Wednesday, June 24, 2026

ऐसे ज्ञान असावे!

ऐसे ज्ञान असावे!
परमार्था पूरक व्हावे! ध्रु.

प्रेम वाढवी
ऐक्य बाणवी 
द्वेषदंभ निपटावे !१

शिकवी नीती 
धार्मिकता ती 
स्नेहसदन जग व्हावे!२

विवेक कळतो
विकार पळतो 
ज्याचे त्या उमगावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १७६ (२४ जून) वर आधारित काव्य.

वाचनात आलेले आचरणात आणून जो लोकांना सांगतो तो खरा वक्ता होय. ज्ञान हे मुळात पवित्र आहे. जे ज्ञान नीती आणि धर्म यांच्या पायावर उभे असते ते जास्त प्रभावी ठरते. सर्वांचे एकमेकावर प्रेम वाढेल व सर्वजण एकत्र येतील असे ज्ञान असावे.

द्वेष मत्सर वाढवील, नीतीधर्मास फाटा देईल असे ज्ञान पुस्तकात नसावे. आपल्या मनामध्ये विचार आणि विकार हे दोघेही आहेत. विचार हा पोलीस तर विकार हा चोर आहे. जेथे विचार आहे तेथे विकार राहू शकत नाहीत, पण विकार जर तेथे आलाच तर तो विचारांच्या ताब्यात राहील इतके विचार प्रभावी पाहिजेत.

Tuesday, June 23, 2026

शुद्ध हेतु राखावा - प्रचीती घ्यावी!

शुद्ध हेतु राखावा - दक्षता घ्यावी!
कृती सहज अनुरूप - प्रचीती घ्यावी!ध्रु.

विषय विसरावे, भजनि रंगावे
हवेपण जावे, तत्त्व बिंबावे
विस्मृती नको देवाची आस पुरवावी!१

प्रपंची रमले, संत निंदिले
स्वहित ऐकले, सोडुनी दिधले
दुर्दशाच अश्रद्धांची गाठी बांधावी!२ 

देव हृद‌यात, सकळ जीवात 
शोध जो घेत, तृप्त तो होत 
नामौषधि रोगा पळवी निरंतर घ्यावी!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १७५ (२३ जून) वर आधारित काव्य.

मनुष्याने शुद्ध हेतु ठेवण्याचा प्रयत्न करावा.  हेतु शुद्ध असला की स्वाभाविकच कृती त्याला अनुरूप होऊ लागते व प्रगतीला मदत होते. ज्याला विषयाची गोडी असते, त्याला नाही परमार्थाची गोडी लागत. जो खरा कर्ता आहे त्याचे मोठेपण खरे असते खरे कर्तेपण भगवंताचे असल्याने त्याच्याकडे ते द्यावे, म्हणजे मोठेपण त्याच्याकडे जाते. आयुष्यात काही दिवस तरी मी कोणाचा नोकर नसून मी भगवंताचा आहे असे माणसाला वाटावे याकरता भगवंत ज्या ठिकाणी आहे तेथे त्याला शोधा. तो सर्वांच्या हृदयात आहे. म्हणून तेथे त्याला पहा. "देव आहे" असे खऱ्या अर्थाने वागणारे जगामध्ये थोडेच असतात. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे. ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते त्याने नाम घेणे हेच एक औषध घ्यावे.

Sunday, June 21, 2026

द्रव्य जसे संसारी, "भाव" हवा परमार्थी!

द्रव्य जसे संसारी, "भाव" हवा परमार्थी!ध्रु.

भावे कळे देव
भावे मिळे देव
सहज खात नैवेद्य पाषाणाची मूर्ती!१

देहे आचरावे कर्म
मुखे उच्चारिता नाम
स्तंभातही झाली भक्ता ईश्वराची प्राप्ती!२

बीज जळे वासनेचे
विस्मरण मीपणाचे 
नारायणा नेमे करी भक्तिभावि वस्ती!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १७३ (२१ जून) वर आधारित काव्य.

प्रपंचात जसा पैसा लागतो त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो. जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणे तुम्हास देवाची प्राप्ती होईल. आपल्यासारख्या आस्तिकांना देव "हवा" असे वाटते पण "हवाच" असे वाटत नाही. आपल्या प्रपंचाच्या मदतीसाठी देव हवा असे वाटते. प्रपंचाची आवड असू नये, पण प्रपंचातील कर्तव्यांची आवड असावी. देहाने ते कर्तव्य करावे व मनाने मात्र अनुसंधान ठेवावे. दगडातील माती अनेक यंत्रांनी व चाळणीने चाळून काढून टाकतात व नंतर सोने हाती लागते, त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो. ज्यांना व्याप आहे ते लोक रडतात  व ज्यांना व्याप नाही तेहि लोक रडतात. मग सुख कशात आहे? सुख हे समजुतीमध्ये आहे, आणि भगवंताचे होणे हीच समजूत तेवढी खरी आहे. आपल्या देहावर आपली सत्ता नाही, आपल्या पैशावर आपली सत्ता नाही, आपल्या माणसांवर आपली सत्ता नाही, म्हणून आपण कर्तव्य तेवढे करावे आणि ते करीत असताना आपले मन दुश्चित होऊ देऊ नये. आपल्या इच्छेनुसार सर्व गोष्टी घडत नाहीत ही भगवंताची कृपा आहे.

Friday, June 19, 2026

खरोखर सर्वस्वा मुकलो!

स्वराज्यातला सरसेनानी
विकारवश होताच त्याक्षणी  
न्यायनिष्ठ राजास सोडुनी
हराम मी झालो 
खरोखर सर्वस्वा मुकलो!

कुठुन आठवे मला अवदसा
पापाचा घेतला मी वसा
गनिमाच्या लष्करात शिरूनी 
गुलाम मी बनलो 
खरोखर सर्वस्वा मुकलो!

आता केवळ मरणयातना
जगण्याची, मज नुरे वासना 
अनंत मरणे आधी मरूनी 
स्वजनद्रोही ठरलो 
खरोखर सर्वस्वा मुकलो!

घडेल कैशी इथुन मुक्तता 
धर्मांतर मज एकच त्राता 
पापक्षालनासाठि आज मी 
धर्मा आंचविलो
खरोखर सर्वस्वा मुकलो!

काल लक्ष्मण, आज बिभीषण 
नियती खेळे मजशी भीषण
वाल्या कोळ्यापरी आज मी 
पापपंकि रुतलो
खरोखर सर्वस्वा मुकलो!

चुकलों मी कर्तव्यपालनी 
दण्ड परी भोगण्यावाचुनी
व्यक्तीसाठी राष्ट्रहिताचा 
घातक मी ठरलो 
खरोखर सर्वस्वा मुकलो!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Friday, June 12, 2026

दुःख द्वैतामध्ये आहे, सुख एकामध्ये!

दुःख द्वैतामध्ये आहे, सुख एकामध्ये!ध्रु.

प्रपंचाच्या दहा दिशा 
परमार्था एक दिशा 
तिच्याकडे लक्ष देणे मर्म हेच साधे!१

जन्महेतु परमार्थ
होमिणे हो निजस्वार्थ 
परमार्थ शिकताना देहबुद्धि बाधे!२

वासनेचे बीज सूक्ष्म 
कधी येत पालवून 
नामस्मरणात रहा तृप्त होत संतबोधे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १६४ (१२ जून) वर आधारित काव्य.

द्वैतामध्ये दुःख आहे तर एकामध्ये सुख आणि आनंद आहे. प्रपंचाच्या दहा दिशा आहेत, पण परमार्थाची मात्र एकच दिशा आहे, तिच्याकडे आपण लक्ष लावावे . काही न करणे, अर्थात मनाने, हा खरा परमार्थ होय. परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू आहे हे आपल्याला कळत नाही.  वासनेचे सूक्ष्म बीज आपल्यात कुठेतरी दडलेले असते त्यामुळे लौकिक सुटत नाही. याकरता संतांनी स्वतः एक मार्ग सुचवला आहे आणि तो म्हणजे नामस्मरणात राहून विषयाची उर्मी उठू न देणे. आपण काही न करताच संतांना दोष देतो. प्रपंचातील विघ्न ही सूचनावजा असतात ती आपल्याला जागे करतात. जन्मास आलो ते भगवंतांना ओळखण्याकरता हे विसरू नये म्हणून विघ्नांची योजना असते.

Sunday, June 7, 2026

नाम सदोदित घ्यावे- नामरंगि रंगावे!

नाम सदोदित घ्यावे-
नामरंगि रंगावे!ध्रु. 

नित्याचा हा नियम 
वाढवि रामावरचे प्रेम  
ध्यावे जीवे भावे!१

नामस्मरणे मानसशुद्धी 
खचित होतसे भक्तिवृद्धी
नित्यकर्म पाळावे!२

राम मिळतसे दिव्यप्रेमे 
श्वासासह ते नामहि घेणे 
सोऽहं भावि रमावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १५९ (७ जून) वर आधारित काव्य.

नित्यनेम म्हणजे काय? नित्याचा जो नियम तो खरा नित्यनेम होय. नित्य कोण? जो कधी बदलत नाही तो नित्य. म्हणून नित्य म्हणजे भगवंत समजावा. नियम करणे याचा अर्थ नियमन करणे, निग्रह करणे, वश करून घेणे, स्वाधीन ठेवणे हा होय. आपले मन भगवंताच्या स्वाधीन करणे, त्याच्या ठिकाणी ते नेहमी ठेवणे, याचे नाव नित्यनियम होय. भगवंताचे नाम अखंड घेणे हा आपला खरा नित्य नियम आहे. इतर सर्व गोष्टी शास्त्राची बंधने, पोथी वगैरे वाचणे, स्नान संध्यादी नित्यकर्मे पाळावीत; पण त्यांचा हट्ट व आग्रह असू नये. कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे नाम मात्र सोडू नये एवढाच हट्ट क्षम्य आहे. शुद्ध भावनेने नाम घेतले की भगवंत दर्शन देतो. भगवंत हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही. तो एका प्रेमानेच वश होतो. परमार्थ आपोआप वाढावा, त्याला ताण देऊन वाढवू नये. सतत नाम घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते आणि सर्व शंका आपोआप विरून जातात. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे यातच जीवनाचे सर्वस्व आहे.

Friday, June 5, 2026

प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे जीवनी रामा भरावे!

प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे
जीवनी रामा भरावे!ध्रु.

शुद्ध हेतू बाळगावा
राम गावा, राम ध्यावा 
पाविजे मग तो स्वभावे!१

राम मी ही राम तू ही
राम वसतो सर्व ठायी
दुःखहरणे तोष पावे!२

भावभक्ती तनि मुरावी
बाह्य वृत्ती आवरावी 
राम आपण अनुभवावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १५७ (५ जून) वर आधारित काव्य.

परमार्थात शुद्ध हेतू ठेवून स्वतःपासून सुरुवात करावी. निर्भेळ हेतू शिवाय भजन केले तर त्याचा उपयोग काय? आस्तिक हा भगवंत सर्व ठिकाणी भरलेला आहे हे जाणतो. पक्षाला हजार लोक जेवायला घालणाऱ्यापेक्षा जो आईबाप जिवंत असताना त्यांची सेवा करतो तोच खरा पुत्र. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल.

Tuesday, June 2, 2026

भगवंतावर अकारण प्रेम करणे याचेच नाव परमार्थ

अकारण प्रेम हाच परमार्थ!ध्रु.

अभिमानाचे नाव नसे
भगवंती दृढ भाव असे
जागता देव अंतरात!१

मन असो समाधानात 
जनि साधावा एकांत 
रंगणे नित्य भजनरंगात!२

मी माझे हे भान सुटावे
मी रामाचा हृदयि स्फुरावे 
बसता एकाच ठायि निवांत!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १५४ (२ जून) वर आधारित काव्य.

भगवंतावर अकारण प्रेम करणे म्हणजे परमार्थच. जो प्रपंचात उबगला तो भगवंतास शरण गेला. आपण अडाणी झाल्याशिवाय, म्हणजे आपली विद्या व मोठेपण विसरल्याशिवाय परमार्थ साधत नाही. जेथे असमाधान फार तेथे दुष्ट शक्तींना काम करायला वाव मिळतो. देहाचा मनाशी संबंध आहे, आणि मनाचा हृदयाशी संबंध आहे, म्हणून मन नेहमी अगदी समाधानात ठेवावे, म्हणजे प्रकृती चांगली राहून आयुष्य वाढेल. ज्याने व्यवहार तपासून केला त्याला परमार्थ साधलाच. भगवंतावर अकारण प्रेम करणे याचे नाव परमार्थ. मनुष्याला परमार्थ किती साधला हे त्याच्या बोलण्यावरून व दृष्टीवरून ओळखता येते.

Tuesday, May 26, 2026

रामनाम घेता घेता नाम स्वये व्हावे! भगवंताच्या स्मरणी राहुनि पुण्य जोडावे!

रामनाम घेता घेता नाम स्वये व्हावे! 
भगवंताच्या स्मरणी राहुनि पुण्य जोडावे!ध्रु.

नामस्मरणे आत्मोद्धार
नाम व्हावा सहजोद्गार 
सद्‌बुद्धीसी कधि न साधके फाटे फोडावे!१

सद्बुद्धीचा दाता राम 
तारक राम, भयहारक राम 
प्रारब्धे आलेल्या भोगा हासत भोगावे!२

नाम स्मरता येती सद्‌गुण
नाम स्मरता पळती दुर्गुण 
राम भानु वरि येता सोऽहं पद्मे उमलावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १४७ (२६ मे) वर आधारित काव्य.

जो नामस्मरण करतो असे म्हणतो तो माझ्यावर उपकार करतो असे मला वाटते. कारण जी व्यक्ती नामस्मरण करते ती स्वतःचा उद्धार करून घेत असते, म्हणजे पर्यायाने माझ्यावर उपकारच करीत असते. भगवंताचे स्मरण हे सद्बुद्धीला व विस्मरण हे दुर्बुद्धीला कारण आहे. सर्व सोडून भगवंताच्या स्मरणात राहिले पाहिजे, परंतु व्यवहार नीट करून त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवणे हे त्याहिपेक्षा श्रेष्ठ होय. अनुसंधानात स्त्री-पुरुष, श्रीमंत -गरीब, हे भेद नाहीत. इतर साधनांनी जे साधायचे ते नुसत्या अनुसंधानाने साधते हाच या युगाचा महिमा आहे. इतर विषय मनात न येता एकाच विषयावर मन एकाग्र होणे याला अनुसंधान असे म्हणतात. देवा प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस.

Monday, May 25, 2026

गृह स्वर्ग हे गमावे!

आधी असे पहावे 
गृह स्वर्ग हे गमावे!ध्रु.

नामात राहिल्यास
भवभ्रांतिचा निरास 
भजनात दंग व्हावे!१

आनंद हा विशाल
स्वार्थास घालवील 
नामे मनी ठसावे!२

आनंद हाच नित्य
तो देवरूप सत्य
विषयातुनी वळावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १४६ (२५ मे) वर आधारित काव्य.

आपली वृत्ति अशी असावी की ज्याला आनंद पाहिजे असेल त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. जीवन हे मूलतः आनंदमय आहे. सृष्टिक्रमावर सोडले तर ते सुखी होईल. सर्व जगाला आनंद हवा असतो. आनंद हा शाश्वत आहे; पण आपण विषयातच आनंद मानतो, त्यामुळे खरा शाश्वत आनंद आपल्याला मिळत नाही. वासना भगवंताकडे वळवली तर माणसाला आनंदरूप बनविते, पण ती जर विषयाकडे वळली तर त्याला दुःखामध्ये लोटते.  वासना, म्हणजे अभिमान किंवा मीपण, हा मनुष्याचा शत्रू असून तो त्याच्या आनंदावर विरजण घालतो. वासनेला जिंकण्यास भगवंताच्या नामात राहण्यासारखा दुसरा उपाय नाही. वासना न ठेवता कर्म करणे याचेच नाव संन्यास. जेथे वासना संपली तेथे आनंदच आहे. सदासर्वकाळ नामात राहिल्यास वासनेचा हळूहळू अंत होऊन केवळ आनंदच आपल्याजवळ राहील.

Thursday, May 21, 2026

अट्टाहासे निदिध्यासे, नाम घ्यावे नाम घ्यावे!

गोडी कळो अथवा न कळो, नाम घ्यावे, नाम घ्यावे!
अट्टाहासे निदिध्यासे, नाम घ्यावे नाम घ्यावे!ध्रु.

हवा आनंद आनंद 
घेणे नामाचाच छंद 
गावे सुस्वर, नाचावे नाम घ्यावे राम व्हावे!१

नामस्मरणात हित
होऊ वासनारहित
जाणण्यास भगवंता नाम घ्यावे नाम गावे!२

जरी प्रपंच अपूर्ण 
करी रामराया पूर्ण
राम आहे प्रेममूर्ति रामा नामात पहावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १४२ (२१ मे) वर आधारित काव्य.

उगीच वरवर नामस्मरण करू नये, ते अट्टाहासाने व अंत:करणपूर्वक घ्यावे यातच खरे हित आहे. प्रत्येक जीवाला भगवंताची गरज असल्यामुळे त्याच्याशिवाय त्याला चैन पडत नाही. प्रपंचात कुठेतरी कमतरता नेहमी असायचीच, त्याची पूर्तता भगवंताशिवाय होत नाही. आपल्याला असणारी तळमळ ही भगवंताची म्हणजे पूर्णत्वाची तळमळ आहे. प्रत्येकाला आनंद पाहिजे आहे. आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे. भगवंत हा प्रेम-मूर्ति आहे.  आपण आपले मागील घडलेले सर्व भगवंतांना अर्पण करावे, मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते.

Tuesday, May 19, 2026

दुःखाचे हे मूळ, पडला रामाचा विसर!

दुःखाचे हे मूळ, पडला रामाचा विसर!ध्रु.

रामासंगे नाही दुःख 
रामावीण नाही सुख
विटत नाही विषया जीव अज्ञानी पामर!१

जे जे धन हाती आले
रामाविण वाया गेले
खरे सुख ते लाभे ना लागे हुरहूर!२

"मी माझे" विसरायाचे 
राम दास मज व्हायाचे 
जोडताच रामराणा दुःख जात दूर दूर!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १४१ (२० मे) वर आधारित काव्य.

Sunday, May 17, 2026

राम कर्ता, राम दाता याचसाठी न लगे चिंता!

राम कर्ता, राम दाता
याचसाठी न लगे चिंता!ध्रु.

सतत जपणे रामनाम
देह होईल मुक्तिधाम
राम अंतरी राहता!१

मृत्युभय सरते सरते 
तळमळही नुरते नुरते
राम आहे शांतवीता!२

"हवा राम, हवा राम"
म्हणुनि घोकू रामनाम
तोच गुंता सोडावीता!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १३८ (१७ मे) वर आधारित काव्य.

सर्व परमात्माच करीत आहे असे मानले, म्हणजे काळजीचे कारण उरत नाही. परमेश्वराची इच्छा प्रमाण मानल्यावर सुखदुःख मानण्याचे कारण नाही. अशी भावना ठेवून वागावे की मी देवाचा आहे; तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काही झाले तरी मला काळजी करण्याचे कारण नाही. हे सर्व नामस्मरण केल्याने साधते. म्हणून मी आज पासून सतत नामस्मरण करीत राहणार असा निश्चय करावा.

Monday, May 11, 2026

श्रीनारायण महाराज ! जय जय नारायण महारा‌ज!

श्रीनारायण महाराज ! जय जय नारायण महारा‌ज!ध्रु.

भगवंताने तुला निवडले, बजाव तुझिया मनास पहिले 
भाग्य तुझे की भक्तिपथावर नकळत पडती पुढे पाउले 
बंधन छे छे नियम हिताचे पाळ सोडुनी लाज!१

वेदाध्ययने जे जे जमते ते ते नामस्मरण साधते 
सहनशीलता तनात येते, मना उलटवी नामच बनते 
मार्दव संभाषणी, दृष्टितुन सुधा सर्वदा पाज!२

दत्तराज आवडते दैवत जनात अथवा वनात सोबत 
गानकला या मना नीववत, शांति नसे क्षणभर ही सोडत
सीमा सगळ्या पुसून जातिल, अवनीवर गुरुराज!३ 

चुकून कोणाचा ना मिन्धा मनात जपतो हरिगोविंदा
संध्यावंदन सुसंधि साधा, बरवा कल्याणाचा धंदा 
सत्यनारायण व्रत चढवी दिव्यप्रभेचा साज!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.०३.२००४

Saturday, May 9, 2026

नामस्मरण करावे, सदा आनंदी असावे!

नामस्मरण करावे, सदा आनंदी असावे!ध्रु.

नाम घेणे करा नेम 
हृदयी फुले रामप्रेम 
कृपा करील 'श्रीराम' रामचरण भजावे!१ 

नको गुंतणे कशात 
राहू शुद्ध- बुद्ध- शांत 
जसे गगन तैसेच जगी निर्लेप असावे!२ 

देव येइल वर्णिता 
परि नामाची महत्ता 
कशी आहे शब्दातीत नाम घेऊनी पहावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १३० (९ मे) वर आधारित काव्य.

आपल्या घरातील वातावरण शुद्ध शांत आणि पवित्र असावे. तुमचे अंत:करण मात्र भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेले राहू द्या. कोणाशी वाद घालीत बसू नका. जगाचा मान फार घातक आहे. प्रेमात गुंतू नका, तसेच द्वेष मत्सरातही गुंतू नका. दोन्ही सारखेच घातक आहेत. आपले कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करून त्याचे अनुसंधान अखंड टिकू द्या. येथून रामाजवळून काही मागून नेणेच असेल, तर त्या नामाचे प्रेम तुम्ही सर्वांनी मागा. सर्वांनी नामस्मरण करा आणि आनंदात राहा. राम कृपा करील हा भरवसा बाळगा.

Monday, May 4, 2026

साधनी रमावे, संतरूप व्हावे!

साधनी रमावे, संतरूप व्हावे! ध्रु. 

चित्त शुद्ध होता 
प्रिय बनू संतां -
नाम नित्य घ्यावे!१

संत ना देहात 
संत साधनात 
तत्त्व आचरावे!२ 

करिता अंगीकार 
आनंद अपार 
देहा विसरावे!२

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १२५ (४ मे) वर आधारित काव्य.

परमार्थास संतांचे अधिष्ठान आवश्यक आहे. चित्त शुद्ध नसेल तर संतांच्या जवळ जाऊन तरी काय उपयोग होणार? संत हे काही देहात नसतात, त्यांना आपण देहात पाहू नये, ते जे काही सांगतात, त्या साधनात ते असतात. आपण जर चित्त शुद्ध करून गेलो तर आपल्याला संतांची भेट होते व भेट झाल्यावर, जे त्रिभुवनातही मिळणार नाही ते ते देतात. ते सांगतील तेच करणे हीच त्यांची खरी सेवा होते. गुरुने एकदा आपल्याला आपले म्हणावे हेच शिष्याला मिळवायचे असते. गुरु आपल्याला निवृत्ती देतात. निवृत्ती दिल्यावर विषयांची प्राप्ती व्हावी ही आठवणच जाते.

Thursday, April 30, 2026

भगवंताचे नाम जिथे, संत निवासा येती तिथे !

भगवंताचे नाम जिथे, 
संत निवासा येती तिथे!ध्रु.

नामस्मरणी मन रंगावे 
रामचरणी लीन व्हावे
शरण गेलिया रामाते!१

नारायण हो मनुजाचा-
मार्ग न चुकला जर त्याचा 
कृपा केलिया रघुनाथे!२

सृष्टि पहावी भगवत्कारी
मन ठेवावे तिच्यावरी 
श्रद्धने प्रचिती येते!३

भगवन्नामे संतसंगती-
करतलि येती चारी मुक्ती
पराशांति मन अनुभविते!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १२१ (३० एप्रिल) वर आधारित काव्य.

Wednesday, April 29, 2026

डोळे असुनी आंधळे त्या संतच कोठे भेटेना!

डोळे असुनी आंधळे त्या संतच कोठे भेटेना!ध्रु.

अंतरी भावाची वाण 
जवळि ना थोडी ही जाण 
विषयकर्दमी लोळला त्या गंगाजलही पिववेना!१

अहंता सोडि नच ज्याते
तयाची झिंग चढत जाते 
सुटेना ज्यास आसक्ती तयांसी तोल गवसेना!२

असत् जे तेच उरि धरि‌ले
भ्रमाने सत् ही लाथाडिले
फेकिले दूर जर परिसा, लोहता खचित संपेना!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १२० (२९ एप्रिल) वर आधारित काव्य.

कामवासना आणि पैसा ही दोन्ही परमार्थाला विघातक आहेत.  एखादा त्यागी मनुष्य सर्व देईल पण "स्व" देणार नाही, "स्व" देऊन "सर्व" ठेवले तरी चालेल पण "सर्व" घेऊन "स्व" ठेवला तर मात्र ते चालणार नाही. म्हणजेच "मी देतो" ही भावना राहिली, तर सर्वच देणे वाया जाते.  संतांचा संतपणा दिसत नाही, याचे कारण आमच्यात तळमळ नाही. सत्ययुगात जो राम होता तोच आजही आहे, पण माझा भावच कमी झाला त्याला काय करावे? जो भगवंताचा झाला त्याचेच कार्य पूर्ण झाले व त्यालाच खरे समाधान मिळाले.

Tuesday, April 28, 2026

संत हवासा वाटावा, देव तयांतचि भेटावा!

संत हवासा वाटावा, 
देव तयांतचि भेटावा!ध्रु. 

वाट चुकली तर संगे येतो 
बोट पकडुनी तो चालवितो
तो करुणाघन बरसावा!१

विषय सुटावा, शिव गाठावा 
भेद मिटावा, भ्रमहि फिटावा 
हृदयासनि बसण्या यावा!२

उक्ति कळावी, कृती घडावी
संत अनाथा मार्गी लावी 
तळमळ लागो या जीवा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ११९ (२८ एप्रिल) वर आधारित काव्य.

विषयाची आवड कमी होऊन खरी तळमळ लागली म्हणजे संत भेटतो. असंताची आवड नाहीशी होईल तेव्हाच संत हवासा वाटेल.  विषय आपल्याला त्रास देतात पण ते सोडावे कसे हे समजत नाही.  जंगलात सापडलेल्या माणसाप्रमाणे आपले झाले आहे. आपली वाट चुकली आहे असे ज्याला वाटेल तोच जंगलातून बाहेर जाण्याची वाट विचारतो. कर्ममार्ग सांभाळताना "कर्ता मी नव्हे" हे सांभाळणे जरूर आहे. स्वतःला कसे विसरावे हे कळण्यासाठीच संतांना शरण जावे. ज्याचे अंत:करण शुद्ध आहे तो स्वतः तर आनंदी असतोच, पण त्यामुळे भोवतालचे वातावरणही आनंदाचे बनते.

Sunday, April 26, 2026

संते महत्कार्य केले भगवंता सगुणी आणिले!

संते महत्कार्य केले
भगवंता सगुणी आणिले!ध्रु.

प्रेम आले साधनी 
राम भरला लोचनी 
जणु पुण्य फळा आले!१

"राम कर्ता" बोधिले 
"राम दाता" वर्णिले 
भिन्नत्वचि विलया नेले!२

रुचि आली सेवेसी
वसला देव हृदयदेशी
सद्गुरु प्रसाद अनुभविले!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ११७ (२६ एप्रिल) वर आधारित काव्य.

भगवंताला सगुणामध्ये आणला हा संतांचा आपल्यावर फार मोठा उपकार आहे. संतांनी आपल्याला सांगितले की, ही दृश्य मूर्ती तुझी आहे, "तुला हव्या असणाऱ्या सर्व वस्तू देणारा भगवंत तोच आहे" ही जाणीव व  कल्पना आपल्या ठिकाणी वाढत गेली तर त्यामुळे "भगवंत दाता आहे" ही जाणीव उत्पन्न होईल. "भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझ्या सुखाचा आधार आहे, तो माझे कल्याण करणारा आहे," ही जाणीव झाली की, जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेनेच मिळाले ही भावना होऊन, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान टिकेल. सर्व भोग भोगून काळजी नसणे हे उपासनेचे खरे बीज आहे. जगाचे खरे स्वरूप कळण्यास सगुण उपासनाच कारणीभूत आहे. आपण ज्या मूर्तीची उपासना करतो त्या मूर्तीमध्ये तेज वाढत असते.

Friday, April 24, 2026

दान एवढे द्यावे संता, आज्ञापालन व्हावे

दान एवढे द्यावे संता, आज्ञापालन व्हावे!ध्रु. 

तुम्ही भगवंताच्या मूर्ती 
तुम्ही ध्येयाची परिपूर्ती
श्रद्धाबळ अंतरात संता जोमाने वाढावे!१

हवेपण जधी कण ना उरले
दुःखाचे ते कारण सरले
अपुल्या चरणींची धूली मज संता झणी करावे!२

अपार आहे सद्गुरु महिमा
साधुसंत साक्षात् परमात्मा
अपुल्या स्मरणे यावा गहिवर मस्तक पदि टेकावे!३

 रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ११५ (२४ एप्रिल) वर आधारित काव्य.

संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहणे.
मनाच्या विषादाला कारण एकच असावे की, भगवंताचा मी अजून झालो नाही. हवेपण नाहीसे झाले म्हणजे मग दुःखाचे कारणच राहात नाही. श्रद्धेने जे काम होते ते दुसऱ्या कोणत्याही तपश्चर्येने होत नाही. गुरु म्हणजे साक्षात् परमात्मा. त्याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या.

Wednesday, April 22, 2026

अपार सत्संगाचा महिमा!

अपार सत्संगाचा महिमा! 
अगाध सत्संगाचा महिमा!ध्रु.

ऐसे दुसरे साधन नाही 
भगवंताप्रत घेऊन जाई
प्रकाश नुरवी लेश तमा!१

संतांना या मरण कुठे 
जन्ममृत्युचे मूळ तुटे 
या महिम्यासी नच उपमा!२

ईश्वर आहे याची प्रचिती
या संतांची निरखा भक्ती
अनुभवाच यांचा प्रेमा!३

देहाचा मग विसर पडे
भगवंताचे स्मरण घडे
संतोषाची परिसीमा!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ११३ (२२ एप्रिल) वर आधारित काव्य.

मनुष्य जन्मास येणे, संतांची भेट होणे, आणि त्यांना ओळखून त्यांचा सहवास होणे, या तिन्ही गोष्टी फार दुर्घट आहेत. म्हणूनच संतसमागमासारखा लाभ नाही असे म्हणतात. मागण्याची इच्छाच संत नष्ट करतात. आत वावरणाऱ्या भगवंताच्या ज्ञानाला योग्य असा सत्पुरुषाचा देह असतो. देहाच्या पलीकडे असणारे व कायमचे टिकणारे आणि देहाला विसरून व देवाला स्मरून जे मिळवायचे असे भगवंताचे सुख आहे ते प्राप्त होण्याचा मार्ग समजावून घेण्यासाठी आपण सत्पुरुषाकडे गेले पाहिजे. संत आपल्याला सत्य स्वरूपाची ओळख करून देतात. संतांची संगत करणारी सर्व माणसे भगवंतापर्यंत पोहोचतात. संगतीचा परिणाम जितका नकळत होतो, तितका कृतीचा होत नाही म्हणून सत्संगती धरावी.

Tuesday, April 21, 2026

त्यात समाधान थोर आहे

संताज्ञापालन, संतसमागम!
त्यात समाधान थोर आहे!ध्रु. 

देव कर्ता मानावे 
अभिमाना सांडावे 
आत्माराम तेणे क्षणी तोषताहे!१

नव्हे मी देहाचा
नव्हे मी मनाचा
विषयाची नावड सत्संग देताहे!२ 

देव असे भावात
देव वसे नामात
नामचिंतामणी भक्ता लाभलाहे!३

संत लाज राखे
संत भक्ति पोखे 
मधुर वचने प्रेम वर्षताहे!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ११२ (२१ एप्रिल) वर आधारित काव्य.

समाधान एकपणात आहे, अद्वैतात आहे. मी कर्ता नसून देव कर्ता आहे असे मानावे. मी नाही कोणाचा हे बघावे. मी देहाचा व मनाचाही नाही. संत विषयाची आसक्ती कमी करतात; अशा संतास शरण जावे. देव भावात असतो; तो भाव शुद्ध व उच्च असावा. सत्समागम म्हणजेच सत्याचा समागम; संत सांगतील त्याप्रमाणे वागावे. भगवंताला विसरून भजन करू नका. जगाच्या लाजेला भिऊन भगवंतास अंतर देऊ नये. निर्विषय चित्त संतांनाच करता येते. नामाच्या योगानेच संत ओळखता येतात, जोडता येतात, आणि टिकविता येतात.

Monday, April 20, 2026

संत सह‌वास भाग्य हेच थोर!

संत सह‌वास भाग्य हेच थोर!ध्रु.
 
तेणे रामरूप जाहलेसे मन 
अतां अम्हांलागी दिसे जग शून्य
संते मरणाचा संपविला घोर!१

देहबुद्धि गेली, भक्ति रुजविली
"मी तो परमात्मा" खूण पटविली
संते पिटाळिला दूर दूर चोर!२  

संते जोडियले श्वासासंगे नाम
मन घोकु लागे क्षणोक्षणी राम
देवा बांधण्याते दिला सोऽहं दोर!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १११ (२० एप्रिल) वर आधारित काव्य.

Saturday, April 18, 2026

उपजण्या अंतरि भक्ति, झडो झडो देहबुद्धि

उपजण्या अंतरि भक्ति, झडो झडो देहबुद्धि!ध्रु.
 
हात जोडिले श्रीरामा 
तूच धाव भक्तकामा 
तगमग शांतवी रे करि "राममय" वृत्ती!१

तुज नित्य आठवावे
देहालागी विसरावे
असे करी रामा काही तुझे ठायी जडो प्रीती!२

वृत्ति ज्याची राममय 
तोचि तोचि निरामय
संतसंग दे गा सदा मागणेच हे संप्रती!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०९ (१८ एप्रिल) वर आधारित काव्य.

परमार्थात भक्ती म्हणजे परमात्म्याची आवड असा अर्थ आहे. भक्तीमार्गातील पहिली पायरी म्हटली म्हणजे मोबदल्यारहित, निष्काम, नि:स्वार्थी परमात्मस्मरण करणे; व शेवटची पायरी म्हणजे आपण स्वतःला विसरणे, देहबुद्धी विगलित होणे, ही होय. देहरक्षण परमात्मप्राप्ति करिता करावे. प्रेम व उपचार यांचा अन्योन्य संबंध असतो. या उपचाराने भगवंताशी संबंध वाढतो. संत विषयात देव पाहतात, पण आम्ही मात्र देवातसुद्धा विषय पाहतो. संतांची वृत्ती राममयच असते. परमार्थात मर्यादा एकच, आणि ती म्हणजे भगवंताच्या नामापासून विचलित न होणे.

Wednesday, April 15, 2026

सत्संगाचा लाभ मोठा! आनंदा ना तोटा!

सत्संगाचा लाभ मोठा! 
आनंदा ना तोटा!ध्रु.

मन द्रव्यांतरि गुंतत नाही 
ओढ हरीची लागुन राही 
गहिवर ये प्रभु स्मरता!१

सर्व गुणांचा सागर ईश्वर 
तो संतांचा बनतो किंकर 
अपार संत महत्ता!२ 

विकार विरती, विचार स्फुरती
हृदि पाजळती ज्ञानज्योती 
विश्व धवळले आता!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०६ (१५ एप्रिल) वर आधारित काव्य.

सत्संगतीच्या योगे मन पैक्यावर गुंतून राहात नाही. जे सुख चिरकाल टिकणारे नाही ते घेऊन काय करायचे? पैक्यासारख्या निर्जीव वस्तूत आपले मन किती गुंतून राहते! पैशाचे नाव अर्थ, पण तो करतो मोठा अनर्थ. पैसा प्रपंचाला पुरेसा असावा! म्हणजे किती तर पेन्शन असेल तर त्यांना रोजच्या निर्वाहापुरता असला म्हणजे पुरेसा झाला. आपल्याला अडचण नाही पडली, की आपली श्रीमंतीच आहे. पैशाच्या बाबतीत आपण प्रयत्न मात्र आग्रहाने करावा आणि नंतर होईल तसे होऊ द्यावे. आपण आतून निष्काम, निर्लोभ व निरिच्छ असावे. सत्संगती पासून सद्विचार व सद्वासना प्राप्त होतात. ज्याचे विचार चांगले तो मनुष्य खरा चांगला होय; व जिथे भगवंताचे अनुसंधान आहे तेथे राहणे हीच खरी सत्संगति होय.

Tuesday, April 14, 2026

ऋणी असावे यासाठी, संत जागे करताती

ऋणी असावे यासाठी, संत जागे करताती!ध्रु. 

त्यांची तळमळ 
क्षाळितसे मळ 
चुकल्या पथिका मधुर बोलुनी पथावरी आणती!१

त्यांच्या लीला 
जग तरण्याला 
स्वार्थाचा लवलेश न चित्ती ते तर शुद्धमती!२

अनुभव बोले
हृदयी ठसले
संतांच्या आज्ञेचे पालन देही दे मुक्ती!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०५ (१४ एप्रिल) वर आधारित काव्य.

संगतीचा परिणाम नेहमी मनावर होतो; म्हणून चांगल्या विचाराच्या माणसांची संगत धरावी. आपल्याला आपल्या ध्येयाचा विसर पडला, परंतु संतांनी आपल्याला जागे केले. ते ज्या लीला करतात त्या जगाच्या कल्याणासाठी असतात. ते स्वस्थ बसलेले दिसले तरी जगाचे कल्याण करीतच असतात. ज्या संतांचा ग्रंथ आपण वाचतो, त्यांच्या कृपेवाचून तो नीट समजणार नाही. ज्याच्यावर त्यांची कृपा आहे, त्याला काही विद्वत्ता नसताना देखील त्या ग्रंथाचा बरोबर अर्थ अगदी स्वाभाविकपणे कळेल. संतांची आज्ञा पालन करणे म्हणजे संतसेवाच होय. सत्पुरुषांच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनविणे हा खरा सत्समागम आहे.
आपल्याला जीवनांतील ध्येयाचा विसर पडल्यामुळे संत आपल्याला जागे करतात.

Monday, April 13, 2026

देह सावलीप्रमाणे हे, ज्ञान संतांना

देह सावलीप्रमाणे हे, ज्ञान संतांना!ध्रु. 

व्यवहारापुरती 
तयांसी असते देहस्मृती
विकार म्हणुनी कधि न बाधती संतांचिया मना!१

जगाहुनी भिन्न-
तयांसी भक्ति हेंच अन्न 
भक्ति भोजनी, भक्ति प्राशनी, भक्ति पुरे श्वसना!२

लोकांती, एकांती
बिघडत ना शांती
वेदांताचे मर्म खरोखर ठावे या सज्जना!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०४ (१३ एप्रिल) वर आधारित काव्य.

साधुसंत देहास सावलीप्रमाणे मानतात. सावलीला दुःख झाले म्हणून रडणे मूर्खपणाचे आहे; म्हणूनच संतांच्या मनावर सुखदुःखाचा परिणाम होत नाही. संतांना व्यवहारापुरतीच देहाची स्मृती असते. संत एकांतात जातात याचे कारण असे की लोकांतात त्यांना भेटणारे निराळे असतात व एकांतात भेटणारे निराळे असतात. लोकांतात संतांची शांती बिघडते असे मुळीच नाही, पण एकांतात भेटणाऱ्यांना लोकांतात भेटता येत नाही, म्हणून ते एकांतात जातात. संतांच्या वचनाचा ओढून ताणून अर्थ करू नये, त्याचा सरळ अर्थ घ्यावा. संतांचे ज्ञानच असे असते की त्यांना वेदांताचे मर्म आपोआप कळते.

Sunday, April 12, 2026

साधावी गुरुसेवा, होण्यासी भगवद्भक्ती

साधावी गुरुसेवा, होण्यासी भगवद्भक्ती!ध्रु. 

भगवंताची मूर्ती दिसली 
तीच मानली गुरुमाउली 
गुर्वाज्ञेचे पालन होता संपणार आसक्ती!१

जिज्ञासा जर तीव्र जाहली
प्रगतीसाठी वाटच खुलली
जोपासावी निष्ठा शिष्या तीच महत्तम शक्ती!२

खोल तळाशी जाता जाता
विचारमौक्तिक हाती येता 
अभ्यासी रंगावे - ध्येयाची होण्या प्राप्ती!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०३ (१२ एप्रिल) वर आधारित काव्य.

भगवंताची मूर्ती पहावी व तीच आपली गुरुमाऊली मानावी. संताजवळ राहावे व भक्तीचे साधन करावे.  भगवंताची भक्ती व्हायला गुरुसेवा हे एक मुख्य साधन आहे. अत्यंत तळमळीशिवाय भगवंताचा योग शक्य नाही, पण संत समागम प्रारब्धाने होतो. संतांना जिज्ञासा मूळचीच असते, आपल्याला ती नाही म्हणून ती उत्पन्न करणे भाग आहे.  काही केल्याशिवायत सद्वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय म्हणजे सत्संगती होय.

Saturday, April 11, 2026

साधने न साधते जे, सत्संगे साधते

साधने न साधते जे, सत्संगे साधते!ध्रु. 

संत राहतात देही
परी ते विदेही 
अहर्निश चित्तावरी राज्य त्यांचे चालते!१

संतवचन परिसावे 
तसे तसे आचरावे
विषय याचना त्यांपाशी जराही न साजते!२

'राम कर्ता' मानतात 
भूती देव पाहतात
संत्संगी साधकासी आत्मज्ञान होते!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०२ (११ एप्रिल) वर आधारित काव्य.

संतांनी जगातील राज्य मिळवली नाहीत, पण त्यांनी स्वतःवर राज्य केले. संतांचे वचन पूर्णपणे समजून ऐकत जावे.  आपल्या आणि संतांच्या कर्मामध्ये फरक आहे.  ' राम कर्ता ' या भावनेने त्यांनी कर्म केले, आपण आपलेपणाने ते करतो, म्हणून आपल्याला कर्म बंधनकारक बनते.  जो विषयाचे प्रेम देईल तो खरा संत नव्हे. साधनांनी जे साधत नाही ते संतांचे सहवासात राहिल्याने साधते. आपण ज्या संताकडे जातो त्याला विषयाचे प्रेम असत नाही, इतकेच नव्हे तर त्याच्या माणसाने विषयांमध्ये मग्न राहिले असता त्याच्या हृदयाला पीळ पडतो.  आपण विषयमग्न असलेले पाहून संतांना वाईट वाटते. जिज्ञासू शिष्य भेटला तर संताना आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते.

Friday, April 10, 2026

कैसे वर्तावे या जगती

सज्जन सांगती कैसे वर्तावे या जगती!ध्रु.

बंधनास कारण 
मनाची ठेवण
सुखदुःख देइ न दुसरा असो द्यावे चित्ती!१

राबावे अखंड
जाळुनी पाखंड 
फलाशा न बाळगावी तीच थोर भक्ती!२ 

उगम जसा रामी 
विलय तसा रामी 
रामार्पण होण्याची ही सांगतात रीती!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०१ (१० एप्रिल) वर आधारित काव्य.

बंधनास खरे कारण परिस्थिती नसून आपल्याच मनाची ठेवण हे आहे. जाणिवेने जैसे घ्यावे। तैसे मनाने सुखदुःख भोगावे। अखंड राखावे अनुसंधान। येणे कर्म होईल सहज रामार्पण। प्रयत्नेविण राहो नये। फळाची आशा ठेवू नये। भगवंताला विसरू नये।

Thursday, April 9, 2026

तुम्ही संत थोर कृपावंत

तुम्ही संत थोर कृपावंत!ध्रु.

मनाचे खंबीर 
सागर गंभीर 
फुलविता जगती वसंत!१

धीर पुरविता
पाठिशी राहता
वानू कैसे सद्‌गुण अनंत!२

आळस असेना 
फलाशा शिवेना 
महीवरी तुम्ही भगवंत!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०० (९ एप्रिल) वर आधारित काव्य.

संत आपल्याला मार्ग दाखवायला तयार असतात, परंतु आपला अभिमान आपल्या आड येतो व आपण संतांना नावे ठेवतो.  जगाचे खरे स्वरूप समजून घेण्यासाठी जो सुखदुःखाच्या जाळ्यात सापडला नाही, त्याच्याकडे जावे. संत कर्म करूनही त्याच्या फळाच्या आशेने लिप्त होत नाहीत.

Monday, April 6, 2026

संत भगवंत चालते - बोलते

संत भगवंत चालते - बोलते!ध्रु.

भय घालविती 
नाम वदविती
घास कैवल्याचे भरविती हाते!१

संतसमागम 
लाभ हा परम
अंतरीची ज्योत जगा उजळीते!२

त्यांची पदसेवा 
अनमोल ठेवा 
संतकृपा भक्ता मार्गासी लावते!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ९७ (६ एप्रिल) वर आधारित काव्य.

व्यवहारात ज्याला चांगले वागता येत नाही, त्याला नाही परमार्थ करता येणार. निर्गुण जरी समजले तरी सगुण नाही सोडू. संतांचा समागम करावा म्हणजे आपण मार्गास लागतो. संत हे देहाचे रोग बरे करीत नसून, त्या रोगाची भीति नाहीशी करतात.  संत हे चालते बोलते देवच आहेत. भगवंताचे नाम सिद्ध करून देणे, हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय.  हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हेच खरे संतांचे कार्य होय.

Sunday, April 5, 2026

संतसंगे दोष नासताती

संतसंगे दोष नासताती!ध्रु.
 
नामाची आवड 
विषयी नावड  
संत हाती मोक्षसुख देती!१

पळविती पाप 
निवारिती ताप 
संत मेघ होउनि वर्षताती!२

संतवाणी गोड 
अमृताची जोड
संत स्वये निर्भयत्व देती !३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ९६ (५ एप्रिल) वर आधारित काव्य.

सत्पुरुषाच्या संगतीत आपले पाप शोषून घेतले जाते आणि पुन्हा तो सत्पुरुष स्वतः शुद्ध तो शुद्धच राहतो. विषयी लोकांची संगत मात्र फार बाधक असते. वाईट विचार मनात आले की नामाची जोड ठेवावी. संत आपल्या हिताचे सांगतात, पण आपले मन विषयात वावरत असल्याने त्यांचे बोलणे आपल्या मनात पूर्णपणे ठसत नाही.  ज्यास भगवंताचे अधिष्ठान आहे त्याचे कडक बोलणेसुद्धा कोणास लागणार नाही. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे, कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही.

Saturday, April 4, 2026

तोचि संत

सृष्टि राम रूप शिष्य रामरूप
विश्व राम ज्यास तोचि संत!१

देह‌बुद्धि नाही आत्मबुद्धि आहे 
निवांत जो राही तोचि संत!२

दुःख मूळ जाणे सोऽहंभाव बाणे 
खणखणीत नाणे तोचि संत!३

पा‌हुनिया आर्त कळवळे मनात
येतसे धावत तोचि संत!४

दुरित जळावे तिमिर हटावे 
आणवी प्रभात तोचि संत!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ९५ (४ एप्रिल) वर आधारित काव्य.

आपले शहाणपण बाजूला ठेवून जो संतास शरण जातो तोच खरा साधक. संत हे पहिल्याने आपल्यातीलच होते, परंतु अनुसंधानाच्या मार्गाने ते वर गेले. आपली इच्छा बलवत्तर असेल तर संतच आपला शोध करीत आपल्याकडे चालत येतील. संताला कर्म मागेपुढे करता येते पण ते टाळता येत नाही.

Friday, April 3, 2026

प्रभात काली "माधवनाथा" ध्याना बसवावे

प्रभात काली "माधवनाथा" ध्याना बसवावे 
अंतरि आपण भवती आपण सदा जाणवावे!ध्रु.

स्वामी माझ्या मस्तकि राहो सदा वरद हात 
मनास वळवा माझ्या नकळत तुम्ही आत आत 
मन पवनाशी 'नाथा' आपण अलगद जोडावे!१

इंद्रिये न ती मुळीच वैरी बालमंडळी ती 
सत्संगाने श्रवणाने ती अंकित जणु होती 
मना सज्जना सन्मार्गावर आपण आणावे!२

ओवी ओवी वाचत जाता कानी ये वाणी 
प्रवचन स्फुरते आतुन नकळत जरि मी अज्ञानी 
अनुग्रहाने मना माझिया आपण बदलावे!३ 

नित्य नवा दिन गुरुभेटीचा नवाच आनंद 
सांजसकाळी मनास रमवी माझा गोविंद 
'राम कृष्ण हरि' नामामृत मी सदैव सेवावे!४

पाठीवरुनी हात फिरावा प्रेमे निरखावे 
बोलला न जरि संवादाचे सुख मी भोगावे 
स्वरूप आनंदाचे दर्शन नित मज घडवावे!५ 

'अनुसंधानी संतत ठेवा' दुजे नको काही 
मनास माझ्या अभ्यासाचा ध्यास जडुन राही 
गावे भावे मी डोलावे - शांत स्वस्थ व्हावे!६ 

असो कुठेही असो कसाही स्वामी हृदयात 
तेच आतुनी पुढची पुढची दाखवती वाट 
साधनेतल्या आनंदाच्या गावाला जावे!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३०.०९.१९८९

अरे साधका ऊठ तू जाग आता

अरे साधका ऊठ तू जाग आता
तुला जागवी सद्‌गुरुनाथ त्राता
स्वरूपी रमावे, स्वरूपास ध्यावे
प्रभाते मनी माधवा आठवावे!१

तुझ्या अंतरी तो कधी बैसलासे
प्रतीक्षा करी, मूक तो जाह‌लासे
वरी मौन नेत्रांस झाकूनि घ्यावे
प्रभाते मनी माधवा आठवावे!२

जिवाची शिवाशी अशी भेट व्हावी 
विदेहीपणे सर्व काया निवावी
कसा चालला आत सोऽहं स्वभावे 
प्रभाते मनी माधवा आठवावे!३

करी साधना तू मदालस्य सोड
तुझी बंधने तूच जाणूनि तोड 
विवेके विचारे तदाकार व्हावे
प्रभाते मनी माधवा आठवावे!४

जरा हास प्रेमे जरा गोड बोल
तुला पाहता येत आप्तांस डोल 
जना आपलेसे करी प्रेमभावे 
प्रभाते मनी माधवा आठवावे!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
स्वामी माधवनाथ यांना केलेली प्रार्थना
१७.०७.१९९३

Friday, March 6, 2026

जा पवना जा वेगे

आणि शिवनेरीवर एका शुभदिनी, फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१, १९ फेब्रुवारी १६३० चौघडा झडू लागला. जो तो उत्कंठेने दुसऱ्यास विचारी, "अहो काय झालं? काय झालं?"
तितक्याच उल्हसित स्वरात उत्तर येई  "मुलगा! मुलगा झाला आपल्या लाडक्या जिजाऊला! 

या पुत्रजन्मसोहळ्याचं वर्णन काय करावं? जणू काही नव्या गोकुळीं नवा कृष्णच जन्माला आला!

ही शुभवार्ता साऱ्या जणांना कळविण्याची गडावरील स्त्रियांची कोण घाई? त्यांनी ते काम पवनावरच सोपविले.

पवन दूताला त्या सांगू लागल्या!

जा पवना जा वेगे मिरव जनी शुभ वार्ता
शिवनेरी घेत जन्म शुभयोगे शककर्ता ॥ ध्रु.॥

सरली नैराश्य निशा उजळल्यात दाही दिशा
पूर्व क्षितिजि येत अरुण, देत अभय शिवभक्ता ॥१॥

दिवस खचित सोन्याचा घुमत गजर वाद्यांचा
अवतरला काय कृष्ण दंडण्यास परसत्ता ॥२॥

सह्याचल थरथरला गहिवरला मनि हसला
पाहण्यास मुखचंद्रा आतुरली उत्सुकता ॥३॥

वळत वळत बाळमुठी लव हसला जगजेठी
श्रीशिवाईचा प्रसाद उचलुनि घे वत्सलता ॥४॥

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, March 5, 2026

जेथे नाही 'राम', तेथे कैचा आराम?

जेथे नाही 'राम', तेथे कैचा आराम?ध्रु.

'मी नव्हे नव्हे' हो कोणी
तो रामच अंत:करणी 
हे ठसण्या जपणे प्रभुनाम!१

लागता प्रेम नामाचे 
आनंदे अंतरि नाचे 
तो भक्तसखा हो श्रीराम!२

'मी नुरणे' पूर्णावस्था 
लाभेल भाग्य वश होता 
परि सोडु नये कधी नाम!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ६५ (५ मार्च) वर आधारित काव्य.

ज्या प्रपंचात राम नाही त्या प्रपंचात आराम होणार नाही. एका म्यानात ज्याप्रमाणे दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे मी आणि भगवंत एका अंत:करणात राहू शकत नाहीत. संत हे भगवंताशी एकरूप झालेले असतात. नामाचे प्रेम लागले म्हणजे कर्तेपणाचा अभिमान कमी होतो. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटना "त्याच्या" इच्छेने व सत्तेने घडून येतात अशी जाणीव ज्याच्या अंत:करणात उमटली त्यांना भगवंताचे खरे अस्तित्व समजले. मी खरा नसून "तोच" खरा आहे हे सांगण्यासाठी जेथे मीच उरत नाही ती खरी पूर्णावस्था होय. नाम घेत असताना सदाचरण कधी सोडू नये. नीतीच्या मर्यादा कधी ओलांडू नयेत. निराश कधी बनू नये, देहाला उगीच कष्टवू नये, पण काही झाले तरी भगवंताचे नाम कधी सोडू नये.

Tuesday, March 3, 2026

प्रपंच ऐसा करावा!

परमार्थाच्या आड न ये जो 
प्रपंच ऐसा करावा!ध्रु.

परमार्थाचा मुख्य धंदा
प्रपंच केवळ जोडधंदा
गुंतु नये मन प्रपंचात कधि 
राघव तया विसावा!१

व्यवहाराते सांभाळावे 
आहारी ना त्याच्या जावे
सुखदुःखांच्या झंजावाती 
राघव ना विसरावा!२

प्रपंच ना कधि कोणा सुटला
भक्ताते परि राम भेटला 
आकुंचितता ताप देतसे 
संश सोडुनी द्यावा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ६३ (३ मार्च) वर आधारित काव्य 

प्रत्येक माणसाने परमार्थ हा मुख्य धंदा ठेवून प्रपंच हा जोडधंदा म्हणून करावा; म्हणजेच प्रपंचात होणाऱ्या लाभहानीचा परिणाम भगवंताचे अनुसंधानावर होऊ देऊ नये. परमार्थाचे आड प्रपंच न येईल अशा युक्तीने वागावे. भाजीला जसे मीठ लागते तसे परमार्थाला प्रपंच लागतो. मीठ नसेल तर भाजी अळणी लागते पण मीठ जास्त झाले तर भाजी खाववत नाही, त्याचप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ यांचा संबंध आहे. प्रपंचात व्यवहार जतन करावा खरा, पण तो काही सर्वस्व नव्हे. प्रपंच पाहिजे आणि दुःख नको असे म्हणणे वेडेपणाचे आहे. नुसता प्रपंच तापदायक नाही नाही तर आकुंचित प्रपंच हा तापदायक आहे. आपण ज्याप्रमाणे आपल्या या खिशातील पैसे त्या खिशामध्ये ठेवतो, त्याचप्रमाणे प्रपंचातील आपले मन आपण काढून भगवंताकडे लावावे तसे करण्यात समाधान आहे.

Monday, February 9, 2026

हनुमंत धन्य झाला!

जय जय रघुवीर समर्थ

हनुमंत धन्य झाला! हनुमंत धन्य झाला!ध्रु. 

व्रत ब्रह्मचर्य घेई 
सेवेस देह देई
कामास जिंकतो तो, हरिभक्त धन्य झाला!१ 

याचें मुखांत नाम 
बाधे न यास काम 
धारिष्ट्य-धैर्य ज्याचें लागे असे पणाला!२ 

बलवंत, भक्तिवंत
हनुमंत, बुद्धिमंत 
तुलना न सापडे हो ज्याच्या जगीं यशाला!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
१३.७.१९७४

खालील श्लोकावर आधारित काव्य.

मुखीं राम त्या काम बांधू शकेना। 
गुणे इष्ट धारिष्ट त्याचें चुकेना॥
हरीभक्त तो शक्त कामास मारी। 
जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी॥

ज्याच्या मुखी राम आहे त्याला काम बाधू शकत नाही. (नामसंकीर्तनाच्या) गुणाने विषयवासनांशी झगडण्यात त्याचें धारिष्टय-धैर्य चळत नाही. हरिभक्त हा मोठा बलिष्ठ असून तो कामास मारतो (जिंकतो) अशा प्रकारचे ब्रह्मचारी मारुतीराय धन्य होत.

Friday, February 6, 2026

शरणागति पथ एकला!

शरणागति पथ एकला!ध्रु.

नाम स्मरता 
रामच कर्ता 
कळते मला!१

कृतीच नाही
गर्वहि नाही
दिसते मला!२

नुरे वासना
स्फुरे चेतना
पटते मला!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३७ (६ फेब्रुवारी) वर आधारित काव्य.

भगवत्प्राप्तीला शरणागतीशिवाय मार्ग नाही व शरणागतीला नामस्मरणासारखा उत्तम उपाय नाही. स्मरण हा मनाचा धर्म असल्याने त्यात कृतीचा प्रश्नच येत नाही. नामाचे स्मरण होत असते, ते करू म्हणून जमत नाही. म्हणून शरणागतीला नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही. शरणागतीचा दुसरा अर्थ म्हणजे कायिक, वाचिक व मानसिक क्रिया थांबवणे. काहीही कृती न करणे हे कृती करण्यापेक्षा फार कठीण असते. गीतेत भगवंतांनी अर्जुनाला तू नुसता मला शरण ये असे सांगितले आहे. देहबुद्धी गेल्याशिवाय शरणागती येत नाही. जगातील वैभवाची आसक्ति व परमात्मप्राप्ती या दोन्ही गोष्टी एकत्र असूच शकत नाहीत. जगाकडे पाठ फिरवल्याशिवाय भगवंत मिळत नाही.

Saturday, January 24, 2026

नामसाधन संतत आवडते विश्वंभरा! पाषाणाही भंगू शके नित्य कोसळती धारा!

नामसाधन संतत आवडते विश्वंभरा!ध्रु.
पाषाणाही भंगू शके नित्य कोसळती धारा!

देह, मन दोन पेठी - मन स्थिर, देह फिरे 
प्रारब्धाच्या खुंट्यामुळे देह पेठे हे तो फिरे 
भगवंती मन स्थिर साधक हो तुम्ही करा!१

नको शंका, नको भय, नको आळस, प्रमाद 
नित्यनेमे जर झाले नाम साधन प्रसाद 
गुरुचरणी जो भाव तोच खास तारणारा!२ 

दृढविश्वासाने नाम मना आवडीने घ्यावे 
पुरे कर्तव्याचे भान तुवा राखावे राखावे 
ऐसा भक्तचि निश्चये प्रिय होतसे ईश्वरा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २४ (२४ जानेवारी) वर आधारित काव्य.

एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतले तर तो दगड नुसता भिजेल आणि पाणी निघून जाऊन कोरडा होईल पण तेच पाणी थेंब थेंब असे एकाच ठिकाणी व अखंड पडत राहिले तर त्या दगडाला भोक पडेल. त्याप्रमाणे केव्हातरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नित्यनेमाने जर नामाचे साधन केले तर ते जास्त परिणामकारक होते. जात्याला दोन पेठी असतात त्यातील एक स्थिर राहून दुसरे फिरत राहिले तर दळण दळले जाऊन पीठ बाहेर पडते पण जर दोन्ही पेठी फिरत राहिली तर दळण दळले न जाता श्रम होतात. माणसाची शरीर व मन अशी दोन पेठी आहेत. त्यातील मन हे स्थिर आहे व देह हे फिरणारे पेठे आहे. मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे व देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्या. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो. प्रारब्धरुपी खुंटा देहरूपी पेठ्यात बसून तो त्याला फिरवतो व मनरूपी पेठे स्थिर असते. देह प्रारब्धावर सोडावा.

Thursday, January 22, 2026

गणपती जनप्रिय झाला हो

गणपतीच्या लोकप्रियतेचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पड‌तात; राष्ट्रसंघटनेसाठी त्याने खानेसुमारी केली. मोजले गेलेल्या लोकांचा समूह म्हणजे गण- ज्यांच्याजवळ काही गुण आहेत अशांचीच गणना व्हायची. अशा लोकांचा - गणांचा तो नायक झाला. शिस्त - श्रमविभागणी - सहकार हे गुण त्याने निर्माण केले. शासन आणि जनसामान्य यांच्यात जेव्हढा जिव्हाळा गजाननाने निर्माण केला तेवढा एखाद्यानेच केला असेल - ऐकू याच त्याची महती!


गणपती जनप्रिय झालाऽ हो 
विघ्नेश जनप्रिय झाला...!ध्रु.

आधी केले मग सांगितले 
संघटनेचे जाळे विणले 
जनतेत मिसळूनी गेला हो!१ 

देह ढगळ साधीच राहणी 
ज्ञान खोल, बारीक पाहणी 
हा वात्सल्याचा सागर हो!२

व्यक्ती व्यक्ती याने गणिली
परिस्थितीची पारख केली 
गुण थोडा ही घे मिळता हो!३

स्वतंत्र प्रज्ञाधारी नेता 
तो सुखकर्ता तो दुखहर्ता
जिव्हाळा निर्मी जगती हो!४
 
पराक्रमीही तरी संयमी 
न्यायी निष्ठुर परंतु प्रेमी 
गणराज्य रमे गुणगानी हो!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

(गणेशदर्शन या गणपती वरील काव्या मधून)
केरवा, राग कर्नाटकी

Saturday, January 17, 2026

सुख रामाच्या ध्यानाने सुख रामाच्या नामाने!

जय जय रघुवीर समर्थ 


सुख रामाच्या ध्यानाने 
सुख रामाच्या नामाने!ध्रु. 

कथा ऐकता तन्मय होई 
देह‌भाव विसरूनियां जाई 
डोल ये रामरूपदर्शने!१ 

जिथे पहावे रामच तेथे 
"तो मी, तो मी!", मन अनुभवते 
मन अमन रामनामाने!२

रामरंगि रंगली वासना 
वेद जाहली सकल वेदना 
शिव तुष्ट भक्तिगानाने!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
०६.०३.१९७५ दासनवमी 

खालील श्लोकावर आधारित काव्य 

जगीं धन्य तो रामसूखें निवाला।
कथा ऐकता सर्व तल्लीन जाला॥
देहेभावना रामबोधे उडाली।
मनोवासना रामरूपी बुडाली॥

जो रामाच्या ध्यानाच्या सुखाने सुखस्वरूप झाला, रामाच्या कथा ऐकून जो तन्मय होऊन गेला, सर्वत्र राम आहे ह्या बोधाने ज्याची देहबुद्धि नष्ट झाली, ज्याची मनोवासना रामरूपी लीन झाली असा रामभक्त धन्य होय.

Saturday, January 10, 2026

राम कर्ता, राम दाता, ही असावी भावना!

राम कर्ता, राम दाता, ही असावी भावना!ध्रु.

"कोण मी" हे जाणणे!
भाव रामी ठेवणे 
विश्वव्यापक होत आपण सोडतांक्षणि मीपणा!१ 

विस्मृती ती दुःख देते
पामराचा अंत बघते 
राम अंती सोडवीता म्हणुनि करणे प्रार्थना!२

राम करतो ते हिताचे 
नाम त्याचे घेई वाचे 
तन प्रपंची, चित्त रामी ठाम राहो धारणा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
१०.०१.१९७४

नाम - प्रपंच सुखी करण्याचे साधन
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १० (१० जानेवारी) वर आधारित काव्य.
व्यवहार उत्तम प्रकारचा केला
पण परमात्मा विसरला
तो व्यवहार दुःखच देता झाला
मी कोण हे जाणून ठेवावे वर्तन
हेच परमार्थाचे मुख्य साधन
बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगती
चित्ती असावा एक रघुपती
काया गुंतवावी प्रपंचात 
मन असावे रघुनाथात

Thursday, January 1, 2026

इथे तिथे श्रीहरी दिसू दे..

भगवंता दे, भाव असा दे! 
इथे तिथे श्रीहरी दिसू दे! ध्रु. 

तरु श्रीहरी, तोय श्रीहरी 
जलस्थलनभही एक श्रीहरी 
सबाह्य अभ्यंतरि तो दिसु दे!१
 
भेदाची तर नुरोच वार्ता 
कसली आधिव्याधी चिंता?
सुखदुःखी समभाव असू दे!२

सुखमय अवघे जीवन व्हावे 
विश्व हेच घर मज वाटावे 
तुझ्याच चरणी देह पडू दे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
०९.०८.१९७७

हरिपाठावर आधारित काव्य.