Friday, December 26, 2014

ऐका कहाणी गीतेची

१९९९ मध्ये अण्णांनी म्हणजे श्रीराम बाळकृष्ण आठवले यांनी लिहिलेले हे लिखाण. याची छोटीसी पुस्तिका ही त्यांनी काढली होती आणि स्वतःच्या आवाजात त्यांनी घरच्या घरी ध्वनीमुद्रणही केले होते. ते क्रमश: ब्लॉगवर टाकायचा प्रयत्न करतो आहे..

ऐका कहाणी गीतेची

ऐका कहाणी गीतेची । ऐका कहाणी गीतेची ॥धृ॥
गोविंद जय जय । गोपाळ जय जय
माधव जय जय । मुकुंद जय जय
ज्ञान वितरते, भक्ती शिकवते, गाते महती कर्माची ॥१॥

अश्रू पुसते, गोड हसवते
निर्भय करते, जवळी घेते
नरदेहाची करुनि बासरी, फुंकर घाली सोऽहंची ॥२॥

जन्मा आला मरावयाचा
मरायचा तो पुन्हा यायचा
रडायचे ना, झुरायचे ना, दिंडी पुढेच न्यायाची ॥३॥

नका गोंधळु, वदे गोंधळी
ज्ञानांजन तो नयनी घाली
पुढचे सुचवी, सावध करवी, किमया गोपालकृष्णाची ॥४॥

तुण तुण तुण तुण वदे तुणतुणे
कडाडतो डफ, झांज झणझणे
फुरफुरताती कैसे बाहु, गाथा लिहवी शौर्याची ॥५॥

जो जो जैसा मला भजतसे
त्याला मी तैसा पावतसे
भक्ति वाढता वाढे शक्ती, युक्ति साधते मोक्षाची ॥६॥

घराघरातून पोचो गीता
कराकरातून विलसो गीता
तुडवित काटे तरीहि हासत वाट चालणे ध्येयाची ॥७॥

नित्यकर्म सवयीचे होता
आस फलाची निघून जाता
सहजसमाधी देते साधून शाल पांघरे मायेची ॥८॥

नादमधुरता प्रासादिकता
प्रसन्न गायक, प्रसन्न श्रोता
कृष्णार्जुनसंवादापुढती साखरही लाजायाची ॥९॥

ऐसे मंथन सुंदर झाले
नवनीतहि मग वरती आले
ज्ञानबा तुकया टिळक विनोबा सेवित गोडी गीतेची ॥१०॥

कारागारी रहस्य लिहिले
गीताप्रवचन तिथे चालले
जे ज्याचे त्या करिता अर्पण तृप्त तृप्तता रामाची ॥११॥

****

No comments:

Post a Comment