Wednesday, April 29, 2015

संसार यास नाव .....

हा खेळ मांडलेला संसार यास नाव
सुख दु:ख मूळ बाबा हा मानवी स्वभाव ।। ध्रु ।।

कुढसी असा कशाला? विघ्ने तुला सुसंधी
रडसी वृथा कशाला ? म्हणसी स्वतःस कैदी
दरियात का न वीरा तू लोटणार नाव ।।१।।

भांडून काय लाभे उठतो कपाळशूळ
तू एकला जगात तव दांडगेच खूळ
समजूत सूत्र सोपे या जीवनास लाव ।।२।।

तडजोड तू करावी जाणीव बाळगावी
जवळीक तू करावी झणि भांडणे मिटावी
शिकवीत संत साधू तू खेळ एक डाव ।।३।।

मी कोण कोठला हा  नाही विचार केला
स्वार्थात जन्म सारा वाया असाच गेला
उद्धार साधण्याला शक्ती पणास लाव ।।४।।

पाहू नको मुहूर्त तू गोड बोलण्याला
पाहू नको मुहूर्त तू गोड वागण्याला
घे नाम विठ्ठलाचे ओतून भक्तिभाव ।।५।।

(सुखाचा प्रपंच हाच परमार्थ मधून)

© रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले