Monday, July 31, 2017

प्रसाद पुष्पे - श्रद्धा!

प्रसाद पुष्पे - श्रद्धा!

मानला तर 'देव' नाही तर...... कशाला तो शब्द उच्चारा?
आपण कोणाला आणि काय मानतो ते महत्त्वाचे. मातृदेवो भव। पितृदेवो भव। आचार्य देवो भव।

केवढा सुंदर आणि महत्त्वाचा उपदेश आहे या वचनात. समर्थांचे वचनच पहा ना "यत्न तो देव मानावा".

श्रद्धेशिवाय माणूस मनुष्य असूच शकत नाही. दोन जन्मठेपांची शिक्षा ऐकूनही वीर सावरकर डळमळले नाहीत,  अंदमानच्या कारावासात लिहून गेले -
अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला
मारिल मज जगति असा कवण जन्मला?

"न योत्स्ये" असा एकतर्फी निर्णय घेतलेला अर्जुन श्रीकृष्णाला सद्गुरु मानता क्षणी मोह निरसन झाल्यावर म्हणाला - 'करिष्ये वचनं तव।'

पण कोणाचे ऐकायचे? कोणाचे नाही ऐकायचे?
भले बुरे ते आतुनि कळते!

विवेक आत आहे त्या सद्गुरुचेच ऐकावे. द्वाड इंद्रियांचे कधीही ऐकू नये.
श्रद्धा  माणसाचे जीवन घडविते. निरार्थकात अर्थ भरून जाते.

कोणी बुद्धिभेद केला नि डळमळली तर ती श्रद्धा कसली?
श्रद्धा हवी प्रल्हादाची! निष्ठा हवी एकलव्याची! मनाची एकाग्रता श्रद्धेमुळे त्वरित होते.

साधना श्रद्धेचे बळ वाढवीत जाते. जशी श्रद्धा तसे आपण! जसे यत्न तसे आपण!

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, July 30, 2017

प्रसाद पुष्पे - स्वच्छता मोहीम!

प्रसाद पुष्पे - स्वच्छता मोहीम!

आपण केर काढतो का? रोजच्या रोज? अगदी प्रत्येक खोलीचा? कोपऱ्यात साठून नाही ना राहात कधी?

तुमची स्वच्छते बाबतची जागरुकता अगदी कौतुकास्पद आहे. बरे पण आता विचार करु या आपल्याच मनाचा! तिथे कसला केर नाही ना साठला? पूर्वग्रहांचा - कामक्रोधाचा, संशयाचा, द्वेष मत्सराचा? नकळतच आपला हात गेला आपल्या नाकाकडे!

मनातली घाण पोटातल्या घाणीपेक्षाही वाईट! आरोग्य बिघडते ते त्यामुळे.  पोट साफ करायला एरंडेल नाहीतर त्रिफळा चूर्ण! मन साफ रहायला - नामजप, ध्यान, सद्ग्रंथांचे श्रवण!

अहो मनाला जी गोडी लावावी, ती लागते. कालचा दिवस गेला निघून.  मनाचे प्रदूषण थांबवायला दर दिवशी नव्याने वागायला सुरुवात करायची.  चुका दक्षतेने टाळायच्या. बोलणे कमी करायचे, त्यात गोडवा आणायचा, वेगवेगळी टीव्ही चॅनेल्स, त्यावरच्या मालिका, चित्रपट (काही सन्माननीय अपवाद वगळता) म्हणजे पचनाला जड असे भेळीसारखे, पदार्थच, नकोतच ते.

चला जळमटे काढू या. भगवंताचे नाव घेऊ या.  तुटायला आलेले भावबंध गोड बोलून, विधायक कृती करून, भगवंताची प्रार्थना करून दृढ करुया! आणि शेवटच्या श्वासापर्यंत विश्वास बाळगू या - भंगवंत दयाळू आहे! तो जे करील ते आपल्या हिताचेच करील! श्रीराम!

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

Saturday, July 29, 2017

प्रसाद पुष्पे - संतांचा विश्वास

प्रसाद पुष्पे - संतांचा विश्वास

उपासना करण्यापेक्षा ती हातून घडावी यासाठी देवापुढे हात जोडून एवढे म्हणू या, 'प्रभो तुझी उपासना घडो सदा तनामना!

भगवंताच्या जवळ नित्य असायचे, त्याच्याशेजारी बसायचे, स्वस्थ व्हायचे. त्याचा आदेश ऐकायचा आणि त्याप्रमाणे तंतोतंत वागायचे.

घरादाराची, देहाची स्वच्छता ही पहिली पायरी, धूत वस्त्रे परिधान करणे, रांगोळी काढणे, निरांजन लावणे , उदबत्ती लावून मूर्तीपुढे आसनावर बसणे ही झाली वातावरण निर्मिती.

देवाने निर्माण केलेल्या सुंदर जगात आपण आलो. ते जग आपल्या जगण्याने अधिक सुंदर व्हावे ही जगन्माउलीची साधी अपेक्षा.

'मी देह', 'माझे, माझे' असे वाटणे ही देहबुद्धी. तिथून पुढे प्रवास करत करत 'तोच मी' ही धारणा दृढ होईपर्यंत वाटचाल घडली पाहिजे.

सद्ग्रंथांचे वाचन यासाठीच. भगवंताच्या नामाचा जप तो यासाठीच. देहू, आळंदी, पंढरी इथे वारंवार जायचे यासाठीच. भगवंताच्या मूर्तीचे दर्शन घ्यायचे यासाठीच.

प्रत्येकाच्या आतला देव जागला की दुरितांचे तिमिर आपोआपच जाईल. विश्वस्वधर्मसूर्यामुळे प्रकाशित होईल. परस्परांशी मैत्री वाढल्यावर संतमंडळी सुखी होणारच.

असे रामराज्य भूवर कलियुगात देखील येते हाच संतांचा विश्वास.

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Friday, July 28, 2017

प्रसाद पुष्पे - दृष्टी बदला, सृष्टी बदलेल!

प्रसाद पुष्पे - दृष्टी बदला, सृष्टी बदलेल!

आपण जे काम करतो ते कोणत्या दृष्टीकोनातून? ते करत असताना आपण जळफळतो का? कसेबसे उरकून टाकतो का? तसे असेल तर त्यापासून आपल्यालाही सुख नाही, दुसऱ्यालाही समाधान नाही.

"मी हे कर्म करतो" हा कर्तेपणा उपद्रवकारक आहे.  नदी वाहत असते पण वाहण्याचे तिला भान नाही. सूर्य उगवतो प्रकाश देतो पण त्याला त्याची जाणीव नाही. हातून घडत असलेल्या कर्माकडे बघण्याची दृष्टी बदलली की ते कर्म अधिक चांगले करण्याचा हुरूप वाढेल.  हात काम करीत असावेत, मुख नाम उच्चारीत असावे. नकळत मन रामरंगी रंगेल, शांत होईल.

जे आवडत नाही - अवघड वाटते तेही काम भगवंताचेच असे समजावे, शिकून घ्यावे.

तो क्षणोक्षणी शिकवत असतो आपण शिकत नाही.  तो भरभरून आनंद देत असतो, आपण आनंद घेत नाही. "नारायण" हा मुक्तीचा मंत्र आहे तो जपत राहावा.

कर्मे कोरडी, भावशून्य न व्हावीत.     त्यात ओलावा असावा. तो नामस्मरणाने निर्माण होतो.

तक्रार करत राहणारा कोणालाच आवडत नाही. आपण ज्या परिस्थितीत असू ती नीट समजून घ्यावी, आपल्या सोयीची भूमिका ठरवून घेऊन तसे वागावे.

संयम, विवेक, सहनशीलता, आत्मीयता,  प्रेमभाव हे गुण ज्याने अंगी बाणवून घेतले त्याला सगळे विश्वच आपले घर वाटते.

तो सगळ्यांचा, सगळेच त्याचे!
पूजा हे कर्म न बनता प्रत्येक कर्म  भगवंताची पूजा म्हणण्याच्या योग्यतेचे व्हावे.

जीवन ही जटिल समस्या आपल्या वागण्याने, वृत्तीने वाटते.  जीवन हा गमतीचा खेळ आपणच बनवू शकतो. होय ना?

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, July 27, 2017

प्रसाद पुष्पे - क्षण साधा, झडझडून निघा..

प्रसाद पुष्पे - क्षण साधा, झडझडून निघा..

मी हे बोलत आहे ते बरोबर आहे ना?
मी हे करत आहे ते योग्य आहे ना?
असा आपला आपल्याशीच विचार करावा आणि पुढचे पाऊल उचलावे ते माघार न घेण्यासाठीच.
सद्गुरू म्हणजे विवेक! सारासार विचार! सद्गुरु म्हणजेच आत्माराम! सत्कार्याचा प्रेरक!
आपण यासाठीच वारंवार एकांतात बसण्याची, साधना करण्याची नितांत आवश्यकता आहे.
संशय, मत्सर, कुत्सित वृत्ती, हीन अभिरुची, विलासी वृत्ती, विघ्नसंतोषीपणा किती म्हणून गोष्टी सांगाव्यात.
मनात नरक साचलेला असतो आपल्या, छे, छे आपण नरकातच  मुक्काम ठोकून असतो.
पण याची जर आपल्याला जाणीव झाली असेल तर तोच क्षण साधायचा झडझडून निघायचा.
वाल्याचा वाल्मीकी झाला!
अक्षरशत्रू असलेला माणूस कालीमातेच्या उपासनेने महाकवी कालिदास बनला!
अरे मग काय अशक्य आहे आपल्याला?
पश्चाताप होऊन वर्तन सुधारणे चांगलेच. पण पश्चाताप वाटेल असे काही मुळात हातून न घडणे हे अधिकच चांगले नव्हे का?
म्हणून तर श्रीतेमुखी रामायणात कवीने असे म्हटले आहे -
कसे बोलतो, कसे वागतो गोष्ट जरी ही साधी "श्रीरामाला रुचते का हे?" विचार करु या आधी.
शुभस्य शीघ्रम्!
चांगल्या गोष्टीला विलंब कशाला?
उद्या करायचे ते आज! आज करायचे ते आत्ताच!

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Wednesday, July 26, 2017

प्रसाद पुष्पे - जीवाचा सखा..

प्रसाद पुष्पे - जीवाचा सखा!

तुम्ही या जगात आल्यापासून जगाचा निरोप घेईपर्यंत तुमची अखंड साथ देणारा मित्र कोणता? श्वास घेता, निःश्वास टाकता! पुन्हा श्वास घेता! ही प्रक्रिया अखंड चाललेलीच आहे. आपल्याला भानही नाही त्याचे!

श्वास! तो योग्य लयीत चालू आहे हा विश्वास धरूनच तुमची कामे चालू असतात, होय ना?

मनाने त्या श्वासावर लक्ष ठेवून असायचे. तुमचा तुम्हाला श्वास घेण्याचा सोडण्याचा अति सूक्ष्म ध्वनी ऐकू येईल. एक सुंदर लय सापडेल.

भगवंताच्या या लीलेकडे लक्ष जाताच थक्क व्हायला होते. मग त्याच्या विषयी वाटणारी कृतज्ञताच त्याच्या नामाच्या उच्चारातून आपल्या मुखावाटे व्यक्त होते. संत सांगतात की वैखरीने उच्चारता ते नामच जोडून द्या ना श्वासाशी!

धरिता सो, सोडिता हं (अहम्)
अखंड चाले सोsहम्  सोsहम् ।।

भगवंताशी अशी जवळीक प्रभातकाली फारच चांगली साधते. भक्ताचे भगवंताशी लग्नच लागले म्हणायचे!

नाम घेत घेत जर कीर्तन, प्रवचन, निरूपण यांचे श्रवण घडले तर त्या सुखाला ना अंत ना पार!

तुकाराम महाराजांचा हा अनुभव पाहा ना

आणिक दुसरे मज नाही आता।
नेमिले या चित्ता पासोनीया -
पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी!

अनाम आणि अरूप असा भगवंत संतांनी आपल्या भावभक्तीने अधिक देखणा, गुणवान केला.

"प्रभाते मनी राम चिंतीत जावा
पुढे वैखरी राम आधी वदावा",  ते यासाठीच.

© लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, July 16, 2017

गीतारहस्य नित्यपाठ




गीतारहस्य नित्यपाठ

कृष्ण कृष्ण म्हणत मला कृष्ण व्हायचे
त्यज विकार कर विचार हे म्हणायचे ! १

कृष्ण जन्म बंदिगृही मुक्त तो सदा
गीता ही कथित सार चिंतका तदा ! २

मन अपुले अलग करुनि शांत व्हायचे
नयन मिटुन मार्ग सुचुन मुक्त व्हायचे ! ३

मीच मला सावरता विजय लाभला
मन ओतुनि सजवी कर्म भक्त तो भला ! ४

यश येवो अपयशही फरक कोणता?
आस फली नसत तिथे खेद कोणता? ५

दु:खमूळ वखवख ती फेकता दुरी
संयमात सौख्य सहज समजवी हरी ! ६

कृष्ण कसा जगला गीतेत हे कळे
लोकमान्य चरित गूढ चिंतने कळेे ! ७

समजे जे थोडेही वाचणे पुन्हा
आचरणी आणुनि ते सांगणे जना ! ८

सोसुनि आघात सहज दडव वेदना
सोने निकषा उतरत सरत मीपणा ! ९

यत्ना ना जमत असे या जगी नसे
वैराग्ये मनुजाची कांति खुलतसे ! १०

मन प्रसन्न जग प्रसन्न मर्म जाणणे
हसऱ्याचे वावरणे दिसत देखणे ! ११

दु:खाला विसरताच दु:ख संपते
आठवता भूत बनुनि छळत सतत ते ! १२

जगलो वा मेलो वा सृष्टि चालते
सुजन कधि न मीपणास माथि मिरवते ! १३

सृष्टीशी समरसता सत्व वाढते
रुसता तुज लागे जगण्यास एकटे ! १४

गीतेचे हे रहस्य जाण नाम घे
बदल किती तनि मनि तव तू बघून घे ! १५

आसक्ती दु:खमूळ हट्टही नको
काम नको क्रोध नको द्वेषही नको ! १६

जे लाभे त्यात तोष हाव ना कधी
तो प्रसन्न कार्य करी जग म्हणे सुधी ! १७

कौशल्या लाव पणा कार्य करत जा
हरिपूजा तीच समज दंभ कर वजा ! १८

यश लाभे कधि अपयश हर्ष खेद ना
मन ज्याचे नित्य तृप्त तो रुचे जना ! १९

निर्मल मन, निर्मल तन मतिहि निर्मला
आत्मतृप्त हरिभक्ता जगति ना तुला ! २०

अभय मनी शक्ति तनी देत प्रार्थना
गीतामृत नित सेवी त्यास भ्रांति ना ! २१

आत्म्याचा कर विचार जाण तू स्वत:
तूच कृष्ण कृष्णहि तू उमज तत्वत: ! २२

कर्म करी सर्व हरि फलहि हरीला
हे कळले तोच जगी पूर्ण मोकळा ! २३

आत्मा हा जीव प्राण त्या विना कुडी
कोसळते भूमीवर दीन बापडी ! २४

जोवरती जीव आत शर्थ तू करी
तोवरती कार्य करुन म्हण हरी हरी ! २५

देव असे जरि न दिसे सुज्ञ जाणतो
नीति जगे त्या श्रीहरि ध्यानि भेटतो ! २६

जैसा मी तैसे जन जाणता खुला
प्रगतीचा मार्ग असा चालणे तुला ! २७

तूच राम तूच कृष्ण स्वस्वरूप ते
ओळख ही पटली तुज भाग्य समज ते ! २८

संतोषा नाव मोक्ष खूण स्वस्थता
बुद्धि शुद्ध तन हि स्वच्छ सहज अवस्था ! २९

मजवरती तेच प्रेम हरिवर जडता
व्यक्ति होय हरिमय ती हीच धन्यता ! ३०

हृदयी वसत घडवि कार्य सद्गुरु म्हणा
कर्म सुबक सुखद शुभद हटवि मीपणा ! ३१

बुद्धि शांत सम ठेवू घेऊ दक्षता
आत्मरूप देव बघत भाव तो स्वत: ! ३२

गीतेचे हे रहस्य टिळक सांगती
श्रीरामा कळत तसे शब्द बोलती ! ३३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, July 9, 2017

श्रीकृष्णाचे जीवन मजला गीता गाता उलगडते..




श्रीकृष्णाचे जीवन मजला गीता गाता उलगडते
जीवन आहे एक रणांगण झुंजाया शक्ती मिळते!१

निजकर्तव्या करावयाचे कर्तेपण तू सोडून दे
कृष्णच कर्ता फळही त्याला व्यर्थ काळजी टाकून दे!२

तनु ही येई तैशी जाई शरीर काही नसशी तू
हासत हासत सोस वेदना अविनाशी जो आत्मा तू !३

शांति मनाची का गमावशी? चिंतातुर का होशी तू? 
धर्मध्वज तू उंच उभारी विजयासाठी निमित्त तू !४

मोह न कसला श्रीकृष्णाला आकाशाला लेप नसे
हवे नको पण जाता विसरून शांति रहाया येत असे!५

सदासर्वदा जो आनंदी स्थितप्रज्ञ माधव होता
तसे प्रयत्ने होता येते क्रिया विवेके पालटता!६

मना उलटण्या नाम स्मरुनी अभ्यासाला बसायचे 
दिवसाकाठी असंख्यदा तू सोsहं ध्यानी रमायचे!७

निवृत्तीचे नाव न येथे रूप बदलते कर्माचे
कर्मच आहे सुंदर साधन स्वानंदाच्या प्राप्तीचे!८

तुरुंगात श्रीकृष्ण जन्मला मुक्त कराया बद्धांना
रणांगणावर कथिली गीता बुद्ध कराया सर्वांना !९  

निराश जे मन प्रथमाध्यायी उल्हासाने नृत्य करी
धर्माचरणा भिडते जाउन किमया ऐशी हरी करी!१०

गुणधर्मांना अपुल्या जाणुन कार्य काय ते ठरवावे
कर्मयोगमार्गाने आपण दिव्यपदाला पोचावे!११

कर्तव्यास्तव जीवन अपुले माधव जीवन ते जगला
अनंत रूपे अनंत वेषे समस्त विश्वी वावरला!१२

मी नच कर्ता मी तर साक्षी साक्षित्वाने वागावे
साक्षित्वहि ते अंति संपते निरीक्षणाने उमजावे!१३

राम कृष्ण हरि गाता गाता देहभानही हरपावे
त्रिगुणांनाही सहज लंघुनी जीवन अपुले उजळावे!१४

सदाचार सवयीचा होतो अनुभव ये ज्याला त्याला 
अम्हा साधका अंकित करशी कृपा तुझी ही गोपाळा!१५

या गीतेच्या गंगेकाठी सांजसकाळी मी यावे
आचमनांनी तृषा शमावी निर्वासन मानस व्हावे!१६

मंदिरात चल उपासनेला घरही मंदिर बनवावे
तिमिरनाशना गीता गाउन कृष्णचरित अभ्यासावे !१७

अठरा कडवी नित्य म्हणावी प्रसाद मोदे सेवावा
श्रीरामाचा हट्ट एवढा जनार्दनाने पुरवावा!१८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Friday, July 7, 2017

श्रीरामायणरहस्यचिंतन

श्रीरामायणरहस्यचिंतन

राजा दशरथ नीतिमंत तो बलशाली होता
कौसल्या शालिनी सुशीला त्याची पतिव्रता ! १
त्यांच्या उदरी यत्नरूप अवतरे प्रभू राम
लक्ष्मण आला शक्ति घेउनी बंधू गुणधाम ! २
भरताच्या मनि बंधुप्रीती सरलहृदयता ती
अनुकरणे शत्रुघ्न धन्य हो बालक शुद्धमती ! ३
सत्यरूप सीतेने वरिले श्रीरघुनाथाला
धरती उल्हासाने भेटे जैसी गगनाला ! ४
कांचनमृगमोहाने फसली व्याकुळली सीता
अहंकाररावणे झडपली संधी सापडता ! ५
श्रीरामाच्या नामस्मरणे कल्याणच झाले
भक्तिरूप हनुमंते पतिचे कुशल सर्व कथिले ! ६
अहंकार दैत्याला वधिता सफल रामकार्य
रामायण सांगते मानवा पणा शौर्य लाव ! ७
यत्ना अंती यश ठरलेले विनम्रता भक्ती
या देहातच मुक्ति लाभण्या सापडते युक्ती ! ८
अशांत लंका शांत अयोध्या पोचावे तेथे
विकारवादळ चित्तामधले नीतीने शमते ! ९
नीती सुटता विटंबना ती पदोपदी होते
सांगे भारत उभ्या जगाला 'सत्यमेव जयते' ! १०
कुटुंबनीती हे रामायण पारायण करणे
सौहार्दाने सामर्थ्याने नारायण बनणे ! ११
सेवाभाव नि टापटीप ती काय कमी येथे
गृहलक्ष्मी ही संस्कारांनी घर मंदिर करते ! १२
श्रीरामाची कथा ऐकता जाणू भावार्थ
शिकता शिकता कथा पसरवू पाची खंडात ! १३