Saturday, September 2, 2017

प्रसाद पुष्पे - ॐ राम कृष्ण हरि!

प्रसाद पुष्पे -  ॐ राम कृष्ण हरि!

स्वामी स्वरूपानंदांचा समाधिकाळ जवळ आलेला. त्याच्या आधी थोडेच दिवस स्वामींनी अगदी निकटवर्तियांकडून हा जप आग्रहाने करवून घेतला. न थकता, न थांबता.

राम कृष्ण हरि या सहा अक्षरांच्या मागे ॐ शक्ती लावली. हा जप जितक्या सावकाश, हलक्या आवाजात उच्चारला जाईल तितक्या त्या नादलहरी आसमंत शुद्ध करतीलच पण जप करणाऱ्या साधकात अंतर्बाह्य सुधारणा घडवून आणतील.

राम! अवघी दोन अक्षरे. प्राणवायू आत भरून घेताना शीतलतेची जाणीव होते, अंगात चैतन्याचा संचार होतो. वाटते मन रमवणारी ही दोनच अक्षरे शिवाला इतकी आवडली की त्याने त्यांना हृदयी साठविले.

विषा औषध घेतले पार्वतीशे!

तो 'राम' हा नाद हळूहळू विराम पावतो तोच उच्चार केला गेला कृष्ण. हीदेखील दोनच अक्षरे.

कृष्ण! वासुदेव कृष्ण! देवकीनंदन कृष्ण! गोकुळचा राजा! रामापाठोपाठ हाही नकळत आत येऊन घुसला आणि त्या चित्तचोरट्याला आपला म्हणण्यावाचून गत्यंतरच नाही उरले.

जो राम आहे ना तोच कृष्ण बरं का! न फोडता येणारी अशी ही जोडी! या मनोहर जोडीने सगळ्या साधकांची विघ्ने हरली. मने जिंकून घेतली. मनाची बाहेर जाणारी धाव थांबवली. आणि मनाला अक्षरशः उलटले आणि नामाला लावले.

हरि! हरि!! हरि!

श्रीराम! श्रीकृष्ण! श्रीहरि! प्रत्येक नामातली श्री काढून घेऊन ॐ मागे लावला आणि जप झाला ॐ राम कृष्ण हरि!

सगुण निर्गुण असा भेदच नाही उरला. जसजशी वैखरीला या जपाची सवय लागली तसतशी आणखी एक गंमत सुरु झाली.

शिष्य आपोआप आसनस्थ होऊ लागला. ॐ राम कृष्ण हरि चाललाच होता. त्याचे डोळे आपोआप मिटले. श्वास संथ झाला. मानस गाभारी सोsहं घोष घुमू लागला. भूपाळी आठवली-

"प्रभात झाली स्वरूपनाथा या हो मम अंतरि! सोsहं घोषचि घुमत रहावा मानस गाभारी!"

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment