Saturday, February 29, 2020

देहामध्ये देव पहा..

चिंतन सतत करत राहा
देहामध्ये देव पहा!ध्रु.

इथे तिथे तुज चरण फिरवती
नितसंचारी दत्तच दिसती
खूण पादुका पहा पहा!१

श्रवण करी - गणपती समजवी
लेखन तुझिया हातुन घडवी
विद्याधर मस्तकी पहा!२

पतिपत्नींना होय संतती
ब्रह्मा काय न करत निर्मिती
श्रेय तयाला देत रहा!३

लालन पालन हासत करता
श्रीविष्णुच हे सर्व करविता
दर्शन ऐसे घेत रहा!४

विसर्जन क्रिया कोण करवतो
अशिवा शिव विलया नेतो
पूजन ऐसे करत रहा!५

मन पवनाला जोडुन देतो
नील गगनी जो राम दावितो
तुझा मारुती तूच पहा!६

कर्म करावे फल न बघावे
असे मनाचे सुमन घडावे
कृष्ण प्रेरणा देत पहा!७

राम जसा सगळ्यांस हवासा
मीही व्हावे तसा भरवसा
राम आतुनी देत पहा!८

नरनारी हा भेद वरिवरी
अद्वय आतुन द्वैत वरिवरी
शिव नि पार्वती तूच पहा!९

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१७.९.१९८७

Wednesday, February 26, 2020

तुझी नसे भीती मरणा!

तुझी नसे भीती मरणा, तुझी नसे भीती!ध्रु.
सिद्ध स्वागतासी झालो
गडबडलो ना व्याकुळलो
परिचित असशि कधीचा, नसे मनी भ्रांती!१

अश्रूंची मदिरा पात्री
प्राशिताच माझ्या गात्री
तृप्ति आली वीरविजेत्या, हवी का प्रचीती?२

सुकण्याते मी सुम नाही
द्राक्षापरि हळवा नाही
फेडली ऋणे अगणीत जाळते न खंती!३

मूल्य तुझे जे जे असते
पूर्ण करु देउनि चुकते
यौवनात मी अनुभवली तने मने मुक्ती!४

क्षण एक न वाया गेला
पस्तावा म्हणुनि न झाला
जाणवे तुझी घन छाया-श्वास कानि येती!५

एकला अचानक ये ये
रोगसैन्य घेउनि ये ये
मित्र मानिले मी तुजला म्हणुनि करित गोष्टी!६

कृतार्थ हे जीवन झाले
विजनी जरि असल्या सडले
मूल्य पीडेनेच दिधले स्वार्थ नसे चित्ती!७

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

जा सुखेनैव जा वीरा..

जा सुखेनैव जा वीरा
मरणास स्वये सामोरा!ध्रु.

स्वातंत्र्ययज्ञ चेतविला
भारती सर्व पसरविला
वीराची आहुति पडता आता
तेज चढे अध्वरा!१

यम शत्रु न आता अत्र
होऊनि पातला मित्र
कर धरा तयाचा संतोषाने
पाचारण स्वीकरा!२

आव्हान न आता देणे
शांतिरूप केवळ उरणे
या असीमात हो अनंतात हो
विलयावे वीरा!३

मनि आस फळाची नव्हती
कर्मात शोधिली तृप्ती
विचारक्रांती घडवायासी
लढला झुंजारा!४

ही नरकाया नच पडते
जणु वज्रसमिध ही वाटे
संतोष कलश हा पुण्य करोनी
परमात्म्या वितरा!५

मागे न पुढेही काही राहियले
'मी'पण ही लेश न आता उरलेले
घ्या भावांजली ही प्रिय अनुजाची
शांतिद-जलधारा!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, February 23, 2020

कशासाठी? पोटासाठी..

घास प्रेमे छोटा घाला अपुल्या पोटाला
चोचले न पुरवा रसनेचे कराल घोटाळा!ध्रु.

जीवन अवलंबून उदरावर
नका हादडू देउन ढेकर
मर्यादांचा शेला बांधा कसून कमरेला!१

नाम घेत हरिचे जेवा
अन्नग्रहण ही प्रभुसेवा
तरच लागते अन्नहि अंगी गिरवा पाठाला!२

यज्ञकर्म हे ध्यानी घ्यावे
शिकून आधी मग शिकवावे
पोटच परमेश्वर देव्हारा पथ्याला पाळा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७.०१.२००४
(फॅमिली डॉक्टर मधील सदर वाचून सुचलेली कविता)

Saturday, February 22, 2020

जगी एकला! जगी एकला..

कस्तुरबांनी गांधीजींची आयुष्यभर सोबत केली. तुरुंगातच त्या साध्वीचे निधन झाले. गांधीजींसारखा स्थितप्रज्ञ माणूसही दुःखावेगाने हादरुन गेला. अश्रू लपविताना फार अवघड गेले. बा गेली. स्मृतीचा कस्तुरी गंध दरवळला!

जीवनसंगिनी सोडुनि जाता
जगी एकला, जगी एकला
कस्तुरिगंधे दिशा सुगंधित
जीव का परि व्याकुळ झाला?

आजवरी करुनी मम सोबत
गुरूच झाली माझी नकळत
अर्धांगिनी सुभगा सावित्री
कसा पुकारू विजनी तिजला!

मोहनद्वारी तुळसमंजिरी
सेवा जणु की ती तनुधारी
भयद शून्यता ग्रासतसे मज
एकमेव आधारही तुटला!

पतिव्रतेच्या पुण्याईने
झाले जरि जन्माचे सोने
मला वाटते लोह मीच परि
तिच्याच रूपे परिस हरवला!

आश्रमात ती होती माता
वनवासिनि वैदेही सीता
ती जाता परि जीवनयज्ञि
राम न उरला! राम न उरला!

सत्त्वपरीक्षा देवा बघसी
एक प्रार्थना तव चरणांशी
जन्मोजन्मी हीच सती दे
दीनानाथा या दीनाला!

गतजन्मीचे माझे सुकृत
म्हणुनि लाभली पवित्र संगत
मितभाषण अन् शांतवृत्तिचा
ठेवा स्वकरे मजला दिधला!

उरले सुरले दिवस सरावे
पक्व फळापरि गळुनी पडावे
वज्राघात मुळी न सहवे
पंचप्राण ते होती गोळा!

जगी एकला! जगी एकला!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Monday, February 17, 2020

दास डोंगरी राहतो....

दास डोंगरी राहतो, गाणे रामाचे गातो ! धृ.

एकांती चिंतन करतो
नभास नेत्री साठवतो
भिक्षेचे परि निमित्त करुनी
जनाजनाते पारखतो!१

सर्वत्रांची चिंता वाहे
अंतरात रामाते पाहे
हनुमंताच्या स्थापुनि मूर्ती
बलोपासना चालवतो!२

रामा! रामा!! बाहतसे
वत्सासम मग स्फुंदतसे
धन्य गायनी कळा दाखवित
श्रीरामाते आळवितो!३

शक्तीसंगे युक्ति हवी
राघवचरणी भक्ति हवी
रामराज्य अवतरण्या भूवर
यत्नांचा गिरि उंचवतो!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
दास डोंगरी राहतो (ऑडिओ)

Sunday, February 16, 2020

गजानन महाराजांना प्रार्थना..

शेगावीच्या गजानना। शांत करी माझ्या मना
येऊ दे माझी करुणा। तुला तरी।।१।।
लावी मला नित्यनेम। आचारात भरो प्रेम।
सर्वांचेच असो क्षेम। भाव देई।।२।।
निराशेने ग्रासे मन। कण कण झिजे तन
जीव जाई वेडावून। का न कळे।।३।।
अश्रू नाही तरी दुःख। हृदयास पोळे शोक
काय तुझे हे कौतुक। उमजे ना।।४।।
तुझी दया तुझे ज्ञान। तुझी दृष्टी तुझे गान
तुझे स्मरण सन्मान। अध्यात्माचा।।५।।
निरोगी तू करी मन। निरोगी तू करी तन
सोsहं सोsहं हे स्फुरण। जाणवू दे।।६।।
तुझी पोथी मला गीता। तुझी पोथी मला माता
तुझा हस्त शिरी आता। राहो देई।।७।।
साठविता कुजे द्रव्य। दान देता वाढे द्रव्य
वाहते हे खरे द्रव्य। खरी गंगा।।८।।
आसक्ती हा महारोग। वैराग्यच तुझा योग
भोगूनीच सारे भोग। ज्याचा त्याचा।।९।।
भूक नाही निद्रा नाही। तृषा नाही शांती नाही
विवेकाची जोड नाही। आयुष्यात।।१०।।
वासना ही दुःखमूळ। माझे माझे पोटशूळ
घालवी हे सारे खूळ। मनातून।।११।।
स्वये सोसलासे त्रास। मारत्यास दिला रस
क्षमा कन्या ही औरस। मायबापा।।१२।।
अलिप्तता शिकावी ही।तटस्थता शिकावी ही
योगमाया शिकावी ही। ऐशी उर्मी।।१३।।
सर्वांभूती देव ज्ञान। सर्वांभूती दया ज्ञान
सर्वांभूती एक प्राण। साक्षात्कार।।१४।।
चिलीम ही तुझ्या करी। धूर सोडी ही अंबरी
ऊर्ध्व दृष्टी तशी करी। उपदेशी।।१५।।
दिगंबरा निर्विकारा। धैर्यधरा तदाकारा
मूर्तिमंत हे ओंकारा। नमस्कार।।१६।।
तुझे नाम गजानन। विघ्ने करी निवारण
अंतरी या प्रकाशून। पुढे नेई।।१७।।
चालवी तू उपासना। नित्य बोधी माझ्या मना
सत्याच्याच आचरणा। मला दाव।।१८।।
आत्मनिंदा महापाप। आत्महत्या महापाप
औदासीन्य महापाप। नको नको।।१९।।
तुझी प्रीती निरांजन। तेवो मनी गजानन
विकल्पांना पिटाळून। लाव देवा।।२०।।
प्रसादाचे दिले दान। रामा दिले पदी स्थान
येथ प्रचीती प्रमाण। दिली खूण।।२१।।

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२६/२७.२.१९८८

Friday, February 14, 2020

गुपित

सांगितले ना जरी काही तू
सारे मज कळले
गुपित तव डोळ्यांनी फोडिले!ध्रु.

मधुर प्रीतिचे गाणे गासी
धरुनि प्रियाचे चित्र उराशी
खेळ खेळशी असा स्वतःशी
पाहुनि मजला दुरी जाउनी
रेखिसी चरणाने वर्तुळे
गुपित तव डोळ्यांनी फोडिले!१

संध्या समयी येउनि दारी
वाट कुणाची बघते स्वारी
दिसता नच, का होशि बावरी
चाहूल येता कुठुनि थोडिशी
सांग का हसती तव डोळे?
गुपित तव डोळ्यांनी फोडिले!२

पुरे जाहला लटका रुसवा
भोळ्या मनीचा कळला कावा
"तुझ्या जिवाचा कोण विसावा?"
पुसता ऐसे अवचित तुज मी
अधरी का नावही अडखळले?
गुपित तव डोळ्यांनी फोडिले!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१४.०१.१९५७

Sunday, February 9, 2020

श्रीराम जयराम जय जय राम

श्रीराम जयराम जय जय राम!ध्रु.

तेरा अक्षरी जप आहे
नाद मधुर त्याचा आहे
अंतरात बघ वसला राम!१

चालायला बळ येते
बोलायाचे ते सुचते
शहाणपण शिकवी श्रीराम!२

दासबोध वाचनी हवा
आत्मशोध घ्यायला हवा
चिंतन करण्या सुचवी नाम!३

या देहाचे मोल कळे
तोल मनाचा कसा ढळे?
समंजसपणा म्हणजे राम!४

जुळवुन घेणे असे कला
विश्वच घर हो दासाला
हाकेला ओ देतो राम!५

प्रसंग आला निभावतो
अनोळखी जिवलग होतो
सखा जीवाचा आत्माराम!६

भेकडपण सरते पुरते
धैर्य कुठुन ते संचरते
येथे तेथे दिसतो राम!७

जपात रामायण भरले
शब्दसूर अवचित जुळले
कथेस कविता करते नाम!८

नामजपे ऐसे घडले
अश्रूंची झालीत फुले
मन मग बनले मंगलधाम!९

नाम मनाला विरंगुळा
अरूप आणी रुपाला
दोषनिवारक आहे नाम!१०

पालट घडवी आचरणी
पोचविते राघवचरणी
रघुकुलदीपक राजाराम!११

नाम जिथे श्रीराम तिथे
राम जिथे विश्राम तिथे
सद्भावाला पोषक राम!१२

अखंड भारत श्रीराम
अजेय भारत श्रीराम
सरिता गिरिवर सागर राम!१३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
८.१०.२००२

श्रीराम जयराम जय जय राम..
^ऑडिओ