Wednesday, March 31, 2021

रायगडा जाऊ!


शिवाजी उत्सव हा दुसरा राष्ट्रीय उत्सव टिळकांनी सुरु करून दिला.  तो केवळ रायगडावरच न राहता खेडोपाडी पसरला. त्यातून असंख्यांना स्फूर्ती मिळाली.  आत्मविश्वास निर्माण झाला. भारतीयांच्या माना अभिमानाने ताठ झाल्या!
-----------------------------------------
रायगडा जाऊ, स्मृतींनी धन्य धन्य होऊ!
शिवभूपा ध्याऊ, शिवाचे उज्ज्वल यश गाऊ!

या भूमीवर स्वराज्य होते
कर्तृत्वाचे पुण्यस्थल ते
दे स्फूर्ती दे भवानी माते!
दिशा दिशा घुमवू - शिवाचे उज्ज्वल यश गाऊ!

समाधीवरी हवीच छत्री
चैतन्याची ही गंगोत्री
अवघे जण तीर्थाचे यात्री
गत वैभव मिळवू - शिवाचे उज्ज्वल यश गाऊ!

तन मोहरले, मन गहिवरले
रायगडाला हासू फुटले
स्वप्न दिव्य नेत्रांत तरळले
या नेत्री पाहू - शिवाचे उज्ज्वल यश गाऊ!

जळी - स्थळी - काष्ठी - पाषाणी
जय स्वराज्य, जय शिव ही वाणी
पुन्हा रंगले शाहिर कवनी
चैतन्ये न्हाऊ - शिवाचे उज्ज्वल यश गाऊ!

उत्सवात या व्यापक दृष्टी
जाति-पंथ जन भुलुनी जाती
स्वराज्य संपादनास स्फूर्ती
येथुनीच घेऊ - शिवाचे उज्ज्वल यश गाऊ!

वाटे जणु शिवकाल पातला
रोम रोम तनि फुलुनी आला
मनगटातला जोर वाढला
पूर्व दिव्य जर, दिव्य अनागत सामर्थ्ये निर्मू
शिवाचे उज्ज्वल यश गाऊ!

रचयिता - श्रीराम बाळकृष्ण आठवले
१.२.१९६८

Wednesday, March 17, 2021

मना नाम जप तेच खरे


ॐ राम कृष्ण हरि जप कर रे
मना नाम जप तेच खरे!ध्रु.

अडू नको रे कुढू नको रे होई रे मोकळा
जीवपणाचे बंधन सुटले छान लागु दे गळा
जे जप करती भगवंताची आवडती लेकरे!१

ॐकाराने प्राणवायु घे भरून तू आत
स्वामींनी बघ हलके धरला स्वये तुझा हात
राम रमवितो, कृष्ण खेचतो, आतुन उमजे रे!२

दुःख नि चिंता मरणभयाचे धुके ओसरेल
तू स्वरूप आनंद तूच रे ध्यानी येईल
अभ्यासाचा मार्ग सुकर तुज सदगुरु करती रे!३

उचलुन पाउल पावसला चल पावस पंढरपूर
वारकरी तू वीणा हाती नयनी अश्रूपूर
भाग्यवंत तू तुझ्यासारखा हो गुरुदास त्वरे!४

श्रीहरि हरतो अज्ञानाला शांत करी काहूर
शांति रहाया ये माहेरा बदले सारा नूर
नामरसायन करि श्रीरामा खचित निरामय रे!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
५.७.२००१



Monday, March 8, 2021

धन्य धन्य हिरकणी

रायगडावर दूध घालायला हिरा गवळण यायची. हिरकणी तिचं नाव. आपल्या लेकराला पाळण्यात ठेवून लगबगीनं वर दूध घालून ती परतणार होती.  

एवढ्यात ती गडावर असतानाच तोफेचे आवाज झाले. गडावरचे दरवाजे बंद झाले. ती भयाभया हिंडली. 

आणि सापडली एक बिकट वाट सापडली.  अत्यंत उतरणीची वाट! तिची पावलं झपाझप पडू लागली. काटेकुटे, कडेकपाऱ्या यांना न जुमानता ती घरी पोहोचली. 

दुसऱ्या दिवशी तिला महाराजांपुढे गडावर आणून हजर करण्यात आले. 
तिच्या धैर्याबद्दल महाराजांनी त्या माउलीचा गौरव केला. 

--------------------------------

तान्हे राहियले घरी जरी आल्ये गडावरी
माजे काहूर मनात ऊर धडकते भारी।।

अशा कातरवेळेला कटी दुधाची कासंडी 
बाळ दुधावाचुनीया आक्रंदुनी विश्व कोंडी

झाले तोफांचे आवाज दारे झाली मला बंद
मन माझे हो बेबंद तया तान्हुल्याचा छंद

शिवा मी रे माय त्याची आण तुला माउलीची
जळाविना तडफड  होते कैसी मासोळीची

गेल्ये कशीही घरासी कोणी आडवू धजेना
माझ्या वाहत्या पान्ह्याला कशी रोखू आकळेना

माझ्या घराच्या वाटेला झाले काटेकुटे फुले
किती अवघड कडे माझ्यासाठी झाले झोले

देव माझा पाठीराखा तया घातली मी आण
भेट घडली पिलाशी नुरे सुखलागी वाण

शिवा देई सजा काही नसे मला त्याची तमा
परी माऊली होऊनी करीन मी तुला क्षमा

वच ऐकुनी मातेचे मुखी बोल उमटेना
शिवा पाय धरी तिचे तिज मिळे दुजा तान्हा

आज कलीयुगामाजी झाली अमर कहाणी
धन्य धन्य बाळ तीचे, धन्य धन्य हिरकणी

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले