Friday, January 26, 2018

भारतीय मी इथे जन्मलो..



भारतीय मी इथे जन्मलो माती ही मोठी माता
इथे खेळलो, पूर्ण उमललो, विसावेन जीवन सरता!

राम कृष्ण आदर्शच माझे रामायण बहु प्रिय मजला
भगवद्गीता मजला गमते अमृतघट हा भरलेला

निर्भय, निस्पृह बहुश्रुत मला स्वावलंबने व्हायाचे
नर नारायण होत प्रयत्ने विघ्नांशी झुंजायाचे

जिज्ञासा जागती ठेवता हुरूप वाढे शिकताना
प्रश्न आपुले उत्तर अपुले अविरत चिंतन घडताना

इतिहासा जो विसरून जातो देशनिवासी तो कसला
अपमानाची चीड न ज्याला सैनिक देशाचा कसला

आक्रमणाची खंत वाटु दे विभाजनाचे शल्य सलो
अखंड भारत अजिंक्य भारत मना मनातुन स्वप्न फुलो

रहस्य गायत्री मंत्राचे अभ्यासे जाणुन घेई
सूर्यासम तेजस्वी होउन मने मने जिंकुन घेई

अथर्वशीर्षाच्या अभ्यासे वक्तृत्वाचा फुले मळा
सामवेद तो शिकता शिकता अंगी मुरते गान कला

संध्या वंदन अर्घ्य समर्पण इंद्रिय संयम नित घडता
नित्य नवा दिन उत्साहाचा जीवनसाथी तो सविता

विनायकाचे मज आकर्षण  गणनायक मज व्हायाचे
चातुर्याने पराक्रमाने अरिमर्दन रणि करायचे

रचयिता - श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, January 21, 2018

घालू या सूर्यनमस्कार सर्वदा.....



घालू या सूर्यनमस्कार सर्वदा! ध्रु.

रवितेजे उजळे तन
रवितेजे उजळे मन
निर्धारे निर्दालू सकल आपदा!१

नामे ती मनि येता
रसभरिता हो कविता
नमन घडे ती घटिका पूर्ण सौख्यदा!२

साधनात सांघिकता
समुदायी विरघळता
गगनधरांशी जवळिक परममोक्षदा!३

घामाने तन भिजले
वदनावर स्मित फुलले
श्वसनी येते सुरेल तालबद्धता!४

भक्तीला तन साधन
नमनाने मन पावन
योग येत जुळुन असा प्रभो सर्वदा!५

रचयिता - श्रीराम बाळकृष्ण आठवले

Friday, January 12, 2018

स्वामी विवेकानंद - देवदर्शना तयांनीच मम वाट खुली केली!


स्वामी विवेकानंद

गुरुदेवांना माझी ओळख कधीच पटलेली -
देवदर्शना तयांनीच मम वाट खुली केली! ध्रु.

सांगवे न मज ऐसे काही उभयांमधले नाते
आळवताना प्रभूस गीती स्वर जुळलेले होते
त्यांच्या स्पर्शे अनाम असली कैसी जादू केली! १

मनात क्रांती घडून आली अनुभव हा मोलाचा
धडा गिरवला माझ्या नकळत पहिला मी योगाचा
मीपण माझे पार लोपले प्रसन्न झाली काली! २

आईचे मी कार्य कराया जगात या आलो
गुरुकृपेने ध्यानी येता स्वस्वरूप झालो
तीच ईश्वरी माता माझ्या हृदयी प्रकाशली! ३

तिचीच सत्ता जीवनावरी पुरते हे कळले
मी नच माझा मी सकलांचा आतुन जाणवले
प्रार्थनेतला अर्थ समजवे आई महाकाली! ४

ती हालविते बोलविते ती कार्यहि ती करवी
लालनपालन करते आई ज्ञानकवळ भरवी
गुरुकृपेची अशी प्रचीती आली मज आली! ५

रचयिता - श्रीराम बाळकृष्ण आठवले

Monday, January 1, 2018

ये नववर्षा!

ये नववर्षा -
जगताच्या या उंबरठ्यावर
नको धरू संकोच कशाचा
सिद्ध आज मी तुझ्या स्वागता!

मला न माहित -
काय लपविशी अपुल्या उदरी
गूढ गुपीते -
असो प्रीतिच्या वा शांतीच्या
अमृतधारा

असोत किंवा
अती भयंकर युद्धाच्या
धगधगत्या ज्वाळा!

मला आढळे
तुझ्या मुखावर
मिस्किलतेचा भाव आगळा!

इतुके परि तू
मनात बाळग
हे नववर्षा -

असो सुखाचा अमृत प्याला
वा दुःखाचा चषक विषाचा
प्राशिन अगदी शांतपणाने
स्थितप्रज्ञ मी नव्या युगाचा!

- श्रीराम बाळकृष्ण आठवले
१ जानेवारी १९५७