Friday, September 29, 2017

प्रसाद पुष्पे - 'दासबोध' घ्या हाती.

प्रसाद पुष्पे - 'दासबोध' घ्या हाती.

ग्रंथा नाम दासबोध। गुरुशिष्यांचा संवाद। येथ बोलिला विशद। भक्तिमार्ग।।

ग्रंथराज दासबोधामधील ही पहिलीच ओवी! इथे आरंभाला नमन नाही पण श्रोत्याच्या-वाचकाच्या मनाची पकड घेणारी तोंडओळख जरूर आहे.

समर्थांचे बोलणे रोखठोक! आत्मप्रत्ययाचे! ग्रंथाचे नाव, ग्रंथाचे स्वरूप, ग्रंथाचा विषय यांचा उल्लेख अवघ्या एकाच ओवीत.

मना सज्जना भक्तिपंथेचि जावे
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे

हे मनाचे श्लोक वाचावे आणि लगेच दासबोधाचा आश्रय घ्यावा.

भक्तिचेनि योगे देव। निश्चये पावती मानव ऐसा आहे अभिप्राव। ईये ग्रंथी।।

मग आपल्याला तरी अधिक काय हवे?

श्रवणाला श्रावण महिना फारच चांगला! डोळे मिटावेत. शिवथरघळीत मनानेच बसावे. त्यातील ओव्या समर्थ आणि सच्छिष्य कल्याण या दोघांच्या स्वरात मनानेच ऐकाव्या. आत्मारामाची भेट घडावी आणि सहज साधना घडता घडता विदेहीपणे सर्व काया निवावी!

समर्था आम्हाला आपल्या चरणी बसवा आणि दासबोधाच्या द्वारे आमच्याशी बोला ना!

- श्रीराम बाळकृष्ण आठवले.

प्रसाद पुष्पे - प्रथम करू या विचार पुरता.

प्रसाद पुष्पे - प्रथम करू या विचार पुरता.

पूजाअर्चा, नामजप, सद्ग्रंथ वाचन यात आपला वेळ फार जातो असे आपल्याला वाटते का? या गोष्टी मनापासून होत नाहीत याची खंत आपल्याला वाटते का? व्यवहारात वावरताना एवढ्या तेवढ्या कारणाने आपल्या मनाचा तोल ढळतो का?

वरील प्रश्नांची उत्तरे आपल्या मनाशी द्यावी आणि मग आपण आपला योग्य विचार करावा.

आजार ओढवतो, छोट्या अपघाताने परस्वाधीन होण्याची पाळी येते तेव्हा आपले वर्तन कसे घडते? भगवंताला उद्देशून अपशब्द नाही ना उच्चारत?

मूर्तीमधील दिव्यत्व मूर्तिपूजेशिवाय नाही कळणार. गणपत्यथर्वशीर्ष, श्रीरामरक्षा स्तोत्र, श्री व्यंकटेश स्तोत्र यांचे पाठ सावकाश झाल्याशिवाय अर्थ आत कसा रिघेल? देवाने आपल्याला उपासनेला बसविले आहे. नवनवीन अर्थ चिंतनातून जाणवून देण्याचे काम तोच अंतःकरणात बसून करवून घेतो असे का नाही समजू?

व्यवहारातली रुक्षता, औपचारिकपणा जाण्यासाठी संतांचा सहवास नित्याचा हवा. त्यासाठी अभंग गायचे, नामजप करायचा, मंदिरात जायचे, ध्यानाला बसायचे. तुम्ही करत असलेली देवपूजा लोकांनी बघत राहावे अशी व्हावी.

चला तर आधी आपला आड भावभक्तीने भरून घ्यायला लागू या म्हणजे मग वेळोवेळी पोहराही भरत जाईल.

हेतू शुद्ध बाळगला तर कृती चांगली होईल.

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

प्रसाद पुष्पे - जागे व्हा, जागे!

प्रसाद पुष्पे - जागे व्हा, जागे!

देहबुद्धी ही निद्रा! आत्मबुद्धी ही जागृती!

विशेषतः रविवारी किंवा अन्य सुट्टीच्या दिवशी अंथरुणावरून उठूच नये, लोळत पडावे असे वाटते. हा मोह झुगारून हात पाय तोंड धुवून देवाला नमस्कार केला की जागृती यायला लागते.

व्यवहार कुणाला सुटला आहे? तो करावाच लागतो आणि सवयीने तो घडतही जातो.

वाद लगेच होतात, निंदा लगेच सुरू होते, खाण्या पिण्याचा अनावर मोह लगेच होतो. परिणामी आपलीच हानी!

आतला देव पहाटे उठून पहावा, ऐकावा. आता हे जे मी लिहीत आहे ते तो सांगतो आणि मी लिहितो. यात स्फुरण त्याचेच आहे. माझे भाग्य की लेखणीवाटे शब्द कागदावर उतरतात.

हं ते जगाला शहाणे करून सोडण्यासाठी वगैरे म्हणणे माझीच फसवणूक करून घेणे आहे. खुद्द मीच जसे लिहितो, बोलतो, गातो तसे मला बनले पाहिजे.

अभ्यासासाठी आपल्याला न येणाऱ्या गोष्टी शिकून घ्याव्यात. अभ्यासासाठी कधीही, कुठेही मुद्रा प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा. वातावरण निर्मिती साठी बोलण्यात गोडवा, खेळकरपणा आणावा.

देवा, तूच मला पहाटे आणलेली जाग आयुष्यभर टिकव! श्रीराम!

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

प्रसाद पुष्पे - नको वासना हेमधामी..

प्रसाद पुष्पे - नको वासना हेमधामी..

जरा फुरसत मिळाली की काय करावेसे वाटते? फक्कडसा चहा प्यावा, सिगारेटचा झुरका घ्यावा, का अजून काही? आतून उसळणारी उर्मी कोणती?

विवेकाने त्या उर्मीवर मात करायची आहे.

मनानेच मनाला शिकवायचे आहे. आयुष्याचा क्षण नि क्षण सार्थकी लावायचा आहे. आपली उपभोगाची लालसा नष्ट करायची आहे. म्हणायचे आहे -
मना वासना वासुदेवी वसू दे!

आजवर स्वतः करताच राब राब राबलो आपण! फार तर अगदी जवळच्या नातेवाईकांचा विचार केला!

विहिरीतल्या बेडकाला जग विहिरीएवढेच वाटते. आपण स्वतःच म्हणू या "कुपातील मी नच मंडूक".

स्वराज्य म्हणजे आत्म्याचे राज्य! रामाचे राज्य! आपला आपण निर्णय घेऊन तसे वागण्याचा पूर्ण अधिकार!

हा अधिकार देवदत्त आहे. मग भगीरथ प्रयत्नाने आपण पूर्वग्रहांवर, विकारांवर मात करू या.

नामस्मरण करून मन शुद्ध करु या. आपले भवितव्य आपण घडवू या. हातून साधना घडू लागली, गीता कळू-वळू लागली म्हणजे आपणच असे म्हणू-

भवितव्य दिव्य माझे माझ्या मुठीत आहे -
झेलावया प्रहारा सामर्थ्य अंगी आहे!

जर जन्म सार्थकी लावायचा असेल तर तटस्थपणे आपणच आपणाला पाहून भावना, विचार आणि त्याद्वारे आचार, सदाचार घडवायचा आहे.

- श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Sunday, September 17, 2017

प्रसाद पुष्पे - चंद्र सूर्य!

प्रसाद पुष्पे - चंद्र सूर्य!

श्री ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ आणि श्री समर्थ रामदासांचा मनोबोध! एवढे दोन ग्रंथ देखील पाठांतराला, मननाला, जीवनभर जगण्यासाठी प्रेरणा घेण्याला पुरणार आहेत.

हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा
पुण्याची गणना कोण करी?
हे वारंवार मनावर ठसविले जाते.

"भावेविण भक्ती बोलू नये" "हरिसी न भजसी कवण्या गुणे" - असे काही सुटसुटीत चरण बहिर्मुख व्यक्तीला अंतर्मुख करतात.

'मनाचे श्लोक' देखील नास्तिकाला आस्तिक बनविण्यास फार चांगले.

केवळ लहान मुलांनीच पाठ करण्यासाठी नव्हेत तर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांनी मनोबोध मोरावळ्यासारखा आवडीने चाखावा, अंगी मुरवावा. धक्के चपेटे सोसण्याचे सामर्थ्य स्वप्रयत्नाने मिळवावे.

सकाळी सकाळी अर्धा पाऊण तास होतील तितके श्लोक म्हणावेत, काही ओळी चिंतनास घ्याव्या आणि भोजनोत्तर निद्रेपूर्वी हरिपाठाची संगत धरावी.

सूर्य चंद्र यांचेच काम हे दोन छोटे ग्रंथ उरलेले आयुष्यभर करीत राहतील असा विश्वास वाटतो.

या दोन्ही ग्रंथांतून गीतादर्शन घडते, नव्हे का?

- श्रीराम बाळकृष्ण आठवले.

प्रसाद पुष्पे - लाज, संकोच, भीड, मर्यादा

प्रसाद पुष्पे - लाज, संकोच, भीड, मर्यादा

लाज, संकोच, भीड, मर्यादा! एकापाठी एक हे शब्द सुचत गेले! लिहूनही बसलो. पण यांचा एकमेकांशी आणि मानवी जीवनाशी संबंध काय आणि कोणत्या प्रकारचा?

आपले बहुतेकांचे चुकते कोठे?

आपण लाजायला हवे तिथे लाजत नाही, नको तिथे लाजतो. देवाचे नाम घ्यायला, देवळात जायला, संध्या करायला लाज वाटते. पण नको ते पाहायला, ऐकायला, बोलायला आणि निंदा करायला लाजत नाही. लज्जा हे केवळ स्त्रीचेच भूषण नाही, पुरुषांचेही आहे.

परकेपणाची भावना संकोच निर्माण करते. पण मग बोलायचे ते राहून जाते. चुटपुट वाटते. सुरवातीला सुदम्याला  श्रीकृष्णाला भेटायचा संकोच वाटत होता. पुढे जाऊ की परतू मागे असे झाले पण श्रीकृष्ण उच्चासन सोडून सुदाम्याकडे धावत गेला व त्याने त्याला कवेत घेतले.

लोक काय म्हणतील असे सारखे वाटणे म्हणजे भीड. यालाच आपण म्हणूया जनलज्जा. ती भीडच एकदा सुटली की गाडी लागली उताराला.

शिमगा सण खरं तर सांगतो शिव गा! पण आपण होलिकोत्सवाचा अगदी शिमगा करून टाकला.

मर्यादशील स्वभाव असणे व्यक्तीच्या दृष्टीने कल्याणाचे. आपण कोण, कुटुंबातले आपले स्थान कोणते, आपण नेमके काय केले पाहिजे या सगळ्याची जाणीव म्हणजे मर्यादेची जाण.

श्रीरामापुढे भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न यांनी आपली मर्यादा जाणली. मर्यादा हा धरबंध आहे. तो सुटता कामा नये.

माणसाचे मनुष्यत्व लज्जेत आहे. भीड वाटली म्हणजे वाटेल तसे वर्तन घडत नाही.

पण आई आणि मूल, देव आणि भक्त ,  पती आणि पत्नी यांचे परस्पर संबंध कसे असतात.

ते सांगायलाच हवे का?

- श्रीराम बाळकृष्ण आठवले.

प्रसाद पुष्पे - गमू पंथ आनंत या राघवाचा.

प्रसाद पुष्पे - गमू पंथ आनंत या राघवाचा.

काय करावे? झोपच येत नाही पुन्हा. ठीक आहे, येत नसेल तर न येवो बापडी. हात पाय धुवू. देहाची सवय म्हणून चहा करून पिऊ या. पण नंतर? या मनाला काही सवय लावायला हवी का नको?  समर्थ जसे म्हणाले आपणही निवांत वेळी त्याला सांगू या -

मना सज्जना भक्तिपंथेची जावे!

आपला श्वास - तो घेणे, उच्छ्वास टाकणे आपले आपल्याला ऐकू येईल इतकी शांतता आहे. जग थांबलेले नाही. अधूनमधून रस्त्यातील वाहनांचा आवाज येतच आहे कानावर!

पण ज्या अर्थी आज भगवंताने लवकर जाग आणली त्याअर्थी तो काही शिकवणार आहे आपल्याला.

प्रभाते मनी राम चिंतीत जावा!

रामाचे चिंतन! म्हणजे त्याच्या चरित्राचे अवलोकन! रामाच्या सद्गुणांचे स्मरण! रामनामसंकीर्तन!

नामसंकीर्तन साधन पै सोपे
जळतिल पापे जन्मांतरिची!

इतर वेळी हे वचन  आठवले असते का आपल्याला?
बाहेरच्या जगाकडे लक्ष पुन्हापुन्हा जात असले तरी त्या धावणाऱ्या मनाला आतल्या जगाकडे लक्ष द्यायला लावायचे. म्हणून तर नाम घ्यायचे.

मना उलटता होते नाम! श्रीराम जयराम जय जयराम!

काळजी काळजाला कुरतडते, संशय वाढवते, भीतीचे निराशेचे साम्राज्य पसरते.

त्याच क्षणी हात जोडून भगवंताला विनवायचे -

तमसो मा ज्योतिर्गमय! मला अंधारातून प्रकाशाकडे ने.

केशवसुतांची सतारीचे बोल कविता वाचली असेल ना? तम अल्प, द्युति बहु असे सतारीच्या दीड् दा दीड् दा ने शिकवले.

विधायक विचार शांत करतात, रचनात्मक कार्य करण्याची प्रेरणा देतात. विघातक विचार विनाशाकडेच नेतात.

आपण सावध राहिले पाहिजे.

उतरणीवरून गडगडत खाली जाणे सोपे आहे. पण नेट धरून डोंगराची अवघड चढण चढणे आव्हान आहे.

ते आव्हानच पेलू या.

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

प्रसाद पुष्पे - थोडं सोसायला शिकू या!

प्रसाद पुष्पे - थोडं सोसायला शिकू या!

अत्यंत उकडतंय, घामाच्या धारा लागल्यात. विजेचा पंखा स्वतः तापून फिरत आहे पण त्याचा वारा तलखी नाही शांत करू शकत. पण पंखा बंद करून पहा काय होतंय ते.

गंमत आहे नाही! ऋतुचक्र असेच फिरले, फिरत आहे, फिरत राहणार. माठातले पाणी एखादा घोटच प्यावे पण नाही राहवत. थंडगार सरबत प्यावे वाटणार, आईस क्रीम चालेल ना! किती चोचले पुरवतो आपण या देहाचे!

मुद्दाम उन्हात उभे रहावे असे नाही म्हणत कोणी. पण दुर्लक्ष करायला शिकावं, अखंड नामस्मरण चालू ठेवलं, संतवचनांवर चिंतन करीत गेलं की मन उंच उंच जाऊन पोचतं. वातावरणच बदलून जातं सारं.

अंदमान मधे तुरुंगात स्वातंत्र्यवीर कसे राहिले असतील? त्यांना नव्हतं उकडत? त्यांना नव्हते डास चावत? कोलू फिरवावा लागत होता ना?

मंडालेमध्ये लोकमान्य कसे राहात होते?

निसर्गाशी जेवढी जवळीक साधावी तेवढी साधत नाही आपण. झाडे लावतो का? बागकाम करतो का? थंड पाण्याने स्नान करतो का?  न लाजता मोठ्याने देवाचे म्हणतो का? शिवमंदिरात जाऊन गाभाऱ्यात पिंडीजवळ बसून शिवस्मरण करतो का?

असं केल्यास चोचले आपोआप कमी होतील आणि थोडं सोसायला ही शिकता येईल.

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

Tuesday, September 12, 2017

प्रसाद पुष्पे - विवेक दे, वैराग्य दे.

प्रसाद पुष्पे - विवेक दे, वैराग्य दे.

आवड असली की सवड सापडते. विषयाची आवड लावावी नाही लागत. त्याची चटक माणसाचा चट्टामट्टा करते. तेव्हा बरे वाईट पारखून निवड करावी आणि आवड नसेल तर ती निर्माण करावी म्हणजे सवड सापडतेच.

पूजा, ध्यान, नामस्मरण, सद्ग्रंथ श्रवण यांची आवड लावून घ्यावी लागते.

नशापाणी केव्हाही वर्ज्यच.

परंतु अंती देहाचाही विसर पडायला लावणारी भक्ती - ईश्वर प्राप्तीचा ध्यास - ही गोष्ट ज्याला लाभली तो आनंद डोहात बुडाला आणि असा जो बुडला तोच तरला.

नारदभक्ती स्तोत्राचा अभ्यास यासाठी करावा.  गोंदवलेकर महाराजांची प्रवचने यासाठी कुटुंबियांनी एकत्र बसून वाचावीत. जपाची एक माळ तरी दिवसाकाठी व्हावी.

शिक्षणात एक महत्त्वाचे सूत्र आहे. एकाग्रता हे यशाचे बीज आहे.

एका रामावाचून आता मला दुसरे प्राप्तव्य नाही असे व्हायला हवे. म्हणून तर संत जिवाला हितोपदेश करतात -

असा धरी छंद, जाइ तुटोनिया भवबंध!

आपल्या निवडीवरून जग आपली किंमत करते.

आत्मारामा, सद्गुरो, विवेक दे,वैराग्य दे.

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

प्रसाद पुष्पे - मन रिकामं ठेवू नका.

प्रसाद पुष्पे - मन रिकामं ठेवू नका.

मन गढूळ होणे यासारखे दुर्दैव नाही कोणते. का बरे असे व्हावे? आपण ते रिकामे ठेवले म्हणून.

जर आपण कुठले ना कुठले काम सतत करत आलो तर क्षुल्लक गोष्टी बोलायला, ऐकायला वेळच उरणार नाही.

मन जर नामस्मरणाने राममय झाले तर त्याला कौसल्या काय आणि कैकेयी काय दोघीही माताच.

सर्व भांडणांचे, द्वेषाचे मूळ 'मी, माझे' हेच आहे. अविश्वास बोलण्या, वागण्यात व्यक्त होतो. मनात भयगंड निर्माण झाला की आलेच रोग वस्ती करायला.

'मी रामाचा, राम माझा' असा दृढ निश्चय हवा. मनाची ही खंबीरता मनोबोध वाचून मिळते. कोणी कोणाचे भाग्य हिरावून घेऊ शकत नाही.

जो दुसऱ्या साठी खड्डा खणायला जातो तो स्वतः साठीच खड्डा खणतो.

स्वामी समर्थ भक्ताला काय सांगतात?
"भिऊ नकोस! मी तुझ्या पाठीशी आहे!"

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

प्रसाद पुष्पे - संत संग दे गा सदा.

प्रसाद पुष्पे - संत संग दे गा सदा.

संत साहित्य वाचावे! संत चरित्र ऐकावे! संतांच्या गावाला जावे.

"जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा" असा असतो संतांचा विश्वास.

संत देहावर असतात कधी?
त्यांचे मन आत्मरंगी रंगलेले असल्यानेच भवतरंग भंगले हे त्यांच्याबाबतीत अक्षरशः खरेच असते.

आपल्याला न दिसणारा देव संतांना मात्र दिसतो. संत त्या देवाशी बोलतात, खेळतात. लेकुरवाळा विठू संतसंगतीत अत्यंत रमून जातो. संत देवाजीची बाळे म्हणूनच जगाच्या अंगणात खेळतात, बागडतात.

भातुकली खेळावी, बाहुला बाहुलींचे लग्न लागावे, संसार करावा, आईचे बोलावणे आले की चट्टामट्टा करून चूल बोळकी आवरावी. पसारा भरून टाकावा टोपलीत.
संतांचे जगातले वावरणे, प्रपंच करणे तसे असते.

शिवथर घळीतील दासबोध लेखन, नेवासे येथील खांबाला टेकून गुरूच्या उपस्थितीत ज्ञानेश्वरांचे गीतार्थ कथन, भंडारा डोंगरावर तुकोबांना स्फुरलेले कवित्व - अभंगवाणी याच गोष्टी मनाला मोहवतात.
अशा देवदुर्लभ सुखलागि आरण्य सेवीत जावे.

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

प्रसाद पुष्पे - मनाचा मोगरा!

प्रसाद पुष्पे - मनाचा मोगरा!

पहाट होण्याची वाटच पहात असतो मी! अत्यंत शांत, शीतल, उत्साहवर्धक वातावरण! श्रीगोंदवलेकर महाराजांचे प्रवचन वाचताना वाटते महाराज सांगतात, तसेच वागू या ना आपण.

श्रीरामाचे नामस्मरण करण्याचा आनंद लुटू या - वाटू या!
पण फोटोमधले महाराज हसतात असे वाटते.

अरे मना, तू पुरता शरण नाही गेलास रामाला! वरचा विचार कितीही चांगला असला तरी त्यात 'मी' दडून राहिला आहे ना.?

श्रीरामच आतून नाम घेववतो, तिकडे अवधान जावे यासाठी डोळे मिटावे आसनावर स्वस्थ बसावे.

प्रभाते मनी राम चिंतीत जावा!

चालण्या, वागण्या, बोलण्यातही सुरेलपणा, मार्दव येईल का?

कुठेही, कुणाकडे बघतानाही दृष्टी निर्मळ होईल का?

पाटी स्वच्छ असू दे! म्हणजे तीवर काढलेली श्रीराम ही टपोरी अक्षरे देखणी वाटतील. नाम बिंबेल, रुजेल, मोगरा फुलून येईल.

- श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Saturday, September 2, 2017

प्रसाद पुष्पे - ॐ राम कृष्ण हरि!

प्रसाद पुष्पे -  ॐ राम कृष्ण हरि!

स्वामी स्वरूपानंदांचा समाधिकाळ जवळ आलेला. त्याच्या आधी थोडेच दिवस स्वामींनी अगदी निकटवर्तियांकडून हा जप आग्रहाने करवून घेतला. न थकता, न थांबता.

राम कृष्ण हरि या सहा अक्षरांच्या मागे ॐ शक्ती लावली. हा जप जितक्या सावकाश, हलक्या आवाजात उच्चारला जाईल तितक्या त्या नादलहरी आसमंत शुद्ध करतीलच पण जप करणाऱ्या साधकात अंतर्बाह्य सुधारणा घडवून आणतील.

राम! अवघी दोन अक्षरे. प्राणवायू आत भरून घेताना शीतलतेची जाणीव होते, अंगात चैतन्याचा संचार होतो. वाटते मन रमवणारी ही दोनच अक्षरे शिवाला इतकी आवडली की त्याने त्यांना हृदयी साठविले.

विषा औषध घेतले पार्वतीशे!

तो 'राम' हा नाद हळूहळू विराम पावतो तोच उच्चार केला गेला कृष्ण. हीदेखील दोनच अक्षरे.

कृष्ण! वासुदेव कृष्ण! देवकीनंदन कृष्ण! गोकुळचा राजा! रामापाठोपाठ हाही नकळत आत येऊन घुसला आणि त्या चित्तचोरट्याला आपला म्हणण्यावाचून गत्यंतरच नाही उरले.

जो राम आहे ना तोच कृष्ण बरं का! न फोडता येणारी अशी ही जोडी! या मनोहर जोडीने सगळ्या साधकांची विघ्ने हरली. मने जिंकून घेतली. मनाची बाहेर जाणारी धाव थांबवली. आणि मनाला अक्षरशः उलटले आणि नामाला लावले.

हरि! हरि!! हरि!

श्रीराम! श्रीकृष्ण! श्रीहरि! प्रत्येक नामातली श्री काढून घेऊन ॐ मागे लावला आणि जप झाला ॐ राम कृष्ण हरि!

सगुण निर्गुण असा भेदच नाही उरला. जसजशी वैखरीला या जपाची सवय लागली तसतशी आणखी एक गंमत सुरु झाली.

शिष्य आपोआप आसनस्थ होऊ लागला. ॐ राम कृष्ण हरि चाललाच होता. त्याचे डोळे आपोआप मिटले. श्वास संथ झाला. मानस गाभारी सोsहं घोष घुमू लागला. भूपाळी आठवली-

"प्रभात झाली स्वरूपनाथा या हो मम अंतरि! सोsहं घोषचि घुमत रहावा मानस गाभारी!"

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

Friday, September 1, 2017

प्रसाद पुष्पे - प्रसाद हवा हवासा.

प्रसाद पुष्पे - प्रसाद हवा हवासा.

'प्रसाद' देवाचे देणे. कृपाच ती. तो सेवन केल्यावर मनाला प्रसन्नता वाटलीच पाहिजे.

इतर वेळी खाण्यासाठी म्हणून केलेला शिरा आणि सत्यनारायणाच्या दिवशी प्रसादासाठी केलेला शिरा - चवीत केवढा फरक वाटतो पहा.

घरची भात आमटी आणि शिर्डी, गोंदवले, पावस अशा ठिकाणी पानावर आलेला प्रसाद - भोजन प्रसाद त्याची माधुरी अमृताला फिकी पाडणारी.

प्रसाद हा काव्यामध्ये ही गुण आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ प्रसाद आहे. मनाचे श्लोक हाही प्रसादच.

प्रासादिकता लेखनात हवी, भाषणात हवी. प्रसन्नता तनामनाला व्यापून उरली म्हणजे मग बाराही महिने आनंदी आनंदच.

भगवंतावर पूर्ण निष्ठा असली की चित्त सदैव प्रसन्न राहील.

भगवंता, मला तो प्रसाद दे! देशील ना?

- श्रीराम बाळकृष्ण आठवले