Friday, January 7, 2022

श्रीरामाची भूपाळी

प्रभात काली श्रीरामा तव नाम मुखी आले
श्रद्धा आली जगावयाला कारण सापडले!ध्रु.

तन मन बुद्धी जपावयाची ठेवच ती ईश्वरी
कंटकमय पथ तरी चालणे सुहास्य वदनावरी
नील नभांतरी घननीळा रे दर्शन तव घडले!१

भावंडांशी समरस व्हावे मायतात तीर्थ
आज्ञापालन मन:संयमन सवयीचे होत
श्वासाइतके सत्य अटळ मज कळले रे पटले!२

वामांगी जानकी तसा तो लक्ष्मण ही जवळी
अर्धांगिनि स्त्री, अनुज तनयसम वत्सलता कळली
ओघळती आसवे तयांनी न्हाऊ मज घातले!३

मी माझे जाता हे विसरुन विशुद्ध कल्याण
तुझा नि माझा एकपणाही कृतीत ये जाण
संशय भय निपटाया रामा शुभागमन घडले!४

रामचरित हे गाता गाता मन उन्मन होते 
रामराज्य ये घराघरातुन श्रद्धा दृढ होते
श्रीरामाच्या प्रतिभेने हे कवितासुम फुलले!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१३.०३.१९९८

No comments:

Post a Comment