Saturday, January 25, 2014

मतदान - पवित्र कर्तव्य

मतदान - पवित्र कर्तव्य

लोकसत्ता रक्षणीया
पवित्रम् जनशिक्षणम्
विवेकेन विचारेण
मतदानं करोम्यहम् ॥

अर्थ : केव्हाही लोकसत्तेचे रक्षण व्हायलाच हवे.  त्यासाठी निवडणूक ही लोकशिक्षणाची सुंदर संधी आहे.  राज्यकर्ता निवडण्यासाठी मी विवेकाने आणि विचाराने़च मतदान करीन.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

Sunday, January 19, 2014

"मागणे श्री गणेशाला" कवि आणि स्वर : श्रीराम बाळकृष्ण आठवले

हे गणपती स्तोत्र माझ्या वडीलांनी लिहिलेले आणि त्यांच्याच आवाजात ध्वनिमुद्रित केलेले.  हे स्तोत्र त्यांच्या नित्य पठणात होते.

मागणे श्रीगणेशाला
   मंगलमूर्ती गजानना रे प्रभात समयी उठवावे
   सिद्धिविनायक हेरंबा देहशुद्धिला  प्रेरावे
   हे विद्याधर मोरया शुचिर्भूत मी नित व्हावे
   श्री गणनाथा आचार्या अथर्वशीर्ष ही मज यावे
   गणाधीश तू दासाचा सांघिकपण अंगी यावे
   सिंदुरचर्चित हे बाप्पा सूर्योपासक बनवावे
   मोदकप्रिय हे शिवकुमरा अन्नब्रह्म हे ठसवावे
   हे लंबोदर विघ्नहरा मन माझे सुस्थिर व्हावे
   अनादि तैसा अनंत तू इथे तिथे दर्शन द्यावे
   चिंतामणि तू परमेशा आत मला बघता यावे
   शिवकुमरा हे शुभंकरा कार्य विधायक घडवावे
   समाजपुरुषा हे देवा मी माझे विलया जावे
   श्रोता वक्ता लेखक तू सार वेचता मज यावे
   ब्रह्मरसाचा मोदक दे उदात्त उन्नत मन व्हावे
   विवेकशुंडा कशी हले सूक्ष्मदृष्टीचे भान हवे
   लंबोदर पीतांबर हे संघटनेचे सूत्र हवे
   हे सुखकर्त्या ओंकारा सोसाया सामर्थ्य हवे
   भालचंद्र हे योगींद्रा अवघड ते सोपे व्हावे
   एकदंत हे वरदात्या जिज्ञासूपण पुरवावे
   मनरमणा हे महोत्कटा विश्वात्मक मज बनवावे
   राम वाहतो या दूर्वा अध्यात्मी रमता यावे
   ।।मंगलमूर्ती मोरया।
  रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले