Friday, June 24, 2022

आरति भगवद्गीतेची, हरीच्या अक्षरमूर्तीची



आरति भगवद्गीतेची, हरीच्या अक्षरमूर्तीची!ध्रु.

मना हो पार्थ, जाण भावार्थ
कृष्ण दे हात, ऊठ तू गात
साध ही संधी भाग्याची!१

नियत जे कर्म, तुझा तो धर्म
जाण रे मर्म, सार्थ कर जन्म
परीक्षा पूर्ण जीवनाची!२

गात जा नित्य, स्मरूनी सत्य
करावे कृत्य, पाळुनी पथ्य
खुबी ही जीवन जगण्याची!३

कोण मी भान, "तोच मी" ज्ञान
तयाचे ध्यान, सुधेचे पान
माधुरी फिकी अमृताची!४

गुरूंची कृपा करुनि घे जपा
बैसवी तपा, स्वधर्मा जपा
प्रार्थना कृष्णा रामाची!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३०.१२.१९९२

Saturday, June 18, 2022

देह नाशवंत, आत चालक अनंत

देह नाशवंत, आत चालक अनंत 
आत चालक अनंत, वदे गुरु कृपावंत ! ध्रु. 

चित्‍त नामात गुंतावे 
विषयास विसरावे 
देह प्रारब्‍धा देउनी मने रहावे निश्चिंत!१   

दृश्‍यमान जे असते 
नाश पावतसे ते ते 
देह दृश्‍य तो जाणार – नच गुंतावे मोहात!२  

मुखे नाम हाती काम 
सखा एक आत्‍माराम 
देवासाठी देव हवा ठसू द्यावे हृदयात !३  

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
गोंदवलेकर महाराज प्रवचन १९१ (९ जुलै) वर आधारित काव्‍य  
सद्गुरुंजवळ मी शरण आलो आहे असे म्‍हटले तर पुढचे काम ते करतातच 

करवुनि घ्‍यावी सेवा, गुरुदेवा!

करवुनि घ्‍यावी सेवा, गुरुदेवा!ध्रु. 

अजाण लेकरु मी तर तुमचे 
बोल बोबडे वदतो वाचे 
कृपादृष्टि तुम्हि ठेवा!१  

कथिता तैसे घडो आचरण 
तुम्‍हीच घ्‍यावे करवुनि पूजन 
भ्रांति मनाची मिटवा!२  

माझे ‘मीपण’ विलया जावे 
ज्ञानकमळ अळुवार फुलावे 
गंध आगळा पुरवा!३  

कथिले साधन मजसि रुचावे 
आलस्‍ये मज नच स्‍पर्शावे 
तथास्‍तु बोला देवा!४  

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
गोंदवलेकर महाराज प्रवचन १८४ (२ जुलै) वर आधारित काव्‍य  
गुरुसेवा करणे म्‍हणजे काय? 

Friday, June 17, 2022

आई निघाली!

आईवेड्या लेकराची हाक वाया चालली 
हुंदके अन् आसवांची घेउनी श्रद्धांजली! 
आई निघाली! आई चालली! ध्रु. 

पोरका शिवाजी झाला 
छत्रहीन राजा झाला 
सांत्‍वनास शब्‍द न सुचती कुणा अशा काली! १ 

प्रेमास किनारे नव्‍हते 
ते होते अद्भुत नाते 
पक्‍व पान अलगद गळले दिशा ओस झाली! २ 

मृत्‍युपुढे हतबल सगळे 
इथे कुणाचे ना चाले 
कर्तव्‍यपूर्ति साधुनिया माय चालली! ३ 

अखेरचे दर्शन घेता 
उमाळा न ये आडविता 
दयासिंधु ऐसी आई निर्विकार झाली! ४ 

सोहळा सुखाचा सरला 
दु:खपूर धावत आला 
दु:खसागरी शिव बुडला, मातृशोक भाली! ५  

बालपणा सरला सरला 
राजधर्म केवळ उरला 
पोरका शिवाजी राजा मूक अश्रु ढाळी! ६ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

Thursday, June 16, 2022

तेच लक्ष्मीचे पूजन, तेणे लक्ष्मी हो प्रसन्न!

आधी स्मरा नारायण, मग करा द्रव्यार्जन!
तेच लक्ष्मीचे पूजन, तेणे लक्ष्मी हो प्रसन्न!ध्रु.

नीतिधर्मासी पाळावे
पोटापुरते मिळवावे
ऐसी येऊ नये घडी, द्रव्य चिंतेसी कारण!१

पैसा माणसा पुरतो
छातीवरती नाचतो
गाडा द्रव्याचे हे भूत, चला स्मरा नारायण!२

द्रव्य माणसाच्यासाठी
नरजन्म रामासाठी
द्रव्य येवो किंवा जावो, धरू हरीचे चरण!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज प्रवचन २५१ (७ सप्टेंबर) वर आधारित काव्य

शांति येतसे त्‍याच्‍या सदनी नित्‍य निवास कराया..


रामस्‍मरणी नित्‍य राहतो त्‍यास न बाधे माया! 
शांति येतसे त्‍याच्‍या सदनी नित्‍य निवास कराया! ध्रु. 

भगवंताचे स्‍मरण करावे ठेवी तसे रहावे 
अपुल्‍यामध्‍ये विश्व पहावे सोऽहं ध्‍यानि रमावे
आत्‍मसुख असे अपणापाशी जगी भटकणे वाया!१  

रूप बदलते नसे रूप तो, स्थिर रामाचे नाम 
उठता बसता तयास ध्‍यावे करत आपुले काम 
कृपावंत सद्गुरु धरताती शिरि कृपेची छाया!२ 

स्‍वार्थ ज्‍या स्‍थली, अशांति तेथे समाधान लाभेना 
परमार्थाची कांता शांति अद्वयत्‍व सोडेना 
आत्‍मा आत्‍माराम मानता मंदिर झाली काया!३  

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
गोंदवलेकर महाराज प्रवचन २४२ (२९ ऑगस्‍ट) वर आधारित काव्‍य

Wednesday, June 15, 2022

गुरुराया शरण आलो, मी तुमचा झालो झालो!


गुरुराया शरण आलो, मी तुमचा झालो झालो!ध्रु. 

नि:संशय मन हे व्‍हावे 
प्रभुनाम जिभेवर यावे 
गुरुदत्त नाम मी घेता, मी घडे सुधेचे प्‍यालो! १ 

ही वृत्ती शांत करावी 
भक्‍तीची वाट दिसावी 
तम मावळण्‍या हृदयीचे- सद्गुरो शरण मी आलो! २ 

विषयांत राहुनी जगती 
कशि आणू अलिप्‍तता ती? 
द्या आपण नामप्रचीती – मी प्रेमभुकेला झालो! ३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
(गोंदवलेकर महाराज प्रवचन १९२ – १० जुलै वर आधारित काव्य)
सद्गुरुस जावे शरण! संशयविरहित वृत्तीने घ्‍यावे नाम!

Thursday, June 9, 2022

हे मना, बन कठोर



हे मना बन कठोर, शत्रुशिबिरि जाउ दे! 
विरह घोर साहु दे!ध्रु. 

दोन्हि गाल अश्रुसिक्त 
मायभू न अजुनि मुक्त 
सुखविलासि हो विरक्त
तुच्‍छ क्षुद्र हेतु ना स्‍वप्नि स्‍पर्शु दे ! १

छळत दास्‍यश्रुंखला 
श्वास आत कोंडला 
देश मम विटंबिला 
वैनतेय बनुनि मजसि झुंज झुंजु दे! २

लढताना मरु मारू 
शत्रूते पुरुनि उरू 
यत्‍नांची शर्थ करू 
भागीरथि आणण्‍यास वज्रशक्ति दे! ३

अंतिम सुख लाभण्‍यास 
मातृबंधमोचनास 
सिद्ध कष्‍ट साहण्‍यास 
राष्‍ट्रमंदिरातळि मज दगड होउ दे! ४

ज्‍यास देश मायतात 
बंध त्‍यास काय करत 
हसत सहत सहत हसत 
मम जीवनि उद्याना मजसि फुलवु दे! ५

मेघजले न्‍हावयास 
ग्रीष्‍म हवा साहण्‍यास 
प्राण पणा लावण्‍यास 
हार असो फास असो तोल राहु दे! ६

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

Tuesday, June 7, 2022

आरति सप्रेम गाऊ - नारायणा हो!

आरति सप्रेम गाऊ -
नारायणा हो!ध्रु.

महाराज या अंतरि या
कृपा कटाक्षे निरखा या
हास्य देखणे मौलिक देणे
दासांना द्या हो!१

सद्गुरुचरणी मना विसावा
लोभलालसा परतुन लावा
धुंद केवडा दरवळताहे
हा अनुभव द्या हो!२

काय सांगतो कानी श्रावण
आचरणे हो नर नारायण
श्रीनारायण जय नारायण
घोष घुमवा हो!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१६.०५.१९८२
# श्री सद्गुरु नारायण महाराज, बेट केडगाव

'नारायण नारायण' मंत्र हा म्हणा अवतरला नारायण धर्मरक्षणा!

'नारायण नारायण' मंत्र हा म्हणा
अवतरला नारायण धर्मरक्षणा!ध्रु.

करुणा जी अंतरात
दीनांना देत हात
वर्तनात प्रेमाच्या प्रकटल्या खुणा!१

रयतेचा देव हाच
संतांचा संत हाच
तोषविले सेवेने सकल सज्जना!२

अन्न दिले, वस्त्र दिले
प्रेम दिले, ज्ञान दिले
कोणी ना बेटावर राहिला उणा!३

धर्मांतर करिल कोण?
स्वत्वाला त्यजिल कोण?
सूर्याचे प्रखर तेज तिमिरनाशना!४

नारायण हाच दत्त
स्मरणाने शुद्ध चित्त
सत्कार्या आतुन तो देत प्रेरणा!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२८.०१.१९८९
# श्री सद्गुरु नारायण महाराज, बेट केडगाव

श्रीसद्गुरु नारायण

श्रीसद्गुरु नारायण ऽ ऽ
श्रीसद्गुरु नारायण! ध्रु. 

हसत राहा सहत राहा 
सहताना गात राहा 
श्रीसद्गुरु नारायण! १ 

नाम मंत्र करि स्‍वतंत्र 
करि स्‍वतंत्र अजब तंत्र 
श्रीसद्गुरु नारायण! २ 

येउन जा बेट पाहा 
बेट पाहा येथ राहा 
श्रीसद्गुरु नारायण! ३ 

प्रेम धरी नेम करी 
नेम धरी येत उरी 
श्रीसद्गुरु नारायण! ४ 

विसर काम विसर क्रोध 
सोड क्रोध दत्त बोध 
श्रीसद्गुरु नारायण! ५ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
१४.०५.१९८२
# श्री सद्गुरु नारायण महाराज, बेट केडगाव

प्रभातसमयी अर्घ्‍य अर्पितो – तेजोनिधि नारायणा !

प्रभातसमयी अर्घ्‍य अर्पितो – 
तेजोनिधि नारायणा ! ध्रु.  

पवन सुगंधित आला आला 
उष:काल जाहला जाहला 
ओंजळ भरून देतो जीवन – 
अर्थ यावा जीवना !१  

आत्‍मरूप तू सत्‍यरूप तू 
यज्ञरूप तू स्‍वस्‍वरूप तू 
अनंत नमने तुला दिनेशा 
सत्‍कर्मा दे चालना !२  

अंत:करणी तू उगवावे 
मंगल मंगल तू वदवावे 
योगाभ्‍यासा मती गती दे 
सुरेल स्‍वर दे गायना!३  

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
१५.०५.१९८२
# श्री सद्गुरु नारायण महाराज, बेट केडगाव

चला, चला बेटावर जाऊ – दत्त, नारायण पाहू!

चला, चला बेटावर जाऊ – 
दत्त, नारायण पाहू! ध्रु. 

प्रेमच द्यावे, प्रेमच घ्‍यावे 
श्रीनारायण स्‍मरण करावे 
सद्गुरुच्‍या लीला गाऊ! १ 

चरण धुवावे, विशुद्ध व्‍हावे 
आनंदाचे भरते यावे 
अद्वयसुख घेऊ! २ 

दिव्‍यत्‍वाचा अनुभव यावा 
तनामना श्रीदत्त विसावा 
सत्‍कर्माचे व्रत घेऊ! ३ 

“दत्तनगरि” ही वेध लावते 
भाविकभक्ता हृदयी धरते 
धर्मध्‍वज हाती घेऊ! ४ 

का कोणाचे मन दुखवावे 
उगाच का या जगी शिणावे 
नारी नर बहिणी भाऊ! ५  

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
१६.०५.१९८२
# श्री सद्गुरु नारायण महाराज, बेट केडगाव

नारायण महाराजांपाशी वरप्रार्थना



दत्तरूप नारायणा, नारायण रूप दत्ता 
चराचरावर सत्‍ता, योगिराजा हो श्रीमंता 
श्रद्धा राहील अचला, ऐसा आशीर्वाद द्या ! 

केडगाव दत्तनगरी 
हीच आळंदी, पंढरी 
वारी घडो पुन्‍हा पुन्‍हा भक्ता अनुग्रह द्या! 

सत्‍यनारायण पूजा 
हाच सोपा यज्ञ दुजा 
वेदोनारायण पूजा करून घ्‍या! 

दत्त हाच नारायण 
दर्शनेच पटे खूण 
देह शुद्ध, मन शुद्ध प्रसाद हा द्या! 

अर्घ्‍य सूर्यनारायणा 
प्रभावी ही उपासना 
संध्‍या साधेल सर्वदा तथास्‍तु वदा! 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
२८.११.२००३
# श्री सद्गुरु नारायण महाराज, बेट केडगाव

Monday, June 6, 2022

आरति गजानना गाऊ! गाउनि धन्‍य धन्‍य होऊ!


आरति गजानना गाऊ! 
गाउनि धन्‍य धन्‍य होऊ! ध्रु. 

विघ्‍नांचा हर्ता 
अहो हा विद्येचा दाता 
यासी प्रेमभरे ध्‍याऊ! १  

थुलथुलीत दोंद 
हलवि हा लीलेने सोंड 
तयाच्‍या कौतुकास पाहू! २  

रक्तवर्ण विलसे 
रक्तांबर सुदर भासे 
यासी हृन्‍मंदिरि ठेवू! ३ 

मोदक वाम करी 
दक्षिण कर अभया वितरी 
ध्‍यान हे रात्रंदिन ध्‍याऊ! ४  

मूषकि बैसे हा 
काला चरणी नमवित हा 
ऐश्‍या महोत्‍कटा गाऊ! ५ 

शुभारंभ करितो 
कार्या सिद्धीसी नेतो 
याचे गुणगायन गाऊ! ६ 

ॐ या उच्‍चारी – 
राहतो पाशांकुशधारी 
वदे श्रीराम नम्र होऊ! ७ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
२८.०८.१९७६

Friday, June 3, 2022

सावधान! नामगान! आत्मभान! समाधान!


सावधान! नामगान! आत्मभान! समाधान!ध्रु.

ऊठ जिवा, तो उठवी, पहा आत, तो खुणवी
उदित रवि, वदत कवि, श्वास श्वास हवि हवि
सोऽहं जो मंजुध्वनि ऐक जिवा सावधान!१

जे लाभे, त्याचे ते, नाम रुचे, बहु त्याते
राम कृष्ण हरि ॐ वा काहीही म्हण त्याते
श्वसनावर बसव नाम तो चालवि नामगान!२

देह न मी, नच मन मी, मति कदापि नाही मी
आत्मा मी, मी अनादि, मर्यादित नाही मी
आनंदी ठेवतसे हे सदैव आत्मभान!३

परमात्मा जे देई सगळे हितकारक
देहाची स्थिती जशी ती जिवास उपकारक
तू त्रिवार हे म्हणणे समाधान! समाधान! समाधान!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
११.०९.२००४

Thursday, June 2, 2022

श्री अष्‍टविनायकयात्रा तारक ही मानवमात्रा

 

श्री अष्‍टविनायकयात्रा 
तारक ही मानवमात्रा ! ध्रु. 

ॐकाराच्‍या उच्‍चाराने 
श्रवणे मनने तसे दर्शने 
आनंद गात्रा गात्रा! १

श्रीमयुरेश्वर सिद्धिविनायक 
बल्‍लाळेश्वर वरदविनायक 
सुखवत नेत्रा नेत्रा! २

हे गिरिजात्‍मज तू हि गण‍पती  
तूच विघ्‍नहर तसा गणपती  
परमवंद्य सत्‍पात्रा! ३

चालत चालत जर ती घडली 
ती दसरा अन् तीच दिवाळी 
तोषिणी प्राणीमात्रा! ४

ॐ गँ ॐ गँ गाता गाता 
गणेशमूर्ती आत प्रकटता 
सफला प्रकाशयात्रा! ५

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
२४.०८.२००६
 
# अष्टविनायक गीते

रांजणगावी गण‍पति पाहू!

रांजणगावी गण‍पति पाहू! 
गणपति पाहू! ध्‍यानमग्‍न होऊ!ध्रु. 

मूर्ति डौलदार 
नेत्र पाणीदार 
अमृताची धारा अंगावर घेऊ! १

सूर्याची किरणे 
घेत लोटांगणे 
अनुपम्‍य शोभा पाहू! २

गजानना यावे 
अंतरी रिघावे 
ॐकार स्‍वरूपी मिसळुनि जाऊ! ३

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
२१.०९.१९७७

#अष्टविनायक गीते

Wednesday, June 1, 2022

ओझरच्‍या विघ्‍नहरा तव करितो जयजयकार!

ओझरच्‍या विघ्‍नहरा तव करितो जयजयकार! ध्रु. 

सिंदुरचर्चित तव काया 
भक्त शिरी धरिसी छाया
असंख्‍य विघ्‍ने हरती करता तव नामाचा उच्‍चार! १ 

कुकडी सरिता वाहतसे 
तुझाच महिमा सांगतसे 
गजानना तू घेशी प्रेमे निजभक्ताचा कैवार! २ 

अनलासुर घेशी उदरी 
दूर्वा म्‍हणुनि घेशि शिरी 
अमृतमय चंद्राला देशी निजमस्‍तकि आधार! ३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
२०.०९.१९७७

#अष्टविनायक गीते