Wednesday, July 26, 2017

प्रसाद पुष्पे - जीवाचा सखा..

प्रसाद पुष्पे - जीवाचा सखा!

तुम्ही या जगात आल्यापासून जगाचा निरोप घेईपर्यंत तुमची अखंड साथ देणारा मित्र कोणता? श्वास घेता, निःश्वास टाकता! पुन्हा श्वास घेता! ही प्रक्रिया अखंड चाललेलीच आहे. आपल्याला भानही नाही त्याचे!

श्वास! तो योग्य लयीत चालू आहे हा विश्वास धरूनच तुमची कामे चालू असतात, होय ना?

मनाने त्या श्वासावर लक्ष ठेवून असायचे. तुमचा तुम्हाला श्वास घेण्याचा सोडण्याचा अति सूक्ष्म ध्वनी ऐकू येईल. एक सुंदर लय सापडेल.

भगवंताच्या या लीलेकडे लक्ष जाताच थक्क व्हायला होते. मग त्याच्या विषयी वाटणारी कृतज्ञताच त्याच्या नामाच्या उच्चारातून आपल्या मुखावाटे व्यक्त होते. संत सांगतात की वैखरीने उच्चारता ते नामच जोडून द्या ना श्वासाशी!

धरिता सो, सोडिता हं (अहम्)
अखंड चाले सोsहम्  सोsहम् ।।

भगवंताशी अशी जवळीक प्रभातकाली फारच चांगली साधते. भक्ताचे भगवंताशी लग्नच लागले म्हणायचे!

नाम घेत घेत जर कीर्तन, प्रवचन, निरूपण यांचे श्रवण घडले तर त्या सुखाला ना अंत ना पार!

तुकाराम महाराजांचा हा अनुभव पाहा ना

आणिक दुसरे मज नाही आता।
नेमिले या चित्ता पासोनीया -
पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी!

अनाम आणि अरूप असा भगवंत संतांनी आपल्या भावभक्तीने अधिक देखणा, गुणवान केला.

"प्रभाते मनी राम चिंतीत जावा
पुढे वैखरी राम आधी वदावा",  ते यासाठीच.

© लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment