादशी


गीता कृपा द्वादशी

मला लढायचे नाही अर्जुनाचा वेडा हट्ट 
पार्थसारथी सोडेना धरी मनगट घट्ट
तुला लढावे लागेल तुझा स्वभाव शूराचा
धर चापबाण हाती पाठिराखा हो धर्माचा
साधुसंतांना रक्षाया दुर्जनांना दंडाया
घडी धर्माची घालाया आलो पार्था धरेवर
काय करी अवतार जर नसे सहकार
घेई आधी पुढाकार तोच आदर्श होणार
कंसवध नव्हे हिंसा भक्त करती प्रशंसा
तुला घेणे हाच वसा मला तुझाच भरवसा
मन येण्या थार्‍यावर खाली नेटाने बसावे
अंतरात रमावर त्याचे दर्शन सेवावे
बुद्धी अचला निर्मला फळ गोड साधनेचे
संतसाहित्याचे वेच शेलकेच कही वेचे
           ज्याला ध्यानाची आवड   त्याच्या बुद्धीलागी धार
मन बुद्धी एकाकार त्याचा जय निरंतर
देव दाखवा दाखवा नाही कोठे विचारावा 
अंतरातला जो ठेवा कसा करंट्याला ठावा ९
विश्वरूप सूक्ष्मरूप सौंम्यरूप उग्ररूप
सारे सारे एकरूप ज्ञाने जो तो सुखरूप १०
देव भावाचा भुकेला दीनाघरी धावलेला 
पुंडलीका भेटीसाठी विठू विटेवर ठेला ११
कर्तव्यातला ओलावा छावेमधाला गारवा 
सोऽहं घुमतसे पावा अनुभव स्वये घ्यावा १२

Sunday, April 1, 2012

नित्यं रामकथां पठेत् |


आज रामनवमी, रामजन्म, त्यानिमित्त माझ्या वडीलांनी लिहिलेली हे सुभाषित येथे देत आहे.

चरितं रघुनाथस्य
स्फूर्तिदं ज्ञानदं तथा ।
आत्मानं सुखिनं कर्तुम्
नित्यं रामकथां पठेत् ॥

अर्थ
श्रीरामचन्द्रांचे एकंदर चरित्रच स्फुर्तिदायक आणि ज्ञान देणारे आहे. जर आत्मसुख हवे असेल तर मनुष्याने नेहमीच रामकथा वाचनात ठेवावी.

Saturday, March 24, 2012

श्री स्वामी समर्थ हरिपाठ


श्री स्वामी समर्थ हरिपाठ
- ॐ -

श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। नामघोष चालो माझ्या मना।
तो हा नामघोष आत्म्याला संतोष। अपूर्णाला देत पूर्णपणा ॥१॥

आत्मविश्वासाचा मोठा पुरवठा । स्वामी समर्थांचा चाललेला।
डरायचे नाही रडायचे नाही। हटायचे नाही मंत्र दिला ॥२॥ 

भिऊ नको आहे तुझ्या पाठीशी मी। विश्वास बाळगे जो जो कुणी।
त्याचा पुनर्जन्म त्याच आश्वासने। होतसे वाटते त्याच क्षणी ॥३॥

शेत पिकवावे पोटभर खावे।  नाव संकोचाचे नको नको।
जातीपातींचे ते बंधन तुटावे। विस्ताराच्या आड येणे नको॥४॥

वेदना सोसाव्या, सोसता हसावे। तीव्रता ओसरे हळुहळू।
मृत्युला का भ्यावे, सन्मित्र मानावे।  आत्माराम वारा झुळुझुळू॥५॥

चिंतनी रमावे पिटाळावी चिंता।  शांतीचे साम्राज्य पसरते।
समर्थांचा चेला त्याला काय कमी? पुराचे ते पाणी ओसरते॥६॥

आत्म्याला ओळख नको कमी लेखू। तुला ना उणीव कशाचीही।
अज्ञानाने तैसा फुगू नको कधी। नम्रतेने शोभे पांडित्यही॥७॥

पदांचे लालित्य नर्तक कवींचे। शंकर विलसे त्या त्या जागी।
नमावे नटेशा, स्तवावे परेशा। प्रार्थनेत व्हावे सहभागी॥८॥

ज्याच्या त्याच्यापाशी असे विरंगुळा। यत्नाने ध्यासाने मिळवावा।
ध्यासाने भेटावा, जिवाचा विसावा। सकळां लाभावा निजठेवा॥९॥

नित्य गुरुवार शिष्याला वाटतो। सद्गुरु पाउले वंदिताना।
स्वामी समर्थांशी संबंध अतूट। मनाला सांगावे पुन्हा पुन्हा॥१०॥

(हा श्री स्वामी समर्थ हरिपाठ श्री ज्ञानेश्वरांच्या हरिपाठाच्या चालीवर म्हणावा)

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले


Sunday, February 26, 2012

स्वातंत्र्यवीरं वन्देऽहं !




स्वातंत्र्यवीरं वन्देऽहं
जीवनं यज्ञवत्  तव |
कीर्तिस्त्यक्ता व्रतस्त्यागो
दधीचिं दृष्टवान् पुनः  ||

अर्थ :

हे स्वातंत्र्यवीरा आपल्याला मी वंदन करतो. आपले समग्र जीवन यज्ञच आहे.  आपण कीर्तीचा त्याग केलात. त्याग स्वीकारलात. आपणामध्ये आम्हाला दधीचींचेच पुन्हा दर्शन घडले. 

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले 

Monday, February 20, 2012

महाशिवरात्र.

आज महाशिवरात्र. त्यानिमित्त माझ्या वडीलांनी म्हणजे श्रीराम बा. आठवले यांनी लिहिलेले व तरुण भारत मध्ये १९८५ साली प्रसिद्ध झालेले हे सुभाषित.


ओम् नमः शिवाय

कोऽहं प्रश्नोत्तरंलब्धुम्
आत्मानं पश्य मानव।
सोऽहं भावं दृढीकर्तुम्
आह्वयस्व सदा "शिव" ॥

अर्थ

मी कोण? या प्रश्नाचे सम्यक् उत्तर मिळविण्यासाठी मानवा तू अंतर्मुख हो, आत्मनिरीक्षण कर. मी तोच आहे, हा भाव दृढ करण्यासाठी तू नेहमीच "शिव शिव" म्हणत जा.

Thursday, February 16, 2012

दासनवमी

आज दासनवमी. त्यानिमित्त माझ्या वडीलांनी म्हणजे श्रीराम बा. आठवले यांनी लिहिलेले व तरुण भारत मध्ये १९८५ साली प्रसिद्ध झालेले हे सुभाषित.


कदा दासबोधं समग्रं पठित्वा
समर्थानुयायी विवेकी भवेयम्।
बलोपासकोऽहं च भक्त्या विरक्त्यो
कदा रामदासं प्रसन्नं करिष्ये॥

अर्थ
दासबोधाचा चांगला अभ्यास करुन विवेकी असा समर्थानुयायी मी कधी होईन बरे?
बलाची उपासना करणारा मी भक्तीने आणि विरक्तीने समर्थ रामदास स्वामींना कधी प्रसन्न करून घेईन?

Sunday, January 15, 2012

जयतु विवेकानन्दः



जयतु विवेकानन्दः

यस्य मुखात् सत्वरं
प्रस्फुटं भारतभक्तिस्तोत्रम् ।
जयतु विवेकानंदः
स्वामी सद्गुरुविश्वविजेता ॥

अर्थ : ज्यांच्या मुखातून अमेरिकेमध्ये उत्स्फुर्तपणे भारतभक्तिस्तोत्र स्फुरले. ते सद्गुरुपदी पोचलेले विश्वविजेते स्वामी विवेकांनद विजयी असोत.