Sunday, December 25, 2022

इतना कहना तुम मानो अपने आपको पहचानो

इतना कहना तुम मानो 
अपने आपको पहचानो!ध्रु. 

पार्थ ना केवल पार्थिव है
तेजोनिधि रवि औ शशी है 
बात पते की तुम जानो!१ 

तुम ना कर्ता, भोक्ता हो 
तुम ना कायर बंदी हो 
असीम आत्मा को जानो!२ 

जनन मरण स्वाभाविक है
सहना भी सुखदायक है 
खडे रहो सीना तानो!३ 

जो होगा होता ही है 
अनुचित पीठ दिखाना है 
शशक नही तुम सिंह बनो!४ 

कोऽहं क्या यह सवाल है 
सोऽहं केवल जबाब है
ज्ञानी हो तुम योगी बनो!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.०७.२००४

Saturday, December 24, 2022

शिक्षेचा मी प्रहार हसत झेलला



दोन अलग जन्‍मठेपि जगाआगळा 
शिक्षेचा मी प्रहार हसत झेलला!ध्रु. 

पुनर्जन्‍म सिद्धांता मिळत मान्‍यता 
शासन हे जरि विदेशी हिंदु तत्त्वत: 
शिक्षेचे साहचर्य नित्‍यची मला!१  

योगसूत्र म्‍हणत मनी करिन चिंतना 
भोजनांति मी करीन ध्‍यानधारणा 
मायभूमि वंद्य नित्‍य सस्‍य श्‍यामला!२  

अर्धशतक अर्धशतक घाव मस्‍तकी 
छिन्‍न भिन्‍न जीवन मम येत ध्‍यानि की 
नीलकंठसम पचविन मी हलाहला!३  

काव्‍याचा विषय अता मीच जाहलो 
मीच ध्‍येय मी ध्‍याता येथ राहिलो 
या योगा विश्वांतरि अन्‍य ना तुला!४  

सूडाचे चक्र येथ फिरत गरगरा 
न्‍यायदेवताच भ्रष्‍ट छळत नरवरा 
न्‍यायदान नावाचा खेळ मांडला!५  

मृत्‍युंजय जो असतो मरत ना कधी 
त्‍यास मारणारा नच संभवे कधी 
अनादि मी अनंत मी अवध्‍य मी भला!६  

आपुल्‍याच मरणाने राज्‍य हे सरे 
दास्‍यमुक्‍त राष्‍ट्र मात्र मागुती उरे 
सत्‍याचा सूर्य तिमिरि मीच पाहिला!७  

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 

(स्‍वातंत्र्यवीर सावरकरांना  २४ डिसेंबर १९१० या दिवशी काळ्या पाण्‍याची शिक्षा ठोठावण्‍यात आली होती त्‍या प्रसंगावर आधारित हे काव्‍य)

Friday, December 23, 2022

श्रम कर सुख मिळेल



अंग जरा राबू दे, घाम गळू दे
घाम असा गळुन गळुन भूक लागू दे!ध्रु.

हालचाल करत रहा
बिजलीसम लवत रहा
पीक डुले शेती ते बघत राहु दे!१

मातीचा स्पर्श हवा
कष्टाचा सोस हवा
श्रमिकाला श्याम असा नित्य भेटु दे!२

बागकाम करा फिरा
मोदाचा आत झरा
सौख्याचा मंत्र असा नित्य स्फुरू दे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

संसाराच्या दुःखावरती विजय मिळविते भक्ती!

संसाराच्या दुःखावरती विजय मिळविते भक्ती! 
विजय मिळविते भक्ती!ध्रु.

दुःखाने भगवंत स्मरला 
त्या दुःखाते कैसा विटला 
कोसळोत शिरि भव्य दुःखगिरि सहण्या येइल शक्ती!१

पांडव जरि ते नित वनवासी
परि आठविती श्रीकृष्णासी 
कधी न पडावा विसर हरीचा म्हणती शुद्धमती!२

सुख भ्रामक मृगजळ हे दुसरे 
पाऱ्यासम तळहाती न ठरे 
देव ठेवितो जैसे अपणा तैसे असणे शांती!३ 

स्वाभाविकि आवडी असावी
कृत्रिमतेची ओढ नसावी 
नियुक्त कर्मे अविरत करणे श्रेष्ठ साधना जगती!४ 

आत्मस्थित जो साधक होई
सुखदुःखांच्या अतीत जाई
संतांचे ते असे सुलक्षण द्वंद्वातीत स्थिति ती!५

शरण गेलिया जगदंबेते 
कळिकाळाचे भय ना उरते 
वज्रासम मग कणखर ते मन देही भोगत मुक्ती!६

जर वाटे दुःखा जिंकावे 
तनामनाने संतच व्हावे 
अनुकरणातुनि नकळत कधितरि घडते शिल्पाकृती!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रावर आधारित हे एक काव्य.

Tuesday, December 20, 2022

आलो शरण स्‍वरूपानन्‍दा


ठाव चरणिं मज द्यावा
आलो शरण स्‍वरूपानन्‍दा ! ध्रु. 

सोऽहं ध्‍यानी प्रगती व्‍हावी 
या देही मुक्‍ती लाभावी 
वन्‍दन पदारविन्‍दा! १ 

उदात्तता आचरणी यावी 
मार्दवता भाषणी खुलावी 
मूर्तिमन्‍त आनन्‍दा! २ 

विशालता द्या, निर्मळता द्या 
अगाधता द्या, जिज्ञासा द्या
वितरा मोदमरन्‍दा! ३ 

देहभावना विलया जावी 
सोऽहं जाणिव फुलुनी यावी 
शिकवा या मतिमंदा! ४ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
२३.०३.१९७४

Sunday, December 18, 2022

प्रपंच आणि परमार्थ

 

प्रपंच हा होतच असतो, परमार्थ करावा लागे! 
देहास भुले तो गुरफटला, आत्माच स्मरावा लागे!ध्रु. 

जन्म नि मरण संसार आत्माच एक परि सार 
अभिमान भेद करणार परमार्थि न भेदविकार 
मी कर्ता हे अज्ञान जाणूनि सद्गुरू वागे!१
 
मी कर्ता फल मज हाव त्या प्रपंच ऐसे नाव 
तो कर्ता फलही त्याचे परमार्थी ऐसा भाव 
देहात असूनी नाही मग लेपहि कुठला लागे!२
 
कर्तव्य म्हणुनि कर काम, मुखि असो हरीचे नाम 
मन सहज बने निष्काम, ते सदन शांतिचे धाम 
नाथा घरी चंदन घासे दाविले स्वये श्रीरंगे!३
 
द्वैताच्या पायावरती हा प्रपंच नामक इमला 
सोऽहंचा गंध अमंद परमार्थी दरवळलेला 
हरिनाम सर्व हरि दोष हरिपाठी ज्ञाना सांगे!४
 
जो सजता सजता विटतो तो प्रपंच मायाजाल 
परमार्थ करू जाताना मन बनते सहज विशाल 
हे विश्व निकेतन माझे अदृश्य रेशमी धागे!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, December 15, 2022

स्वरूपसंध्या



सायंकाळी स्वरूप स्मरता
भिरभिरते मन विसावते।
आनंदाचा उगम अंतरी
गुरुकृपेने त्या कळते।।१।।

नित्यपाठ तो नित्य वाचता
ओवी ओवी मनि मुरते।
सामूहिक या अभ्यासाने
माझी काया मोहरते।।२।।

मन पवनाला जोडुन देता
मस्तक थोडे जड होते।
कृपाहस्त मस्तकी गुरूंचा
ऐहिकास मन विस्मरते।।३।।

घर हो पावस घर आळंदी
समाधिमंदिर घर बनले 
आता मैत्री चराचराशी
पालटले मन पालटले।।४।।

नित्यच मजला गुरुपौर्णिमा
प्रासादिकता ये वचनी।
भजनकेंद्र चालवा निरंतर
श्रीरामा ठेवाच ऋणी।।५।।

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

स्वरूपप्रभात

 

मना नाम घे तू मनाशी निवांत
पहा आत झाली स्वरूपप्रभात! ध्रु. 

गुरुमाउली ती कशी पाहते ते 
मने मूल झाला तया जाणवे ते
जरी शब्द ना सूर ते गीत गात!१

कसा मंद वारा कसे गोड ऊन 
विठाई कशी घे मुला सावरून 
अलंकापुरी नांदते पावसेत!२

कसे ध्यान लागे तुला काय चिंता
पहा सद्गुरू तो निवारी अहंता 
दुजाभाव ना तो असा भक्तिप्रांत!३

असा नेम तू नित्य लावून घ्यावा
प्रभाते मनी नाथ चिंतीत जावा
खरा मोद नांदे तुझ्या आत आत!४

जरी अज्ञ श्रीराम तो आर्त झाला
वदे साई स्वामी विसावा मिळाला
समाधीत लाभो तया साधुबोध!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Tuesday, December 13, 2022

रामा, सर्व भार तुजवरी!

रामा, सर्व भार तुजवरी!ध्रु.

देह वाहिला तुझ्याच चरणी
मन गुंतविले तुझिया भजनी
करिन अशी चाकरी!१

तुला स्मरावे तुज पूजावे
सर्वांभूती तुजसि पहावे
रहा सदा अंतरी!२

तुझ्या संगती कष्ट सौख्यमय
तव विरहाने विलास विषमय
हीहि तुझी वैखरी!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २९८, २४ ऑक्टोबर वर आधारित काव्य)

तुझा विसर न व्हावा रामा, हाच वर द्यावा!

तुझा विसर न व्हावा
रामा, हाच वर द्यावा!ध्रु.

व्हावे सर्वस्वी अर्पण
आम्ही तुज दयाघन
मग कृपेचा श्रावण घनघोर बरसावा!१

अनुसंधान राहू दे
पूर्ण निश्चिंत होऊ दे
अहंकारवारा रामा तुझ्या दासा न लागावा!२

मन ऐसे व्हावे धीट
मानो विषयाचा वीट
वाढो तुझ्या नामी प्रीती जोर साधनेत यावा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २९४, २० ऑक्टोबर वर आधारित काव्य)

आवरेना मन, म्हणूनि शरण

आवरेना मन, म्हणूनि शरण
येउनि राघवा धरिले चरण!ध्रु.

कैसा भेटशील?
कैसा पावशील?
ध्यास हाच लागे मज रात्रंदिन!१

मन जेथ गुंते
रहा देवा तेथे
विषयच व्हावा मला नारायण!२

प्रपंच नामात
देवा तूहि त्यात
भजनात लाभो सौख्य समाधान!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २६६, २२ सप्टेंबर वर आधारित काव्य)

माझ्यात राम आहे विश्वात तोच आहे!

माझ्यात राम आहे
विश्वात तोच आहे!ध्रु.

भगवंत अंतरात
भरला कणाकणात 
फुलण्यात हासताहे!१

माझेपणा सुटावा
मी कोण? बोध व्हावा
विश्वी मलाच पाहे!२

जगि राम हाच कर्ता
जगि राम हाच भर्ता
हे तोचि बोधताहे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २७६, २६ ऑक्टोबर वर आधारित काव्य)

तुजशी बोलावे, तुझे नाम घ्यावे

तुजशी बोलावे, तुझे नाम घ्यावे
गाता गाता नकळत माझे मीपण लोपावे!ध्रु.

असे ऐकले नामामागे
तुजला धावत यावे लागे
जीवन माझे तुझिया स्मरणे सार्थकि लागावे!१

वाचा लाभे नाम गावया
चित्त लाभले तुजसी ध्याया
अतूट नाते म्यां भक्ताने तुजसी जोडावे!२

बहिरंगा भुलतसे विकारी
अंतरंग पाही अधिकारी
आत्मारामा अंतरात मी तुजसी निरखावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २५७, १३ सप्टेंबर वर आधारित काव्य)

गुरुदेवा, मज हा वर द्यावा

गुरुदेवा, मज हा वर द्यावा 
सुसंवाद अपुल्याशी व्हावा!ध्रु.

अभ्यासाची आवड लागो 
न्यायनीतिने मानस वागो 
दत्तनाम हा परमविसावा!१
 
नयन मिटावे दर्शन व्हावे 
अंत:करणी आपण यावे 
आचरणी ओलावा यावा!२ 

स्वस्थ आसनी बसता बसता 
उपासना ही सहज वाढता 
भक्तिमार्ग ना कधी सुटावा!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२२.०२.१९८६
(श्रीसद्गुरु साधक सुसंवाद या पुस्तकावरून सुचलेलं काव्य)

Sunday, December 11, 2022

जहां तहां सोऽहम् सोऽहम्

रैन गई और हुआ सबेरा 
मनपंछी गाता सोऽहम्
स्वस्वरूप का स्मरण करो
सुन पाओगे तुम सोऽहम् 
जहां तहां सोऽहम् सोऽहम्। 

सद्गुरुनाथ, मंगलनाथ 
जय नवनाथ, जय श्रीनाथ 
मिटी पहेली अब कोऽहम्। 

डाल डाल पर सुमन खिले 
भाव सुमंगल आके मिले
गूंजी शहनाई सोऽहम्। 

भाग्य उसी का जो जागा 
दूर दूर भवभय भागा 
मनसे पुकारो धन्योऽहम्।

सुन पाओगे तुम सोऽहम्
जहां तहां सोहम सोऽहम्।

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१८.०७.२००४

आठवणीतील गुरुदेवा

आठवणीतील गुरुदेवा 
करवुनि घ्या काही सेवा!ध्रु. 

धर्म सनातन, त्याचे पालन 
श्री गुरुपूजन शुद्ध आचरण
स्वरूपचिंतन हा मेवा!१ 

बसल्या ठायी येते जाता 
शरीर हे रोमांचित होता 
देता दर्शन गुरुदेवा!२ 

कर्ता भोक्ता श्रीनारायण 
स्वस्थ बसावे शिकवी वामन 
अनुग्रहच आहे बरवा!३ 

करुणाकर ही वामनमूर्ती 
वर्ण केतकी सुवर्णकांती 
रसाळ गाणी नित लिहवा!४

अन्न ब्रह्म हे प्रसाद बोले 
आनंदाने डोळे भरले 
कृतज्ञ आम्ही गुरुदेवा!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२६.०६.२००७

मला माधवा सर्व गीता कळावी



"करू काय" हा प्रश्न जेव्हा छळे तो
स्वये जोडुनी हात मी पार्थ होतो
अहंता हरी औषधाला नुरावी 
मला माधवा सर्व गीता कळावी!१
 
यशे होत वेडा अलाभे खचे मी 
कुणी आप्त जाता रडे मी झुरे मी 
परी आत्मसत्ता कळावी वळावी 
मला माधवा सर्व गीता कळावी!२
 
करी कर्म तेव्हा तुझ्या आठवाने 
स्फुरो नाम कृष्णा असे आर्ततेने
सुयोगे अशा चित्तशुद्धी घडावी 
मला माधवा सर्व गीता कळावी!३
 
अरूपा तुझे रूप ते जाणवावे 
गुणातीत तू, मी तुला आळवावे 
तुझी बासरी आत सोऽहं घुमावी 
मला माधवा सर्व गीता कळावी!४

जसा थेंबुटा तो समुद्री बुडाला 
तसा एकला तो अनेकी रिघाला
विनंती अशी खिन्नता लुप्त व्हावी 
मला माधवा सर्व गीता कळावी!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०७.०२.१९८३

राम कर्ता, राम कर्ता ही असू दे भावना

राम कर्ता, राम कर्ता ही असू दे भावना
नाहिशा होतात तत्क्षणि शोक, चिंता, वासना!ध्रु.

नाम देते राम हाती
नाम राही नित्य पाठी
राहु नामी निश्चयो हा तुष्ट करितो तनमना!१

राम म्हणता काम आटे
शूल ही मग पुष्प वाटे
द्वंद्व मिटता देव भेटे - काळजी नारायणा!२

नाम ऐसे शस्त्र आहे
विषयप्रेमा जाळताहे
आग होते शांत सारी गंध लाभे चंदना!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २२१, ८ ऑगस्ट वर आधारित काव्य)

इथे तिथे तू भगवंता मीहि तूच तू भगवंता..

इथे तिथे तू भगवंता
मीहि तूच तू भगवंता!ध्रु.

दुःख कशाला
सुखमय त्याला
एकभाव ऐसा ठसता!१

भाव प्रबळे
शब्द पांगुळे
आनंदाश्रू हे झरता!२

गुरुची आज्ञा
सकला मान्या
तिच्यात दिसशी भगवंता!३

नामचि घ्यावे
काम करावे
कर्तव्य हि तू भगवंता!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २१६, ३ ऑगस्ट वर आधारित काव्य)
भगवंताशी एकरूप झाल्यावर सर्व आनंदच आहे.

चित्त शुद्ध होण्या प्रभूसी भजावे..

चित्त शुद्ध होण्या प्रभूसी भजावे!ध्रु.

दोष दुसऱ्याचा दिसू नये डोळा
चित्ति जागा व्हावा भक्तिभाव भोळा
याचसाठि रामा शरण रिघावे!१

दासबोध हाच सांप्रत सत्संग
बोध बाणताच भक्तिस ये रंग
साधुपण अंगी हळू मुरवावे!२

साधनात मज सद्गुरु दिसावा
आचरणी बोध काही तरी यावा
आयुष्यच सारे तीर्थयात्रा व्हावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २०१, १९ जुलै वर आधारित काव्य)
सद्गुरु ने सांगितलेल्या साधनात राहिल्यानेच गुरुभेटीचे सार्थक होते.

Wednesday, December 7, 2022

दत्तात्रय पाठीशी असता का करिशी चिंता?

दत्तात्रय पाठीशी असता 
का करिशी चिंता? ध्रु. 

दत्त दत्त म्‍हण 
मन हो उन्‍मन 
सोडी चंचलता! १ 

विचार सुचती 
प्रश्‍नहि सुटती 
तो तुज सावरता! २ 

स्‍मर दत्ता रे 
दत्त तुझा रे 
दत्ताची सत्ता! ३ 

दत्तच कर्ता 
दत्त करविता 
ध्‍यानी धर आता! ४ 

अशुभ टळतसे 
शुभच होतसे 
दत्त दत्त जपता! ५ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
२४.०१.१९८९ 
नारायण महाराज केडगाव यांच्‍या चरित्रावर आधारित काव्‍यामधील हे एक काव्‍य

दर्शनास आलो दत्ता

दर्शनास आलो दत्ता, इथे शांत वाटे
इथे शांत वाटे, दत्ता समाधान होते! ध्रु

"दत्त, दत्त," जप हा चाले
चित्त पदी सुस्थिर झाले
भावभरे भरतो ऊर कंठ मात्र दाटे!१

जटाजूट शोभे माथी
करी माळ आणिक पोथी
सुवेष हा अपुला दिसता जुळे गोड नाते!२

कमंडलूमधले नीर
अधीरास बनवी धीर
भलेबुरे सोसत जावे चक्र पाठ देते!३

कामक्रोध अंकित होता
नाग रुळे कंठी दत्ता
भस्म चर्चिता अंगाला पाप भस्म होते!४

शंखनाद सोऽहं गमतो
दीर्घकाळ साधक बसतो
मंत्रमुग्ध होण्यासाठी स्मरण साह्य देते!५

रचयिता :: श्रीराम बाळकृष्ण आठवले
२९.०१.१९८९
नारायण महाराज केडगाव यांच्या चरित्रावर आधारित काव्यातील हे एक काव्य

माझा भार दत्तावरी! तो परमहिताचे करी!


माझा भार दत्तावरी!  
तो परमहिताचे करी! ध्रु. 

दत्त फिरवितो तैसा फिरतो 
दत्त वदवितो तैसा वदतो 
झोळी खांद्यावरी! १ 

दत्तनाम या मुखात येते 
तहान सरते, भूक न उरते 
छत्र मस्‍तकावरी! २

तन दत्ताचे मन दत्ताचे 
मन दत्ताचे धन दत्ताचे 
दत्त वदे वैखरी! ३

मी माझेपण नकळत सरते 
कणकण काया मम मोहरते 
नयनी अश्रूसरी! ४

जेथे जातो दत्तच तेथे 
गुरुदत्ताची प्रचीति येते 
नाचतात लहरी! ५

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
२४.०१.१९८९ 
नारायण महाराज केडगाव यांच्‍या चरित्रावरील काव्‍यातील हे एक काव्‍य

अनन्‍यभावे शरण तुला मी, आलो श्रीरामा!



गोंदवलेकर महाराज प्रवचन १८७, ५ जुलै वर आधारित काव्‍य 

अनन्‍यभावे शरण तुला मी, आलो श्रीरामा! ध्रु.

अशीच सेवा करवुनि घेई 
हीच विनवणी तुझिया पायी 
दर्शन मिळण्‍या सुपात्र ठरण्‍या उच्‍चारिन नामा! १

घरातला तू कुणी वाटते
अबोध काही जुळले नाते 
सुखदु:खे सांगावी तुजला रे गुणैकधामा! २

प्रारब्‍धाचे भोग ललाटी 
विधिने जे जे लिहिले असती 
भोगण्‍यास दे अपार शक्‍ती, नामी दे प्रेमा! ३

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

Monday, December 5, 2022

सोडुनि दे नोकरी, गणू रे सोड सोड नोकरी!ध्रु.

सोडुनि दे नोकरी, गणू रे सोड सोड नोकरी!ध्रु. 

बूट पुसाया काय जन्‍मलो? 

विसरलास का येथे आलो! 

करावी रामाची चाकरी! १ 


तुझी काळजी भगवंताला 

कारण नसता भिसी कशाला? 

ठेवि तव ओझे रामावरी! २ 


कल्‍याणास्‍तव तुझ्या सांगतो 

पांगुळगाडा टाकुनि दे तो 

पंगु हि लंघित गिरी! ३ 


कवित्‍व आहे तुझ्या ठिकाणी 

ते लावावे रामकारणी 

संकीर्तन तू करी! ४ 


मोह सोड तू अशाश्‍वताचा 

करि विचार तू “मी कोणाचा?”

हो जागृत झडकरी! ५ 


रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 


भूपाळी श्रीकृष्णाची


प्रभातकाली तुझी बासरी मधुर मधुर ऐकली! 
शीणभाग सरलासे सारा सुखद जाग आली!ध्रु. 

श्रीकृष्णा तव हसरी मुद्रा अवचित मज दिसली 
अनुभूतीने अंगांगावर रोमावलि उठली
हसतमुख सदा त्या संतांना श्रीगीता कळली!१

गीता गाता भान हरपते साधे समरसता 
विषाद सरला प्रसादलाभे अनुग्रहच घडता 
मस्तक लवले कृतज्ञतेने नयनदले भिजली!२
 
उद्धारावे आपण अपणा विवेक हा सोबती 
विकारविलसित जाता विलया उरली विश्रांती 
नित्य नवा दिस साधकवृंदा दसरा दीपावली!३ 

श्यामसुंदरा, हे घननीळा कसा लागला लळा 
सदनोसदनी आला बहरा भक्तीचाच मळा 
आपआपली कामे करण्या जनता सरसावली!४ 

पीतांबर कसणारा शेला हिरवागार भला 
गोड गुलाबी उपरणे तसे साजे तव तनुला
श्रीरामाच्या मनोमंदिरी कृष्णमूर्ति ठाकली!५ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०६.०७.२००९

आरती श्रीकृष्णाची

जय देव जय देव जय जय श्रीकृष्णा
आरति ओवाळिता  नयनी गंगायमुना!ध्रु. 

गोप नि गोपी आम्ही जन्मोजन्मीचे
आतुरलो श्रवणाला भगवद्गीतेचे
कर्मयोगाला कोठे ना तुलना!१ 

हे मुरलीधर गिरिधर गोंडस गोविंदा
पापवासनांचा कर चेंदामेंदा
आनंदकंदा श्रीनंदनंदना!२ 

हासत खेळत जगणे जीवन या नाव
अवखळ त्या मनाला अभ्यासा लाव
फुंकर घालुनि वाजव मुरली मोहना!३

थोरांमाजी थोर थोर सानांत सान
गवळी गोपगडी तू कृष्ण किसान
चराचरामध्ये तुझी चेतना!४ 

समाधान हाच योगांचा योग 
तोच घालवितो रोगांचा रोग 
धन्वंतरी रामा जगदीशा कृष्णा!५ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, December 4, 2022

सज्जनगडला चला


सज्जनगडला चला, 
सुजन हो, सज्जनगडला चला!ध्रु.

वायुलहर अंगावर येते 
पाउल भरभर पुढती पडते 
चिंतन करुया चला!१ 

समर्थ जेथे, मारुती तेथे 
मारुती तेथे, राघव भेटे 
अनुभव घ्या, घ्या, चला!२ 

चढण चढाया सोपी जाई 
रामदास गुरु संगे राही 
नेट धरुया चला!३ 

केविलवाणे कशास व्हावे 
यत्न देव पुरते जाणावे
स्तोत्र आळवा चला!४

थंडीही उबदार होतसे 
पाऊस गुलाबपाणी भासे 
हासत खेळत चला!५ 
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१८.१०.२००४

आहेस तू, नाहीच मी



गोंदवलेकर महाराज प्रवचन २५३, ९ सप्‍टेंबर वर आधारित काव्‍य 
("तू आहेस, मी नाही" ही स्थिती जेव्‍हा नामस्‍मरणाच्‍या योगाने आपली होईल तेव्‍हाच परमेश्‍वर आपण जोडला किंवा मी परमेश्‍वराचा झाालो असे सार्थपणाने म्‍हणता येईल)

नाम घेता रमत रामीं 
बोल येती कुठुनि कानीं 
“आहेस तू, नाहीच मी” ! ध्रु. 

जे पहावे त्‍यात दिसशी 
श्रवणि यावे त्‍यात असशी 
बंध पडती पामराला मुक्‍त मी आनंद मी! १  

शरण जाण्‍या भीति कसली? 
नामरंगी भक्ति हसली 
देवबुद्धि सूर्य उगवे देह बुद्धीच्‍या तमीं ! २ 

ध्‍यास लागो रामराया 
आवरी तव घोर माया 
चंचला वृत्ति स्थिरावी मी रहावे सौख्‍यधामीं ! ३  

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले