Wednesday, January 30, 2019

सांगता..

विराम नच हा तुझ्या जीविता
ही यज्ञाची आज सांगता!ध्रु.

ज्योत तुझ्या जी अंतरातली
रामचिंतनी जरी निमाली
अता तेवतिल लक्ष ज्योती
उजळतील त्या साऱ्या जगता!

वसन पुराणे जसे फेकणे
झिजल्या देहा तसे त्यागणे
देहांतर स्वाभाविक मनुजा
ठाउक होते तुझिया चित्ता!

जगायचे तर जगतासाठी
मरायचे ही जगतासाठी
अवघे जीवन रामसमर्पित
तनु अमुची ही गिरविल कित्ता!

आसमंत दरवळे परिमले
खोड चंदनी अनली जळले
तव रक्षेचा पुनीत कणकण
वितरत जगती विक्रमवार्ता!

विनाशात निर्मिती हासते
त्यागांती आराध्य लाभते
धन्य मोहना प्राण अर्पुनी
तुवा दिधलि मरणा अमरता!

क्षमा तयांना जे जे चुकले
दयाघना ही तुझीच बाळे
त्यांच्यासाठी कर जुळलेले
रामनाम मुखि उमटत असता!

जय शांती जय जय सात्त्विकता
जय ऋजुता जय जय मानवता
अरुणोदय होणार निश्चये
सत्संकल्पे तम ओसरता!
ही यज्ञाची आज सांगता!

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

Monday, January 28, 2019

ग्रासते रथचक्रा वसुधा..

भवती वादळ, अंतरि काहुर
लवता डोळा कंपित हो उर
आज कोणती जीवास हुरहुर?
काळाच्या का विशाल उदरी पेट घेतसे क्षुधा
ग्रासते रथचक्रा वसुधा!

कधी न झुकलो दैवापुढती
विश्वसलो मज बाहूंवरती
शरचापाची मला संगती शापवचन जर साधत दावा, वीरमरण मज सुधा
ग्रासते रथचक्रा वसुधा!

'सूतपुत्र' मी मला न आई
गेली निघुनी राधामाई
कोण ऐकविल मज अंगाई?
नीज अंतिची 'भैरवि' कुठली, तांडव मन्मनि सदा
ग्रासते रथचक्रा वसुधा!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Saturday, January 26, 2019

भारतभूचे अम्ही शिपाई, अम्हांस ठावे पुढे चालणे

भारतभूचे अम्ही शिपाई, अम्हांस ठावे पुढे चालणे
कोण आडवू शकेल आम्हां, गाऊ आम्ही एकच गाणे
उत्साहाने पुढे चालणे!ध्रु.

नव्या युगाचा झडे चौघडा
अन्यायाशी देऊ या लढा
उठा वीर हो निद्रा सोडा
साम्राज्याच्या दुष्ट रुढीला मुळापासुनि पुरे उखडणे
अम्हांस ठावे पुढे चालणे!१

भारतभू तर अमुची माता
शिकवी आम्हा शांती गीता
समता आणि विश्वबंधुता
मंत्र तिचा तो वितरुनि जगती विश्व आपुला निवास करणे
अम्हांस ठावे पुढे चालणे!२

गुलाम नाही कुणी कुणाचा
घोष असे हा स्वातंत्र्याचा
ध्वज उंचावू मानवतेचा
वैफल्याचे बंध तोडुनि आशागगनी स्वैर विहरणे
अम्हांस ठावे पुढे चालणे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
११ जानेवारी १९५६

Sunday, January 20, 2019

चांदणे शिंपीत जा..

थोडे थोडे हसा, असे मजेमध्ये बसा!ध्रु.

बोलण्याला बोल बरे
पाहण्याला प्रेम पुरे
आनंदाच्या झऱ्यामध्ये पाय सोडा बसा!१

भेटा जरा अगत्याने
सुखदुःख देणे घेणे
चाक फिरे गरागरा दाखला द्या असा!२

काळजी जी काळजाला
काजळी ती काळोखाला
आनंदाच्या प्रकाशाला द्या ना भरवसा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Monday, January 14, 2019

चला हाती घेऊ झाडू करू सफाई सफाई - संत गाडगे महाराजांवरील कविता..

चला हाती घेऊ झाडू करू सफाई सफाई
नाम गोपाळाचे मुखी हीच पुण्याई पुण्याई!१
हाती 'गाडगे' धरले नाव पडले पडले
चिंध्या अंगावर ल्याले संत आगळे वेगळे!२
दारु पिऊन न कोणी दुःखसागर तरला
असो लहान वा मोठा एका पेल्यात बुडला!३
अरे लिहावे, वाचावे मस्त हिंडावे फिरावे
स्वये शहाणा होऊन जन शहाणे करावे!४
जगी दोनच या जाती कुणी नर कोणी नारी
देव पाषाणाचा नाही आहे दीनांचा कैवारी!५
यत्नाविण तो करंटा त्याच्या माथी हाणू सोटा
गाईगुरांना जो राखी त्याला म्हणू नये खोटा!६
नको कापाया कोंबडे नको कापाया बकरे
दया प्राण्यांवर करा लाड जिभेचे ते पुरे!७
जात परीट परीट स्वच्छ धुवावे कपडे
इस्त्री ऐसी चालवावी कुठे दोष न सापडे!८
रूढी बुडवी बुडवी बुध्दी कोडे हे सोडवी
मोठ्या हिम्मतीचे काम संत घडवी घडवी!९
गावा अभंग तुक्याचा करू विचार भावाचा
अर्थ ऐसा कळायचा झाली अनावर वाचा!१०
मनी उसळे विचार करू जगात संचार
ऐसा घडावा आचार त्याने घडावा प्रचार!११
घाम गाळावा गाळावा घास भाकरीचा घ्यावा
येई वाऱ्याची झुळुक देई हरीचा सांगावा!१२
देव धावणार नाही देव पावणार नाही
हातपाय हालवावे तरी तरशील पाही!१३
द्यावी लाकडे फोडून द्यावे शेत नांगरून
घर द्यावे शेकारून स्वच्छ झाडावे अंगण!१४
मी तो माणूस माणूस जात कशाला पुसता
देही जाणून देवता करा ममता ममता!१५
देव नाही देवळात आहे दीनदुबळ्यात
मनी उजळे पहाट धरा भक्तीचीच वाट!१६
पांग भक्तीने फिटला देव जनांत भेटला
असो आंधळा पांगळा देव प्रेमाचा भुकेला!१७
घ्यावे शिक्षण शिक्षण फेडा रयतेचे ऋण
पैसा वाढे देता दान  कार्य घडते महान!१८
भाऊराव पाटलांचा बाबा आंबेडकरांचा
स्नेह ऐसा घनदाट गहिवर ये प्रेमाचा!१९
व्हावे पायाचा दगड जनी असून नसावे
कैसे पुस्तक जगाचे उघडावे नि वाचावे!२०
यात्री यात्रेत खपला सरे मुक्काम येथला
मनी जागला जिव्हाळा रामे गीतात मांडला!२१

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
चला हाती घेऊ झाडू ( ऑडिओ )

Saturday, January 12, 2019

सौभाग्यासह स्वराज्य द्यावे करुणा कर माते..

शहाजीराजांना दगाबाजीने कैद करण्यात आले ! जणू काही यवनसत्तेने जिजाऊंना सवाल टाकला, बोला काय हवं? स्वराज्य की सौभाग्य?

जिजाऊंनी पदर पसरला हात जोडले, पण हे सर्व आई जगदंबेपुढे! त्यांनी सौभाग्य आणि स्वराज्य दोन्ही मागून घेतली.  कलियुगातील सावित्रीने आपली तपस्याच पणाला लावली जणू!

जगदंबे पसरुनी पदर मी
दान एक मागते
सौभाग्यासह स्वराज्य द्यावे
करुणा कर माते!ध्रु.

घन आषाढी जमुनी भवती
पुनवेच्या चंद्रास ग्रासती
मंगलसूत्रा हात घालती
दूत यमाचे पाश फेकुनी भिववित आम्हांते
सौभाग्यासह स्वराज्य द्यावे
करुणा कर माते!१

तुझाच तान्हा घेउनि सेना
सेवी सज्जना, दंडि दुर्जना
कार्य तुझे हे अतां पावना
धैर्याची दे ढाल, येउ दे अगणित विघ्नाते
सौभाग्यासह स्वराज्य द्यावे
करुणा कर माते!२

लेक लाडकी व्याकुळ झाली
तुझ्याच दारी म्हणुनि तिष्ठली
सर अश्रूंची झरली गाली
सावित्रीच्या निर्धारा दे हसण्या यमधर्माते
सौभाग्यासह स्वराज्य द्यावे
करुणा कर माते!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

चला उठा हो भारतियांनो - स्मरू विवेकानंद!

चला उठा हो भारतियांनो -
स्मरू विवेकानंद!
       अनुभवु या स्वानंद!धृ.

विवेकात आनंद आगळा
विरक्तीत आनंद कोंदला
       अनुपम भजनानंद!१

आता भक्ती समाजसेवा
जनकार्यी जन शक्ती लावा
       दानातच आनंद!२

विसरायाचे मी अन् माझे
सगळे सगळे भगवंताचे
       ऐक्यभाव मकरंद!३

माझा भारत, माझा भारत
अंतरात ही झडु दे नौबत
        सोऽहं चा धरु छंद!४

उपासनाही पुढे चालवू
सत्कार्ये भगवंत तोषवू
       तोडू कृत्रिम बंध!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवलेq

Friday, January 4, 2019

ऐक केसरी तुझी कहाणी....

ऐक केसरी तुझी कहाणी
भास्कर असशी या नभांगणी!ध्रु.

शतकामागुन शतके निघती
गर्जनेस तव ना विश्रांती
आग वर्षते नेत्रांमधुनी!१

वृत्तपत्र छे तू आंदोलन
युवापिढीशी हस्तांदोलन
तुकयाची तू अभंगवाणी!२

लिहिशी जे ते ठामपणाने
झुंज झुंजशी निर्धाराने
मतपत्रांचा तूच अग्रणी!३

स्वराज्य आले सुराज्य व्हावे
जनसत्तेचे मुख उजळावे
रान उठव तू दाही दिशांनी!४

मराठबाणा उठून दिसतो
कुणी डिवचता उसळुन उठतो
कसूर ना कधि शत्रुमर्दनी!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२ जानेवारी २००३

केसरी गर्जून उठला..

शाळेचे मर्यादित क्षेत्र या पुरुषसिंहांना अपुरे पडू लागले. भरतखंडातील ३० कोटी प्रजाजनांना आवाहन करून राष्ट्रप्रेमाने भारून टाकावयाचे होते! एकत्र विचामंथनातून 'केसरी' साप्ताहिक मराठीत आणि 'मराठा' पत्र इंग्रजीत काढण्याचे ठरले. ४ जानेवारी १८८१ पुण्यामधून केसरी गर्जून उठला!

पुच्छ आपटूनि रक्तवर्णदृष्टि फेकितो
'केसरी' च गर्जतो! केसरीच गर्जतो!ध्रु.

पारतंत्र्य फेकण्यास
संघशक्ति जागण्यास
लेखणीस खड्गधार पत्रकार लावतो!१

अग्रक्रम शिक्षणास
अस्मिता फुलावयास
सत्वजागृती करीत दैन्य सर्व झटकतो!२

शासन जर अन्यायी
लढणे न्यायापायी
एक पाय बंदिगृही ठेवुनीच ठाकतो!३

लेख अग्निगोल ते
जळणारे जणु पलिते
घनतिमिरी हा प्रशस्त मार्ग जना दावतो!४

अभिनवा त्रिमूर्तिही
देत स्फूर्ति प्रत्यही
मनामनात तत्क्षणी "देशदेव" जागतो!५

एकजूट ती अभंग
कर्तृत्वा चढत रंग
काळ ठाकुनी क्षणेक विस्मयेच पाहतो!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले