'आरोग्याचे नियम पाळणे' औषध याचे नाव
जाता येता घे घे मनुजा देवाजीचे नाव!ध्रु.
खरमरीत जर भूक लागली तरीच जेवावे
वेळ जाहली म्हणून अन्ना आत न लोटावे
पोट ठेवता हलके येती भरून सारे घाव!१
स्वच्छच पाणी ते तर आहे पावन गंगेचे
स्वस्त तसे ते मस्तच रुचकर देणे देवाचे
उठल्यासरशी पिऊन पाणी स्नानासाठी धाव!२
आजाराला आरोग्याला आपण बोलावतो
जरा घसरलो तरीहि तोंडावर आपटतो
आहाराच्या आहारी जाता बुडते पुरती नाव!३
एकसारखे लोळत पडणे आळस वाढवणे
चालणे न मुळी कष्ट टाळणे शरीर गंजत जाणे
नियमित व्यायामाने मनुजा शक्ति पणाला लाव !४
औषध ज्याला लागले न कधि वीरगडी तोच
सदा हसतमुख देवाचाही आवडता तोच
अजून आहे सुधारणेला तुजला मोठा वाव!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले