Monday, March 19, 2018

भूपाळी - प्रभात झाली स्वामि समर्था.

प्रभात झाली स्वामिसमर्था भक्त सहज जमले
उठा उठा हो सद्गुरुराया दावा पदकमले!ध्रु.

दत्तदिगंबर ध्यान पाहु दे डोळे भरभरुनी
श्रीस्वामी समर्थ जय जय घोष असो वदनी
भक्तिप्रेमे कंठ दाटतो अश्रू ओघळले!१

वैराग्याची विजयपताका अशीच फडफडु दे
अध्यात्माचा भव्य चौघडा धडधड  वाजू दे
अक्कलकोटच मन झालेले कानी वच आले!२

आजानबाहू स्वरूपसुंदर काया रसरसली
रोमरोम फुलला मम तनुचा अशा सुभगकाली
स्वामीस्तवना हवी सुसंधी शब्द पुढे धावले!३

मंदमंदशी झुळूक आली गंधित झालेली
कळ्या वेलिवर सुमने होण्या टपल्या यावेळी
ती आतुरता होय अनावर डोळे उत्सुकले!४

सद्गुरु लीला कथिता श्रविता मन झाले काशी
तुम्हीच शंकर स्वामिसमर्था यावे वसण्यासी
गंगेचे जल चरण धुवाया नयनी या भरले!५

अच्छा होगा घनगंभिर ही सादाविण वाणी
आता ऐकली भावभाबड्या माझ्या कानांनी
अहोभाग्य हे प्रशांत वेळी जवळ मला केले!६

स्वामी समर्थ स्वामी समर्थ पाचच ही अक्षरे
वेदमंत्रशी वंद्य आम्हाला त्यांच्या उच्चारे
श्रीरामाला स्फुरण जाहले स्तवन सहज घडले!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

काकड आरती गाऊ स्वामी समर्था..

काकड आरती गाऊ स्वामी समर्था
स्वामी समर्था हो दत्ता अवधूता!ध्रु.

तण अभिमानाचे उपटावे
आसक्तीचे नाव नुरावे
नामस्मरणे मन पवनाला द्या जोडुन आता!१

गृहस्थ असुनी घडते भक्ती
नीतिबंधने जीवन युक्ती
प्रभातकाली तनामनाने वंदू समर्था!२

बसल्या जागी यात्रा घडते
स्वामीदर्शन अवचित होते
आनंदाश्रू ओघळती हो अनुभव हा येता!३

देहच मी भ्रम जळून जावा
भवभीतीने पळ काढावा
पराक्रमाची वाढो ईर्षा पुरुषार्था करिता!४

सुधारणा हो माझ्यापासुन
पालट व्हावा स्वामी आतुन
मने मनाला द्या द्या जुळवुन स्वामी समर्था!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

भूपाळी - उठा उठा हो स्वामी समर्था..

उठा उठा हो स्वामी समर्था प्रभात ही झाली!
प्रभात झालेली, वदनी प्रसन्नता हसली!ध्रु.

नित्यच लागे परस्परांना ओढ भेटण्याची
हसण्या रमण्याची, तैशी सुखसंवादाची
आम्ही लेकरे स्वामीमाउली जमलो भवताली!१

शुभकार्या आरंभ करावा सादर नमनाने
नमने वाहुन स्तवने उधळत भाविक नेमाने
भूपाळीस्तव सरसावत या शब्दांच्या ओळी!२

आपण अमुचे, आम्ही अपुले या रेशिमगाठी
तुटायच्या ना सुटायच्या ना या रेशिमगाठी
सुरेल सनई म्हणते गाते मीही भूपाळी!३

ज्योत ज्योतिने लागे, वाढे भक्तीने भक्ती
समाजपुरुषा जागृत करते व्यक्ति आणि व्यक्ती
चैतन्याचा अनुभव देण्या रचना ही स्फुरली!४

आत्म्यावर विश्वास प्रकटतो शब्दाशब्दात
भीति कुठली, ठामपणा तो नित्य भाषणात
प्रकाशपूजन स्वामी घ्यावे करवुन या वेळी!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Saturday, March 3, 2018

तुकोबांचे बोल ..

तुकोबांचे बोल आणतात 'डोल
जीवनास मोल कर्तव्याने ।।१

उजळाया वाट अभंगाचा थाट
नामाची पहाट उजाडली ।।२

आनंदाचा गाव देई विठुराव
ऐसा नवलाव भक्ताघरी ।।३

आपुले कीर्तन आपुले श्रवण
भजन पूजन चाले सदा ।।४

हाचि संतसंग देही पांडुरंग
रंगला अभंग तुकोबांचा ।।५

पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी
रामाच्या नयनी अश्रुपूर ।।६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

तिथे तुका साकारला.

टाळ चिपळ्यांची साथ। करी काळावर मात
जरी तुका वैकुंठात। भरलासे अभंगात।।

दीन जन हृदी धरा। दु:खितांची सेवा करा
पांडुरंग घोष करा। ठेवा स्वार्थावर चिरा।।

हेच हेच वीणा सांगे। धाव माये पांडुरंगे
तुकाराम हेच मागे। राहा देवा पुढे मागे।।

समाजाशी एकरूप। तरी व्यक्ति सुखरूप
पाहा आपलाले रूप। सुख भजनात खूप।।

तुका वैकुंठास गेला। तरी घरोघरी आला
जिथे प्रेम नि जिव्हाळा। तिथे तुका साकारला।।

राम सांगे थोडक्यात। ठेवा समतोल चित्त
परमार्थ प्रपंचात। पांडुरंग माणसात।।

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले


Friday, March 2, 2018

परमार्थाला प्रपंच साधन!!

नव्हेच अडसर प्रपंच काही
नव्हेच बेडी प्रपंच पायी
वद वद जिव्हे श्रीनारायण
परमार्थाला प्रपंच साधन !१

पाची बोटे समेट करती
अवजड वस्तू सहज उचलती
सहकार्याचे गाता गायन
परमार्थाला प्रपंच साधन !२

पोटापुरता पैसा मिळवा
लोभ धनाचा टाकुन द्यावा
दीन जनांचे करता पालन
परमार्थाला प्रपंच साधन !३

दुःख जनांचे माना अपुले
सुख सर्वांचे सुखच आपुले
जनात बघता श्रीनारायण
परमार्थाला प्रपंच साधन !४

एकनाथ हे माय जनांचे
तात जनांचे गुरु जनांचे
सर्वात्मकता अंगी येण्या
परमार्थाला प्रपंच साधन !५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले