१९७० साली प्रकाशित झालेली आणि अण्णांनी म्हणजे श्रीराम बाळकृष्ण आठवले यांनी लिहिलेली "उपनयन संस्कार गीतावली" ही गीतावली नुकतीच मिळाली त्यातील ही कविता
उपनयन या संस्कारात बटूचा पिता आणि त्याचे गुरुजी यांनी त्याला गायत्री मंत्राचा उपदेश केला, सर्व जगाला प्रेरणा देणाऱ्या सूर्याविषयी त्या मंत्रात कृतज्ञता आहे - त्या सूर्याची मनोभावे केलेली प्रार्थना त्या मंत्रात आहे.
केवढा उदात्त अर्थ भरला आहे त्यात ! सूर्याची पवित्र उपासना ! तेजाचा, मांगल्याचा ध्यास!
सूर्यनारायणा, ऐक ही प्रार्थना
ऐक ही प्रार्थना ।। धृ ।।
तेज दे, ऊब दे, देहि आरोग्य दे
शक्ति दे, बुद्धि दे, दिव्य आनंद दे
सान बाळे आम्ही, हे दयाळॊ प्रभो
देई रे चेतना ।। १ ।।
अर्घ्य घे, भक्ति घे, भाव घे, ठाव घे
हे उपास्या रवे, यत्न घे, रत्न घे
अग्नि बंधू तुझा येथ पृथ्वीवरी
देऊ दे प्रेरणा ।। २ ।।
पुत्र आम्ही तुझे, शिष्य आम्ही तुझे
भक्त आम्ही तुझे, ध्येय नाही दुजे
तू शतायु करी, तू निरोगी करी
हीच अभ्यर्थना ।। ३ ।।