Thursday, November 29, 2018

'माझे पुराण' सांगते अण्णांची बाया!

'माझे पुराण' सांगते अण्णांची बाया!ध्रु.
अर्धांगी मी अण्णांची
सहभागी सुखदुःखांची
आत्मा सेवा उभयांचा जरी दोन काया!
मीही धरली झोळी हाती
स्तुतिनिंदेला लावुन काठी
सत्यवान ते मी सावित्री, तरु ते मी छाया!
पुनर्जन्म माझाच मानते
जीवन जगता, जीवन कळते
अभिमाने सांगते जगाला मी त्यांची जाया!
जसे वाटले तसे बोलले
केले माझ्या मना मोकळे
आयुष्याच्या मुक्तिधामा त्यागाचा पाया!
काम जाहले जाते पुढती
पाच तपांची सरे संगती
वृक्ष बनते धरते आता सगळ्यांवर छाया!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Wednesday, November 28, 2018

पांडुरंग मी करित प्रतिज्ञा, मातृभूमि मुक्तीसाठी..

शपथ भवानी मातेची, शपथ नग्न समशेरीची
पांडुरंग मी करित प्रतिज्ञा, मातृभूमि मुक्तीसाठी!ध्रु.

निर्दालाया ही परवशता
झिजविन कायाचंदन आता
यावज्जीव झटेन प्रत्यही धावत येइन सेवेसाठी!१

देहाचा या होम करावा
नवा जन्म भारतात घ्यावा
कार्य न अपुरे राहू देइन तळमळ मनि दिव्यत्वाची!२

आवश्यक ती शक्तीबुद्धी
पवित्र कार्यी मंगलसिद्धी
माझ्या श्रीहरी देइ सकल तू आस प्रतिज्ञापूर्तीची!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

उधळितो तव चरणांवर फुले..

सत्यशोधका, दलितसेवका
तुझ्यापुढे कर जुळले
विनम्र मस्तक करुनि
उधळितो तव चरणांवर फुले!ध्रु.

तू करुणामय, तू तेजोमय
तूच हिमालय, तू जगि निर्भय
पददलितांचे अश्रू संता
सदया तू पुसले!१

सत्यपूजका, धर्मप्रेषिता
तुज आवडली साधनशुचिता
सुधारणेचे रोप अंगणी
तू प्रेमे लावले!२

तू जनदुःखे दुःखी होशी
त्यांच्या सौख्यी सौख्य मानिशी
दलितांस्तव जे अश्रु सांडिले
त्यांची झाली फुले!३

मानस व्हावे ते गंगाजल
पसरो मानवतेचा परिमल
थोर महात्म्या ध्येयासाठी
तव तनुचंदन झिजले!४

अभिमानाते जाग आणली
उत्कर्षाची वाट उजळली
ज्योतिर्मय या तुझ्या जीवने
पथ आलोकित झाले!५

लढण्यासाठी तूच जन्मला
तू सत्त्वाचा मान राखला
तुझिया कार्ये समतादेवी
प्रसन्नतेने डुले!६

न्यायाते जगि न्याय मिळाला
सत्याला आधार भेटला
अतुलनीय सामर्थ्य नरविरा
रुढींशी झुंजले!७

प्रयत्नवादावरती श्रद्धा
सार जीवनाचे नवबुद्धा
तुझ्या आश्रमी नित रमली रे
देवाघरची फुले!८

परमार्थी तू , तूच तपस्वी
तू कृतयोगी, खरा मनस्वी
प्रेमे धरले तुवा छातिशी
जे रंजले! गांजले!९

तू ज्योती रे प्रकाशपुष्पा
तूच सुमन रे तू निष्पापा
तव गुणकीर्तनि शब्द येउनि
विनयाने जुळले!१०

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२.४.१९६८

Tuesday, November 27, 2018

नामदार ग. वा. मावळंकर लोकसभेचे पहिले सभापती

असे मराठी, परि गुजराथी भाषाप्रभू झाला
मावळंकर हा मुक्तभारती सभापती पहिला
गांधीजींचे अनुयायीपण प्राणपणे राखले
सौजन्याने, औचित्याने मना मना जिंकले.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, November 25, 2018

न भूतो न भविष्यति..

संकटे रक्षितम् राष्ट्रं
शस्त्रसज्जम् सुखं कृतम्
यशवंतसमो मंत्री
न भूतो न भविष्यति।।

अर्थ : परकीय आक्रमणाचे वेळी राष्ट्राचे संरक्षण केले. अगदी सहज देश शस्त्रसज्ज केला. खरोखर यशवंतरावांसारखा मंत्री पूर्वी झाला नाही, पुढेही होणे कठीण.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(१९८४ मध्ये तरुण भारत मधे छापून आलेलं सुभाषित.)

Monday, November 19, 2018

संत नामदेव.

विठ्ठलाचे नाम नामदेव गाई
नाम घेत घेत नामा विठु होई!
निरंतर नाम घेता
विठुराय आत येता
जीव ऐसा जडलेला विठु ठायी!
नाम साधकाची माता
निवारिते ताप चिंता
तिने विठु दाखविला नरदेही!
विठ्ठलास गावे ध्यावे
चित्त सुखरूप व्हावे
प्रेमसुख अनायासे हाती येई!
मन जाहले विशाल
विठु करतो संभाळ
मागेपुढे विठु ऐसा नित्य राही!
हारपले देहभान
मन जाहले उन्मन
वासना विलीन झाली हरि पायी!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Wednesday, November 14, 2018

पं. जवाहरलाल नेहरू - भारताचे पहिले पंतप्रधान.

जवाहराने स्वातंत्र्यास्तव त्याग किती केला
सारा भारत हिंडहिंडुनी त्याने जागविला!
विज्ञानाने या देशाची प्रगतीही साधली
'महामंत्रि त्याच्यासम ना कुणि' जनता हे वदली.

- श्रीराम बाळकृष्ण आठवले
(जन्मशताब्दी निमित्त अभिवादन म्हणून ही रचना केली होती)

Monday, November 12, 2018

मंत्र

मंत्र

शपथ भवानी मातेची, शपथ नग्न समशेरीची
पांडुरंग मी करित प्रतिज्ञा, मातृभूमि मुक्तीसाठी!ध्रु.

निर्दालाया ही परवशता
झिजविन कायाचंदन आता
यावज्जीव झटेन प्रत्यही धावत येइन सेवेसाठी!१

देहाचा या होम करावा
नवा जन्म भारतात घ्यावा
कार्य न अपुरे राहू देइन तळमळ मनि दिव्यत्वाची!२

आवश्यक ती शक्तीबुद्धी
पवित्र कार्यी मंगलसिद्धी
माझ्या श्रीहरी देइ सकल तू आस प्रतिज्ञापूर्तीची!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, November 11, 2018

पुण्यप्रतापासंगे असतां पापाचा भरतसे घडा!

युगयुगांतरी शिवाशिवाचा अटीतटीचा झडत लढा
पुण्यप्रतापासंगे असतां पापाचा भरतसे घडा! ध्रु.
माजला दैत्य बळी भारी
पौलस्त्य करी शिरजोरी
मथुरेत सज्जना चोरी
बटु वामन, श्रीराम कृष्ण शिकविती जनांना एक धडा
पुण्यप्रतापासंगे असतां पापाचा भरतसे घडा!
जनि झाला एकच गिल्ला
ये रोरावत अफजुल्ला
शिवबा न मुळी डगमगला
विरोधाविना विकास कैसा झुंजाया हा नित्य खडा
पुण्यप्रतापासंगे असतां पापाचा भरतसे घडा!
जन रडती धाई धाई कुणि आम्हां त्राता नाही
पाहुनि प्रलय हा भारी कळवळते अंबाबाई
खड्गात प्रवेशे देवी शिवबाची मोठी आई
हो शिवास साक्षात्कार
अशिवाचा कर संहार
खड्गास चढू द्या धार
महिषासुर मर्दिनी निकट तव निर्दालाया दैत्य बडा
पुण्यप्रतापासंगे असतां पापाचा भरतसे घडा!
डावावर योजुनि डाव खानाला येण्या वाव
देउनी शिवाजी बोले जगदंबे मजला पाव
साकार कपट ये दारी जरी दिसे वरीवरी साव
मन चिंती न वैरी चिंती
न्या अम्हांस तुम्ही सांगाती
शिवबा न श्रवे ही विनती
घन तिमिराला संहाराया समर्थ भास्कर पुरे सडा!
पुण्यप्रतापासंगे असतां पापाचा भरतसे घडा!
आतुनि चिलखत वरी अंगरखा
सफेद मंदिल झाकी टोपा
सावधता घे करी वाघनखा
भैरव करी अभिनव पोशाखा
दग्यास देण्या जबर तडाखा
निर्धारे पद पुढती पडता कालवक्ष करी धडाधडा
पुण्यप्रतापासंगे असतां पापाचा भरतसे घडा!
ती काळमिठी नच प्रेममिठी
यमधर्माची जणु लिखित चिठी
वाजता कट्यार झुकलीच कटी
झणी वाघनखे घुसता पोटी
या दगा दगा हे वच ओठी
व्याधाची पारध हो अंती
खानासंगे धुळीस मिळला पैजेचा उचलला विडा
पुण्यप्रतापासंगे असतां पापाचा भरतसे घडा!
झनझनन झांज करी नाद
तुणतुणे घुमवी प्रतिसाद
कडकडा देत डफ साद
शब्दफेकी टकमक बघताना शेष डुले काढुनी फडा
पुण्यप्रतापासंगे असतां पापाचा भरतसे घडा!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Friday, November 9, 2018

'स्त्री शिक्षण संस्था' सांगते, अण्णांची ही कथा!

महर्षी कर्व्यांची 'स्त्री शिक्षण संस्थाच महर्षींबद्दल बोलते आहे अशी कल्पना करून केलेलं हे काव्य -

'स्त्री शिक्षण संस्था' सांगते,
अण्णांची ही कथा!ध्रु.

हा पुरुषोत्तम कणखर होता
देहाने बटु वामन होता
तेजे जणु सविता!

अबला जीवन दुःख जाणले
डोळे भरले, हृदय द्रवले
उद्यत परमार्था!

पुसेन अश्रू होईन छाया
समाज मंदिर, समता पाया
समूर्त सात्त्विकता!

येथे यावे अनुभव घ्यावा
सहकार्याचा धडा शिकावा
क्षणहि न घालविता!

समग्र जीवन हीच तपस्या
तळमळ ऐसी सुटे समस्या
साक्षी मीच स्वतः!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
९.११.१९८४

Thursday, November 8, 2018

गोवर्धनगिरी आश्रय झाला

गोपगड्यांच्या संघटनेला
गोवर्धनगिरी आश्रय झाला!ध्रु.

गोवर्धन हे नाव सार्थ हो
उपकारा नच मिती पहा हो
गोवत्सांचा पालक असला!

कृतज्ञतेने गिरिचे पूजन
प्रदक्षिणा अन् विनम्र वंदन
हा तर सोपा यज्ञसोहळा!

या गिरिवरती स्वैर फिरावे
मुक्तमने गावे नाचावे
हा गिरिवरही भावभुकेला!

मुसळधार वृष्टी जर झाली
घळही इथली धरी सावली
कोण जुमानी कळीकाळाला!

याच्यासम राहू या अविचल
पुढती ठेवू ध्येय सुमंगल
श्रीकृष्णाचा ध्यास तयाला!

गोवर्धन म्हणतात पेलला
आत्मप्रत्यय उभा ठाकला
गोविंदे जिंकले मनाला!

हृदय कसे उबदार गिरीचे
कृतज्ञता ही मनात नाचे
ते प्रेमाश्रू भिजवत गाला!

जग बदलावे अशी प्रेरणा
कृष्ण वाढतो तनामनांना
गिरिधर गाली गोड हासला!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Wednesday, November 7, 2018

डॉ. सी व्ही रमण

बालवयातच छंद लागला भौतिक विद्येचा
चंद्रशेखरे रचला पाया विद्यासदनाचा
लेखांमागुन लेखांनी त्या विस्मित झाले सर्वजण
वेंकटसुत हा विनम्र तरीही अभ्यासु रमण!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले