अध्याय चौथा - ज्ञानकर्मसन्यासयोग
ऐकव गीते तुझी कहाणी, निर्मळ निर्मळ तुझी वाणी
भगवंताच्या वाणीला धार अगदी विलक्षण
ज्ञान ज्यातून प्रकट होते ओजस्वीच असे ते भाषण
कर्मयोग अनुसरला तर सहज लाभे आत्मज्ञान
श्रद्धा हवी, संयम हवा, श्रोता हवा सावधान
जन्मकर्म दिव्यच असते लोकोत्तर या पुरुषांचे
रहस्य जाणत अवतारांचे ते तर मोठे भाग्याचे
आत्मतत्त्वा धरुन चालता ढळत नाही तोल कधी
भगवंताचे कर्मच असे बाधत नाही त्याला कधी
मिळवायाचे काहीच नाही तरी कर्म करीत असतो
जीवेभावे करता कर्मे उदाहरण ठेवून जातो
धर्मग्लानी जेव्हा होते, अधर्म थैमान घालत सुटतो
तेव्हा तेव्हा मीच पार्था येथे अवतार घेत असतो
मागचे पुढचे सगळे स्मरते पूर्वापार कर्मयोग
परंतु पामर विसरून गेले गिळती त्यांना विषयभोग
इंद्रियांचे व्हावे स्वामी मनावरती अंकुश हवा
त्याची धाव जरी बाहेर निर्धारे त्या आत वळवा
भोगात काय ठेवले बाबा, त्यागात आगळा आनंद आहे
नकोत विद्या नकोत कला भक्त भक्तीत रंगत आहे
देहापासून देवाकडे जर पाहिजे घ्याया झेप
वासना ठेव वासुदेवी सरेल जन्ममरण खेप
वैराग्याचे ज्ञान मुरते, विवेक साधना बहीण भाऊ
आनंदाचे लाडू आपण निरंतर खात जाऊ
जुळले नाते आईचे, प्रेमाचे पुण्याईचे
संवादाची घेत रुची, ऐका कहाणी गीतेची, ऐका कहाणी गीतेची