Monday, September 26, 2022

प्रभातकाली सोऽहं भावे भूपाळी आळवू! स्वरूपनाथा सद्गुरुनाथा हृन्मंदिरि बसवू!

प्रभातकाली सोऽहं भावे भूपाळी आळवू!
स्वरूपनाथा सद्गुरुनाथा हृन्मंदिरि बसवू!! ध्रु.

शांत सुशीतल वातावरणी तनु पुलकित झाली
स्वामी अपुली मूर्ति आगळी हसतमुखे आली
कर जोडुनिया मस्तक अमुचे पदकमली ठेवू!१

भारतीय मी, देश देव हा भाव पुरा जागला
जातिधर्मभाषांचा भेदहि लोपुनिया गेला
नाथपंथिची ध्वजा स्वामिजी नभि डोलत ठेवू !२

अभंगातुनी ओवी प्रकटे सोपी ज्ञानेश्वरी
साधकासही ध्याना बसवी माता योगेश्वरी
अमृतधारा वाचुनि नाचत मरणभया पळवू !३

पावस हे घर, घरात पावस स्मरणी आवेग 
घन जलधारा बरसत आला श्रावणीय मेघ
नित्यपाठ नेमाने म्हणता पद पुढती ठेवू !४ 

अलकापुरिच्या ज्ञानेशा हे पावसच्या नाथा
अलौकिका घ्या प्रणाम कोटी झुकलासे माथा
एक हृदय हो भारतजननी भाव मधुर जागवू !५ 

स्वामी माझे, मी स्वामींचा संजीवनि गाथा 
आळविताना अभंग त्यातिल कंपित तनु आता
चिरंजीविता कृतीत वचनी  सकलांना दावू !६

स्तवन करावे शब्द न पुरती मन हे मौनावे
दर्शनास हे नयन न पुरती ते मिटुनी घ्यावे
श्रीरामासह बंधु नि भगिनी भावफुले वाहू !७ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, September 25, 2022

गीता संध्या


आहारावर पूर्ण नियंत्रण 
जीभ असावी ताब्यात 
विहारही मोजका असावा 
वीर न बुडतो विषयात
वीर न बुडतो विषयात!१ 

भलेबुरे ते आतुन कळते 
विवेक प्रामाणिक मित्र 
मने मनाला जोडत जावी 
संघटनेचा हा मंत्र 
संघटनेचा हा मंत्र!२ 

नकोच आसक्ती कसलीही 
देहाची वा स्वजनांची 
अप्रिय जरी कर्तव्य भासले 
सबब नको टाळायाची 
सबब नको टाळायाची!३ 

संध्यासमयी घ्या आढावा 
स्वभाव कैसा, कसा हवा
श्रीकृष्णाच्या नामस्मरणी 
उद्या उजाडो दिवस नवा 
उद्या उजाडो दिवस नवा!४ 

असो नसो मी काय तयाचे 
महत्त्व ना या गोष्टीला 
मी कर्ता हा गर्व ना शिवो 
श्रीहरि दे भक्ती अमला 
श्रीहरि दे भक्ती अमला!५ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१३.०७.२००३

गीताप्रभात


सर्वकाळ मज आठव पार्थ 
तुझी लढाई तू लढणे 
प्रामाणिक जो निजहृदयाशी 
कधी न त्याला पडे उणे!१ 
कधी न त्याला पडे उणे 

मरणाला भ्यायचे कशाला? 
अरे जन्मला तो मेला 
का डरतोसी  आघातांना 
जो हसला तो वीर भला!२ 
जो हसला तो वीर भला 

मी अपुले कर्तव्य पाळले 
यामध्ये जो संतोष 
सांग अर्जुना सख्या मला तू 
अपयश का असतो तो दोष?३
अपयश का असतो दोष? 

हारजीत जो समान समजत 
तोल मनाचा सांभाळी 
खेद न त्याच्या चित्ता स्पर्शत 
त्याच्या वदनी दिपवाळी!४ 
त्याच्या वदनी दिपवाळी 

गीता घ्यावी जगावयाला 
हरिनामाचा कर गजर 
जीवनयोद्धा तूच पांडवा 
लढताना तू मला स्मर!५ 
लढताना तू मला स्मर 

रचयिता :  श्रीराम बाळकृष्ण आठवले
१३.०७.२००३

भावार्थासह गीता समजो स्वामी स्वरूपनाथा


भावार्थासह गीता समजो स्वामी स्वरूपनाथा
अपुल्या चरणी टेकवीत मी हात जोडुनी माथा!१
साकी मजला बहु आवडली अंतरात ती ठसली
श्रीकृष्णाची कानी आली आतुन गीतामुरली!२
कळेल गीता गाता गाता ऐसा हा विश्वास
जे जे कळते ते ते वळते गुरुकृपेने खास !३
अर्जुन झालो जर मी स्वामी माधव आपण माझे
गुरुशिष्यांच्या संवादा या नित्य नवेपण ताजे!४
प्रातःकाळी नित्य म्हणावी भावार्थासह गीता 
उदात्त उन्नत होवो मानस गाताना श्रीगीता!५
अभ्यासाची मना माझिया ओढ अशी लागावी
अक्षर अक्षर पुरे ठसू दे आस हीच पुरवावी!६
मनात येता पावसला मी ऐसा अनुभव यावा
कृपाहस्त पाठीवर माझ्या स्वामी नित्य फिरावा!७
परिस्थितीशी जुळवुन घेणे मजला सहज जमावे
सदा हासरे जगास स्वामी माझे वदन दिसावे!८
लेखन अपुले मना लाविते अभ्यासाचा छंद 
डोळे मिटता मला जाणवे झालो मी गोविंद!९
प्रभातकाली मला उठविता धरुनि माझा हात
लिहू लाग तू बाळा वदता स्वामी स्वरूपनाथ!१०
रुक्ष वाटतो, वर्तनात मम ओलावाही यावा
विषयांचा तो लाग सुटावा कृष्णयोग साधावा!११
रामकृष्णहरि वदो वैखरी संजीवन दे मंत्र
गीता आचारात यायचे मला जमू दे तंत्र!१२
देहामधले विकार कौरव गाजवती अधिकार
विचार पांडव स्वराज्य इच्छिति कृष्णाचा आधार!१३
मी नच कर्ता, न लगे फल मज अंतरात बाणावे
स्वकर्मसुमने हरिपदी वाहुन कृतार्थ होता यावे!१४
अवघड नाही जगात काही, भेसुर नाही काही
इथेतिथे श्रीहरि कोंदला रिता ठाव मुळी नाही!१५
चलता चलता वाट संपते विश्रांतिस्थल येई
हळूहळू ये कर्मि कुशलता सुस्थिर मानस होई!१६
प्रयाणकालाची का चिंता अवघे हरिमय होते
सरे अहंता विश्वात्मकता तदा साधका वरते!१७ 
भलेबुरे वा जे जे घडते तुझिया आयुष्यात 
हरिची इच्छा असे मान तू बुडू नको मोहात!१८
जसा वागशी इतरांशी तू तसे वागती इतर
प्रेम लाभते प्रेमळ मनुजा पडो न याचा विसर!१९
एकांतामधि बसुनि घ्यावी आपआपली भेट
वाट अशी ही मुक्कामाला पथिका  नेई थेट!२०
चुकले नाही कर्म कुणाला का कंटाळा त्याचा 
ज्ञानासाठी आश्रय लागे घ्यावा कर्तव्याचा!२१
श्रीकृष्णाचे जीवन कैसे सांगे भगवद्गीता
मार्गदीप हा उपकारक हो जीवनयात्री करिता!२२
देव व्हायचे दानव किंवा ठरव तुझे तू आधी
दैवी संपद् थांग तिचा ना कुणास लागे आधी!२३
चुकता चुकता शिकता येते शिकेन मी हे बोल 
हृदयनिवासी सद्गुरु आतुन सावरती तव तोल!२४
आशावादी सदा असावे यत्न देव तो मान 
कर्म घडे जे कृष्णाज्ञेने यज्ञरूप ते जाण!२५
जे जे घडते ते कृष्णार्पण म्हणता देही मुक्ती
नाम स्मरता अंतःकरणी भक्तीला ये भरती!२६
जे जे भाविक  तया जनांना गीता सांगत जावे
आनंदाच्या प्रकाशात या आनंदाने गावे!२७
मनोबोध तो गीता आहे हरिपाठातही गीता 
तुकयाच्या त्या अभंगातही ऐकू येई गीता!२८
शिवथरघळ तर तुझ्या मानसी तूच शिष्य कल्याण
रामदास ते गीतागायक श्रोता तूच सुजाण!२९
जो सावध तो त्यावर ना ये पस्ताव्याची पाळी 
करू नये त्या कर्मालाही सहजपणाने टाळी!३०
तूच तुझा उद्धार करी हा श्रीगीतेचा घोष 
खचू न देई मना कधीही सदा मान संतोष!३१
देहामध्ये देव पहावा राखावा तो तुष्ट 
साह्य कराया धावत जावे दुजाभाव हो नष्ट!३२
एकटेपणा वृद्धा छळतो थोडी सोबत द्यावी
मधुर भाषणे, मधुर गायने आशा ती पुरवावी!३३
कसे वागशी तू इतरांशी गीतादर्शन त्यात
भलेपणाने जगी वागता सोऽहं आचारात!३४
देह येतसे देह जातसे खूणगाठ बांधावी
आत्मतत्त्व ते ध्यानी घेउन दुःखे ही सोसावी!३५
सुधारण्याला प्रत्येकाला जगात लाभे संधी
यज्ञचक्र जो चालू ठेवी समाज त्याला वंदी!३६
श्रवण करावे मनन करावे नाम स्मरता स्मरता 
जीवनात ये सहजच गीता गीता सर्वांकरिता!३७
ओंकाराच्या उच्चाराने  शांत शांत मन होते
मन पवनाला जाउन मिळते भजनानंदी रमते!३८
नित्य वाचनी गीता ज्याच्या ओठावरती नाम
सोऽहं मुरली त्याच्या कानी जी वाजवितो श्याम!३९
मुरवावा जर बोध अंतरी गीतामृत सेवावे
या गीतेच्या सरितेतीरी सांजसकाळी यावे!४०
आनंदाचे स्वरूप म्हणजे स्वरूप हा आनंद
ज्ञानी कर्मी योगी आहे भरला परमानंद!४१
देहाच्याही पलीकडे जो पहावायला शिकला 
त्या भक्ताला त्या ज्ञान्याला निराकार आकळला!४२
तत्त्वापासून ढळू नको रे गीतेचा संदेश
या देही या जन्मी मुक्ती देत तुला परमेश!४३
क्षण जो गेला वाया गेला तो न पुन्हा ये हाती
हे जाणुनिया ज्ञानी सज्जन अनुसंधानी असती!४४
इथली नाती मायावी ती खरा सोयरा राम
हे जाणुनिया अलिप्त राहुन शोधी आत्माराम!४५
परिस्थिती ही प्रश्नपत्रिका भगवंताने दिधली
सावधतेने चातुर्याने पाहिजेच सोडविली!४६
खचू न द्यावे धैर्य कधीही उत्साहाने जगणे
ओघे आले कर्म करावे नको नको डगमगणे!४७
केव्हाही तू श्रीगीतेचा श्लोक चिंतना घेई
पुनर्जन्म मानवा तेधवा नि:संशय तव होई!४८
तुझ्या रथाचे सूत्र मानवा कृष्णाहाती दे रे
करुनि अकर्ता कसे व्हायचे झणी शिकूनी घे रे!४९
जे कळते ते जना सांगता स्वभाव बदलत जातो
शोकाकुल तो आत्मज्ञाने वीरधीर तो होतो!५०
हो मृत्युंजय हो शत्रुंजय धनंजया तू आता
असे जाणवो जनांस कळते गीता गाता गाता!५१
सदा हासरा सदा खेळकर त्याला गीता कळली
अंतर्मुख तो लुटे आत्मसुख ऐके सोऽहं मुरली!५२
जो मज भजतो जैशा भावे तयास तैसा प्राप्त
हे आश्वासन माझे आहे भक्ताचा मी आप्त!५३
कृपा आपली स्वामी मजवर मला आपुले म्हटले
अश्रुजलाने श्रीरामाने चरण आपुले धुतले!५४
स्वरूप बोधावरी राहशिल द्यावा आशीर्वाद 
आणिक दुसरे न लगे मजला हा सद्गुरुप्रसाद!५५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, September 22, 2022

देव पहा माणसात


नको जाऊ देवळात- 
देव पहा माणसात!ध्रु. 

मुखे शब्द गोड यावा 
गोड शब्द हा विसावा 
देव आहे रे प्रेमात!१ 

मने सांभाळ, सांभाळ 
मग संतुष्ट गोपाळ 
देव मधुर बोलात!२

सर्व रूपे देवाची ती 
ऐसे आणूनीया चित्ती 
दिसो कोणी जोडी हात!३
 
मन ठेवावे प्रसन्न 
घरा येतो नारायण 
संत सारे सांगतात!४ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१६.०७.१९८९

श्रीनवनाथ जय नवनाथ

प्रभात होण्याआधी मजला नवनाथांनी जागवले
वीररसाची जोड भक्तिला दे दे आधी सांगितले!ध्रु. 

डरायचे या जगात नाही, गजाननाला नमन करी 
सूत्रे ध्यानी ठेव साजरी, ॐ  तत् सत् दे ललकारी
शिव शिव म्हणता आदिनाथ गुरु डमरूनाद करत आले!१

श्री गुरुदेवा दत्तात्रेया अनसूयासुत हसलात
काळोख्या रात्रीतुन झाली ज्योत्स्नेची जणु बरसात
उमेद वाढव नित जनतेची लेखणीने झरझर लिहिले!२ 

गूढ असे या जगात नसते उणीव डोळस पठणाची
चिकाटीस धर, धावे स्फूर्ती खूणगाठ वक्तृत्वाची
झपझप चालावे, न अडावे, माय धरित्री हे वदले!३ 

हाव हावरी करते फरफट, काळा पैसा यमपाश
भल्या गृहस्था परिवारासह गाडे विघ्नांची रास 
मोहाचा कर होम माणसा कृष्णमेघ जणु गडगडले!४
 
भले बुरे ते प्रत्येकाला आतुन कळते विवेक तो 
विचार त्याचा भाऊ, भक्ति ही बहीण संबंधच असतो 
बलोपासना सतेज करते, आदित्यही हासत बोले!५ 

निष्ठा सांगे निसटायाचे कसलाही हव्यास नसो 
सदाशिवाला, उमापतीला निर्मळ सुंदर स्थान असो 
पोथीमधल्या घटनांची ही संगत हलके सांगितले!६ 

श्रीनवनाथ जय नवनाथ शब्द खुणेचे यावेळी 
येता जाता घरच्या देवा वंदन कर जाणीव दिली 
आत्म्यावर विश्वास बालका ठेव पडो हे स्मरण दिले!७ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Tuesday, September 20, 2022

मी दास तुझा


मी दास तुझा, दास तुझा 
दास तुझा श्रीरामा! 
मम हृदयी ये, हृदयी ये 
हृदयी ये श्रीरामा!ध्रु. 

तू सदैव जवळी राही 
मी स्‍मरता दर्शन देई 
रे नामच तू, नामच तू 
नामच तू श्रीरामा!१  

घे करवुनि काही सेवा 
ती संधिच मजला मेवा 
नच आस दुजी, आस दुजी 
आस दुजी श्रीरामा!२  

घे खोल अंतरी ठाव 
हृदयी ये होउनि भाव 
तू प्रेम झरा, प्रेम झरा 
प्रेमझरा श्रीरामा!३  

मन नामी रमव रमव रे 
चरणी ते जडव जडव रे 
मी प्रार्थितसे, प्रार्थितसे 
प्रार्थितसे श्रीरामा!४  

तव चरित्र गाउन घेई 
सगुणातुन निर्गुणि नेई 
कर निर्मळ रे, निर्मळ रे 
निर्मळ रे श्रीरामा!५  

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
( समर्थ रामदास स्‍वामींच्‍या चरित्रावर आधारित काव्‍य)

Sunday, September 18, 2022

गोविंदकाका उपळेकर हो ऽऽ ओढ कशी लागली

गोविंदकाका उपळेकर हो ऽऽ
ओढ कशी लागली 
ब्रह्मच केवळ फलटणचे हे 
हसे ज्ञानमाउली!ध्रु. 

आहे- असु दे, नाही नसु दे 
भेद त्यात काय? 
हरिपाठाची पुरे शिदोरी 
पुरवुन ती खाय 
सदा हसावे, डुलत चलावे 
चिंतनात मुरली!१ 

हरि हरि म्हणता आनंद वाटे 
काटे बोथटती
कडु घोट परि सुखद गिळाया 
किमया गुरु करती 
उन्मनीत काका नित भेटा 
भूक तीव्र लागली!२ 

नयन मिटावे, आत पहावे 
हरिबाबा आत 
हात धरूनि ते खेचुन घेती 
गात्रे निवतात 
संगति लागे विसंगतीतुन 
कृष्णकृपा झाली!३ 

सुबोधिनीचे लेखन अपुले 
एक चमत्कार 
आघातांनी सुखद वेदना 
मन ब्रह्माकार 
मीपण लोपे, पाप विलोपे 
हरिमय योगबळे!४ 

अता न मागे फिरावयाचे भक्तिपथावरती 
कृष्णदेव गोविंदा मिळता 
फिटे भवभ्रांती 
माया तोडी पुसे सावली 
काका हे कळले!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.०९.१९९७
भाद्रपद कृ ८

श्रीकृष्ण गोविन्द गाते चलो हसाते, रिझाते, लुभाते चलो। ध्रु


श्रीकृष्ण गोविन्द गाते चलो
हसाते, रिझाते, लुभाते चलो। ध्रु

हमें चाहिए, हम करें वन्दना
हमें चाहिए, हम त्यजे कामना
इसी जन्म में मुक्ति पाने चलो।१

जहां हम चलेंगे वहां कृष्ण है
जहां हम बसेंगे वहां कृष्ण है
सखा श्याम अन्दर छिपाते चलो।२

सदाचार ही धर्म कहते हैं श्याम
दुराचार ही पाप कहते हैं श्याम
सदा धर्म का पक्ष लेते चलो।३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Saturday, September 17, 2022

प्रभाती दिसली मंगलमूर्ती.



ॐ गं गणपतये नम:

प्रभाती दिसली मंगलमूर्ती! ध्रु. 

डोळे मिटले, ध्‍यान लागले 
तनामनाचे भान हरपले 
निवासा आली जणु शांती!१  

मनास शुण्‍डेपरि वळवावे 
आत्‍मरूप ते चिंतित जावे 
हळुहळू शिकवित मज ‘गणपती’!२  

तत्‍परतेने श्रवण करावे 
प्रसन्नमुख सर्वदा असावे 
ज्ञानिया शिवे कुठुन भ्रांती?३  

त्रिशूल करिचा अरि माराया 
मोदक करिचा मोद द्यावया 
बसावे ध्‍याना एकांती!४  

तनु मी नाही, मनही नाही 
सोऽहं आत्‍मा जाणिव होई 
सिद्धि ही दे मंगलमूर्ती!५ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
२५.१०.१९८९

Thursday, September 15, 2022

योग्यता देशील ना?

ऑडिओ - योग्यता देशील ना
 
तू क्षमा करशील ना? 
तू दया करशील ना?ध्रु. 

अज्ञ मी मज ज्ञान नाही 
भक्ति करण्या भाव नाही 
योग्यता देशील ना?१

सुमन मी कोठून आणू? 
शब्द स्तवना कुठुनि आणू? 
जवळ परि घेशील ना?२ 

ओळखाया दृष्टि नाही 
साधनीही स्नेह नाही 
संगती असशील ना?३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०१.११.१९७७

एकनाथ एक नाथ भागवती तेच ते!

एकनाथ एक नाथ भागवती तेच ते!
हरिचरणां स्मरुनि मना बिलग बिलग तेथे!ध्रु. 

भजने नर नारायण संत सांगतात
एक नाथ अंतरिचा जनी पाहतात
कृष्णरूप विश्व सर्व सज्जनास वाटते!१

कृष्ण कृष्ण आळवीत चिंतनी बुडावे
कार्य काय ध्येय काय आतुनि सुचावे
नाथ माय नाथ बाप भावभेट होते!२

जो पदार्थ क:पदार्थ सुख न त्यात काही
जो अनंत अंतरात त्यास तूच पाही
काम तुझा राम बनो श्याम येत तेथे!३

सद्गुण कर आत्मसात तूच देव होशी 
सोडुनि घर श्रीहरिला कुठे शोधतोसी?
तू प्रसन्न जग प्रसन्न हसत खेळ नेटे!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०५.०५.१९८५

Wednesday, September 14, 2022

तू गीता मन में पढ ले तू गीता जन में गा ले



तू गीता मन में पढ ले
तू गीता जन में गा ले
तू मुक्‍त वायुमंडल में
छिन सुखद सॉंस तो ले ले । १

जो योगी है संन्‍यासी
मन में ना कभी उदासी
स्मितवदन तथा मितभाषी
यह बात ध्‍यान में ले ले । २

उत्‍कर्ष हाथ में होता
अपकर्ष हाथ में होता
अरि मित्र स्‍वयं ही बनता
दक्षताही तू अपना ले । ३

सुखदुख है आते जाते
हरिदास भजन ही करते
आसन से लेश न हिलते
आनंद ध्‍यान का ले ले । ४

मन जिस के वश में आया
वह श्रीहरि का मनभाया
बिंदु में ही सिंधु समाया
भावार्थ समझ में ले ले । ५

खोया है उसने पाया
सुख यहॉं साप की छाया
साधन है नश्‍वर काया
मोहन को तू अपना ले । ६

द्वंद्वो को सहनेवाला
दुख में भी हसनेवाला
बन ऐसाही मतवाला
अनुभूति आप ही ले ले । ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

तू गीता मन में पढ ले
तू गीता जन में गा ले 
तू मुक्‍त वायुमंडल में 
छिन सुखद सॉंस तो ले ले । १  

कर्म करना हर किसी को 
विवश है यहॉं हर कोई 
बुद्धि से यदि देख ले तो 
ज्ञानसाधन कर्म ही । २ 

मन से वश कर इंद्रियों को 
छोड दे तू मैं मेरा 
कर्म जनहित के लिए जो 
यज्ञ है सुंदर तेरा । ३ 

भावना सहकार की है 
स्‍नेह की नवनिर्मिति 
आयु उस की सफल है 
जो सन्‍मती है सुकृती । ४  

प्रकृति है सब कराती 
हॅू मैं कर्ता भ्रांति है 
चित्‍त रखता ईश में जो 
मुक्‍त है, विभ्रांत है । ५ 

आस, ममता त्‍याग कर 
तू कर्म हाथों से करे 
दुख क्‍या है, डर भी क्‍या है 
शांति से संग्राम करें । ६ 

काम जो है, क्रोध जो है 
ज्ञान को वे ही मिटाते 
इंद्रियोंका दमन करते 
वीरवर है विजय पाते । ७ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

तू गीता मन में पढ लें 
तू गीता मन में गा ले 
तू मुक्‍त वायुमंडल में 
छिन सुखद सॉंस तो ले ले । १ 

शरचाप गिर पडें भूपर 
वह रोया मुँह को ढककर 
मैं नही लडूँगा कृष्‍ण 
क्‍यों पाप लूँ मेरे सिरपर । २ 

जो शरण में आया अपनी 
हो कितना भी अज्ञानी 
ईशने सीख दे नामी 
कर दिया है उस को ज्ञानी । ३ 

इस तन की कौन बडाई 
आत्‍मा की है परछाई 
कर्तव्‍य ही करना होगा 
तू जन को उत्‍तरदायी । ४ 

प्रज्ञा को स्थिर है रखना 
कभी अस्थिर ना हो देना 
सुखदुख को समही समझ तू 
बस मन को सुमन बनाना । ५   

शांति अक्षय धन है 
लडना यहॉं अटल है 
निर्वैर हो पहले पार्थ 
युद्धही तपश्‍चर्या है । ६ 

श्रीव्‍यास अतुल पंडित है 
संवाद तो रोचक ही है 
जी जान से कोई पढ ले 
संतोष मधुरतम फल है । ७   

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

तू गीता मन में पढ ले
तू गीता जन में गा ले
तू खुली हवा में प्यारे
जरा मुफ्त सॉंस तो लेले।१

ना समझ पार्थ ने पहले 
एक कदम तो गलत उठाया
श्रीकृष्ण सारथी ने तो 
गलती को सुधर दिया।२

ये काम क्रोध तो दैत्य - 
मायावी कपटी हैं ही
भूल का समर्थन करना
है पातक मेरे राही। ३

अपना है कौन पराया
कुछ भी न समझ में आया
श्रीहरिजी कुछ भी न बोले
मौन से मित्र फिर जिता।४

अँधेरा छाया लगता
ये चोटभी गहरी पहुँची
ये बुँद बुँद आसू की
दीक्षा दे सोच समझ की।५ 

श्रीकृष्ण कृष्ण गर गाता
तू हरि को जागृत करता
तो कभी न प्यारे तुझको 
पछताना योंही पडता।६ 

इस विषाद ने सत्कार्य
इतना तो जरूर किया है
शिष्य को लाभ सद्गुरु का
अद्भुत ये हरि लीला है, अद्भुत ये हरि लीला है। ७


रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले


तू गीता मन में पढ ले
तू गीता जन में गा ले 
तू मुक्‍त वायुमंडल में 
छिन सुखद सॉंस तो ले ले। १ 

जो योग है तुझे बताया 
वह परंपरा से आया 
तू सखा तथा है भक्‍त 
अति सुयोग्‍य तुझ को पाया। २ 

जब धर्महानि होती है 
जय अधर्म की दिखती है 
प्रभु अपना रूपही रचकर 
अवतीर्ण हुआ लगता है। ३ 

ये जनम करम का कूट 
जिस जिसने होगा जाना 
वह प्रपंच से है मुक्‍त 
मैंने/मुझसे न अलग है माना। ४ 

सज्‍जन की रक्षा करना 
दुर्जन को दंड दिलाना 
धर्म की स्‍थापना करना 
अवतारहेतु है माना। ५ 

ना चाहा फल कर्मों का 
बंधन ना आसक्ति का 
मैं प्रेमी निर्मोही का 
माधव हॅूं अर्जुनजी का। ६ 

आसक्ति गई जब मन से 
कर्तव्‍य लगा पूजन सा 
जो योगी है वही ज्ञानी 
नर नारायण के जैसा। ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

तू गीता मन में पढ ले 
तू गीता जन में गा ले 
तू मुक्‍त वायुमंडल में 
छिन सुखद सॉंस तो ले ले। १  

ज्ञानयोग से कर्मयोग है 
सुगम अधिक मत मेरा 
प्रकृति करती, वही मिटाती 
खेल उसी का सारा। २ 

छोड फलाशा कर्म करे जो 
स्‍वास्‍थ्‍य बडा पाता है 
सच्‍चा मानव केवल अपने 
लिए नही जिता है। ३ 

कर्म सिखाता, वही परखता 
मन को शुद्ध है करता 
मनमंदिर में भक्‍तजनोंके 
नाम ही मन बन जाता। ४ 

काम करे हर कोई अपना 
श्रद्धा रखकर मन में 
सशक्‍त बनता है उसका तन 
समाधान है घर में। ५ 

आत्‍मा में जो योगी रमता 
ज्ञानी है कहलाता 
आदि अन्‍तवाले भोगों से 
लेश न विचलित होता। ६ 

क्‍या है बाहर देखो अंदर 
राम कृष्‍ण बैठे है 
बिना शब्‍द के चुपके चुपके 
मिलन मधुर होता है। ७ 
   
रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 




Tuesday, September 13, 2022

नर जन्‍माचा हेतु काय तो – ध्‍यानी घे रे नरा!


नर जन्‍माचा हेतु काय तो – ध्‍यानी घे रे नरा! ध्रु. 

कर्मि गुंतसी, जागी फिरसी 
आशा धरसी, मोही रुतशी 
फेऱ्यातच या राहिलास तर व्‍यर्थ जिणे तव नरा!१  

जीव असे तो देहि देहपण 
तो उडताक्षणि सरे देहपण 
कर्तेपण तू देई सोडुनि सावध हो रे जरा!२  

करू नये ते करवित माया 
हरिभजनासी साधन काया 
यत्‍न न सोडी श्रद्धा ठेवी शरण जाई प्रभुवरा!३  

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २८२, ८ ऑक्‍टोबर वर आधारित काव्‍य)

देह नव्‍हे मी! तो मी! तो मी!



देह नव्‍हे मी! तो मी! तो मी! 
नित्‍य घोकणे तो मी! तो मी!ध्रु.  
 
जिणे अशाश्‍वत 
हरेक जाणत 
स्‍वहित साधती असे कमी!१   

खेळ मनाचे 
सुख दु:खांचे 
उगम दोन्हिंचा असे भ्रमी!२   

सोऽहं ध्‍यानी
अनुसंधानी 
राम सापडे तोच तोच मी!३   

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २४५, १ सप्‍टेंबर वर आधारित काव्‍य 
जीवाचे कल्‍याण व्‍हावे म्‍हणून भगवंताचे स्‍मरण करावे)

Monday, September 12, 2022

गोपालकृष्ण! राधाकृष्ण!



गोपालकृष्ण! राधाकृष्ण!
गोपालकृष्ण! राधाकृष्ण! ध्रु.

छंद जिवाला तुझा लागला 
गोकुळास मज ने घननीळा 
ऐकव मुरली - अधीर पैंजण!१

मोरपिसांचा मुकुटहि सुंदर 
कसा झळाळे बघ पीतांबर 
स्मित वदनावर असे सुदर्शन!२ 

निसर्ग नटला वायुलहर ये 
दृश्य जपावे जे न पुन्हा ये 
चित्त चोरतो हा मनमोहन!३ 

अम्ही गौळणी सगळ्या जमुनी 
बघत राहतो मूर्ति देखणी 
दृष्ट न लागो, होतो उन्मन!४ 

वाजव वेणु ऐके धेनु 
नीलाकाशी थबके भानु 
ऊन कोवळे, शीतल चंदन!५ 

नरनारी हा भेद लोपला 
मांगल्याचा अंकुर डुलला 
मुरली सांगे लंघा कुंपण!६ 

घरी बसावे नयन मिटावे 
आत वळावे मने पहावे 
ध्येय ध्याता ध्यानहि मोहन!७ 

मनात राधा तिजला बाधा
तव ध्यानाचा उपाय साधा 
अवघ्या आशा श्रीकृष्णार्पण!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३०.०७.१९९४

Sunday, September 11, 2022

देह हेच गोकुळ आहे

देह हेच गोकुळ आहे 
तुझा तूच शोधुन पाहे!ध्रु. 

तुझी इंद्रिये या गाई 
चपळतेस सीमा नाही 
कोण वाजवूनी पावा मना वेधणारा आहे?१
 
कृष्ण कृष्ण गात रहावे 
शांत शांत बनता यावे 
श्वास श्वास नामा बांधे असा कोण आहे?२ 

प्रेम घेत वितरत प्रेम 
रहायचे पाळत नेम
प्रेमरूप होता येते भाव ठाम धरुनी राहे!३ 

वृत्ति विविध त्या त्या गोपी 
आवरण्या युक्ती सोपी 
राम कृष्ण हरी गोविंदी लीन होउनीया राहे!४ 

कृष्णजन्म देही व्हावा 
बद्ध जीव मुक्तच व्हावा 
खरा इंद्रियांचा स्वामी नंदकुमर आहे आहे!५ 

दिव्य ध्येय पुढती राहो 
दिव्य कार्य घडतच राहो 
रास खेळणे कृष्णाशी निदिध्यास लागुनि राहे!६ 

राम कृष्ण हरि गोविंद 
मना हाच लागो छंद 
सूर सूर वेणूचा तो श्रवणि येत आहे!७

कृष्ण गीत गाता यावे 
स्वच्छ स्वच्छ गोकुळ व्हावे 
श्यामकरी मुरली तूच दुजे कोण आहे?८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Friday, September 9, 2022

श्रीरामाचे जीवन गा!


श्रीरामाचे जीवन गा! शिकत रहा तू! शिकत रहा! ध्रु.

तुझ्याजवळ जे असेल ते दे 
विद्या दे दे, धन ही दे दे 
वृक्षासम तू देत रहा!१

सुख हे येते, दुःखहि येते 
सुख ही जाते, दुःखहि जाते 
स्थितप्रज्ञ तू सदा रहा!२

माझे जीवन सगळ्यांसाठी 
संकटी राहिन सर्वांपाठी 
नायकपण तू पहा पहा!३

अपशब्दांना नकोच थारा 
मधुशब्दांचा खरा निवारा 
उजाड माळहि फुलव पहा!४

गुणीजनांचे कौतुक करता 
राष्ट्राची वाढते सुबत्ता 
उत्तेजन तू देत रहा!५

भोग न जीवन त्यागच जीवन 
सेवा करता सरते मीपण 
तनमनधन देशास वहा!६

परिश्रमच ही खरी संपदा 
सच्चरिताला कुठली विपदा
चंदनसम तू झिजत रहा!७ 

तुझ्या आतल्या रामा आळव 
रामा आळव, रामा जागव 
अंतरातला राम पहा!८

मन कोणाचे नच दुखवावे 
दीनजनांचे अश्रु पुसावे 
मेघासम तू बरस पहा!९

सज्जनरक्षण खलनिर्दालन 
एकांती तत्त्वाचे चिंतन 
ध्यानाला तू बसत रहा!१०

पक्वान्ने? छे फलाहार कर 
जीवन देती निर्मळ निर्झर 
जनी वनी तू स्वस्थ रहा!११ 

जीवनविद्या खरीच विद्या 
कधी न सरते ऐसी विद्या
उत्साहाने शिकत रहा!१२ 

मनन करी तो मानव आहे 
त्याच्या हृदयी राघव आहे 
अनुभव घेई तूच पहा!१३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२८.०४.१९८७

सुभाष विद्यामंदिर

सुभाष विद्यामंदिर माझी आवडती शाळा!
मुला मुलींना गुरूजनांना हिचा लागला लळा!ध्रु.

हिच्याच छायेमधे बैसुनी ज्ञानार्जन करता 
हिच्या अंगणी आनंद लाभे रमता बागडता
जीवन म्हणजे खेळ मजेचा धडा शिकवला मला!१

तन झिजवावे, मन घडवावे फुलते व्यक्तित्व 
परिश्रमाने यश लाभावे कळू दे अस्तित्व 
जनसत्तेचा शिक्षणकाली अर्थ इथे कळला!२
 
जवान कोणी, किसान कोणी, कोणी अधिकारी
ध्येय ध्रुवावर दृष्टी ठेवुन प्रगति करी भारी 
प्राण जोवरी तो न विसरणे शालामातेला!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१३.०७.२००१
(या शाळेत जून १९५७ ते मे १९५९ नोकरी)

गणेशाचे तत्वज्ञान सांगतसे गजानन

गणेशाचे तत्वज्ञान सांगतसे गजानन 
रामे घेतले लिहून वाचतसे आवर्जून १

मूर्ति मृण्मयी पाहिली धार डोळ्यांना लागली 
सर्व किल्मिषे धुतली कृपा गणेशाची झाली २

बाळा यावे आनंदात परतावे आनंदात 
भक्तिगीत गात गात सुखदुःखांवर मात ३ 

नाही कायम राह्यचे केव्हातरी निघायचे 
व्यर्थ नाही गुंतायचे असुनीया नसायचे ४

अर्थ जाणाया वाचावे अर्थ जाणून वाचावे 
अर्थ जाणून म्हणावे मनामध्ये घोळवावे ५

एक सत् तत्त्व गणेश सर्वां होतसे प्रत्यक्ष 
भक्तिभावनाच साक्ष ध्यावा मनाने अलक्ष ६

कर्ता धर्ता गणपती स्वामी एक गणपती 
शुभाशुभ गणपती मानता न उरे खंती ७

चल माग गणेशाला जाई शरण तयाला 
करी पूर्ण अपूर्णाला लाग मोदाने कामाला ८

स्वर लताचा गणेश नृत्य गोपीचे गणेश 
ज्ञान विज्ञान गणेश ब्रह्मचैतन्य गणेश ९

जर श्रद्धा जोपासली फळे वृक्षा लहडली 
लिही ओळी पाठी ओळी नित्य दसरा-दिवाळी १०

आत्मबला जागवावे कधी देवा न निंदावे 
भोग हासत सोसावे दुःख गणेशा कथावे ११

होवो मेळा साधकांचा गण ऐसा घडायाचा 
विरंगुळा हा जिवाचा जोर वाढे  साधनाचा १२

ध्येय उदात्त असावे त्याच्या प्रकाशी चालावे
मन क्षुद्र न करावे सर्वात्मका तोषवावे १३

गेले त्याची नको खंत असो उत्साह अनंत 
पाठीराखा भगवंत भरवसा हा वसंत १४

गुण एकेक जोडावा मनी गणेश पूजावा
सरो सगळा दुरावा जोडीदार सुखी व्हावा १५

चतुर्थी ते चतुर्दशी पहा दहाच दिवस 
सत्कार्याला लागो देह असा पुरव नवस १६

हेच मागावे गणेशा माझे मागणे सरावे 
तुझ्या अथर्वशीर्षाचे मला कवच लाभावे १७

सूर लागू दे गाताना मन रमू दे ध्याताना  
गती वाढो चालताना आत्मविश्वास या म्हणा १८ 

कायाकल्प श्रीगणेशा घडो यावा जगदीशा 
तोष व्हावा स्वरूपेशा अगा दयाळा सर्वेशा १९

सदा सर्वदा स्मरण नाम मुखी गजानन 
हेच भरण-पोषण स्वत्मस्वरूप चिंतन २०

अगा दयेच्या निधाना गणपते गजानना 
घेगा सामावून रामा गणनाथा त्रिलोचना २१

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, September 8, 2022

नक्षत्रांचे देणे

 

नक्षत्रांचे देणे आशाचे गाणे 
बोलणे, चालणे मोहविते १

चेहरा बोलका म्हणे आयका
जिभेला चरका झुणक्याचा २

असो रागदारी कविता किशोरी
फिरते भिंगरी वेगातच ३

श्वासाचा विश्वास गाणे हमखास
नित्य रंगण्यास गाली हासू ४

दीनानाथसुता गाण्यास बसता
माधुरी संगीता अमर्याद ५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.११.१९९९

Wednesday, September 7, 2022

श्रीनवनाथा प्रसाद द्यावा

श्रीनवनाथा प्रसाद द्यावा द्यावा सहवास 
असे जाणवो जिवास तुमचा इथे तिथे वास!१ 

देहच मी या अज्ञानाने भित्रा मज केले
विषय सुखाला दुबळे मन हे व्यर्थ व्यर्थ भुलले!२

चुकले कोठे तुम्ही सुचविले तुमचा उपकार 
सद्गुरुनाथा स्वरूपनाथा तुम्हा नमस्कार!३ 

आसनावरी मजला बसवा हात शिरी ठेवा
मन पवनाला द्या द्या बांधुन माझ्या गुरुदेवा!४
 
बाहेरुन मज आत आणले दाखवता वाट 
जय जय जय जय श्रीनवनाथा स्वर देती साथ!५ 

गंध दरवळे असे जाणवे सोऽहं घमघमला 
मागुति पुढती इथे तिथे हे नवनाथा दिसला!६
 
वाचत जा तू नेमे प्रेमे रहस्य उलगडते
तव प्रश्नांना तुझी उत्तरे अनुभव घे येथे!७ 

नको मानवा उगाच पसरू मागण्यास हात
न मागता भगवंत देतसे घे घे ध्यानात!८

या साक्यांचे चिंतन कर रे कोण वदे कानी?
भक्तीचे फळ भक्तिच असते सांगतात ज्ञानी!९

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Monday, September 5, 2022

जे जे दिसते, नाश पावते, ती तर सगळी माया!


जे जे दिसते, नाश पावते, ती तर सगळी माया!ध्रु.

भगवंताच्या स्मरणि असावे
उठता बसता नामचि घ्यावे
सद्गुरु धरतिल शिरी आपुल्या नित्य कृपेची छाया!१

रुचेल रामा तेच करावे
साक्षित्वाने जगि वर्तावे
देव विसरता अहं बळावे जीवन जाते वाया!२

रामाविण जगि नसते कोणी
तोचि संकटी येत धावुनी
नाम तयाचे शांतिगृहाचा आहे सुदृढ पाया!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २५२, ८ सप्टेंबर वर आधारित काव्य)

आले हो आले ऽऽआले गणपति बाप्‍पा आले

आले, आले हो आले ऽऽआले
गणपति बाप्‍पा आले! ध्रु. 

माती, पाणी, उजेड, वारा 
मिसळुन घेउन सर्व पसारा 
समूर्त होउन आले! १

शेतकऱ्यांचे, कामकऱ्यांचे
स्‍त्री पुरुषांचे, मुलामुलींचे 
नकळत नेते झाले! २

मिळवा विद्या, मिळवा शक्ती
जगण्‍याची घ्‍या शिकून युक्ती 
आनंद उधळत आले! ३

डोळे बारिक सूक्ष्‍म पहाया 
लंबोदर हे क्षमा कराया 
अभयदानही दिधले! ४

अंकुश राहो सदा मनावर 
पहा अंतरी आपण क्षणभर 
हृदयमंदिरी वसले! ५

काळावरती स्‍वार व्‍हायचे 
विघ्‍नांनाही हटवायाचे 
उत्‍साहे मन भरले! ६

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
१२.०९.१९८८

Sunday, September 4, 2022

एकमुखाने हिंदू सारे, मुक्त स्वराने गर्जू या गणपति बाप्पा मोरया!

लोकमान्य टिळकांना साऱ्या समाजात जागृती घडवून आणायची होती. लोकशिक्षण द्यावयाचे होते. त्यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिले. त्या काळात सर्वत्र व्याख्याने, प्रवचने, कीर्तने, पोवाडे, मेळे असल्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असे. गणपति विसर्जन मरवणुकीचा सोहळा तर अवर्णनीय असे. एकच एक गजर घुमत राही - 

गणपति बाप्पा मोरया!

सुतार, माळी, कुंभारांनो, व्यापाऱ्यांनो या हो या
एकमुखाने हिंदू सारे, मुक्त स्वराने गर्जू या
गणपति बाप्पा मोरया!ध्रु.

आम्ही कोण ही होत विस्मृती
विघ्नहरी आणील जागृती
श्रद्धाभावे करू आरती
हिंदु अस्मिता जागवु या, गणपति बाप्पा मोरया!१

गणाधीश तर हे जनदैवत
जनसत्तेच्या मंत्रा वितरत
शक्ति बुद्धि ते स्वये उपासत
आत्मगौरवा अनुभवु या- गणपति बाप्पा मोरया!२

दहा दिवस कैसे हे गेले
भजनि रंगता नाही कळले
स्फूर्तिगान ते गाती मेळे
तालावरती नाचू या, गाऊ या गणपति बाप्पा मोरया!३

गुलाल भाळी विराजतो
सनई चौघडा दुमदुमतो
लेझिम ताफा झणझणतो
गर्जन गगना भिडवू या - गणपति बाप्पा मोरया!४

जागृत होवो नवजनशक्ती
विकसित होवो पूर्ण समष्टी
ज्ञानभक्तिची मिळू दे संगति
गणराज्या मनि उभारुया! गणपति बाप्पा मोरया!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३१.०१.१९६८

सोऽहं गणेश

 
माझा गणेश सुखवी मजला 
करवुनि घे अभ्यास चांगला!१

माझा गणेश थांबवि पुढती 
फिरते अंगांगावर दृष्टी!२ 

माझा गणेश दे संजीवन 
वय वाढे परि अक्षय यौवन!३

माझा गणेश श्री गुरुनाथ
परिस्थितीवर करवी मात!४ 

माझा गणेश गुणगंभीर 
वेळोवेळी पुरवी धीर!५ 

माझा गणेश आसनि बसवी 
मुळाक्षरे योगाची शिकवी!६ 

माझा गणेश असा पकडतो 
भवसागरी पोहणे मुरवितो!७ 

माझा गणेश दिसो ना दिसो 
सोऽहं ध्यानी सुंदर विलसो!८ 

माझा गणेश निजशुंडेने 
अजरामर करी आत्मज्ञाने!९ 

माझा गणेश श्रवणकीर्तने 
करी अपणासम अनुग्रहाने!१० 

माझा गणेश सोऽहं आहे 
स्वयंसिद्ध जगि जो तो आहे!११ 

नकोस विसरू स्वस्वरूपाला 
माझा गणेश निक्षुन वदला!१२ 

माझा गणेश रक्षणकर्ता
हितशत्रूंवर रोखे भाला!१३

सोऽहं सोऽहं भजनामध्ये 
माझा गणेश वसला आहे!१४

तिमिराकडुनि प्रकाशाकडे 
माझा गणेश नेतो आहे!१५ 

असूनही देही पूर्ण विदेही 
माझा गणेश ऐसा राही!१६ 

माझा गणेश मना मुरडवी 
सैरावैरा धाव संपवी!१७ 

माझा गणेश जेथे आहे 
समाधान तेथे दिसताहे!१८ 

माझा गणेश घडवी लीला 
शक्तियुक्तिसत्कृतिंचा मेळा!१९

स्थिरचर व्यापुन दशांगळेही 
माझा गणेश उरला पाही!२०

वदनावर अंगुली ठेवुनी 
गणेश सांगे व्हावे मौनी!२१
 
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.०८.२००४