Sunday, September 30, 2018

मराठी सुभाषिते

जन्मणे भोग देहाचा 
मरणे भोगही तसा 
टाळणे शक्य जे नाही 
त्याचा शोक करू कसा?

'देव पाठीशी आहे!' 

नको भीती, नको शंका 
बोलावे मोकळ्या मने। 
"देव माझा असे त्राता" 
श्रद्धेने कर जोडणे। 

सदासर्वदा मी रामाचा।" 

आलो जगी जरी त्याचा 
गेलो वा तरिही तसा 
सगुणी निर्गुणी एक 
तत्त्वाचा ठसला ठसा।

"सुसंगतीच हवी!" 

संगती चांगली नाही 
कर्णाचे चुकले इथे। 
रथचक्र गिळे पृथ्वी 
पाप पाप्यास भोवते।



Sunday, September 23, 2018

गणेशा नाम तुझे गातो!

रात्रंदिन मी अगा गणेशा
स्वरूप तव ध्यातो
गणेशा नाम तुझे गातो!ध्रु.

मंगलमूर्ती तुजला म्हणती
त्रैलोक्यात पसरली कीर्ती
या मातीतुन देह तुझा रे आकारा येतो!१

अकार उदरा मकार मस्तक
उकार पदयुगुलाचा वाचक
ज्ञानेशे ओंकार दाविला अनुभव तो घेतो!२

मूषकावरी स्वारी बसली
निराशा न नावाला उरली
ज्ञानकमळ करि हळू उमलले सोऽहं घमघमतो!३

ब्रह्मरसाचा करात मोदक
तुझे देखणे सकलां रोचक
अभयहस्त तर अगणित विघ्ने विलयाला नेतो!४

तुला वंदुनी कामे करता
आरंभी घे रूप सांगता
संगीताचा शिल्पकलांचा संगम हा घडतो!५

लोकनायका विनायका हे
प्रवर्तका हे सुधारका हे
एकात्मच हे राष्ट्र बनावे इतके तुज प्रार्थितो!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Friday, September 14, 2018

शेगावच्या गजानन महाराजांची आरती!

गजानना तुज आरती गाउन धन्य धन्य होऊ! ध्रु.

शेगावाचे भाग्य उजळले तुझिया आगमने
अतर्क्य लीला अगा सद्गुरो दरवळली सुमने!
एक एक स्मृतिमणि स्पर्शूनी रोमांचित होऊ!१

अन्न ब्रह्म हे आल्या आल्या जगास दाखविले
सगळे जीवन जलगंगेचे हासत प्राशियले
झळाळते किति विरक्ति कांचन! नेत्र मिटुन पाहू!२

चरणकमळीचे तीर्थ देउनी थोपविले मरण
असा कळवळा ये भक्ताचा करुणामय जीवन
गे विश्वाई धरि गे हृदयी प्रार्थित हे राहू!३

उधळत जगती विकार वारू आण तया नरम
विवेक शिकवी भक्ति बाणवी आस हीच परम
अधिक याहुनी नकोच काही नाम घेत राहू!४

आत्म्याचे अमरत्व शिकविले धगधगल्या ज्वाळा
पलंगावरी सुस्थिर शोभे ज्ञानाचा पुतळा
गिन गिन गिनात बोते भजनच प्रेमाने गाऊ!५

नश्वर देहा त्यजिले तरिही दाखविशी लीला
अनुभव घेता कृतज्ञ भाविक कितिदा गहिवरला
तुझ्या पादुका प्रसादचिन्हच प्रेमभरे पाहू!६

दासगणूंनी ग्रंथनिमित्ते फळ दिधले गोड
जणू माउली निजबाळाचे पुरवितसे कोड
श्रीरामाचे शब्दसुमन हे पदकमली वाहू!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, September 9, 2018

खोटा पैसा असत्य भाषण पचायचे नाही..

खोटा पैसा असत्य भाषण पचायचे नाही
फसवशील तू सकलां, देवा रुचायचे नाही!ध्रु.

मन हे खाते झोप न येते
अन्न न जाते, तळमळ होते
आयुष्याची धूळधाण ते टळायचे नाही!१

शापित धन ते शापित जागा
शापित सत्ता शापित मत्ता
उलटे फासे पडती कैसे कळायचे नाही!२

भेसळ करणे शापच घेणे
लाच मागणे आत्मा विकणे
अशी तशी ना सजा लाभते चुकायचे नाही!३

काम टाळणे सबब सांगणे
नियम मोडणे व्यर्थ भटकणे
दुष्कीर्तीच्या भोगा त्या मग डरायचे नाही!४

सावध होणे चूक टाळणे
भक्ती करणे, त्याग साधणे
हे जर केले माफ मागले हे ध्यानी घेई!५

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
२१.०१.१९८९
खोटा पैसा असत्य भाषण पचायचे नाही..
👆🏻 ऑडिओ

Thursday, September 6, 2018

ऐसा पैसा सुख देतो

कष्ट करावे अंग भिजावे
संतोषाचे बीज रुजावे
हळूहळू अंकुर फुटतो
ऐसा पैसा सुख देतो!१

कला शिकावी, संधि मिळावी
रडवी वदने हसरी व्हावी
कृतज्ञतेने जो मिळतो
ऐसा पैसा सुख देतो!२

कर संशोधन तनमन विसरून
झिजवत देहा चंदन मानुन
कौतुक म्हणुनी जो मिळतो
ऐसा पैसा सुख देतो!३

जनता माझी मी जनतेचा
सेवाभावच रुजावयाचा
तूट भराया जो सरतो
ऐसा पैसा सुख देतो!४

जो प्रेमाचा जो नेमाचा
जो न्यायाचा जो नीतीचा
लोभा विरहित जो असतो
ऐसा पैसा सुख देतो!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Wednesday, September 5, 2018

व्रत घेतले अध्यापनाचे! अध्यापनाचे! जनजागराचे!

व्रत घेतले अध्यापनाचे
अध्यापनाचे! जनजागराचे! ध्रु.

ही बालके माझी मुले
उद्यानि या फुलली फुले
मन रंगले, सद्भाव नाचे! १

जे आतले बहु साचले
शोधूनि ते द्यावे कळे
पूजाचि ही वच माधवाचे! २

संवाद तो साधे जरी
मग वैखरी मधु बासरी
फुलते कळी देणे हरीचे! ३

येतात ही जातात ती
माझी परि अचला स्थिती
दुरि राहुनी सांभाळण्याचे! ४

ते भाग्य हो आले भरा
भरती जणू ये सागरा
तरुनी, मुलां तारावयाचे! ५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
९.१.८२

डॉ सर्वपल्‍ली राधाकृष्‍णन् (भारताचे माजी राष्‍ट्रपती)

तत्‍त्‍वज्ञ तो राज्‍यकर्ता ऐसा योगच दुर्लभ
ज्ञानाचा चालवी यज्ञ कीर्तिचा जगि सौरभ
पूर्वपश्चिम हा सेतु बांधला मृदुभाषणे
राधाकृष्‍णन् अशा संता नम्रते शतवंदने।

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

Sunday, September 2, 2018

तेव्हा मनामनात 'श्रीकृष्णजन्म' झाला!

काळोखल्या मनात नैराश्य घोर येत
"होईल काय, कैसे" छळते जिवास खंत
मज मीच तारणारा हुंकार स्पष्ट आला
तेव्हा मनामनात 'श्रीकृष्णजन्म' झाला!

जड बंधनात जीव सुखदुःख हे चपेटे
सोशी जरी कसेही भजना बसेच नेटे
कोणा कसे न ठावे आनंद दाटलेला
तेव्हा मनामनात 'श्रीकृष्णजन्म' झाला!

कोणी न राव रंक नर नारी नाहि भेद
असु दे स्थिती कशीही नाहीच खंत खेद
द्वंद्वात ना जराही हा जीव गुंतलेला
तेव्हा मनामनात 'श्रीकृष्णजन्म' झाला!

अज्ञान घोर ग्रासे कर्तव्यबुद्धि जाई
मी देह भावनेने तो अश्रुपूर येई
वाक्ताडने कठोर ये जागृती जिवाला
तेव्हा मनामनात 'श्रीकृष्णजन्म' झाला!

स्वातंत्र्य संकटात तो ऐक्यभाव जागे
ही मातृभूमि माझी आज्ञेत वृंद वागे
आव्हान पेलण्या हे हा देश ठाकलेला
तेव्हा मनामनात 'श्रीकृष्णजन्म' झाला!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले