श्रीकृष्णांच्या बोलण्यातील उपरोधाची, क्रोधाची तीव्रता कमी झाली. सहानुभूतीचे मेघ अर्जुनाच्या अंत:करणातल्या वणव्यावर बरसू लागले. आताच्या त्यांच्या बोलण्यात अनौपचारिकता होती.
अर्जुनाचा शोक कसा अनाठायी होता हे ते खुबीने दाखवू लागले.
अरे नाश होतो म्हणतात तो देहाचा – परब्रह्माला नाश ही अवस्थाच ठाउक नाही. माणूस शूर ठरतो त्याच्या सोशिकपणाच्या बळावर.
वक्तृत्वाचा तो गंगौघच होता. अर्जुनाच्या मनावरचा भार हलका होण्याला या बोलण्याची फार मदत झाली.
परस्परविरुद्ध विचारांच्या आवर्तात सापडलेल्या अर्जुनाचा तोल सावरायला भगवंतांनी दिलेला धीर उपकारक ठरला.
भगवान् म्हणाले -
धीर धरी, पुस अश्रुसरी,
झणि हो पार्था तू सावध रे
तुज खुळा म्हणू की पंडित रे? ध्रु.
ज्याचा शोक न करणे कधिही
त्यासाठी तू रडसि प्रत्यही
पांडित्याच्या गप्पा करता
वेडेपण दिसते जगास रे!१
तूच सर्व का विश्व निर्मिले
प्राण्यांतरि चैतन्य ओतले
तू न मारले तरि का कोणी
शाश्वत जगती राहिल रे!२
बाल्यानंतर येते यौवन
यौवनांतिही तसे वृद्धपण
जन्ममृत्युचे चक्र सदोदित
नियमित असते फिरते रे!३
अशाश्वताचा शोक नको तुज
सुखदु:खांचा केवळ भासच
सहनशीलता निशिदिनि वाढव
सोसण्यात नित गौरव रे!४
इंद्रियवश जो मानव होई
चैतन्याते विसरून जाई
सुखदु:खांच्या गिरक्यांमाजी
भोवळ चित्ता येते रे!५
जे नाही ते असेल कैसे?
जे आहे ते लोपे कैसे?
तनु नश्वर ही शाश्वत आत्मा
मर्म एवढे जाण बरे!६
ज्यास जन्म ना, मृत्यु न त्याला
आत्मा नच कधि घडला फुटला
वस्त्रांतर करि मानव जैसा
नवतनुशेला पांघर रे!७
जन्मा आल्या मरण ठाकते
मरण पावता जनन लाभते
होणारे ते न चुके कधिही
शोक न त्याचा करणे रे!८
जन्मजात तू क्षत्रिय पार्था
तुला न शोभत अशी भीरुता
धर्मयुद्ध तर क्षत्रियास जणु
दार खुले स्वर्गाचे रे!९
रणी मरशि तर स्वर्गा जाशी
विजयी होता मही भोगशी
युद्धासाठी हो कृतनिश्चय
झटकुन मोहा ऊठ त्वरे!१०
विजय मिळो वा लाभो अपजय
समान दोन्ही समज धनंजय
द्वंद्वातीता युद्ध करी तुज –
पाप न तिळभर लागत रे!११
स्वधर्मदीपक घेउन हाती
पुढे पुढे चालणे संप्रती
अधर्मकंटक निखंदता- अपघाता
तिळहि न वाव उरे!१२
कशास ओझे शिरि वागविशी
नसती चिंता कशास करसी?
कर्तव्याचे धरुनि वल्हे
जीवननौका वल्हव रे!१३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले