अशी व्हावी सहजच एकादशी
देहच देहू तुकया आत्मा गात्रे इंद्रायणी
आळंदी मन, ज्ञाना आई, घे मज उचलूनी
ती पाजत प्रेमाचा पान्हा काय उणे मजशी?
अशी व्हावी सहजच एकादशी ! १
मायबाप विठ्ठल रखुमाई धरता ती पाउले
आज्ञापालन हातुन घडता विठ्ठल घरी आले
पुंडलिकास्तव सान विटेवर तिष्ठे हृषिकेशी
अशी व्हावी सहजच एकादशी ! २
हरिपाठाची गोडी लागे, रुजते मनि ओवी
अभंगवाणी श्रीतुकयाची हरि वेणू वाजवी
विवेक सद्गुरु अंतरी वसुनी मजला उपदेशी
अशी व्हावी सहजच एकादशी ! ३
नकोस शिणवू काया वाया, नको दूर तुज जाण्या येण्या
बोरे चाखी, सेवी पोहे, कृष्ण चापतो कण्यावर कण्या
भक्तिभाव भर सांभाळुन धर माथ्यावर कळशी
अशी व्हावी सहजच एकादशी ! ४
तू जे करशी कल्याणाचे श्रद्धा दृढ राहो
सबुरी होवो मज सवयीची देह भले जावो
स्वरूप आनंदाने न्यावे मज पवनाशी
अशी व्हावी सहजच एकादशी ! ५
राम कृष्ण हरि, ज्ञानबा तुकाराम गजर पडो कानी
भानुदास एकनाथ पैठणहुन ये मृदुल मधुर वाणी
भागवताचे निमित्त करुनी कधी हृदयी धरशी
अशी व्हावी सहजच एकादशी ! ६
मी कर्ता हा नकोच ताठा पाण्यासम व्हावे
पाट काढुनी वाट दिली त्या दिशेनेच जावे
हे जगदीशा वनराईतुन फुलांतुनी हसशी
अशी व्हावी सहजच एकादशी ! ७
मन कोणाचे नच दुखवावे पथ्या पाळावे
परस्परांशी मधुर भाषणे मैत्र जुळुन यावे
तो मी तू ही मुळात एकच गिरवु पाठाशी
अशी व्हावी सहजच एकादशी ! ८
भाजी भाकर सेवन केली व्रत नच मोडेल
पचायला जड टाळावे कोठे बिघडेल
गावकऱ्यांनी प्रेमभराने कराव्यात चौकशी
अशी व्हावी सहजच एकादशी ! ९
प्रश्न विचारुन शंका फिटती समाधान होते
कारण येते शोधाया मग रहस्य उलगडते
समजावुन ते द्यावे जे जे कळते आपणासी
अशी व्हावी सहजच एकादशी ! १०
देशी भाषा वेषहि देशी चालरीत देशी
प्रचलित सगळ्या प्रांतांमध्ये असे कधी करशी
रामराज्य भूवरती नांदे दिसु दे सगळ्यांशी
अशी व्हावी सहजच एकादशी ! ११
- श्रीराम बाळकृष्ण आठवले