Wednesday, May 16, 2018

आरती श्रीगीतेची

आरती श्रीगीते, तू प्रसाद देते
मोह जातो दूर देशा आत प्रभात होते ! ध्रु.

तुझे नाव सार्थ आई तुज गाई सदा मी
समस्या न उरे काही ऐसा अनुभव येई ! १

कर्ता मी न कळो आले माझे मीपण गेले
फली नुरे लेश आस मन विरक्त झाले ! २

भोग देह सुखे भोगो त्याचा लेप कशाला?
सोसण्यात सुख सारे शांति वाटे जिवाला ! ३

नर होय नारायण यत्न हवा कराया
अल्प स्वल्प सत्कार्य कधि न जाई वाया ! ४

नित्य नवे गीता बोले रामे ऐकावे नित्य
श्रवणेहि जाती दोष हे त्रिवार सत्य ! ५

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

कृष्णनाथ हे कृपाच तुमची! अध्याय १८ - मोक्षसंन्यास योग

नियत कर्म ते अटळ अर्जुना मनापासुनी मुदे करी
नको अहंता नको फलाशा तो कर्ता हा भाव धरी!१

लेप न लागे कर्तृत्वाचा आकाशासम तो झाला
भिन्न देह जरि भक्तीने त्या योगेश्वरही गहिवरला!२

सात्त्विक बुद्धी पूर्ण जाणते अविनाशी त्या भगवंता
सहज कर्म ते धर्मच गमले लेश न भ्रांती मग चित्ता!३

संग तुटे मग द्वंद्व मिटे पथ पुढचा सगळा उलगडला
आत हरी बघ निमिष तरी तो नित भेटाया आसुसला!४

प्रकृति घडवी कर्मे सारी नको युद्ध  मज हट्ट तुझा
स्वतंत्र नसशी पार्था येथे छळे तुला अविचार तुझा!५

हे अंतःस्था शरण तुला मी जसे सांगशी मी करतो
तुझ्या कृपेने ज्ञान जाहले कृतज्ञतेने तुज नमितो!६

कृष्णार्जुनसंवाद चालला अंतर्मुख तो श्रवण करी
द्वंद्व कुठे भयशोक कुठे ज्या चालवि संगे स्वये हरी!७

अर्जुन झाले मन हे माझे स्वरूपनाथा स्वामिवरा
कृष्णनाथ हे कृपाच तुमची आत झरे शांतिचा झरा!८

- शुभं भवतु-
।।श्रीकृष्णार्पणमस्तु।।

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Monday, May 14, 2018

ॐ तत् सत् हा घोष घुमावा! अध्याय १७ - श्रद्धात्रयविभाग योग

शास्त्रविधीला सोडुनि पूजन करिती जन जे देवाचे
त्यांची श्रद्धा कशी असे हा प्रश्न माधवा मनि उपजे!१

स्वभाव जैसा श्रद्धा तैशी सात्त्विक राजस तामस रे
श्रद्धेविण ना जगता येते श्रद्धामय जन हेच खरे!२

आहाराने मन बनताहे मनच घडविते आचार
सात्त्विक श्रद्धा सात्त्विक मन मग धार्मिक झाला आचार!३

प्रसन्न मन जर शांत भाव तो मन:संयमन पावित्र्य
सुखद सत्य वच कृती संस्कृती परमात्मा नित ध्यातव्य!४

शरीरस्थ परमात्म्यालागी कृश करणारे असुरच ते
अविचाराने झपाटलेले अध:पतित जन ते पुरते!५

गुरुजनपूजन, सुमधुर भाषण, कर्म जयांचे निष्काम
मनी शांतता, तनी वज्रता हृदय तयांचे मम धाम!६

ॐ तत् सत् हा घोष घुमावा कर्मे हरिला पूजावे
यथासांग तो यज्ञ खरोखर प्रत्येकाने जाणावे!७

श्रद्धा असते प्राण खरोखर हवनाचा तपदानाचा
श्रद्धा आहे दृढतर पाया विजयाचा ऐश्वर्याचा!८

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

दैवी संपद् झगमगते! अध्याय १६ - दैवासुरसंपद् विभाग योग

अभय  शुद्ध मन ध्यानी आवड दान दमन पूजन रुचते
दुःख न देणे, सत्य वागणे दैवी संपद् झगमगते!१

दंभ दर्प अभिमान क्रोध अन् भाषणातली कर्कशता
अज्ञानच वर्तनी प्रकटते अशी आसुरी गुणवत्ता!२

मुक्तिदायिनी दैवी संपद् सहजपणे तुज लाभतसे
शोक टाक अर्जुना भाविका सुदैव कैसे शोभतसे!३

कामक्रोधपरायण जे जे आशापाशी बद्ध सदा
अज्ञाने मोहित झालेले त्यांच्या दैवी बहु विपदा!४

अंतर्यामी जो मी वसलो त्या माझ्या द्वेषे जळती
पुन्हा पुन्हा ते असुरच म्हणुनी इहलोकी खितपत पडती!५

काम क्रोध अन् लोभ अशी ही तीनहि द्वारे नरकाची
तयां टाळण्या मनापासुनी कास धरी तू भक्तीची!६

नरकद्वारापासुन सुटला साधतसे निजकल्याण
त्या भक्ताचा त्या ज्ञान्याचा वाटतसे मज अभिमान!७

जे शास्त्राने नेमुन दिधले कर्म करावे मनुजाने
मनात येते तसे वागणे कड्यावरुन लोटुनि घेणे!८

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, May 13, 2018

संसाराचा वृक्ष वाढला! अध्याय १५ - पुरुषोत्तम योग

संसाराचा वृक्ष वाढला फांद्या खाली मूळ वरी
आदि न अंत जयाचा ठावा नवल केवढे खरोखरी!१

'मी माझे मजसाठी सगळे' अशी वासना दृढ बंध
संगच हा सुखदुःखा कारण मनुज होत भोगे धुंद!२

असंगशस्त्रा करात घेउन नेटाने या छेदावे
जिथे जाउनी पुन्हा न येणे परमपदा त्या पोचावे!३

स्वरूपात स्थिर सुखदुःखी सम निरहंकारी निर्मोही
तो ज्ञानी द्वंद्वातुन सुटला मला मिळाला तू पाही!४

भगवंताचा अंश जीव हा स्वरूप कैसा नाठवतो
इंद्रियवश तो झाला म्हणुनी अज्ञानातच गुरफटतो!५

हृदयी वसला तयास दिसला अभ्यासाला जो बसला
अज्ञ जनांना यत्नांतीही श्रीहरि नाही सापडला!६

नाशवंत अविनाशी ऐसे पुरुष उभयविध जरि असती
परंतु उत्तम पुरुष निराळा त्या परमात्म्या मुनि म्हणती!७

पुरुषोत्तम हा पूर्ण जाणला ज्ञानी भक्त असा विरळा
तो योगी तो आत्मतृप्तच सेवक स्वामी झालेला!८

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

Saturday, May 12, 2018

त्रिगुणांचा हा खेळ चालला! अध्याय १४ - गुणत्रयविभाग योग

त्रिगुणांचा हा खेळ चालला प्रकृति त्यांची आई रे
अव्ययास त्या गुणच बांधती शरीरात या ओळख रे!१

ज्ञानाचा अभिमान, सुख हवे सत्त्वाचे बंधन पडले
निर्विकार जो प्रकाशदाता त्यावर पडले हे जाळे!२

मी कर्ता मज हवेच फळ ही रजोगुणाची खूण असे
कर्मासक्ती जखडत जीवा जाच हाच ना सोसतसे!३

अज्ञानातुन तमोगुणाचा उगम मोह मग झपाटतो
आळस निद्रा प्रमाद यांचा प्रभाव मोठा जाणवतो!४

सत्त्वगुणातुन ज्ञान होतसे लोभ वाढतो रजोगुणे
तमोगुणे अज्ञान वाढते कळेल तुज हे मननाने!५

त्रिगुणांविण नच कर्ता कोणी साक्षी त्याला हे दिसते
तिन्ही गुणांच्या पलीकडे जो त्याला भेटावे वाटे!६

जन्ममृत्यु वा जरादुःख नच पार्था त्रिगुणातीताला
सुखदुःखी सम हरिभजनी रत सदैव अमृत प्यालेला!७

भक्ति घडावी गुण लंघावे सहजपणे सगळे व्हावे
कृष्णच कर्ता कृष्ण करविता ज्ञानकमळ मग उमलावे!८

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

Friday, May 11, 2018

सर्व क्षेत्री माझी वसती! अध्याय १३ - क्षेत्रक्षेत्रज्ञ योग

शरीर म्हणजे क्षेत्र अर्जुना आत्मा तो क्षेत्रज्ञ असे
या दोघांचे नाते कैसे जिज्ञासा वदनी विलसे!१

सर्व क्षेत्री माझी वसती दिक्कालांची ना सीमा
जो परमात्मा तोच तोच मी ज्ञान हेच रे अरिंदमा!२

दहा इंद्रिये पाच विषय ते अहंकार मन बुद्धि तशी
क्षेत्र विकारी संक्षेपाने तुला दिली कल्पना अशी!३

विकारविरहित निर्मळ तनमन उपकारक हे ज्ञानाला
साधक असतो सदैव तत्पर नित्यनेम अनुसरण्याला!४

ज्ञान प्रकटते सद्गुणांतुनी आचरणे जन पारखती
विषया विटता ममत्व सरते समत्व देते अनुभूती!५

आनंदाचा कंद अंतरी पालटले मन आत वळे
नमन घडे मग सहजपणे हे ज्याचे त्याला जाणवले!६

वसे शरीरी लेप न काही गुणातीत परमात्म्याला
दोघांमधला भेद कळे तो भ्रमजाली ना गुरफटला!७

क्षेत्र तसे क्षेत्रज्ञ जाणता नश्वरात शाश्वत दिसला
विकारातुनी सुटण्याचाही उपाय सहजच सापडला!८

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, May 10, 2018

भाविकजन ते आवडती! अध्याय १२ - भक्तियोग

सगुण समजुनी पूजन करिती भक्तीने तुज आळविती
निराकार तू ज्ञान होउनी उपासना योगी करिती!१

कळला वळला योग कुणाला सांग मला हे गोपाळा
उत्तर देता या प्रश्नाचे योगेश्वर फुलुनी आला!२

नाम स्मरती गुण गाती जे भगवच्चिंतनी रमताती
देह विसरती समरस होती भाविकजन ते आवडती!३

कर्मे हातुनि जी घडताती पूजेचे साहित्यच ते
मी माझे हे मावळलेले अज्ञानाचे तिमिर कुठे?४

माझ्या ठायी लाव मनाला स्थापन कर तू बुद्धि तिथे
कर्मे कर तू माझ्यासाठी नको फलाशा शुद्धमते!५

ममत्व सरले सुखदुःखी सम शांत शांत मन झालेले
ध्यान साधले त्या योग्याचे मी माझेपण मावळले!६

सावधान तो पूर्ण मोकळा भक्तिभावना रसरसली
न विटे जगता, विटे न जग त्या स्थिती तयाची आवडली!७

ईश्वर ध्याता ईश्वर झाला प्रज्ञा त्याची स्थिर झाली
तो माझा मी त्याचा संतत चाले खेळीमेळी!८

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

Wednesday, May 9, 2018

बघून घे रे रूप खरे! अध्याय ११ - विश्वरूपदर्शन योग

शक्य असे तर मला पाहु दे रूप दिव्य ते श्रीकृष्णा
विस्ताराने वर्णिलेस जे ते बघण्याचा मोह मना!१

दिव्य दृष्टि घे धनंजया तू विश्वरूपदर्शन घे रे
ज्ञानशक्तिबलतेजयुक्त ते बघून घे रे रूप खरे!२

अंत न मध्य न आदि तसाही न कळे काही पार्थाला
विस्मयकारक भयंकर असे बघता बघता बावरला!३

सर्वच जाते तुझिया तोंडी उफाळताती त्या ज्वाळा
कुणी न सुटते तडाख्यातुनी ठाव मनाचा मम सुटला!४

तू निर्माता, पालनकर्ता, तू संहर्ता कुणी न मी
वळे बोबडी आवर आवर भगवंता तुज भक्त नमी!५

दिशा न कळती सुख न लाभते प्रसन्न हो रे भगवंता
का धरिलेसी उग्ररूप हे मना ग्रासती भयचिंता!६

तुझी योग्यता ध्यानी आली सौम्य रूप तू धरी हरी
चरणशरण मी अरे अच्युता धाव पाव तू कृपा करी!७

कर्म करी तू माझ्यासाठी मीच अर्जुना परम गती
असे वदे गोविंद तेधवा कौंतेया लाभली धृती!८

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

विभूतींस या गणना नाही! अध्याय - १० विभूति योग

तू आवडता म्हणुनि अर्जुना हितार्थ तुझिया सांगतसे
रहस्यमय हे वचन ऐक रे तव मूर्ती अंतरी वसे!१

सुरगण ऋषि वा कुणी न जाणति मम उत्पत्ती वा लीला
निश्चल ध्याने ध्याता मजला अवगत होई ज्ञान तुला!२

जे दिसते जे जाणवते ती माया भगवंताची रे
इथे तिथे भगवंत नांदतो ही अनुभूती तत्त्व बरे!३

मलाच ध्यावे मलाच गावे मज वर्णावे परोपरी
असे वाटते त्या भक्तांना जोड बुद्धिची मिळे खरी!४

शशीसूर्य मी सामवेद मी मी रुद्रांचा शंकर रे
मी सागर मी हिमाद्री तैसा कुंतीसुत मी अर्जुन रे!५

उत्कट भव्य नि दिव्य तसे मी न दिसे तेथेही असतो
जो मज भजतो अनन्यभावे कधी कुठेही ओळखतो!६

कर्तव्याचे भान तेच मी भगवंताचे कीर्तन मी
परमार्थाचे चिंतन ते मी चराचराचे बीजच मी!७

विभूतींस या गणना नाही तरी कल्पना दिली तुला
एकांशाने जगा धारिले तत्त्वाधारे जाण मला!८

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

Tuesday, May 8, 2018

भजन करी मम! अध्याय ९ - राजविद्याराजगुह्य योग

असूया न तुज हे निष्पापा तुझ्या मनाचा तळ दिसतो
म्हणुनि अर्जुना पवित्र शुभ हे ज्ञान गहन तुजला कथितो!१

मी निर्माता, मी संहर्ता पार्था सगळ्या भूतांचा
करुनि अकर्ता कसा पहा तू आश्रय घेउनि योगाचा!२

माझी माया जगा निपजवी कर्तृत्वाचा लेप नसे
नच ध्यानी ये परमात्मा मी, अज्ञ जनां मी तुच्छ दिसे!३

दृढव्रती मज भजती संतत वंदुनि माझे गुण गाती
ते माझ्याशी नित्य जोडले निरहंकारी मज ध्याती!४

मी जीवन मी मृत्यु तसाही मी तपतो मी वर्षतसे
सर्व सर्व मी ध्यानी धरता अनुसंधानी खंड नसे!५

नसे फलाशा अनन्यभावे मला चिंतुनी जे रमती
योगक्षेम तयांचा वाहे निजरूपाची त्या प्राप्ती!६

पान फूल वा पाणी दिधले आवडले मज आवडले
जे भक्तीने मला अर्पिले ते घेता मन गहिवरले!७

विसर मागचे भजन करी मम पूजन कर देहा विसरी
पवित्र संगम सरितांचा हा तप्त जनां संतृप्त करी!८

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

Monday, May 7, 2018

सदा सर्वदा मला स्मरावे! अध्याय ८ - अक्षरब्रह्म योग.

कसे जगावे हे तुज कळले, कसे मरावे जाणुनि घे
सदा सर्वदा मला स्मरावे रहस्य इतके साधुनि घे!१

ज्या भावाचे चिंतन घडते त्या भावाचे कर्म घडे
नाम स्मरता ज्ञान स्फुरते भक्ताचे ना कुठे अडे!२

सदैव स्मर तू मजला पार्था युद्ध करी तू प्राणपणे
मजला अर्पुनि तनमनधन मग तुला न राही कुठे उणे!३

मन हे निश्चल योगाभ्यासे देह पडो मग कुठे कधी
मलाच येउनि मिळे भक्त तो, तो योगी तो खरा सुधी!४

एकाक्षर जे ब्रह्म तयाचा मुखातुनी हो उच्चार
मीच प्रेरणा देत तयाला तो वदतो मग ओंकार!५

धाव मनाची नच बाहेरी इंद्रिये न कसमस करती
प्रसन्न मुद्रा त्या योग्याची आत रहाया ये शांती!६

नित्ययुक्त जो माझ्या ठायी अनन्यचित्ते मज भजतो
त्या योग्याने स्मरता मजला तो माझ्यातच विरघळतो!७

आठवाच मी आठव मजला सदा सर्वदा निरोप हा
दुःखालय तो पुनर्जन्म नच, परमसिद्धिचा मार्गच हा!८

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

Saturday, May 5, 2018

भाविक ज्ञानी बनतात! अध्याय ७ - ज्ञानविज्ञान योग

सखाच असशी म्हणुनि अर्जुना विज्ञानासह मी ज्ञान
कथितो तुजला असे विवरुनी ऐकताच तू सज्ञान!१

जिज्ञासा तव मला आवडे, कथितो तैसे आचरिशी
साधन घडता योगाचे तू ओळखशी मज ओळखशी!२

मणि ओवावे एका सूत्री मणिमाला ती एक असे
मजविण कोणी जगी न दुसरे स्थावर जंगम मीच असे!३

त्रिगुणांनी जग मोहित झाले कोण ओळखे कसे मला
गुणातीत मज पूर्ण जाणतो दैवी माया तो तरला!४

मायेने जे झपाटलेले ज्ञाना मुकले दैत्यच ते
ते पापी मज कसे पावती आत्मघातकी ठरती ते!५

पुण्यशील जे नित्ययुक्त ते भाविक ज्ञानी बनतात
मी त्यांचा ते माझा ऐसा भाव जगतो हृदयात!६

अचला श्रद्धा मीच देतसे जैसी श्रद्धा लाभ तसा
जे माझे ते मलाच मिळती भक्तीचा भरवसा असा!७

जरामरणभय त्यांचे सुटले आश्रयास ते आलेले
ते योगी ते ज्ञानी त्यांनी ब्रह्माला त्या आपणिले!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Friday, May 4, 2018

सुशांत सुस्थिर मन व्हावे ! अध्याय ६ - आत्मसंयम योग

कर्मफलाची धरी न आशा जो योगी तो संन्यासी
नच शिवतो संकल्पही चित्ता लेप न लागे गगनासी!१

मन वश झाले इंद्रिये तशी समजावा हा उद्धार
खचे न केव्हा महावीर जो गोविंदच तो होणार!२

विषया विटला हरिस भेटला भाग्यवंत तो खराखुरा
अभ्यासाने घडता प्रगती विकार करती पोबारा!३

एकांतातच बसुनी ठायी सुशांत सुस्थिर मन व्हावे
मंदिरात त्या ये मुरलीधर सोsहं सोsहं ऐकावे!४

गोपालाचे ध्यान लागता उसळे आतुन आनंद
कृष्णसखा कर धरुनि चालवी आनंदाचा तो कंद!५

मीच सुदामा हरिला देतो अवधानाचे हे पोहे
हरीच ध्याना मला बोलवी कृतज्ञ त्याचा मी आहे!६

चंचल मन परि कसे आवरू विचारता हे श्रीकृष्णा
हासत सांगे समजावुन हे करुणा आली दयाघना!७

'अभ्यासाने वैराग्याने मन वश होते' हरि वदला
ते आश्वासन जणु संजीवन उपकारक ते योगाला!८

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, May 3, 2018

दोन्ही पथ हे कल्याणाचे! अध्याय ५ - कर्मसंन्यास योग

संन्यासाचे जे फल आहे योगाचेही तेच असे
दोन्ही पथ हे कल्याणाचे पार्था मी तुज सांगतसे!१

कर्मयोग आचरिण्या सोपा जनसामान्या तोच भला
ओघे आले कर्म करी जो स्वधर्म त्याने आचरिला!२

नसे फलाशा निर्मळ तनमन कर्म न बांधे मनुजाला
हरिशी साधे योग सहज मग सद्भाग्याला नसे तुला!३

मी नच कर्ता फलावरी मग कुठला माझा अधिकार
अशी भूमिका ज्याची राहे हरि घे त्याचा कैवार!४

आशा सुटता कर्मफलाची भगवत्प्राप्ती होत असे
जनसामान्या कर्मयोग हा आचाराचा मार्ग दिसे!५

प्रकृतीच ती घडवी कर्मे कर्तेपण मग ते कुठले?
हरिभक्ताला जीवन जगता नित्य आतुनी जाणवले!६

समत्वभावी स्थिरावले मन अंकित  झाला संसार
निराकार सम ब्रह्म जणू ते याच्यारूपे साकार!७

ध्यानाचा आनंद आगळा आत आत तो साठवला
विषया विटुनी साधक सहजच अभ्यासी सुस्थिर झाला!८

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

ज्ञानयज्ञ हा थोर अर्जुना अध्याय ४ - कर्मब्रह्मार्पण योग

असशी माझा सखा म्हणूनी योग अर्जुना तुज कथिला
बरीच वर्षे होउनि गेली सूर्याला जो सांगितला!१

धर्मग्लानी जेव्हा येते अधर्म वाढे जोराने
धर्मस्थापन करण्यासाठी मी अवतरतो नेमाने!२

सज्जनरक्षण खलनिर्दालन याचा लागे ध्यास मला
मम जन्माचे रहस्य जाणे रुचतो ज्ञानी भक्त मला!३

कर्मे मजला लिप्त न करती कर्मफलाची स्पृहा नसे
हे जो जाणे तोही तैसा कर्मे बद्ध न होत असे!४

तनमन ज्याने वश केलेले देहाने जरि कर्म करी
पाप न लागे तिळभर त्याला अंतरि त्याच्या वसे हरी!५

नाश पावते कर्म तयाचे यज्ञ तयाला नाव मिळे
चित्तहि होते सहज शुद्ध मग संदेहाने ते न मळे!६

ज्ञानयज्ञ हा थोर अर्जुना कर्मे ज्ञानी विरघळली
विनम्र होउनि प्रश्न करी बघ सद्गुरु त्याला कुरवाळी!७

त्या ज्ञानाने  धन्य धन्य तू मोहाचे मग नाव नको
तुझ्यात मी अन् मदंतरी तू अच्युत तू विस्मरू नको!८

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

Wednesday, May 2, 2018

कर्म न चुकले कधी कुणाला! अध्याय ३ - कर्मयोग

कर्म न चुकले कधी कुणाला इंद्रियवश ना कधी व्हावे
कर्तृत्वाचे ओझे कोणी माथ्यावरती नच घ्यावे!१

'मी, माझे' अभिमान सुटावा परमात्म्याशी तो योग
जरी निरंतर ऐक्यभाव मग द्वैताचा कुठला रोग?२

आसक्ती सोडूनि कर्म जे यज्ञच त्याला नाव असे
मिळवायाचे मला न काही तरी कर्म नच टाळतसे!३

परस्परांना जाणत जगणे सहकाराचा हा मंत्र
उणे दिसे ते पूर्ण करावे प्रगतीचे सोपे तंत्र!४

यज्ञचक्र हे सतत फिरावे अशी योजना आखलेली
कामक्रोध ही छुपी मंडळी दबा धरुनी बसलेली!५

देवांना संतुष्ट करा हा यज्ञ चालवा कर्मांचा
बंधन सुटते कर्माचे ते सांगावा हा कृष्णाचा!६

आत्म्यातच सर्वदा रमावे असा रमे तो संतुष्ट
यश लाभो वा येवो अपयश जरा न जाणवती कष्ट!७

आचारच आदर्श मानती बहुजन थोरांचा येथे
ज्ञान जाहले तरी न संता स्वकर्म करणे ते चुकते!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Tuesday, May 1, 2018

कृपामेघ बरसला भूमिवर! अध्याय २ - सांख्य योग्य

खरा धर्म जर कळला नाही कर्म कसे ते घडणार?
देहच मी अज्ञान मनाचे लयास कैसे जाणार? १

शोक न करणे योग्य अशाच्या शोकी अर्जुन बुडलेला
पांडित्याच्या गोष्टी हरिला रणात सांगत सुटलेला!२

कृष्णाच्या उपदेशासाठी अर्जुन निमित्त झालेला
कृपामेघ बरसला भूमिवर जो तो मानव धालेला!३

आत्मा असतो नित्य सत्य हे तनु येई तैशी जाई
स्वधर्म ध्यानी धरूनि पार्था झुंज रिपूंशी तू घेई!४

धर्मोचित हे युद्ध पांडवा जरी न आता करशील
उपहासाला जगात अवघ्या पात्र इथे तू ठरशील!५

'मी कर्ता' हे नकोस समजू अज्ञाने या बेजार
नसत्या शंका काढुनि पार्था वाढविशी तू आजार!६

प्रसन्नतेच्या योगे दुःखे बघता बघता सरतात
सोशिकता तर अशी वाढते भूमाता तो साक्षात!७

प्रज्ञा ज्याची स्थिरावलेली कसा वागतो वदे कसा
हरी तयाच्या हृदयमंदिरी, विश्वसखा तो भक्त असा!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले